घरफिचर्समहापुरूषांच्या लोकप्रियतेतील चढउतार

महापुरूषांच्या लोकप्रियतेतील चढउतार

Subscribe

एखादा महापुरूष सदासर्वकाळ समाजातील आदरणीय राहिल याची आजच्या काळात खात्री देता येत नाही. महापुरूषांच्या मूल्यमापनात कालानुरूप बदल होत असतात. त्यात धक्का बसावा असे काही नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचा पुतळा घानातून का काढला याची चर्चा केली पाहिजे. मोहनदास करमचंद गांधी हा 24 वर्षे वयाचा तरूण 1893 साली दक्षिण आफ्रिकेला गेला होता. सुरूवातीला गांधीजी तेथे फक्त एका वर्षासाठी गेले होते. पण बघता बघता ते तेथे 1914 पर्यंत राहिले.

आधुनिक काळाचे एक वैशिष्टय म्हणजे येथे कालचा नायक आजचा खलनायक ठरू शकतो. याचे कारण अभ्यासकांना सतत नवनवे पुरावे सापडत असतात व या पुराव्यांच्या प्रकाशात आधुनिक महापुरूषांचे सतत मूल्यमापन होत असते. यामुळे महापुरूषांबद्दलची समाजाची मानसिकता बदलत असते. या संदर्भातील ताजी बातमी म्हणजे घाना या पश्चिम आफ्रिकेतील देशातील (लोकसंख्या ः दोन कोटी ऐंशी लाख) घाना विद्यापीठाने एका ठरावाद्वारे तेथील गांधीजींचा पुतळा काढण्याचा निर्णय घेतला आहे. घाना विद्यापीठाच्या मतांनुसार निग्रो समाजाबद्दल महात्मा गांधींचे मत प्रतिकुल होते व गांधीजी दक्षिण आफ्रिकेत फक्त तेथील भारतीय समाजाच्या हक्कांसाठी लढले होेेते, निग्रोंच्या नाही.

या निर्णयाचे भारतीयांना आश्चर्य वाटणे, या निर्णयाचा धक्का बसणे स्वाभाविक आहे. मात्र या निर्णयावर प्रतिक्रिया देताना लोकशाही मूल्यांचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा निर्णय एका सार्वभौम देशातील विद्यापीठाने घेतला आहे हे कदापि विसरता कामा नये. हा निर्णय आपल्याला आवडो वा न आवडो, या निर्णयाचा मान ठेवलाच पाहिजे.

- Advertisement -

आज ज्या प्रकारे गांधीजींबद्दल घानात पुनर्मूल्यमापन सुरू आहे तसे पाहिले तर हा प्रकार नवीन नाही. लेनिननंतर सोव्हिएत युनियनचे समर्थपणे नेतृत्व करणार्‍या स्टॅलिनचे 1956 नंतर त्याच्याच देशात वाभाडे काढण्यात आले होते. स्टॅलिनचा मृत्यू 1953 साली झाला व अवघ्या तीनच वर्षांत स्टॅलिनचे पुतळे लोकांनी पाडले. असाच प्रकार 1991 साली लेनिनबद्दलही झालेला दिसून येतो. रशियन जनतेने लेनिनचे पुतळे जमीनदोस्त केले. समाजाचा राग एवढ्यावर शांत झाला नाही तर त्यांनी सरकारवर दबाव आणून स्टॅलिनग्राड व लेनिनग्राड वगैरे रेल्वे स्टेशन्सची नावं बदलली. 1917 साली सेंट पिटसबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड ठेवण्यात आले. मात्र लेनिनग्राडचे 1991 नाव पुन्हा सेंट पिटसबर्ग करण्यात आले. तसेच 1920 च्या दशकात वोल्वोग्राडचे नाव बदलून स्टॅलिनग्राड ठेवण्यात आले होते. पण 1991 साली त्या शहराचे नाव पुन्हा वोल्वोग्राड करण्यात आले. एके काळी लेनिन आणि स्टॅलिन म्हणजे जगभरच्या डाव्या चळवळीची दैवत होती. त्यांच्या नशिबानंतर काय आले हे सर्व जगाने बघितले.

आपल्याकडेही हा प्रकार सर्रास सुरू असतो.
एखादा महापुरूष सदासर्वकाळ समाजातील आदरणीय राहिल याची आजच्या काळात खात्री देता येत नाही. महापुरूषांच्या मूल्यमापनांत कालानुरूप बदल होत असतात. त्यात धक्का बसावा असे काही नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचा पुतळा घानातून का काढला याची चर्चा केली पाहिजे. मोहनदास करमचंद गांधी हा 24 वर्षे वयाचा तरूण 1893 साली दक्षिण आफ्रिकेला गेला होता. सुरूवातीला गांधीजी तेथे फक्त एका वर्षासाठी गेले होते. पण बघता बघता ते तेथे 1914 पर्यंत राहिले. या काळातच मोहनदास करमचंद गांधीचे रूपांतर महात्मा गांधीत झाले.

- Advertisement -

हा इतिहास आपल्याला माहिती असतो. आता या इतिहासाबद्दल नव्याने संशोधन सुरू आहे. त्यातून असे दिसून येते की गांधीजींनी तेथे असलेल्या भारतीयांच्या हक्कांबद्दल लढे उभारले. तेथील निग्रो समाजाबद्दल गांधीजींना काहीही देणे घेणे नव्हते. काही अभ्यासक तर पुराव्यानिशी असेही दाखवून देतात की गांधीजींना निग्रोंबद्दल एक प्रकारचा राग होता. म्हणूनच आता घानाने गांधीजींचा पुतळा काढण्याचे ठरवले आहे.

सुरूवातीच्या काळात गांधीजींना आफ्रिकेतील निग्रो समाजाबद्दल फारशी आपुलकी नव्हती हे अमान्य करण्यात अर्थ नाही. पण जसा काळ लोटला तसे त्यांच्या विचारात फरक पडत गेला व नंतर त्यांनी निग्रोंची बाजू घ्यायला सुरूवात केली. उलटपक्षी असे दाखवून देता येते की नंतर नंतर तर महात्माजींना निग्रोंच्या लढयाबद्दल खास सहानुभूती होती. मात्र, सुरूवातीला नव्हती, हेही तितकेच खरे आहे.

अशा परिस्थितीत कोणत्या गांधीजींचा उदो उदो करायचा? निग्रोंच्या लढ्याबद्दल उदासिन असलेल्या गांधीजींचा की निग्रोंच्या लढ्याबद्दल सहानुभूती असलेल्या गांधीजींचा? महापुरूषांचे आंधळे भक्त आणि त्यांच्या नावाचा वापर करून आपापले राजकारण करणारा वर्ग महापुरूषांचे त्यांना सोयीस्कर असणारे अर्थ लावत असतो व पूर्ण सत्य समाजासमोर कधीच येऊ देत नाही.

आपल्या देशात तर हा प्रकार सतत सुरू असतो. आजकालचा काळ म्हणजे तीव्र जातीय व धार्मिक अस्मितांचा काळ आहे. अशा आजच्या काळात गांधीजी काय किंवा पंडीत नेहरू काय किंवा सावरकर काय यांना सतत बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या जीवनातील एखादा प्रसंग, आगचेमागचे संदर्भ न सांगता, सांगायचा व त्यातून आपले राजकारण करायचे.

यात जर उच्चदर्जाचे सुसंस्कृत वागणे दिसत असेल तर याबद्दल आक्षेप घेण्याची गरज नाही. काही अभ्यासकांना जर प्रामाणिकपणे वाटत असेल की महात्मा गांधीजींच्या मनात वर्णीय आकस होता व या अभ्यासकांनी नीट अभ्यास करून, पुरावे देऊन त्यांचे म्हणणे मांडले तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. इ.स. 2015 साली प्रा.अश्विन देसाई व प्रा.गुलाम वाहेद यांनी ‘गांधीः स्टे्रचर बेअरर ऑफ एम्पायर’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ अमेरिकेतील ख्यातनाम प्रकाशक स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात लेखकद्वयाने दाखवून दिले की इ.स. 1899 साली झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटीश साम्राज्य यांच्यातील युद्धात गांधीजींनी ब्रिटीशांना पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर इंग्लंड जिंकावे म्हणून त्यांनी इंग्रजांच्या साम्राज्याला स्वयंसेवक पुरवले होते. नंतर मात्र गांधीजींचे विचार बदलले व त्यांनीच भारतातून इंग्रजांनी कायमचे जावे म्हणून स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व केले होते.

हे तपशील समजुन घेतले म्हणजे महापुरूषांच्या जीवनाचा अभ्यास करताना काळाचा संदर्भ सतत मनांत जागृत ठेवणे गरजेचे ठरते. घाना विद्यापीठाने गांधीजींच्या विचारांचा साकल्याने विचार केला असता तर त्यांनी विद्यापीठाच्या परिसरातला पुतळा उठवला नसता. एवढेच नव्हे तर सुरूवातीला निग्रोंच्या लढ्याबद्दल उदासिन असलेले गांधीजी नंतरच्या काळात याबद्दल सक्रिय झालेले दिसून आले असते.

प्रा. अविनाश कोल्हे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -