घरफिचर्सहे व्यर्थ न हो बलिदान! वीरपंड्या कट्टाबोम्मन

हे व्यर्थ न हो बलिदान! वीरपंड्या कट्टाबोम्मन

Subscribe

ब्रिटिश त्यांच्या पद्धतीने खटला चालवून कट्टाबोम्मनला फाशीची शिक्षा देतात. तेथेही तो इतर कुणाला स्वतःच्या गळ्याला फास अडकवू न देता, स्वतःच फास गळ्यात अडकवून मरण पत्करतो. उपस्थित हजारो प्रजाजन त्याला नमस्कार करतात. कालांतराने ब्रिटिश राजवटीचा शेवट झाल्याने युनियन जॅक उतरताना आणि तेथेच तिरंगा फडकताना दाखवून चित्रपट संपतो.

तमिळनाडूमधील एका छोट्या राज्यात इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या एका देशभक्ताची कहाणी सांगणारी ही कथा आहे. ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराबरोबरच राजकारण करून भारताचा मुलुख गिळंकृत करू लागली होती, त्या काळातील एका योद्ध्याची. असे लढवय्ये स्वातंत्र्य योद्धे देशात सगळीकडेच होते. आपल्याला त्यांची फारशी माहिती नसते इतकेच. देशातील अन्य प्रांतांप्रमाणेच तमिळनाडूतही त्यांना विरोध करणारे होते, आणि दुर्दैवाने त्यांच्या कावेबाजपणाला भुलून केवळ स्वार्थ पाहणारे देशद्रोहीदेखील होते. परकीयांविरुद्ध प्राणाची बाजी लावून लढणार्‍यांची कहाणी देशातील सर्वांनाच आवडते. ती पडद्यावर प्रभावीपणे साकार झाली, तर प्रेक्षकही तो चित्रपट पाहण्यासाठी वारंवार चित्रपटगृहात जातात, (किंवा असत, असे म्हणूया. कारण आता, विज्ञानाच्या कृपेने घरातच असे चित्रपट पाहण्याची सुविधा आहे.) देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण हे यातून स्पष्ट होत होते. राजाला चांगला सल्ला देणारे देशद्रोही नसून देशभक्तच असतात, त्यांची कदर करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते हे या चित्रपटांतून आपल्याला समजते.

वीरपंड्या कट्टाबोम्मन हा पंचलंकुरिची येथील शूर राजा आहे. एकदा आपल्या प्रदेशात चोरी झाल्याची बातमी त्याला समजते. तो आणि त्याचे शिपाई वेषांतर करून त्या चोरांना पकडतात. पण चोर जबानीत आपल्याला ब्रिटिशांनीच कट्टाबोम्मनच्या प्रदेशात उठाव करण्यासाठी पाठवले, असे सांगतात. ब्रिटिश शेजारच्या प्रदेशातील एट्टाप्पन या राजालाही त्याने कट्टाबोम्मनविरुद्ध आपल्याला मदत करावी म्हणून लालूच दाखवून फितवतात. पंचलंकुरिचीजवळच्या गावात राहणारी वेलैयम्मल तिच्या आवडत्या बैलाला कट्टाबोम्मनने आयोजित केलेल्या जल्लीकट्टू या खेळात जो नमवेल, त्याच्याबरोबर लग्न करण्याची शपथ घेते. कट्टाबोम्मनचा सेनापती वेल्लैयतेवन तो पण जिंकतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. राजाला हे कळल्यावर तो त्यांना लग्न करायला सांगतो.

- Advertisement -

राजाला जॅकसन या ब्रिटिश करवसुली अधिकार्‍याचा त्याने रामनाथपूरम येथे कराच्या संदर्भात आपली भेट घ्यावी म्हणून संदेश येतो. राजाच ब्रिटिश स्नेही डेव्हीसन त्याला ते मान्य करायला सांगतो. जॅकसनला राजा आपल्या फौजेसह आल्याचे कळते, म्हणून तो एकांतात भेट घ्यावी असे सांगतो. त्या भेटीच्यावेळीच राजाला पकडण्याचा प्रयत्न ब्रिटिश सैनिक करतात. पण तो त्यांच्याबरोबर लढून तेथून निसटतो. मात्र त्याचा मंत्री पिल्लै मात्र पकडला जातो. नंतर पिल्लै परत आल्यावर जॅकसनला डेव्हीसनच्या सांगण्यावरून इंग्लंडला परत धाडल्याचे सांगतो. ब्रिटिश कर्नल लुशिंग्टनचा दूत पिल्लैच्या लोकांनी श्रीवैकुंठम येथे आपले धान्य लुटून त्यांच्या माणसांना मारले, असे सांगतो. राज्यातील दुष्काळामुळे आपण हे कृत्य करायला सांगितले असा बचाव पिल्लै करतो. पण त्यामुळे खजिल झालेला कट्टाबोम्मन त्याच्यावर चोरी आणि खून केल्याचा आरोप करतो. पिल्लै माफी मागतो आणि कैदी म्हणून ब्रिटिशांच्या ताब्यात जायची तयारी दाखवतो, पण राजा त्याला नकार देतो. लुटलेल्या धान्याबद्दल तो नुकसान भरपाई देऊ करतो. पण लुशिंग्टन ते अमान्य करतो आणि मेजर बॅनरमन आणि एट्टाप्पन यांच्या मदतीने पंचलंकुरिचीवर, सर्व लोक तिरुचेंदुरच्या उत्सवात गर्क असताना, आक्रमण करायचे ठरवतो. कोट्टाबोम्मनचा गुप्तहेर सुंदरलिंगम त्याला हे कळवतो. युद्धाची तयारी सुरू होते.

युद्धावर निघालेल्या वेलैयम्मलला तिचा पती वेलैयतेवनला जाऊ नको. कारण मला अतिशय अशुभ स्वप्ने पडली, त्यामुळे भीती वाटते असे सांगते. पण तो युद्धावर जातो आणि घायाळ होतो. वेेलैयाम्मल त्याला मारणार्‍याचा वध करून त्याच्या मृत्यूचा बदला घेते. हे सांगण्यासाठी परत येते तेव्हा तिला वेलैयतेवनचे पार्थिव दिसते तेव्हा ती तेथेच प्राण सोडते. बॅनरमनच्या फौजा मोठ्या तयारीने पंचलंकुरुचीवर आक्रमण करतात. कट्टाबोम्मनच्या सैन्याची मोठी हानी होते तोही जखमी होतो. त्याला त्याचा भाऊ ऊमैतुराई वाचवतो. आता किल्ला पडणार हे हेरून तो आणि कट्टाबोम्मन वेषांतर करून शेजारच्या पदुकोट्टी या राज्यात जातात. मंत्री त्याचाच पोषाख करून ब्रिटिश सैनिकांना चकवतो. ब्रिटिश फौजा त्याच्या मागावर तेथे पोहोचतात. तेथील राजाला ते कट्टाबोम्मनला ताब्यात देण्यास सांगतात. ब्रिटिशांना घाबरून तो तयार होतो. पण कट्टाबोम्मन म्हणतो, विश्वासघात तर झाला आहे आता त्याने पकडण्याची वाट कशाला पाहायची मी स्वतःच त्याच्या स्वाधीन होतो. ब्रिटिश त्यांच्या पद्धतीने खटला चालवून कट्टाबोम्मनला फाशीची शिक्षा देतात. तेथेही तो इतर कुणाला स्वतःच्या गळ्याला फास अडकवून देता, स्वतःच फास गळ्यात अडकवून मरण पत्करतो. उपस्थित हजारो प्रजाजन त्याला नमस्कार करतात. कालांतराने ब्रिटिश राजवटीचा शेवट झाल्याने युनियन जॅक उतरताना आणि तेथेच तिरंगा फडकताना दाखवून चित्रपट संपतो.

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटांतील त्याकाळच्या प्रथेनुसार यात नाच गाण्यांची खैरात-तब्बल बारा गाणी आहेत. संगीत ः जी रामनाथन. त्यामुळे चित्रपटाची लांबीही अठरा हजार फुटांपेक्षा जास्त आहे. अर्थात, पे्रक्षकांना त्याची फिकीर नसावी. कारण सर्वत्र या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला होता. इतकेच नाही तर अनेकदा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 1984 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी त्याला करमाफीही दिली होती. नंतर त्याची तेलुगूमध्ये ‘वीरपंड्या कट्टाब्राह्मण’ या तर हिंदीतही ‘अमर योद्धा’ या नावाने निर्मिती झाली होती. राष्ट्रीय पारितोषिकांत त्याला सर्वोत्तम तमिळ चित्रपट म्हणून गौरवले गेले होते.

कट्टाबोम्मनच्या भूमिकेत शिवाजी गणेशन आहे. जेमिनी गणेशन वेलैयतेवनच्या तर पद्मिनी वेलैयम्मलच्या भूमिकेत आहेत. एट्टाप्पन म्हणून व्ही. के रामस्वामी, तर बॅनरमन म्हणून जवर सीतारामन आहेत. पिल्लैची भूमिका शिवसुब्रह्मण्यम तर सुंदरलिंगमची ए. करुणानिधी यांची आहे. कन्नन-जॅकसन, बेबी कांचन-मीना, याखेरीज अनेक आहेत.

दक्षिणेतील प्रख्यात अभिनेते शिवाजी गणेशन यांनाही अशा प्रकारचा लढवय्या व्हावे, असे कट्टाबोम्मनची कथा ऐकल्यावर लहानपणापासूनच वाटत होते. त्यामुळे ते सातव्या वर्षीच हे स्वप्न पुरे करण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण तो योग, बर्‍याच नंतर, आधी नाटकात आणि नंतर चित्रपटात आला. मोठेपणी एकदा ते त्यांचे स्नेही आणि लेखक शक्ती टी. के. कृष्णस्वामी यांच्यासह प्रवास करत असताना, कयातरु या ठिकाणी आले. तेथेच वीरपंड्याला फाशी देण्यात आले होते. तेव्हा गणेशन यांनी कृष्णस्वामी यांना कट्टाबोम्मनच्या पराक्रमावर नाटक लिहायला सांगितले आणि त्यांनीही ते एक महिन्यात लिहून पूर्ण केले. या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी गणेशन यांनी सालेम येथे 1957 च्या ऑगस्टमध्ये, त्यांच्याच नाटक कंपनीद्वारे केला. नाटकाच्या सेट आणि कपडेपटासाठी त्यांनी तेव्हा पन्नास हजार रु. खर्च केले होते. दिग्दर्शक बी. आर. पंथलू यांनी हे नाटक पाहिले आणि त्याच्यावर त्यांच्याच पद्मिनी पिक्चर्सतर्फे चित्रपट बनवायचे ठरवले. त्याच नावाने तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे काम नाटकाचे सेट तयार करणार्‍या आर. देवराजन यांना, तर छायाचित्रणाचे डब्ल्यू. आर. सुब्बराव यांच्याकडे देण्यात आले. पटकथा त्यांच्या इतिहास संशोधन चमूने तयार केली.

याआधीही 1948 मध्ये कट्टाबोम्मनच्या खर्‍या नावाने म्हणजे कट्टाबोम्मु या नावाने तर 1953 मध्ये कट्टाबोम्मन या नावाने चित्रपट आले होते. नंतर जेमिनी स्टुडिओचे वासनही कट्टाबोम्मनवर चित्रपट करणार होते. त्यांनाही शिवाजी गणेशनच या कामासाठी हवा होता; पण त्याने नकार दिला. कारण आधी ‘चंद्रलेखा’ या चित्रपटात भूमिका देण्यास त्यांनी त्याला नकार दिला होता. त्यांना गणेशनने कट्टाबोम्मनवर चित्रपट न करण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली होती. उलट जमा केलेली सारी माहिती त्यांनी गणेशन यांना दिली.

वेलैयतेवनच्या भूमिकेसाठी प्रथम शिवाजी गणेशन यांनी एस.एस. राजेंद्रन यांना विचारले होते; पण आधीच दुसर्‍या कामांत गर्क असल्याने त्यांनी नकार दिला. मग जेमिनी गणेशन याची पत्नी सावित्रीला शिवाजी गणेशन यांनी जेमिनीला विचारायला सांगितले. पण त्याने राजेंद्रन यांना वाईट वाटेल म्हणून नकार दिला होता. पण राजेंद्रनने आपली अजिबात हरकत नसल्याचे कळवल्यानंतर त्याने काम करण्याचे मान्य केले. कथेमध्ये कट्टाबोम्मनची लहान मुलगी मीना मरण पावते असा प्रसंग होता. कृष्णमूर्ती यांची लहान मुलगीही अशीच अकाली निधन पावली होती. त्यामुळे त्यांनी तो प्रसंग पटकथेत घेण्यास नकार दिला होता. शेवटी ते अगदी नाइलाजानेच तयार झाले.

या चित्रपटाचे चित्रण अन्नलईइल्लम येथे सुरू झाले. नंतर ते मद्रास (आता चेन्नई) येथील भरणी स्टुडिओत झाले. युद्धाचे प्रसंग जयपूरला चित्रीत केले गेले. तमिळमध्ये टेक्निकलरमध्ये तयार झालेला हा पहिलाच चित्रपट होता. प्रथम तो गेव्हाकलरमध्ये चित्रीत झाला आणि नंतर लंडनमध्ये त्याचे टेक्निकलमध्ये रूपांतर केले गेले. नंतर तेथेच 10 मे 1959 ला त्याचा प्रीमियर झाला. अगदी अलीकडे त्याची डिजिटल आवृत्तीही तयार करण्यात आली आहे.

आफ्रोआशियाई चित्रपट महोत्सवात 1960 मध्ये कैरो येथे शिवाजी गणेशन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. ते बक्षीस त्यांना इजिप्तचे अध्यक्ष नासर यांच्या हस्ते देण्यात आले. त्याबाबत शिवाजी गणेशन म्हणाले होते, ते ताडमाड उंच आणि त्यांच्यापुढे मी अगदी ठेंगू म्हणावा असा दिसत होतो. तरीही सर्वांनी उभे राहून माझ्या कामाला पावती दिली होती! नाटकावरून सिनेमा झाला तरीही त्यातील मोठी भाषणे तशीच आहेत आणि शिवाजी गणेशन यांच्या चाहत्यांसाठी ती पर्वणीच होती. इंग्रजांनी कराची मागणी केल्यावर तो म्हणतो, हो. आम्ही तुम्हाला कर द्यायला हवा. कारण जमीन तुमची, नांगरून पीक काढले तुम्ही इ. या उपहासाने प्रेक्षक भारावून जात असणार. कारण ते त्यांना मनोमन पटत होते. ब्रिटिशांचे कुटिलपण कोणत्या थराला गेले होते तेही कळते. त्यांची फोडा आणि झोडा ही नीती आणि तिला बळी पडणारे अट्टप्पनसारखे लोक यामुळे ती यशस्वी होत होती. देशावर प्रेम करा हे सांगतानाच देशहितासाठी सल्ला देणार्‍यांचा आदर करायचा असतो हे कट्टाबोम्मन शिकवून जातो, हेही आजघडीला महत्त्वाचेच.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -