घरफिचर्सकरोना आणि आपण

करोना आणि आपण

Subscribe

करोना व्हायरसने जगभरात भीती पसरली असताना भारतात मात्र जमातवादी आणि अस्मितांच्या राजकारणाने टोक गाठले आहे. वैद्यकीय क्षेत्रापुढे आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संघटनांनी करोनाचा फैलाव हा जागतिक आणीबाणीसदृश्य स्थिती असल्याचे म्हटले आहे. या आजाराची लक्षणे ज्ञात आहेत. मात्र, त्यावर ठोस उपचार शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. दुसरीकडे या आजारातून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक लस निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या आजारातील विषाणूंचा स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असताना भारतात मात्र या आजाराविषयीची असलेली उदासीनता धोकादायक ठरण्याची भीती आहे.लोकसंख्येबाबतीत भारत आणि चीन हे दोन्ही देश तुल्यबळ आहेत. भौगोलिक वातावरणातही सारखेपणा आहे. दोन्ही देशातील लोकसंख्येेच्या घनतेमध्येही सारखेपणा आहे. त्यामुळे भारतालगत असलेल्या चीनमध्ये हाहाकार उडवणार्‍या करोनाचा धोका इतर देशांच्या तुलनेत भारताला जास्त आहे. या आजारावर अद्याप ठोस उपाय सापडला नसताना या गंभीर मुद्याचेही राजकारण करण्याचा प्रयत्न भारतीयांच्या मूर्खपणाचा कळस आहे. समाज माध्यमातून करोनाबाबत प्रतिबंधात्मक माहितीचे आदान-प्रदान होण्याऐवजी चुकीच्या आणि जमातवादी ध्रुवीकरणाला पोषक वातावरण निर्मिती करणार्‍या पोस्ट पडत आहेत. ज्यात करोनापासून वाचण्यासाठी शेणाचा उपयोग कसा करावा, याविषयावर दिशाभूल करणार्‍या चर्चा झडत आहेत. कुठल्याही गोष्टीचे मग त्याचे परिणाम कितीही गंभीर असोत, त्याचाही वापर आपले साळसूद जमातवादी राजकारण करण्यासाठी केल्यामुळे आपण किती वैचारिकदृष्ठ्या मागासलेले आहोत, हे स्पष्ट करणारे हे प्रकार आहेत. चीनने करोनाला कधीचेच राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. अमेरिका किंवा इतर प्रगत देशांंनी करोनाचा फैलाव त्यांच्या भूभागावर होऊ नये यासाठी आवश्यक पावले टाकली आहेत. आपल्या देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने, वैद्यकीय सुविधा, सरकारी यंत्रणांकडून चालवली जाणारी मोठी रुग्णालये यावर पडणारा दैनंदिन रुग्णांचा ताण पाहता करोनाचा धोका आपल्या देशात गंभीर नव्हे अतिगंभीर स्वरूप धारण करू शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा फैलावच होता कामा नये, यासाठी टोकाची काळजी आणि शक्य ते सर्व उपाय करण्याची गरज आहे.
या आजाराचा दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळल्याची बातमी आहे, तर मुंबई आणि पुण्यातही करोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, ते केवळ संशयित आहेत. त्यांच्या सखोल तपासणीनंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजता येणार्‍यांची संख्या आजतरी करोनाच्या संशयित रुग्णांची आहे. त्यातील दोघांंना या आजाराचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असताना अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, हा दिलासा आहे. त्यासाठी चीनहून देशात येणार्‍यांबाबत आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत कुठलाही ढिसाळपणा देशात करोनाचा वणवा पेटण्यासाठी कारण ठरू शकतो. केरळमध्ये आढळलेल्या करोनाच्या दोन ठिणग्या वेळीच नियंत्रणात आणायला हव्यात, अन्यथा या ठिणग्यांनी देशात या आजारांचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही.

ऑस्ट्रेलियातील मोठ्या जंगलक्षेत्र भागात नुकताच वणवा पेटल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. वणवा एकाच वेळेस संपूर्ण जंगलात ठिकठिकाणी पेटत नसतो. वादळात दोन झाडे एकमेकांवर घासली जाऊन अग्नी निर्माण होतो. काही अंशी असे वणवे पेटवण्यास माणसांचा निष्काळजीपणाही कारण असतो. मात्र, त्यांची किंमत हजारो जीवजंतू आणि मानवाला जीवाचे मोल देऊन कित्येक शतके चुकवावी लागते. आगीचा वणवा कालांतराने नियंत्रणात येऊ शकतो. मात्र, जैविक आजाराचा हा वणवा डोळ्यांनी दिसत नसतो. त्यामुळे तो जास्त धोकादायक असतो. करोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये आणि प्रतिबंधामध्ये होणारा सवयीचा ढिसाळपणा देशाला मृतनगरीच्या वळणावर नेऊन ठेवू शकतो. उत्तर प्रदेशातील एका हॉस्पिटलमध्ये करोनाचा संशयास्पद रुग्ण असलेला विद्यार्थी हॉस्पिटलमधून पळून गेल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला पकडून हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, या सर्व घटनाक्रमात २४ तासांपेक्षा जास्त कालावधी गेला. या तरुणाला करोनाचा संसर्ग नसेल असे गृहीत धरणे हा मानवतावाद झाला. मात्र, जर या तरुणाला या आजाराचा संसर्ग झालेला असेल आणि पळून गेलेल्या २४ तासात या ठिणगीने बाहेरच्या जगात एखादा जळता निखारा पेटवला असेल तर या निखार्‍यातून आणखी निखारे सुलगण्याचा धोका माणसांची सर्वाधिक घनता असलेल्या आपल्या देशाला परवडणारा नाही. याबाबत सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि स्वतः नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी केरळमधील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाविषयी माहिती दिली आहे. एका २२ वर्षाच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या विद्यार्थ्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विद्यार्थी २४ जानेवारी रोजी वुहानमधून केरळला आला होता. करोना आजाराबाबतची लक्षणे त्याच्यात आढळल्यानंतर त्याच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाला अलाप्पुझा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. हा करोनाचा दुसरा रुग्ण आहे. पहिला रुग्णही केरळातील त्रिचूर भागात आढळला होता. या रुग्णाला केरळमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. चीनमधल्या वुहानमधून २४ जानेवारीला तो केरळमध्ये परतला होता. या दोन्ही रुग्णांची स्थिती स्थिर असल्याने काळजी नाही, असे केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र २४ जानेवारीलाच हे दोन्ही रुग्ण देशात दाखल झाले होते. चीनमधून भारतात दाखल झालेले किती भारतीय आणि चिनी नागरिक आहेत. याचा शोध घेण्यासाठी देशात कोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत. त्यांच्या तपासणीसाठी काय पावले उचलली जात आहेत. याबाबत खूपच सतर्कता आवश्यक आहे. करोनाची लक्षणे ही सामान्य सर्दी आणि तापाची असल्याने हा धोका जास्त आहे. आपल्या देशात कित्येक ठिकाणी ताप थंडी हा अंगावर काढण्याचा आजार समजला जातो. त्यामुळे हा धोका वेळीच लक्षात घ्यायला हवा. चीनमध्ये जाऊन आलेल्या जवळपास दोन हजार रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ७५ जणांना विविध रुग्णालयात विविध कक्षांत उपचार केला जात आहेत. ही स्थिती असताना वुहानमधून व्यक्ती भारतात दाखल होतच आहेत. २४ देशात करोनाचा फैलाव झाल्याने भीती पसरली आहे. अशा परिस्थितीत याबाबत प्रतिबंधात्मक उपाय हाच या आजाराला फैलावण्यापासून रोखण्याचा सध्यातरी उपाय आहे, तो आपण सर्वांनी सजगपणे, सतर्कतेने करायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -