घरफिचर्सथोडं ‘पीटर ओ’टूलसंबंधी...

थोडं ‘पीटर ओ’टूलसंबंधी…

Subscribe

अगदी देखणा, राजबिंडा म्हणावा असा... निळ्याशार डोळ्यांचा ‘पीटर ओ’टूल हा अभिनेता. स्टार नसला तरी तितकाच लोकप्रिय. विविध छटांच्या भूमिका समर्थपणे करणारा अभिनेता. मुळात नाट्यकर्मी. तेच त्याचं पहिलं प्रेम आणि ते नेहमीच जागं होतं. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत एवढं यश मिळाल्यानंतरही रंगभूमीबद्दलची आपुलकी जपणारा. नुसतं बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीनं दर्शवणारा. मात्र प्रेक्षकांना तो चित्रपट अभिनेता म्हणूनच माहीत आहे. त्याची नाटकं पाहण्याची संधी आपल्याला मिळाली नाही. ते भाग्य लाभलं इंग्लंड आणि अमेरिकेतील प्रेक्षकांना. त्यामुळे आपल्याला भारतात जे प्रदर्शित झाले, त्या चित्रपटांतील कामगिरीच केवळ ठाऊक आहे.

खरं तर मूळ योजनांप्रमाणे सारं झालं असतं, तर ‘क्लिओपात्रा’त तो मार्क अँटनी आणि ‘डॉक्टर डू लिटल’ मध्ये तो डॉक्टर डू लिटल बनला असता. वास्तवात यापैकी काहीच घडू शकलं नाही. त्यामुळेच अशा चांगल्या भूमिका करण्याची संधी त्याला गमवावी लागली. एकदा नव्हे, तर बर्‍याचदा आणि तरीही ‘पीटर ओ’टूल केवळ आपल्या अभिजात कलागुणांमुळेच चांगला अभिनेता बनला. त्याने साकारलेला लॉरेन्स ऑफ अरेबिया, एवढा प्रभावी होता की, डेव्हिड लीनचा परिसस्पर्श लाभलेला तो चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण पीटरला लॉरेन्स म्हणूनच ओळखू लागले.

हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी प्रत्यक्ष लॉरेन्सला पाहणारे अनेक लोक हयात होते. त्यांच्या सांगण्यानुसार त्या दोघांच्यात खूपच फरक होता. अगदी चटकन जाणवेल असा. कारण खरोखरच्या लॉरेन्स ऑफ अरेबियापेक्षा पीटर उंचीने खूपच जास्त होता. तरीही त्याला लॉरेन्स म्हणणं कुणालाही खटकलं नाही. केवळ त्याच्या त्या भूमिकेत झोकून देण्यानं आणि अर्थातच त्याच्या अभिनय सामर्थ्याच्या प्रभावामुळं. रंगमंच-नाटक हेच पीटरचं पहिलं प्रेम, त्याचं ध्येय होतं. रंगमंचावरील त्याच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. केवळ त्यानेच आपल्या नाटकात भूमिका करावी म्हणून कित्येकदा कार्यक्रमांच्या वेळापत्रकातही बदल केला जात असे. महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कोणत्याही निर्मात्याला वा दिग्दर्शकाला कधीही पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. उलट आपल्या निर्णयाबाबत त्यांना समाधानच लाभलं.

- Advertisement -

आपण जीवनात काय करायचं हे त्याला समजलं होतं. त्याला नाटक शिकायचं होतं. त्यासाठी त्याला रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामा ‘राडा’ मध्ये प्रवेश घ्यायचा होता. रुपेरी पडद्यावर अमाप लोकप्रियता मिळाल्यानंतरही त्याचं रंगमंचाचं प्रेम कणभरही कमी झालं नव्हतं. संधी मिळताच तो तेथे विविध भूमिकांत प्रभाव दाखवत राहिला. ‘गुडबाय मिस्टर चिप्स’, ‘लायन इन किंटर’ आणि ‘द नाइट ऑफ द जनरल्स’ असे त्याचे इतर चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या कामावर फिदा न झालेला प्रेक्षक शोधूनही सापडणं अवघडच. तरीही पीटर ओटूल म्हणताच डोळ्यापुढे येतो, लॉरेन्स ऑफ अरेबिया.


– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -