घरफिचर्सबेफिकीर मुंबईकरांना धोक्याचा इशारा

बेफिकीर मुंबईकरांना धोक्याचा इशारा

Subscribe

मुंबईची लोकसंख्या १२० लाख असून त्यातील ९० लाख लोकसंख्या ही स्लम अर्थात झोपडपट्टीत राहते. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही कच्च्या घरात राहते. त्यातही पत्र्याच्या खोल्या, १० बाय १० च्या खोल्या, अस्वच्छता आणि नाल्याजवळच शौचालयाला बसणार्‍यांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. अशावेळी धारावीसारख्या झोपडपट्टीत एखाद्या चाळीत अथवा विभागात करोनाचा रुग्ण आढळला तर किमान तीन किलोमीटरच्या परिघात कमीत कमी लाखभर लोकांची करोना टेस्ट करावी लागेल. त्यात आपल्याकडे असणार्‍या पीपीई किटची कमतरता या गोष्टी लक्षात घेता आपणच आपली काळजी घेतली तर यंत्रणांवर येणारा ताण कमी होईल. त्यामुळे अनावश्यक बाहेर पडणार्‍यांना घरातून, नंतर चाळीतून, कॉलनीतून विरोध व्हायला सुरुवात झाली आणि उगाचच घराबाहेर पडणार्‍यांची नावे पोलिसांना कळविल्यास गर्दी कमी होऊ शकते.

सध्या देशभरात सर्वत्र करोनाचा संसर्ग रोखणे यावरच सार्‍या यंत्रणा काम करीत आहेत. ज्या ज्यावेळी भारताचा उल्लेख येतो तेव्हा साहजिकच मुंबईचा संदर्भ येतो. कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. सार्‍या जगाचे लक्ष मुंबईवर असते. सध्या करोनाच्या काळातही मुंबईत काय चालले आहे, करोनाचे रुग्ण किती झाले, मृत्यू किती आणि उपाययोजना काय सुरू आहेत यावर सर्वांचेच लक्ष आहे. मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा जर पाहिला तर तो 1018 होता आणि मृत्यू होते ५6 जणांचे. त्यामध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक असून मुंबईत करोनाचे रुग्ण आहेत 652 आणि मृत्यू आहे ३५ जणांचा. करोनाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवले तर लक्षात येते की राज्यातील एकूण रूग्णसंख्येच्या निम्मी रुग्णसंख्या राज्यातील आहे आणि मृत्यूचा दरही राज्याच्या तुलनेत दोन तृतियांश आहे. त्यामुळे मुंबई ही करोनासाठी हॉटस्पॉट ठरली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

करोनाने जगातील १९० हून अधिक देशांना विळखा घातला आहे. ज्या चीनमधून करोनाची उत्पत्ती झाली त्या सर्वाधिक १५० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या चीनने कडक उपाययोजना करून आता १०० दिवसांनंतर जनजीवन सुरळीत झाल्याचा दावा करीत आहे. मात्र अमेरिका, इटली आणि स्पेनची आरोग्य व्यवस्था अपग्रेड असतानाही मागील तीन दिवसांत हजारो जणांचे प्राण कुणीही वाचवू शकलेले नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमधील १४ व्या दिवशी देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

देशभरात आणि राज्यात करोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’, या म्हणीप्रमाणे मुंबईकर आणि राज्यातील जनता ही सरकारच्या सुचनेनुसार घरीच आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर न पडणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे हाच सध्या तरी करोनावर रामबाण उपाय आहे. खबरदारी म्हणून देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन लावल्यानंतर आता प्रत्येकजण १४ एप्रिलची वाट बघत आहे. पण आर्थिक राजधानी मुंबईची गर्दी थांबवण्यासाठी मुंबई बंद करूनही करोनाच्या संसर्गाला आळा बसत नसल्याने महापालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि राज्य सरकारपुढे नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी ८ वॉर्ड हे डेंजर झोनमध्ये असून, याच भागात करोना पॉझिटिव्हच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

यातील बहुसंख्य भाग हे स्लम असून, या झोपडपट्टीतील करोनाचा शिरकाव थांबवायचा कसा असा प्रश्न यंत्रणांपुढे आहे. धारावी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवडी, डोंगरी, कुर्ला,अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, वरळी आणि सायन कोळीवाडा भागात करोनामुळे कॉलनी आणि झोपडपट्ट्या सील कराव्या लागत असल्याने आता यावर आणखी काही कडक उपाययोजना केल्या नाही तर मुंबईत करोनाला रोखणे कठीण होऊन जाईल. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता मुंबई महानगर क्षेत्रावरही लक्ष ठेवावे लागेल. वारंवार सांगूनही घराबाहेर पडणार्‍यांना वेळ पडल्यास जेलमध्ये टाका, जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करा जेणेकरुन आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कुणी करणार नाही. सध्या सुशिक्षित मुंबईकरांप्रमाणे अशिक्षित मुंबईकरांचाही भरणा आहे. सिर्फ काली खाँसी है असा गैरसमज असून काही दिवसांत खोकला बरा होईल असा समज काही समाजात आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेसी, पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या कशी कमी करता येईल यावर दिवस-रात्र अभ्यास करीत आहेत. काही एनजीओ, होमगार्ड्स यांच्या मदतीने आता १९० हून अधिक पॉईंटसवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईकरांची त्यांना साथ मिळणे आवश्यक बनले आहे. मुंबईची लोकसंख्या १२० लाख असून त्यातील ९० लाख लोकसंख्या ही स्लममध्ये राहते. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही कच्च्या घरात राहते. त्यातही पत्र्याच्या खोल्या, १० बाय १० च्या खोल्या, अस्वच्छता आणि नाल्याजवळच शौचालयाला बसणार्‍यांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. अशावेळी धारावीसारख्या झोपडपट्टीत एखाद्या चाळीत अथवा विभागात करोनाचा रुग्ण आढळला तर किमान तीन किलोमीटरच्या परिघात कमीत कमी लाखभर लोकांची करोना टेस्ट करावी लागेल. त्यात आपल्याकडे असणार्‍या पीपीई किटची कमतरता या गोष्टी लक्षात घेता आपणच आपली काळजी घेतली तर यंत्रणांवर येणारा ताण कमी होईल. त्यामुळे अनावश्यक बाहेर पडणार्‍यांना घरातून, नंतर चाळीतून, कॉलनीतून विरोध व्हायला सुरुवात झाली आणि उगाचच घराबाहेर पडणार्‍यांची नावे पोलिसांना कळविल्यास गर्दी कमी होऊ शकते.

सध्या चीननंतर अमेरिका, इटली आणि स्पेनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आपत्तीजनक परिस्थिती असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी भारताकडे अजून किमान एक आठवड्याचा कालावधी आहे. भारतात सध्या करोना दुसर्‍या टप्प्यात आहे. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुंबईसह देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह मेट्रो सीटीला बसला आहे. केंद्राच्या लॉकडाऊनपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच शहरे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन केली होती. जमावबंदी लावली होती. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी सर्वात पहिले पाऊल राज्यानेच उचलले.

महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठा व्यावसायिक भाग म्हणून मुंबई आणि महानगर (MMR) क्षेत्राकडे पाहिले जाते. या क्षेत्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर (काही भाग) आणि रायगड (काही भाग) असे पाच जिल्हे येतात. याच भागात ९ महानगरपालिका आणि तेवढ्याच नगरपालिका येतात. भारतातील बहुतांश मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. बँक, उत्पादक कंपन्या, सेवा क्षेत्र यांची मुख्यालये मुंबई आणि परिसरात असल्याने मुंबईला करोनाला रोखण्याबरोबर आर्थिक तोटा कसा भरून काढायचा हाही प्रश्न आहे. मुंबई महापालिकेकडे असणारा कर्मचारी वर्ग आणि त्यांच्यावर येणारा ताण पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी महापलिका आणि राज्य सरकारने तात्काळ आवश्यक वाटल्यास नोकरभरती करणे गरजेचे बनले आहे. मागील कित्येक वर्षे उमेदवारांची नावे केवळ वेटिंग लिस्टवर असणार्‍यांना नोकरी उपलब्ध करून दिल्यास कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होईल. त्यामुळे मुंबईकरांची तपासणी, सॅम्पल्स आणि वैद्यकीय सेवा देणे सोयीचे ठरेल. आपत्कालीन स्थितीमध्ये आपण असल्याने आपल्यासाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान ठेवणे हे आपल्या सर्वांचेच काम आहे.

डॉक्टर्स, पोलिसांवर हात उगारणार्‍यांचे हात उपटलेच पाहिजेत. जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यासाठी गृहखात्याने लक्ष घालावे. तसेच दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजला गेलेल्यांनी स्वत:हून पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे जे माहिती लपवतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे झाले आहे. मात्र त्यांच्या बचावासाठी राजकीय पक्षांनी व्होटबँकेचे राजकारण करू नये. अन्यथा जगभरातील करोनाचा संसर्ग कडक उपाययोजनांमुळे आटोक्यात येईल; पण मुंबईचा करोना हा इथेच मुक्कामी राहील. तसेच मुंबईकरांमधील बेशिस्तपणा, बेफिकीरपणा आणि बेपर्वाईपणा आटोक्यात आला नाही तर आपल्याला कुणीही वाचवू शकत आही. कारण मुंबईची घनता आणि लोकसंख्येचा विचार केला तर आपण एका चौरस मीटरमध्ये २४ जण राहतो. ज्यावेळी लॉकडाऊन उठेल तेव्हा लोकल, बस, रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीत आपण सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार हाच मोठा सवाल आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. काळजी घेणार्‍या यंत्रणांना सहकार्य करा. माहिती लपवू नका. अनावश्यक फिरणे टाळा आणि घरीच बसा.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -