घरफिचर्सकोरोना : दुप्पट ताकदीने परतला

कोरोना : दुप्पट ताकदीने परतला

Subscribe

गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून कोरोनारुपी संकट आपल्या मानगुटीवर बसले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न जरी करत असलो तरी कोरोनाची नव-नवीन रुपे आपल्या समोर संकटाप्रमाणे उभी आहेत. कोरोनाचे संकट काही काळासाठी दिलासा देते. मात्र, जेव्हा परतून येते तेव्हा त्याचा धोका अधिक वाढलेला असतो. याचे कोरोनारुपी संकटावर आपाल्याला मात करायची असेल तर विविध नियमांचे पालन करण्यासोबत लसीकरण करण्याची गरज असल्याचे दिसून येते. या कोरोनारुपी संकटाने ना भूतो ना भविष्यती अशी त्याची रुपे दाखवून दिली आहेत. त्यामुळे आगामी काळातही हे संकट आपल्यासोबत असणार आहे. मात्र, त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला अधिकाधिक सज्ज राहणे गरजचे आहे. गेल्या वर्षभरात या संकटाचा देशांतर्गत प्रवास कसा राहिला त्याचा आढावा घेणारा हा लेख…

2020 च्या डिसेंबरमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आगामी वर्षात 2021 मध्ये या संकटाला तोंड देऊन पुन्हा पूर्वीसारखे जगू असे वातावरण पसरले होते. कारण नववर्षात लसीकरण सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. 2021 उजाडले आणि अवघ्या दोन दिवसांनंतर तिसर्‍याच दिवशी दोन लसींना मंजुरी दिल्याची आनंदाची बातमी समोर आली. 3 जानेवारीला सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली. त्यामुळे भारतीयांच्या मनात यावर्षी कोरोना आटोक्यात येणार, असा विश्वास आणखी दृढ झाला. या दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना मंजुरी मिळाल्यानंतर 10 दिवसांत देशभरात लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. त्यापूर्वी लसीकरण देण्याची संपूर्ण देशभरात रंगीत तालीम सुरू झाली. लस देण्यापासून तिचा पुरवठा करण्यापर्यंतची संपूर्ण तयारी देशात करण्यात आली. या रंगीत तालीम दरम्यान अनेक अडथळे आले, पण तरीही त्यावर मात करून 16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

- Advertisement -

लसीकरणाचा पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सपासून सुरू झाला. यादरम्यान कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. 1 मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यास सुरुवात झाली. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा पहिला डोस घेऊन एकजुटीने भारताला कोरोनामुक्त करुया, असे देशवासीयांना आवाहन केले. मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. यादरम्यान देशात लसीचा तुटवडा, रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर आणि आरोग्यसंबंधित साहित्यांचा तुटवडा भासण्यास सुरुवात झाली. देशात नवीन कोरोनाबाधित आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे अशा परिस्थितीत लसीकरण आणखीन वेगाने करण्यासाठी कोविन अ‍ॅपची सुरुवात केली.

देशात दररोज लाखो कोरोनाबाधितांची नोंद होत होती. 30 एप्रिल 2021 रोजी पहिल्यांदा देशात 24 तासांत 4 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. तरुण मंडळी कोरोनाचे शिकार होत होते. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा किती भयानक रुप धारण करेल याची कोणालाच कल्पना नव्हती. दुसर्‍या लाटेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत होते.सरकारसमोर कोरोना संकटावर मात करण्यासह लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आव्हान होते. सातत्याने आरोग्य विभागांकडून लसीकरणबाबत जनजागृती केली जात होती.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव अधिक होता. यादरम्यान ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस याचा तुटवडा अधिक भासत होता. ऑक्सिजन अभावी अनेक जणांचा मृत्यू होत होता. देशातील ऑक्सिजनची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून बरेच प्रयत्न सुरू होते. त्यानंतर ऑक्सिजन वाढता तुटवडा पाहून केंद्राने वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून ऑनलाईन पद्धतीने मागवण्याची परवानगी दिली. पावसाळा आणि जून महिना सुरू झाल्यानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीची दहशत पसरली.

म्युकरमायकोसिसवर मात करण्यासाठी अ‍ॅम्फोटेरेसिनी-बी इंजेक्शन वापर होऊ लागला. या कोरोनाच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत होती. रेमडेसिवीरप्रमाणे अ‍ॅम्फोटेरेसिनी-बी इंजेक्शनची देखील जास्त पैशात विक्री जास्त होत होती. या काळ्या बुरशीच्या संकटादरम्यान पांढर्‍या, पिवळ्या, हिरव्या बुरशीची लागण झालेले लोक आढळू लागले होते. तसंच झिका व्हायरसने देखील देशात प्रवेश केला होता. पण दुसर्‍या बाजूला हळूहळू दुसरी लाट नियंत्रण येऊ लागली होती. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू संख्या कमी होऊ लागली. पण तिसर्‍या लाटेचे संकेत दिले जात होते. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला गेला. अमेरिका, चीन यासांरख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत भारतात वेगाने लसीकरण सुरू होते.

सप्टेंबर महिन्यांत देशातील विविध राज्य पुन्हा एकदा अनलॉक होण्यास सुरुवात झाली. दुसर्‍या लाटेदरम्यान मुंबई प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राबवलेल्या मॉडेलचे जगभरात कौतुक झाले. जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेने मुंबई मॉडेलचे कौतुक केले. 21 ऑक्टोबर 2021 रोजी 277 दिवसात भारताने लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला. पण ऑक्टोबर महिना ओलांडल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत पसरली. पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुपाची भीती संपूर्ण जगभरात जाणवू लागली.
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट डेल्टा पेक्षा कमी घातक असून त्यापेक्षा दुप्पट वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. 2 डिसेंबर 2021 ला भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाला. कर्नाटकात पहिल्या दोन ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली. देशात हळूहळू ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले. 21 दिवसांत ओमायक्रॉनचे 15 राज्यात रुग्ण आढळले. तर आताच्या घडीला 200 हून अधिक ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनचा धोका आता असला तरी पुढच्या वर्षी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू, असा दावा केला आहे. तसेच कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट महामारीचा शेवट करेल, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे 2021 या वर्षाची सुरुवात लसीकरणाच्या सकारात्मक मोहिमेतून झालीच, तशीच 2022 या नवीन वर्षाची सुरुवात कोरोनामुक्त भारत या आशादायी प्रेरणेतून होत आहे, हे स्वागतार्ह आहे.


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -