घरफिचर्सप्रतिसाद ...

प्रतिसाद …

Subscribe

उमटे धरणातील गाळ काढा

रायगड जिल्ह्यातील अनेक भागात आजघडीला पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाणीटंचाईच्या तीव्र झळा अनेक गाव खेड्यापाड्यांना पोहचत आहेत. असे असताना अनेक धरणे राजकीय व शासकीय अनास्थेमुळे गाळात रूतली आहेत. त्यापैकीच एक आहे अलिबाग तालुक्यातील उमटे धरण. या धरणाची साठवण क्षमता जरी मोठी असली तरी सध्या धरण चहुबाजूंनी गाळाने भरलेले दिसत आहे. रामराज परिसरात वसलेल्या या धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली होती. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन विकास प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून, पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यःस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता साधारणत: 25 ते 30 दशलक्ष घनफूट कमी झाली आहे. त्यामुळे मोठे धरण असूनही ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी तेथील ग्रामस्थांची परिस्थिती झाली आहे. उमटे धरणातून साधारणत: दीड लाख लोकांची तहान भागवण्याची क्षमता आहे. 70 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणाला उपेक्षित ठेवले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवून ग्रामस्थांची तहान भागवावी. -गौरी मोरेश्वर धुरी, नागाव, अलिबाग

- Advertisement -

केबल चॅनेलचे करायचे काय?
गेल्या काही दिवसापासून महाड शहरात असलेली केबल सेवा डळमळीत झाली आहे. केबल चॅनेल निवड प्रक्रिया सुरू झाल्यापासून केबलची सेवा देखील बीएसएनएलप्रमाणेच सतत खंडित होत आहे. एकीकडे चॅनेल निवड प्रक्रियेमुळे केबलचे दर अव्वाच्यासव्वा झाले आहेत. यामुळे केबल सेवा न परवडणारी झाली आहे. चॅनेल निवड आणि पॅकेज भरणा करून देखील अनेक चॅनेल दिसत नाहीत. तर काही चॅनेल वारंवार खंडित होत असतात. फ्री चॅनेल देखील अनेक वेळा दिसत नाहीत. वारंवार खंडित केबल सेवेमुळे अनेक वेळा आवडीचा कार्यक्रम किंवा बातम्या पाहण्यास मिळत नाहीत. वाढलेले दर पाहता ही सेवा चांगल्या पद्धतीने पुरवणे अपेक्षित आहे. चॅनेल निवड केल्यानंतर याचे बील देखील परवडणारे नाही. केबल कार्यालयाकडून मात्र हे बिल महिन्याच्या महिन्याला वसूल केले जाते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून केबल वारंवार खंडित होत असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. -राजू सासणे, महाड

समाज प्रबोधन गरजेचे
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात मुलीने दुसर्‍या जातीतील मुलाशी प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबीयांनी मुलगी व जावयाला पेटवून दिले. मुलीचा दुर्देवी अंत झाला तर जावई पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार घेतो आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती. खोट्या प्रतिष्ठेपायी स्वतःच्या मुलीचा व जावयाचा जीव घेण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीही वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अनुराधा बिराजदार या तरुणीला वडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या शेतात सालगडी म्हणून काम करणार्‍या गड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला म्हणून या मुलीची हत्या तिची आई व वडिलांनी केली. ऑनर किलिंगच्या या दोनच घटना नाहीत. याआधीही अशा मानवतेला काळिमा फासणार्‍या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या ऑनर किलिंगच्या घटना वारंवार घडत असल्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. आपल्या मुलीने परजातीतील मुलाशी विवाह केल्याने समाजातील आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, समाजात आपली बदनामी होईल, असा समज करून घेऊन मुलीची केलेली हत्या माणुसकीला काळिमा फासणारी आहे. -श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

- Advertisement -

दुष्काळाचे मूळ भ्रष्टाचारातच
दरवर्षी एप्रिल, मे, जून या कालावधीत पाण्याची कमतरता असते हे नवीन नाही. दुष्काळ यावेळी जास्त जाणवत आहे. तहान लागली की विहीर खोदायची ही राज्य सरकारची चाल जुनीच. जमिनीत पाणी असेल तरच पाणी मिळेल. दुष्काळ पडणार आहे हे अगोदर कळते. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून देखील ठोस उपाययोजना करण्यात अपयश आले कसे? शेतकर्‍यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप संथगतीने होते व सर्व पिकांना पीक विमा वाटप नाही. पाणी नाही त्यामुळे चारा नाही हे लक्षात येत नाही का? जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात चारा छावण्या नाही. यामुळे जनावरे मरतात. शेतकर्‍यांना तत्काळ सहाय्य मिळत नाही. जलयुक्त शिवारसारखी योजना शासनाने दुष्काळ निवारणासाठी अमलात आणली खरी; पण प्रत्यक्षात ठेकेदार, कंत्राटदार या योजनेत धनाढ्य होत आहेत. गावे तहानलेली आहेत. दुष्काळी भागात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. उपक्रमाचे फोटोसेशन मोठ्या दिमाखात होते? टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. या टँकरलॉबी व नोकरशहा व पुढारी यांचे लागेबांधे भ्रष्टाचाराच्या भोवर्‍यात नाही का? हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते असे फोटो दैनिकांत नेहमी येतात. शासनाने शहरांना पाइपलाइनने पाणीपुरवठा केला तसाच शेतीला करण्यात आला तर खर्च कमी होऊन शेतकरी सदन व्हायला मदतच होईल. -नानासाहेब मंडलिक- ओझर मीग (नाशिक )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -