Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स बघ्यांचा एक नकार हवाय!

बघ्यांचा एक नकार हवाय!

Related Story

- Advertisement -

‘वेड लागलंय या मीडियावाल्यांना… काहीही दाखवत सुटलेत. आधी कोरोनाबद्दल वाट्टेल ते..मग सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा कीस पाडला आणि आता कंगणा रनौतच्या मागे लागलेत. कशात म्हणून काही राम राहिलेला नाही. वास्तविक बातम्या देणं हे यांचं काम. पण बातम्या सोडून सगळं देतात. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात घुसतात. कुणालाही काहीही विचारतात. कधी काय विचारावं याचं अजिबात भान नाही. बॉलिवुडवाल्यांना तर या मीडियावाल्यांनी पार वेडं करून सोडलं आहे. कुणाची कुणाशी कशी भानगड आहे, कोण कुणाच्या घरी कसं सापडलं आणि कोण कुणासाठी कसं भांडलं या असल्या बिनकामाच्या गप्पा मारायला यांना फार आवडतं आणि आपल्यालाही असलंच काहीतरी दाखवत असतात. शीण आलाय सगळ्याचा. मी तर न्यूज चॅनल बघणंच सोडून दिलं आहे…!’

नुकताच हा संवाद कानांवर पडला. तसा तो आपल्या सगळ्यांच्याच कानांवर पडत असतो आणि फक्त आज नाही, तर गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने पडत आला आहे. त्यामध्ये तथ्य नाही असं म्हणण्याचं धाडस कुणीही करू शकणार नाही. कारण पुरावे आपल्या सगळ्यांच्या घरात दिवसरात्र अगदी दुधाचा रतीब पडावा तसे ओतले जात असतात आणि आपणही ते अधाशासारखे गिळत असतो आणि सगळं गिळून झाल्यावर पुन्हा दुधात पाणीच फार होतं, असं म्हणून ढेकर देऊन टाकतो. बकरी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी! अशातलाच हा प्रकार! हां आता त्यातल्या काही बकर्‍या वातड असतात, काही खवट असतात, काही आरडा-ओरडा करणार्‍या असतात आणि काही नुसत्याच शिवारात खत टाकत फिरत असतात. पण मोटामोटी विचार करायचा झाला तर सगळ्याच बकर्‍या एकाच ध्येयामागे असतात. त्यांचा ‘चारा’ आणि समोरच्याचा ‘घोटाळा’! पण हे सगळं नक्की का होतंय, असा प्रश्न जसा आपण माध्यमांना करतो, तसाच तो स्वत:ला देखील करायला हवा!

- Advertisement -

आधी कोरोना, नंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि नुकतंच फोडणी मिळालेलं कंगणा रानौत विरूद्ध शिवसेना ऊर्फ संजय राऊत प्रकरण.. या आणि याआधीच्याही अनेक प्रकरणांमध्ये माध्यमांनी कळसच केला असं प्रत्येक प्रकरणावेळी म्हटलं गेलं आणि पुढच्या वेळी माध्यमांनी हे सगळे अंदाज खोटे ठरवत पुढच्या प्रकरणात त्याऊपर कडी केली. त्यामुळे माध्यमांचा कळस नक्की कोणता आणि किती उंचीचा, याचं परिमाण ठरवता येणं कठीण होऊन बसलं आहे. खरंतर, ते आपणच कठीण करून ठेवलेलं आहे.

अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा असं एक गणित आहे. त्यात मागणीनुसार पुरवठा वाढवला किंवा कमी केला की वस्तूच्या किमतीत फरक पडतो. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी वाढली, की त्याची किंमत वाढते. मग पुरवठा वाढवून जास्त फायदा मिळवण्यासाठी त्याचं उत्पादन वाढतं. तशाच प्रकारच्या अधिकाधिक वस्तू बाजारात येतात. थोड्या कालावधीसाठी त्यातून फायदाही मिळतो. पण नंतर अतिपुरवठा झाल्यामुळे मागणी कमी होऊन वस्तूची किंमत कमी व्हायला लागते. परिणामी आपोआप उत्पन्न घटल्यामुळे त्या वस्तूचं उत्पादनही कमी केलं जातं. अर्थात हा जरी या सूत्राचा ढोबळ अर्थ असला, तरी त्यातून अंदाज मात्र नक्की लागू शकतो. अर्थशास्त्राचं हे सूत्र माध्यमांच्या वर्तणुकीला अगदी तंतोतंत लागू होतं. (आणि माध्यमांकडूनही सुरू असलेल्या तमाशासाठी तेच समर्थन म्हणूनही दिलं जातं!) पण इथे प्रेक्षक अर्थात माध्यमांकडून उत्पादित केल्या जाणार्‍या वस्तूला मागणी देणारे ग्राहक म्हणजेच आपण अर्थशास्त्राच्या या तत्वाला पार हरताळ फासला आहे. त्यामुळे आपली मागणी म्हणून त्यांचा पुरवठा आणि त्यांचा पुरवठा म्हणून आपली परत मागणी असं नवीनच सूत्र आपण तयार केलं आहे.

- Advertisement -

माध्यमांच्या आजच्या तमाशाला आपणही माध्यमांइतकेच जबाबदार आहोत, हे कुणीही मान्य करायला तयार नाही. फक्त माध्यमांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून भागणार नाही. कारण आपणही या ‘राड्या’मध्ये त्यांचे ’पार्टनर इन क्राईम’ आहोत आणि जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही, तोपर्यंत यातून आपली सुटका होणं शक्य नाही. माध्यमांचा हा तमाशा आपल्या घरांचा फड करून असाच रंगत राहणार! याचं कारण अगदी साधं सरळ आहे. सध्याच्या काळात माध्यमं ही पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर चालणारे उद्योगधंदेच झाले आहेत. त्यामुळे त्यांना जे फायद्याचं आहे तेच ते करणार, ज्यातून फायदा मिळणार नाही, ते ते करणार नाहीत. अर्थात, पत्रकारितेची मूल्य, हेतू, वसा, समाजाचं भलं, कल्याण, क्रांतिकारी विचार वगैरे करणारी मंडळी देखील आहेत. नाही असं अजिबात नाही. पण ती मंडळी या माध्यमांच्या वर्तुळापासून फार लांब कुठेतरी आपली नैतिक पत्रकारिता करताना दिसतात. तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचणारी पत्रकारिता ही या आर्थिक फायद्यावर आधारित व्यावसायिकांकडूनच येत आहे. त्यामुळे जोपर्यंत ते बनवत असलेल्या ’प्रॉडक्ट’ला आपल्याकडून मागणी आहे, तोपर्यंत या अशा उत्पादनांना मरण नाही.

‘लोकांच्या’ वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याबाबत ‘लोकांना’ असलेला रसच बिग बॉससारखे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय करत असतो. इतरांवर कुरघोडी करण्याची वृत्तीच कायम द्वेष-राग-मत्सर-हेवा-सूड अशा भावनांचा अतिअतिरेक करणार्‍या भडक मालिका विश्वाला तुमच्या-आमच्या घराचा एक हिस्सा बनवत असतो. त्यामुळे माध्यमांकडून केल्या जाणार्‍या या किंवा यासाठीच्या गोष्टींना नावं ठेवत का होईना पण पाहिलं जातं. चघळलं जातं. अंधश्रद्धा तर बहुतांश प्रेक्षकवर्गाच्या वैयक्तिक आयुष्याचा एक घटकच राहिला आहे. त्यामुळे अशा गोष्टींना कायमच मागणी असते हे न कळण्याइतके माध्यमांमधले तथाकथिक ‘जाणकार’ काही खुळे नाहीत. मी जर एखाद्या उद्योगात किंवा व्यवसायात पैसा गुंतवत असेल, तर त्यातून तो पैसा परत कसा मिळेल, वाढवून कसा मिळेल याचा विचार कोणताही गुंतवणूकदार करतोच. मग तो माध्यमांच्या ‘बिग बॉस’नी केला तर ते कोणत्याही उद्योगप्रणालीसाठी योग्यच धोरण ठरेल! मग ज्या गोष्टींना मागणी जास्त आहे, त्याच गोष्टींचं अधिकाधित उत्पादन घेण्याचं धोरण ठरवलं जाणारच.

माध्यमांच्या धोरणांमागची आर्थिक कारणं किंवा त्यांचे हितसंबंध यांच्यावर भाष्य करण्याचा इथे अजिबात प्रयत्न नाही. मात्र, इतर बाबतीत म्हटलं तर माध्यमं काय किंवा आपण प्रेक्षक म्हणून काय, या चक्रात अडकलो आहोत. आपण जे पाहू, ते माध्यमं दाखवणार, आपण ज्याची मागणी करू, ते माध्यमं पुरवणार. नाहीतर उगीच कुणाला जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात कुठल्यातरी सरकारी कार्यालयाबाहेर कुठल्यातरी आरोपीचा बाईट किंवा व्हिडिओ किंवा फोटो घेण्यासाठी गर्दी करण्याचं कारण नाही. त्यांच्यासाठी तो रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या एसी कार्यालयांमध्ये बसलेल्यांसाठी तो फायद्या-तोट्याचा प्रश्न आहे तर आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठी बर्‍याच वेळा ती कुणाची कशी अवस्था झाली हे बघण्याची हौस असते. वृत्तपत्रांचा उमेदीचा काळ म्हटली जाणारी 60, 70, 80 आणि अगदी नव्वदीच्या दशकात अशा प्रकारचे तमाशे का होत नव्हते? वृत्तवाहिन्या देखील पहिल्या दशकभरात असे तमाशे करण्याच्या भानगडीत पडली नाहीत. पण वृत्तवाहिन्या देखील मनोरंजनाची हौस भागवण्यासाठी म्हणून बघणार्‍या एका मोठ्या प्रेक्षकवर्गामुळे समस्त प्रेक्षकविश्वालाच शिक्षा झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

माध्यमांची विश्वासार्हता किंवा संवेदनशीलता अजूनही पूर्णपणे अस्तंगत झालेली नाही असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे. पण इतरांचा झगमगाट पाहून उरलीसुरली ती देखील बुजरी होऊन मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडू लागली आहे आणि हे गंभीर लक्षण आहे. कधीकाळी समाजाचा आरसा असणारी माध्यमं आता त्याच समाजाचा एक घटक झाली आहेत आणि त्यांना आरसा दाखवणारे दर्दी प्रेक्षक मात्र कुठल्या कुठे गडप झाले आहेत. इतरांना आरसा दाखवून वठणीवर आणणार्‍या माध्यमांनाच आता वठणीवर आणण्यासाठी आरसा दाखवण्याची वेळ आली आहे. पण ते दाखवण्याची ‘मुभा’ असणारे प्रेक्षक मात्र त्याच हुल्लडबाजीचा एक भाग बनले आहेत. एक मेसेज काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. त्यात म्हटलं होतं, ‘माध्यमांचा टुकार तमाशा थांबवता येईल की नाही ते माहीत नाही. पण किमान त्याचा निषेध करण्यासाठी अमुक तारखेला अमुक वेळी एक तास महाराष्ट्रात कुणीही न्यूज चॅनल पहायचे नाहीत’. वरवर पाहता ही एक साधी कृती वाटावी. त्यामुळे कदाचित माध्यमांच्या या अजस्त्र पांढर्‍या हत्तीला टाचणीइतकाही फरक पडणार नाही. पण त्याची सुरुवात तरी नक्की झाली आहे. माध्यमांच्या उत्पादनांना मागणी करणार्‍या प्रेक्षकांनी त्यांचं उत्पादन नाकारण्याची ती सुरुवात होती. आतापर्यंत माध्यमांचा अनियंत्रित तमाशा पाहणार्‍या बघ्यांचा तो पहिला उत्स्फूर्त नकार होता!

- Advertisement -