घरफिचर्सविनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Subscribe

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्मय समीक्षक होते. त्यांचा जन्म २९ जून १८७१ रोजी विदर्भातील बुलढाण्यास झाला. अकोला, पुणे आणि मुंबई येथे त्यांनी बी.ए., एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचा व्यवसाय वकिलीचा होता. त्यांनी आपल्या वाङ्मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूष (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली.

‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे-अर्थात साहित्य बत्तिशी ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत.

- Advertisement -

कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटीत्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना-न्यासात्मक चमकदार वाक्यरचना-रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकर्‍यांनी व त्यानंतर प्र.के.अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे ‘सुदाम्याचे पोहे’ हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्मय ठेवा आहे. त्यात संग्रहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं.वि. जोशी, अत्रे, पु.ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील.

कोल्हटकरांचे वाङ्मय समीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. पुस्तक परीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यामधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले, त्यामुळे मराठी वाङ्मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली. अशा या महान साहित्यकाचे १ जून १९३४ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -