घरफिचर्सभाजपचे अनमोल ‘स्वामी’रत्न!

भाजपचे अनमोल ‘स्वामी’रत्न!

Subscribe

सत्तेची हवा काय असते ते भाजपच्या तमाम नेत्यांच्या तोंडाकडे पाहिल्यावर कळतं. केंद्रातील सत्तेमुळे त्यांचे चेहरे उजळले आहेतच; पण चेहर्‍यांबरोबरच त्यांच्या सातत्याने वाजणार्‍या तोंडानेही सत्तेच्या हवेचा कोंडाळा दाखवून दिला आहे. कोण नेता कधी काय बोलेल, याचा पत्ता नसतो. या नेत्यांवर कोणाचाच अंकुश नाही. यामुळे त्यांनी काय बोलावं यावर कोणाचंच बंधन नाही. भाजपच्या या बोलघेवड्यांपुढे नतमस्तक व्हावं, असं आता देशवासीयांना झालं आहे. जुने जाणते नेतेही यात मागे नाहीत. मोदी आणि अमित शहा यांचे जणू आपणच पायिक असल्याचा या बोलघेवड्यांना वाटतं. पण यामुळे भाजपचे नुकसान होत आहे, याचं त्यांना काहीच वाटत नाही. एकाचं नाव घ्यावं तर दुसरा उठून तयारच असतो, इतकी संख्या भाजपतल्या बोलघेवड्यांची झाली आहे. जुने जाणते ज्यांचा उल्लेख आवर्जून केला जातो त्या सुब्रह्मण्यम स्वामींना देशाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीने हैराण केलं आहे. देशाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी जे काही करायचं ते करा, हवं तर माझ्याकडे ते खातं द्या, अशी मागणीही त्यांनी याआधी करून पाहिली. रिझर्व्ह बँकेच्या आजवरच्या सगळ्याच गव्हर्नरांना त्यांनी वेडं ठरवून टाकलं होतं. मनमोहन सिंग आणि रघुराम राजन हे तर स्वामींच्या खिजगणतीतही नाहीत. उर्जित पटेल तर कंटाळून निघून गेले. तेव्हा ते ना जुमानत पंतप्रधान मोदींना ना पक्षाध्यक्ष शहांना. देशाची आर्थिक परिस्थिती योग्य ठिकाणी असल्याचा दावा करणार्‍या सत्ताधारी भाजपच्या धुरिणांना जमिनीवर आणणारं वक्तव्य करत ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर त्यांनी कान उपटले आहेत; पण यावर उपाय देताना त्यांना चमत्कारिक मागणी करून टाकली. भारतीय चलनावर लक्ष्मीचा फोटो आल्यास रुपयाचं संकट दूर होईल, असलं विधान या स्वामींनी केलंय. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने त्याला चलनावर स्थान नको. त्याऐवजी लक्ष्मीचा फोटो आल्यास त्याचा भारतीय चलनावर प्रभाव पडेल, अशी मुक्ताफळे स्वामींनी उधळली आहेत.स्वामी यांची आजवरची सगळी वक्तव्यं लक्षात घेतली तर त्यांच्या असल्या वक्तव्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही; पण काळ अनेकदा संकटं ओढावत असतो. स्वामींसारखी माणसं अशा काळासाठी पूरक असतात. भाजप त्यांना आवरू शकत नाही. जेव्हा नेत्याचा राजकीय पक्ष त्याला रोखू शकत नाही तेव्हा याची जबाबदारी माध्यमांनी घेतली पाहिजे. प्रश्न चलनावरील लक्ष्मीच्या फोटोचा नाही. तो जसा अंधश्रध्देचा आहे तसा तो एका देशभक्ताचा अवमान करणाराही आहे. खरं तर भारतीय चलनावर गणपतीही नाही. तरी स्वामींनी गणेशाचा विघ्नहर्ता म्हणून उल्लेख करत तिथे लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. स्वामी हे चतूर गृहस्थ आहेत. होत्याचं नव्हतं करण्यात ते इतके माहीर आहेत की त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. भारतीय चलनावर गणपती नाही, हे त्यांना ठावूक नाही असं नाही. आज नव्हे गणपती पुरातन चलनावरही आढळून येत नाही. असं असताना लक्ष्मीचा उल्लेख करत आपल्या मनातील राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयीचा असलेला काळेपणा स्वामींनी उघड केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याआधी गुलामगिरीच्या काळात चलनावर किंग जॉर्ज यांचा फोटो होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे दोन वर्षं जॉर्जच चलनावर होते. १९४९मध्ये जॉर्ज यांची जागा अशोक स्तंभाने घेतली. नंतर त्या जागी सिंहाचं चित्र होतं. भारताच्या रिझर्व्ह बँकेने चलनावरील सिंहाचं चित्र दूर करून तिथे महात्मा गांधींचं छायाचित्र छापण्याचा निर्णय १९९६मध्ये घेतला. तोवर वॉटरमार्कद्वारे म. गांधींचा फोटो चलनाच्या उजवीकडे वापरला जात होता. हा फोटो १९४६मध्ये लॉर्ड फेड्रिक पेथिक लॉरेन्स यांच्यासोबत कलकत्तातील विक्ट्री हाऊसमध्ये घेण्यात आला होता. तो दूर करून गांधींचा पूर्ण फोटो लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. हा निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेने भारतीय स्वातंत्र्याचा लढा विचारात घेतला. देशाला एकसंघ ठेवून सर्वधर्म पालक म्हणून गांधींची ओळख होती. विविध धर्म जातींमध्ये विखुरलेल्या देशाला एक करून ब्रिटिशांपुढे अहिंसेच्या माध्यमातून दोन हात करणारे गांधी एकमेव द्वितीय होते. तेव्हा प्रत्येकाला आपल्या राज्याचा फोटो चलनावर हवा होता. देशव्यापी म्हणून मग गांधींच्या फोटोची निवड झाली. आजवर चलनावरील गांधी कोणालाच अडचणीचे वाटले नाहीत. कारण ते चित्र म्हणजे स्वतंत्र भारताचे प्रतिक होते. आता या चलनावर लक्ष्मीचं छायाचित्रं असावं, असं निमित्त करत स्वामी यांनी वाद निर्माण केला आहे. लक्ष्मीचं छायाचित्र चलनावर आणण्याचा विषय मर्यादित नाही. चलनावरील महात्मा गांधीचं छायाचित्र दूर करणं हा यामागचा छुपा डाव होय. तो उघडपणे मांडण्याऐवजी गणपतीचं नाव घेत लक्ष्मीला तिथे आणण्याचं हीन राजकारण स्वामी खेळत आहेत. असं छायाचित्र छापल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारेल, असं स्वामी यांना वाटत असेल, हे हास्यास्पद आहे. याआधी त्यांना देशाचं अर्थमंत्री व्हायचं होतं. आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक असल्याचा स्वत: विषयीचा ठाम दावा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी जो कोणी या खात्याचा मंत्री बनेल, त्याला नको ती वक्तव्यं करत सतावणं हा स्वामी यांचा एकमेव कार्यक्रम असतो. जगात मंदीची लाट असताना भारत हा एकमेव देश होता जिथे मंदीला वाव मिळाला नाही. पण तेव्हा त्यांनी ना मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं ना रघुराम राजन यांचं. आज जग आर्थिक सुस्थितीत असताना भारत मात्र मंदीचे फेरे मोजतो आहे. ही आपत्ती येण्यामागचं कारण स्वामींना ठावूक नाही, असं नाही. पण सांगायचं कोणाला? असं त्यांचं झालं आहे. देशावरील मंदी ही नोटबंदीच्या करण्यात आलेल्या अकाली अवलंबाचा परिणाम होय. खोटा आणि काळा पैसा बाहेर काढण्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर काळापैसा बाहेर आला नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला. काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा बाहेर काढण्याचं निमित्त करत नोटबंदी आणल्याच्या आणाभाका मारल्या. वास्तवात काळापैसा बाहेर आला नाही असं अजिबात नाही. काळ्या पैशाला पांढरा करण्यासाठी ४० टक्क्यांचं कमिशन घेतलं गेलं आणि कोट्यवधींचा काळा पैसा चलनात आला.रिझर्व्ह बँकांच्या देशभरातील २६ शाखांमधून लाखो कोटी रुपये परस्पर बदलून देण्यात आल्याचा परिणाम म्हणजे देशावरील मंदी होय. हे ना सुब्रह्ण्यम यांना मान्य ना भाजपच्या सत्ताधार्‍यांना. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर मान्यवर अर्थतज्ज्ञांनी गंभीर टिप्पण्या केल्यावरही सत्ताधारी हालायचं नाव घेत नाहीत. जीडीपी वाढायचं नाव नाही. उलट तो २ पर्यंत खाली आल्याचं वास्तव आहे. याची दखल घेण्याऐवजी रुपयावर लक्ष्मी छापण्याचा अर्धवट सल्ला देत स्वामी देत आहेत. आर्थिक परिस्थितीने संकट ओढून घेतल्याचे परिणाम सर्व स्तरावर उमटू लागले आहेत. देशातील तरुणांना रोजगार मिळता मिळत नाही. असलेल्या नोकर्‍या टिकवण्यासाठी हाणामार्‍या सुरू आहेत. महागाईने कहर केला आहे. इंधनाच्या वाढत्या दरवाढीचे परिणाम महागाईवर सातत्याने होत आहेत. इतकं सारं संकट एका आर्थिक विवंचनेने करूनही त्यावर मार्ग काढण्याऐवजी देवी आणि लक्ष्मीला आणण्याचा आचरटपणा स्वामी करतात याचं आश्चर्य आहे. याआधीही महात्मा गांधींना बदनाम करण्याचे भाजपचे हरएक प्रयत्न फसले. गांधींहून सरदार पटेलांना मोठं दाखवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवरत्न कंपन्यांचे ३२०० कोटी रुपये गुजरातमध्ये नेले. पण त्यामुळे गांधींची पत अजिबात कमी झाली नाही. भाजपने आता अशा नेत्यांना आवर घालण्याकडे लक्ष दिले तरच त्यांचे भविष्य उत्तम असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -