घरफिचर्सलॉकडाऊन ते अनलॉक : देशाची झालेली फरफट

लॉकडाऊन ते अनलॉक : देशाची झालेली फरफट

Subscribe

जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी २०२० वर्ष एक अविस्मरणीय बनले आहे. २०२० या वर्षाची भयानक आठवण कोणती असा जर कोणाला प्रश्न विचारला तर सर्वांची एकच आठवण असू शकते ती म्हणजे कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये देशातील कष्टकरी, गोरगरिबांची फरफट झाली. त्यामुळे आता लॉकडाऊनचे नाव जरी काढले तरी सर्वांना घाम फुटतो. भारतात २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला. यानंतर जे काही चित्र देशाने पाहिले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. लॉकडाऊनमुळे कोट्यवधी कष्टकरी, स्थलांतरित मजुरांचे हाल झाले.

भारतात ३० जानेवारीला केरळमध्ये पहिला रुग्ण आढळला. खरेतर तेव्हाच आंतरराष्ट्रीय दळवळणाच्या सेवा बंद करायला हव्या होत्या. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार म्हणून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्याचे परिणाम अख्खा देश भोगतोय. देशात पहिला रुग्ण सापडल्यानंतर तब्बल ५५ दिवसांनी देशात लॉकडाऊन करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला रात्री आठ वाजताच्या सुमारास जनतेला अवघ्या चार तासांचा अवधी देत देशात लॉकडाऊन जाहीर केलं. त्यावेळेपासूनच देशातील गोरगरिबांची फरफट सुरू झाली. अचानक लॉकडाऊन लागू केल्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांच्या जत्थेच्या जत्थे बाहेर पडले. स्थलांतरित मजूर आपआपल्या गावी जायला निघाले. यामुळे सगळीकडे एकच गर्दी झाली.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविरुद्ध लढणार्‍या जगातील तमाम गरीब देशांमध्ये समान धागा काय होता, तर तो स्थलांतरित मजुरांच्या हालाखीचा. पंतप्रधान मोदींच्या २४ मार्चच्या लॉकडाऊनच्या घोषणेत कोणतंच नियोजन नव्हतं. लॉकडाऊनचा हा निर्णय कष्टकरी, स्थलांतरित मजूर वर्गाला कोड्यात टाकणारा होता. पंतप्रधानांच्या अचानक घोषित केलेल्या निर्णयाने सैरभैर झालेल्या स्थलांतरितांच्या झुंडी रस्त्यांवर दिसू लागल्या. आवाज नसलेला, आर्थिक शोषणाने बेजार झालेला, दुर्लक्षित, संतप्त आणि उपासमार होत असलेल्या स्थलांतरित मजुरांची दयनीय स्थिती हृदय पिळवटून टाकणारी होती. लहान मुलं, गर्भवती, वृद्ध स्त्री-पुरुष यांनी डोक्यावर बोचकं, काखेत मूल आणि हातात पिशव्या घेत गावाकडे जाण्याचा हजारो किलोमीटरचा प्रवास पायीच सुरू केला. वाटेत खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. असे जत्थेच्या जत्थे गावाकडे निघाले. १९४७ च्या फळणीनंतर पहिल्यांदाच देशात हजारो स्थलांतरित कामगारांना शेकडो किलोमीटर पायी चालत जावं लागलं. यात अनेक मजुरांचा जीव गेला.

लॉकडाऊनचा फटका जसा गोरगरीब, कष्टकरी जनतेला बसला तसाच तो उद्योग क्षेत्राला बसला. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. बांधकाम क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रातील लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. लॉकडाऊनच्या काळात ६७ ते ७० टक्के लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. कोरोनामुळे जगासह देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. भारताच्या विकासदरात ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांनी घसरण झाली. लॉकडाऊनचा फटका वाहन उद्योगाला, कृषी क्षेत्राला बसला. अनेक उद्योग बंद पडले. उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आरबीआयने वित्तीय संस्था आणि बँकांना व्याजावर तसेच थकबाकीवर सवलतीची सुविधा देण्यास सांगितलं. शिवाय, लॉकडाऊनमुळे रोडावलेली अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यात अनेक योजना सरकारने आणल्या. यामध्ये किती जणांना फायदा झाला? याची माहिती सरकारलाच ठाऊक.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. मात्र, कोरोनामुळे सर्व शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको हे त्यामागचं उद्दिष्ट होतं. मात्र, या काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा समोर आला. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात की नको यावरून सावळा गोंधळ सुरू झाला. अखेर अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरलं. एकीकडे अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विषय असताना इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उभा होता. शिवाय, मुलांच्या शाळा सुरू कधी करायच्या? असे अनेक प्रश्न आ वासून उभे होते. सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र, ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणात डिजिटल इंडियाचं भयानक चित्र समोर आलं. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास समस्या निर्माण झाल्या.

लॉकडाऊनमुळे चिखलात रुतलेलं अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी देशात ८ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात विविध क्षेत्र सुरू केली. राज्याच्या तिजोरीला चालना देण्यासाठी सुरुवातीला मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली. यानंतर हळूहळू सर्वच क्षेत्र खुली करण्यात आली. देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. कोरोनासंबंधीच्या नियमांमुळे अनेक सण, लग्नसोहळे घरी राहून, कमी जणांच्या उपस्थितीत साजरे करावे लागले. मात्र, या नियमांमधून निवडणुका, राजकीय नेत्यांच्या प्रचारांना मुभा होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील प्रचाराला उतरले. कोरोनामुळे संसदेचं अधिवशेन रद्द करत राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराला राजकीय नेते पोहचलेले लोकांनी पाहिले.

दरम्यान, देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूने जगासह भारतात खळबळ माजवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरळीत होणार असं वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी ब्रिटनहून आलेल्या नागरिकांमध्ये नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. मात्र, असं असतानाही नव्या वर्षात पुन्हा लॉकडाऊन होऊ नये हीच आशा!

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -