घरफिचर्सचित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

Subscribe

दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. दादासाहेब हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले (१८९०).

१९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. १९०९ मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले (१९११). यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले.

- Advertisement -

स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित झाला (३ मे १९१३). राजा हरिश्चंद्रच्या यशाने खर्‍या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटानंतर त्यांनी ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३ ), ‘सत्यवान सावित्री’ (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली. १९१७ मध्ये त्यांनी ‘लंकादहन’ हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. अशा या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -