घरफिचर्स‘मिरासदारी’ एक्झिट..!

‘मिरासदारी’ एक्झिट..!

Subscribe

निखळ विनोदीशैलीचे प्रतिभासंपन्न आणि सिद्धहस्त लेखक द. मा. मिरासदार यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची कधीही भरून न येणारी अपरिमित अशी हानी झाली आहे. मराठी साहित्यामध्ये जेव्हा शहरी साहित्याचे वर्चस्व होते त्या काळात मिरासदार यांनी ग्रामीण विनोदाचे अनोखे रंग ढंग विनोदी कथा लेखनाच्या माध्यमातून साहित्यविश्वात आणले आणि कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक अफलातून प्रयोग करत कथाकथन हा साहित्य प्रकार त्यांनी अजरामर केला, असे म्हटले तर त्यात नवल वाटू नये. दमा हे मराठी साहित्य प्रांगणातील अत्यंत मोलाचे असे रत्न होते. त्यांच्या साहित्यामध्ये प्रमुख्याने ग्रामीण जीवनातील बारकाव्यांचे अत्यंत मार्मिक आणि त्यातही विनोदी पद्धतीने चित्रण अशी मिश्किल विनोद निर्मिती होती. कथाकथन या साहित्य प्रकाराला व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, पु. ल. देशपांडे तसेच द.मा. मिरासदार यासारख्या समकालीन लेखकांनी उत्तुंग प्रतिष्ठा मिळवून दिली. दमांचा विनोद हा निखळ हसवणारा तर होताच. मात्र, जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाराही होता. कथाकथनातून हास्याचे तुषार शिंपडत त्यांनी वाचकांना आणि प्रेक्षकांनाही त्यांच्या विनोदाने लोटपोट हसायला शिकवले. कथाकथन हा खरेतर शहरी साहित्यप्रकार होता. मात्र, त्याला विनोदाचा गावरान तडका देण्याचे काम दमांनी केले. त्यांच्यामुळेच कथाकथन हा मराठमोळा साहित्यप्रकार सातासमुद्रापार लोकप्रिय झाला. ‘माझ्या बापाची पेंड,’ ‘भुताचा जन्म,’ ‘फर्मास गोष्टी,’ ‘फुकट,’ ‘चकाट्या,’ ‘हसणावळ,’ ‘गुदगुल्या,’ ‘गफलत,’ ‘माकडमेवा,’ ‘भोजन भाऊ,’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ असे त्यांचे एकाहून एक सरस असे गाजलेले कथासंग्रह आणि त्यांची यादी न संपणारी आहे.

दमांचा जन्म अकलूज येथे 14 एप्रिल 1927 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अकलूज आणि नंतर पंढरपूर येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. काही काळ त्यांनी पत्रकारितादेखील केली. तसेच शाळेत शिक्षक म्हणून नोकरीही केली. 1952 मध्ये ते शिक्षकी पेशात आले आणि 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.1968 ते 1989 अशी तब्बल एकवीस वर्षे ते गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या लेखनाचा शुभारंभ हा 1950 मध्ये सत्यकथा मासिकात प्रकाशित झालेल्या ‘रान माणूस’ या कथेपासून झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चि.वि.जोशी, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे अशा नावाजलेल्या साहित्यिकांच्या विनोदाची बरोबरी करत मिरासदार यांच्या ग्रामीण विनोदी ढंगातील कथादेखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. शहरी नवकथांबरोबरच ग्रामीण भागातील विनोदी कथा आणि साहित्य त्यांनी समांतरपणे लोकप्रिय केले. ग्रामीण जीवनाचे मार्मिक खुसखुशीत व्यक्तिचित्रण आणि चटकदारपणे गोष्ट सांगण्याची लकब त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील श्रद्धा-अंधश्रद्धा आणि त्यामधून निर्माण होणारा सहजसाध्य विनोद हा त्यांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने त्यांच्या कथाकथनातून साहित्य रसिकांसमोर आणला. गावागावातील निरुपयोगी गप्पांना त्यांनी चमचमीत आणि झणझणीत असे ग्रामीण विनोदाचे साहित्यिक मूल्य प्राप्त करून दिले. मिरासदार यांच्या लेखनाचे हे एक ठळक वैशिष्ठ्य म्हणता येईल की, ज्या काळात शहराशहरात नियतकालिके सर्वदूर विस्तारत होती त्याच वेळी ग्रामीण ढंगातील लेखनाने त्यांनी ग्रामीण जीवनातील अनुभवविश्व मार्मिक विनोदाने वाचकांसमोर उलगडून दाखवले. 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकातील कथा लेखनापासून कथालेखक म्हणून स्वतःची स्वतंत्र कारकीर्द सुरू करणार्‍या मिरासदारांनी कथाकथन या साहित्य प्रकारावर स्वतःची ठसठशीत अशी छाप उमटवली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि मिरासदार यांनी संयुक्तपणे केलेले कथाकथनाचे कार्यक्रम आजही कथा रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. कथाकथनाला मराठी साहित्य विश्वात रुजविण्यात आणि त्याला लोकप्रिय करण्यात मिरासदार यांचे योगदान मराठी साहित्यविश्व कदापि विसरू शकणार नाही इतके आहे. केवळ भारतातच नव्हे तर त्यांनी परदेशातही ग्रामीण विनोदी ढंगातील कथाकथनाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. मिरासदार यांनी त्यांच्या कथाकथनातून टिपलेल्या ग्रामीण जीवनातील अतरंगी व्यक्ती चित्रांना आणि कथाकथनाला मराठी वाचकांनी आणि प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इंदोर, हैदराबाद, कोलकाता या शहरांमधूनही त्यांनी कथाकथन केले तर सातासमुद्रापार कॅनडा आणि अमेरिकेमध्ये कथाकथनाचे 25 कार्यक्रम करत त्याचा विक्रमही प्रस्थापित केला. इतके केल्यानंतरही मिरासदार यांचे पंढरपूरशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जोपासले. त्यांचे पाचवी ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पंढरपुरातील लोकमान्य विद्यालयात झाले होते. पंढरपुरातील कवठेकर प्रशाला येथे त्यांनी शिक्षक म्हणून कामही केले होते. याच काळात तरी विनोदी लेखन सुरू केले. त्यामुळेच त्यांच्या साहित्यामध्ये पंढरपुरी राहणीमान, विठ्ठलाच्या वारीमधील प्रसंग, चावडी वरच्या गप्पा, वारीमधील अभंग हे सतत झळकत राहायचे. मानवी जीवनातील दुःख विनोदाने पूर्णपणे संपुष्टात येऊ शकत नाही. मात्र, हे दुःख हलके करण्याचे सामर्थ्य विनोदात आहे असे मिरासदार सांगायचे. केवळ विनोदी लेखनच नव्हे तर स्पर्श, विरंगुळा, कोणे एके काळी यासारख्या काही गंभीर कथा लेखनातूनही त्यांनी ग्रामीण जीवनातील कारुण्य अत्यंत बारकाईने टिपले आहेत. मात्र, बालपणापासूनच त्यांचा ओढा हा त्यांची प्रवृत्ती मिश्किल असल्याकारणाने विनोदी लेखनाकडे होता. ‘गप्पा-गोष्टी,’ ‘गुदगुल्या,’ ‘मिरासदारी,’ ‘गप्पांगण,’ ‘ताजवा’ असे त्यांचे 24 कथासंग्रह आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाच्या कथा पटकथा लेखनासह त्यातील हेडमास्तर अशी भूमिकाही त्यांनी साकारली होती. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या गाजलेल्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिकेदेखील मिळाली होती.

- Advertisement -

‘व्यंकुची शिकवणी’ या त्यांच्या लोकप्रिय झालेल्या विनोदी कथेवरून ‘गुरुकृपा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे झालेल्या 71 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मिरासदार यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठे योगदान दिले होते. मिरासदार यांनी ज्या काळामध्ये ग्रामीण कथाकथनाला साहित्यविश्वात प्रस्थापित केले. तो काळ हा एकूणच मराठी साहित्यासाठी आणि त्याहीपेक्षा म्हणजे ग्रामीण साहित्यासाठी प्रचंड संघर्षाचा काळ होता. आजच्यासारखी प्रचाराची आणि प्रसाराची अत्याधुनिक साधनसामुग्री त्या काळात उपलब्ध नव्हती. त्यामुळे अस्सल मातीतील हा कलावंतच ग्रामीण जीवनातील रंगढंग, अनुभव विश्व, ग्राम्य जीवनातील अवलिया व्यक्तिचित्र, श्रद्धा-अंधश्रद्धांचे खेळ आणि एकूणच ग्रामीण संस्कृतीशी मराठी माणसाची जुळलेली नाळ मार्मिक विनोदी सादरीकरणाने रसिकांसमोर मांडू शकला. मिरासदार यांच्या मिरासदारीचे हे खरेखुरे सामर्थ्य होते. त्यांच्यातील ग्रामीण बाजाचा रांगडेपणा हा वाचकांना आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. शहरी नवकथांच्या मानाच्या पंगतीत ग्रामजीवनातील सहज ओघवत्या भाषाशैलीतील कथांना केवळ विनोदाच्या जोरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्या रसिकांनी तेवढ्याच प्रेमाने डोक्यावर घेणे हे त्या काळात वाटते तितके सहज सोपे नक्कीच नव्हते. त्यामुळेच मिरासदार यांची एक्झिट ही जशी साहित्य रसिकांना चटका लावणारी आहे त्याचप्रमाणे तमाम मराठी अभ्यासकांना त्यांची उणीव सतत भासवून देणारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -