घरफिचर्सआंबोली घाटातून...

आंबोली घाटातून…

Subscribe

माझ्यासाठी आंबोली म्हणजे अनेक छटा दाखवणारी अभिसारिका म्हणावी लागेल. आंबोलीवर नेहमी आकाशाचं पांघरून आणि हिरव्या दाट झाडीची समृद्धता आहे. हे गिरीरोहणाचं स्थान नेहमी आपल्याला आव्हान देणारं वाटतं. काळानुसार आंबोली बदलते आहे. हल्ली पावसाळ्यात ती धबधब्यांसोबतच पर्यटकांनी भरून वाहते. कितीही आधुनिकता आली तरी आंबोलीच्या मूळ सौंदर्यात कोणताच फरक पडलेला नाही.

साधारणपणे पंचवीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी भांडुपच्या मेनन कॉलेजमध्ये अकरावीत नुकताच प्रवेश केला होता. तिथल्याच एका मित्राकडून कळलं की, कविवर्य डॉ. वसंत सावंत हे सावंतवाडीहून कायमचे भांडुपला राहायला आले आहेत. त्याच संध्याकाळी मी कविवर्यांना भेटायला गेलो. स्वतः कवींनी घराचा दरवाजा उघडला आणि वर्षानुवर्षांची ओळख असावी असं समजून त्यांनी माझं स्वागत केलं. जवळपास दीड-दोन तास गप्पा झाल्या. आणि कविवर्यांनी नुकतीच लिहिलेली आपली ‘नांगरट’ ही कविता वाचून दाखवली. ही कविता उद्या ‘हंस’ दिवाळी अंकाला द्यायची आहे, असं सावंत म्हणाले आणि आपली अजून एक कविता म्हणून दाखवतो म्हणत कवितांचा पाऊस पाडला. त्यातली एक कविता मला अजूनही लख्ख आठवते ‘आनंद्गौरी’- जेव्हा आंबोली गर्द धुक्यात बुडालेली असते तेव्हा माझा आत्मा ढग होऊन तरंगत असतो. अशी ती कविता.

ही कविता मनाला भारावून गेली, त्यापेक्षा कवी सावंतांनी केलेलं आंबोलीचं वर्णन मला एका क्षणी आता हा पृथ्वीवरचा स्वर्ग-आंबोली बघायलाच हवी असं वाटून गेलं. आंबोली घाटातून प्रवास करण्याचा योग पुढे लवकरच आला. ते उन्हाळ्याचे दिवस होते. कणकवलीहून बेळगांव एसटी पकडून मी निघालो. उन्हाळ्याचे दिवस. गाडीला गर्दी होती. कसंबसं सावंतवाडी पार झालं आणि गाडी घाट चढू लागली. आणि आजूबाजूला बघितलं तर राईगज पर्वत रांगा, गर्द झाडी, तो वळणावळणाचा रस्ता. त्यातून एसटी जात होती. अंगातला घाम बाहेरच्या हवेने मुरून गेला. त्या उन्हाच्या दिवसातदेखील आंबोलीत थंडी होती. ती आंबोली मला दृश्यमान चित्रासारखी डोळ्यासमोरून निघून गेली. आंबोलीच्या हवेचा अंदाज आला. कधीतरी वेळ काढून आंबोली बघायला हवी.

- Advertisement -

त्याच वर्षी पावसाळ्यात पुन्हा बेळगावला जाण्याचा योग आला. तेव्हा या वेळेला आंबोली मनसोक्त बघून मग पुढे जायचं हे ठरवलं. त्याप्रमाणे मी रेल्वेने सावंतवाडी स्टेशनला उतरलो आणि पुन्हा एसटी पकडून आंबोलीला उतरलो. त्या पावसाळ्यात आंबोली झाडापेडानी डवरली होती. या घाटातून फिरताना या निसर्ग पर्यटनाचा आनंद मनमुराद घेता येतो. आंबोली हे गाव समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीवर आहे. आंबोलीच्या पायथ्याशी दानोली म्हणून गाव आहे. या गावाचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे हे सत्पुरुष साटम महाराजांचं स्थान. या गावाहून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.

आंबोली म्हणजे सावंतवाडी संस्थानाचे राजे बापूसाहेब महाराज यांची राजधानी. घाटावरून कोकणात उतरण्यासाठी या आंबोलीत अनेक प्राचीन काळापासूनच्या पायवाटा आहेत. या घाटातून जाताना यातील एखादी दरड कोसळेल की काय …? अशी नेहमीच धाकधूक लागलेली असते. आंबोलीच्या या घाटमाथ्यावर गेलं की, एका वेगळ्या रसिकतेने आपण आंबोली अनुभवू लागतो. आंबोलीचे ते निसर्ग सौंदर्य, आजूबाजूला पसरलेली हिरवीगार वनश्री आणि तिथून दिसणारा समुद्र आणि तळकोकण बघायला तुमच्याकडे एक सौंदर्यदृष्टी असावी लागते. घाटावरून थोडं पश्चिमेकडे बघितलं की, हिरण्यकेशी नदीचा प्रवाह दिसतो, पावसाळ्याच्या दिवसात हिरण्यकेशी भरून वाहत होती. हिरण्यकेशीला असं तुडूंब

- Advertisement -

भरून वाहताना कवी बा. भ. बोरकरांची कविता आठवली.
क्षितिजामधल्या हिरण्यकेशी, जरा तुझा कर वर मुखडा.

सात गृहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. त्यातील एक गुहा बघायला मिळाली. ही गुहा सुमारे तीनशे मीटर लांब आहे, या गुहेत असणार्‍या मंदिरात महादेवाची पिंडी बघायला मिळते. या पिंडीच्या दोन्ही बाजूला गायमुख आहे. इथून दिसणारी आंबोली काही वेगळीच. पक्षांचा किलबिलाट सतत चालूच होता. त्यात तिथल्या एका ग्रामस्थाने माहिती दिली की, इथूनच जवळ असणार्‍या शिरोडा गावी जेव्हा १९२८ साली मिठाचा सत्याग्रह झाला होता तेव्हा महात्मा गांधी या मार्गेच तळकोकणात उतरले होते. इथला परिसर बघून सावंतवाडी संस्थानाचे तेव्हाचे राजे बापूसाहेब महाराजांबरोबर इथे मुक्काम केला होता. स्वामी विवेकानंददेखील या आंबोलीचं सौंदर्य बघून या निसर्गावर लुब्ध होऊन त्यांनी या आंबोलीशी नक्कीच आध्यात्मिक संवाद साधला असावा.

मी आंबोली वर्षाकाळात बघत होतो. इतकी वर्षे आपण तळकोकणात येतोय मग ही आंबोली आपल्या लक्षात कशी आली नाही? आंबोलीच्या घाटात असणार्‍या सर्व टेकड्या या आकाशाला गवसणी घालतात की काय असा भास आपणास होतो. घाटातल्या प्रत्येक पाऊलवाटेने जाताना आजूबाजूने वेळूची बेटं दिसायला लागली. आमच्या पट्ट्यात अशी वेळूची बेटं दिसत नाहीत. आंबोलीच्या घाटात ठिकठिकाणी धबधबे आढळतात. प्रत्येक धबधबा उंचावरून वेगाने पाणी खाली सोडत होता. ते

शुभ्र पाणी बघून कवी सावंतांच्या कवितेतील पुढील ओळ आठवली.
कुमार संभवातल्या अंबेने नुकते स्नान करून उठावे,
आणि गंगेचे प्रवाह निथळत राहावे तिच्या अंगावरून सारीकडे.
तसे आतून काही पाझरत असते, अखंड विश्व मनोहर शिवांग त्याचे शुभ्रधवल अभिसार.

आंबोली येथील महादेव गडदेखील बघण्यासारखा आहे. आता या गडाचे काही अवशेष बघायला मिळतात. त्या गडाचे मजबूत बुरूज आजही त्या इतिहासाची साक्ष देतात. या ठिकाणाहून जवळच बापूसाहेब महाराजांचा वाडा आहे. माझ्यासाठी आंबोली म्हणजे अनेक छटा दाखवणारी अभिसारिका म्हणावी लागेल. आंबोलीवर नेहमी आकाशाचं पांघरून आणि हिरव्या दाट झाडीची समृद्धता आहे. एवढं गिरीरोहणाचं स्थान नेहमी आपल्याला आव्हान देणारं वाटतं. काळानुसार आंबोली बदलते आहे. हल्ली दोन तीन दिवसांची सुट्टी लागून असली की, आंबोली पर्यटकांनी भरून वाहते. त्यामुळे पूर्वीच्या मानाने हल्ली आंबोलीत हॉटेल्स, रेस्टॉरंट भरपूर झाली आहेत.

कितीही आधुनिकता आली म्हणून आंबोलीच्या मूळ सौंदर्यात कोणताच फरक पडलेला नाही. उन्हाळ्यात आंबोली जशी टवटवीत असते, तशीच ती पावसाळ्यात मत्त होते. आणि हिवाळ्यात अधिक खुलते. आंबोली ही अनुभवसिद्ध आहे. मी तेथील सनसेट पॉइंटला पोचलो तेव्हा सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. संपूर्ण आकाश रक्तकुंकुमाने भरले होते. जसा जसा सूर्य क्षितिजाखाली लपत गेला तशीतशी आंबोलीत गडद छटा पसरली. इथला कावळेतास पॉइंटदेखील काहीसा असाच, मनाला उभारी देणारा. सृष्टीची अनोखी किमया बघून आपले डोळे दिपून जातात. त्या विशाल रूपाने काही काळ आपण घाबरतो पण, तेदेखील क्षणभरच!

संपूर्ण आंबोली न्याहाळताना मी हरवून गेलो होतो. परत परत माझं मन हिरण्यकेशीच्या पात्राकडे ओढ घेत होतं. पुन्हा त्या हिरण्यकेशीकडे आलो आणि वर्षाकाळात तिथलं सुख अनुभवत राहिलो. तो जलकुंभ परत परत बघत राहिलो, हा प्रवाह म्हणजे जणू मानवी जीवनाचा प्रवाह तर नव्हे. हिरण्यकेशीला हे तर सांगायचे नसावे? तिच्या प्रवाहासारखा आपला जीवनप्रवाह चैतन्यदायी असावा हाच या आंबोलीचा संदेश असावा. वर्षाकाळातील आंबोलीचे हेच वैशिष्ठ्य आहे. एरवी शांत दिसणारी आंबोली आतून अनाहत असते, तिला खळखळणार्‍या प्रवाहाची सदैव वाहती किनार आहे. शेवटी आंबोलीतल्या घाटातून फिरताना एकच गोष्ट जाणवते,

आंबोली : धरतीच्या अंगावरील थरारते मोरपीस माझ्या श्वासांना :
धुवाँधार आत्मा न्हातो माझ्या ओझारांतून
मी डोळे हरवून बसलो आहे वर्षाकाळात आंबोली
गूढ गूढ सरकताना पाहून…

-प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -