घरफिचर्सक्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता

क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता

Subscribe

शूर पराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांची १८ जून १८५८ ही पुण्यातिथी. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

शूर पराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांची १८ जून १८५८ ही पुण्यातिथी. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. धोरणी, चतूर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला. परंतु, तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ठ्य करणार्‍या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. परंतु, हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेला असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले.

- Advertisement -

१३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले. झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते. इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु, अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु, तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली.

१८५७च्या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चेबांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु, त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -