घरफिचर्सबंटी, तुझा साबण स्लो आहे का?

बंटी, तुझा साबण स्लो आहे का?

Subscribe

दीड वर्ष एकच मोबाईल वापरतोय म्हटल्यावर लोक म्हणतात- अरे काय स्लो आहेस तू. अमुक व्हर्जन आली, तमुक फीचर्स आली और तुम हो की पुरानी दुनिया में हो. ती मुलगी बंटीला विचारत नाही का, ‘बंटी तुझा साबण स्लो आहे का? धुवत रहा धुवत रहा धू.’ त्यामुळे स्वच्छ व्हा झटपट. यशस्वी व्हा पटपट. कशाची नको कटकट. रुकना नहीं, बस भागते रहना. फास्ट- इन्स्टंट- रेडी रेकनर ही आजची शब्दावली.

दुपारी चारच्या आसपास आई घरी आली तेव्हा माझ्या धाकट्या बहिणीनं मॅगी करून खाल्ली आहे, हे तिच्या लक्षात आलं. घरात शेवया असताना हे मॅगीसारखं फॅड का या पोरीच्या डोक्यात आहे हे पाहून वैतागून आई तिच्यावर ओरडली- श्रुती, हे काय सतत मॅगी खाणं. आरोग्याला चांगलं आहे का हे? शेवया होत्या घरात. शेवयाचं उपीट करायचं. शेवया आणि मॅगी यांची तुलना श्रुतीला पटली नव्हतीच; पण ती चटकन म्हणाली, कम ऑन मॉम. किती वेळ लागतो ते करायला. मॅगी एकदम झटक्यात होते. दुसर्‍या मिनिटाला खायला सुरू. हा संवाद ऐकत असताना मला जाहिरातीतील ‘मॅगी मॉम’ आठवली. अशा सगळ्या जाहिरातींमध्ये ‘संतूर मॉम’ ‘मॅगी मॉम’च असतात. तो मुद्दाच वेगळा. असो.

तर ही ‘मॅगी मॉम’ एकदम स्मार्ट. ती भुकेजल्या पोरांना 2 मिनिटात इन्स्टंट मॅगी तयार करून खाऊ घालते, अशी ती जाहिरात. मॅगी पौष्टिक की फास्ट फूड, वगैरे वेगळा मुद्दा; पण जे काही हवं ते चटकन हवं, हे आपल्या या काळाचं घोषवाक्य आहे. जो चाहिए अभी चाहिए- अभी के अभी, अशी सारी गत आहे. वेटिंग टाइम नही मंगताय बॉस. रांगेत उभं रहायला वेळ नाही. तू टाइम बता आपुन उस टाइम आयेगा, हा हमखास ऐकवला जाणारा डायलॉग. मध्यंतरी एक मैत्रिण हॉटेलात 5 मिनिटं माझी वाट बघत होती. मी आल्या आल्या म्हणाली, ‘काय हे श्री, मी इथे येऊन ‘जुनी’ झाले.’ गमतीचा भाग सोडा; पण सगळं किती फास्ट हवं असतं आपल्याला.

- Advertisement -

गोष्टी फटाफट झाल्या पाहिजेत, असा अत्याग्रह आपला असतो. ‘चट मंगनी पट ब्याह’ असा एकूण लोकांचाही मूड असतो. साला सोचने के लिए टाइम किसके पास है. काळ तर 4 जी वेगात धावू लागला. क्लिकच्या क्लिक उड्डाणे. नवीन विंडो. एमबीपीएसच्या वेगात आपण भयंकर धावत राहतो. कुठून कुठे ते ठाऊक नाही.

थांबायचे नाही कोठेही जराही. थांबला तो संपला अशी पक्की खूणगाठ आपण मनाशी बांधलेली असते. (भले पुढे ट्रॅफिक सिग्नल आला तरी.) मागे एक सावरकर भक्त म्हणाला, ट्रॅफिक सिग्नलला सावरकरांनी काय शब्द सुचवला होता माहितीय का? ताम्रहरितलोह पट्टिका. मित्र म्हणाला, भिडू, हा तुझा भयंकर शब्द म्हणेपर्यंत गाड्या सुसाट वेगात सुटलेल्या असतील. त्यामुळे आता एक मिनिटात बाईट, चार स्लाइड्समध्ये नोट्स, अर्ध्या मिनिटात गुगल पेवरून पेमेंट, अर्ध्या तासात पिझ्झा घरपोच- सगळं कसं फटाफट. एकदम सटासट.

- Advertisement -

दीड वर्ष एकच मोबाईल वापरतोय म्हटल्यावर लोक म्हणतात- अरे काय स्लो आहेस तू. अमुक व्हर्जन आली, तमुक फीचर्स आली और तुम हो की पुरानी दुनिया में हो. ती मुलगी बंटीला विचारत नाही का, ‘बंटी तुझा साबण स्लो आहे का ? धुवत रहा धुवत रहा धू.’ त्यामुळे स्वच्छ व्हा झटपट. यशस्वी व्हा पटपट. कशाची नको कटकट. रुकना नहीं, बस भागते रहना. फास्ट- इन्स्टंट- रेडी रेकनर ही आजची शब्दावली.

स्वाभाविकच त्यामुळे सामाजिक राजकीय निर्णयसुद्धा तातडीने घ्यावे, असं आपल्याला वाटतं. ‘एक घाव दोन तुकडे’ टाइप निर्णय घ्यायला हवेत, असं आपलं मत असतं. ‘एकच फाइट वातावरण टाइट’ असं सिंघमछाप नेतृत्व आपल्याला हवं असतं म्हणून तर असे लोक लोकशाहीलाच शिव्या घालतात. लोकशाही ‘स्लो’ असते ना. निर्णय प्रक्रिया लांबते; पण त्यामुळे सर्वांचं मत ऐकून योग्य निर्णय घेतला जातो.

कुठे गंभीर गुन्हा घडला तर गुन्हेगारांची ट्रायल होण्याआधीच एन्काऊंटर केलं जातं. मरण पावलेल्या व्यक्तीला न्याय मिळणं दूरच; पण एन्काऊंटरमुळे न्याय मिळाला, असं म्हणत जेव्हा ढोल पिटले जातात, तेव्हा आपली इन्स्टंट न्यायाची अपेक्षा किती चुकीची आहे, हे समजून घ्यायला हवं. ताबडतोब एखादी कृती होईलही; पण तो योग्य न्याय असेल का? की केवळ ताबडतोब झटपट काही निर्णय घ्यायचा म्हणून आपण चुकीच्या दिशेने जाऊ? एखादा निर्णय तुम्ही किती वेगात घेता यापेक्षाही तो निर्णय घेताना त्याबाबतच्या सार्‍या आयामांचा विचार करता का, हा सवाल अधिक महत्त्वाचा आहे. ज्याला विहित प्रक्रिया किंवा कायद्याचं राज्य आपण म्हणतो त्यानुसार निर्णय होतो का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. चीनमध्ये भ्रष्ट अधिकार्‍यांना तात्काळ सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं जायचं. त्याच्यामुळे इतर अधिकार्‍यांवर अंकुश निर्माण होईल, अशी अनेकांना आशा होती. तात्काळ असं काही अत्यंत कठोर पाऊल उचलल्याने लोकांवर वचक बसेल, अशी अपेक्षा फोल ठरली. अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

ताबडतोब झटपट काही निर्णय घेण्याआधी आपण जे पाऊल उचलतोय ते योग्य आहे की नाही, याचा विचार आपण करायला हवा. जोरात धावण्याआधी कुठल्या दिशेने धावतो आहोत, इसके बारे में भी तो सोचना पडेगाच ना. वेगाच्या नादात आपण अचूकता विसरलो तर निगेटिव्ह मार्किंग असलेल्या पेपरात जी गंमत होते तशीच आपली अवस्था होईल. वेगात सारे प्रश्न तर सोडवले; पण घाईघाईत अनेक चुकले आणि त्यामुळे निगेटिव्ह मार्क्स मिळाले, अशी तर्‍हा. रस्त्याच्या बाजूला ‘अति घाई, संकटात नेई’ हा फलक आपण पहात नाही का? जगण्याच्या भरधाव वेगात भरीव असं काही आपल्या हातून निसटत चाललंय, याची आपल्याला कल्पना आहे का? बंटीचा साबण स्लो असला तरी हरकत नाही; पण आपण अंतर्बाह्य स्वच्छ होत आहोत ना, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. हा प्रश्न विचारुन त्यावर उत्तर द्यायला थोडा वेळ लागेल. पण थोडं दमानं, धीरानं घ्यायला काय हरकत आहे. ‘जरा विसावू या वळणावर’ म्हणत योग्य दिशेने जायला हवं. आपणही आपल्या बुलेट ट्रेनला थोडा ब्रेक लावायला हवा. स्पीडब्रेकर सेहत के लिए अच्छे होते है.

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -