घरफिचर्समेट्रो वुमन

मेट्रो वुमन

Subscribe

मुंबईतल्या वाहतूक कोंडीसाठी मेट्रोवर सध्या ब्लेम गेम सुरू आहे. मेट्रोची कामे सुरू नसती तरीही वाहतूक कोंडी ही झालीच असती. उलट मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक चॅनेलाईज होण्यास मदत झाली आहे. होय, मेट्रोच्या कामामुळे सध्या मुंबईकरांची थोडीशी गैरसोय होत आहे. पण नक्कीच उद्याच्या चांगल्या वाहतुकीच्या पर्यायासाठी थोडीशी कळ मुंबईकरांना सहन करावीच लागेल, अस मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ’ माय महानगर आणि मी’ या फेसबुक लाईव्ह चर्चेतून मांडले.

मुंबईतील वाहतूक कोंडी, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, वर्क लाईफ बॅलेन्स ते करिअरमधील अनेक महत्वाच्या टप्प्यांवर त्यांनी या चर्चेतून संवाद साधला. दिल्ली मेट्रो, कोकण रेल्वे अशा मोठ्या प्रकल्पाच्या कामातून ई. श्रीधरन यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मेट्रो ३ प्रकल्पाच्या सर्वेसर्वा अश्विनी भिडे पहिल्या मेट्रो वुमन म्हणून नावारुपास येत आहेत.

मुंबईची वाहतूक कोंडी मेट्रोच फोडणार

जगभरात प्रगत मानल्या जाणार्‍या शहरांमध्ये वाहतुकीचा सर्वात उत्तम असा पर्याय करून दिला. खासगी वाहनांसाठीची प्रत्येक कुटुंबातील इच्छा आणि आकांक्षा तर असतेच. पण त्याचवेळी वाहतुकीचा सार्वजनिक पर्यायही उत्तम देणं महत्वाच आहे. मुंबईत तयार होणारं मेट्रो प्रकल्पांच जाळं पाहिलं तर कोणी आपलं खाजगी वाहन वापरले नाही तरीही प्रवास करणे शक्य होणार आहे. पण खाजगी वाहने ही रस्त्यावर धावणारच आहेत. हे देखील विचारात घ्यायला हवे. सुलभ आणि सुकर प्रवासाचे पर्याय असतील तरच लोक अशा सेवांचा वापर करू शकतात. मेट्रो 3 च्या पर्यायामुळे अंदाजे 14 लाख प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करू शकतात. या मेट्रो प्रकल्पाची कमाल अशी 18 लाख प्रवासी सामावण्याची क्षमता आहे. मेट्रो 3 ज्या भागातून जाणार आहे. त्याठिकाणी सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे साडेचार लाख वाहने या भागात पोहचण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर बाहेर पडतात. त्यामुळे ही रस्त्यावरची वाहने कमी करून लोकांनी मेट्रोचा वापर केला तर निश्चितच वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मेट्रोची कामे सुरू आहेत म्हणून वाहतूक कोंडी आहे, ही वास्तविकता नाही. मेट्रोचे काम सुरू नसते तेव्हाही वाहतूक कोंडी कायमच राहिली असती. उलट मेट्रोच्या कामामुळे वाहतूक चॅनेलाईज झाली आहे.

- Advertisement -

ओला आणि उबेरसारखे एग्रेगेटर यासारख्या सेवा लोक अधिक वापरत आहेत. 80 लाख प्रवासी वाहून नेणार्‍या उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करण्याची चांगली सोय नाही. म्हणूनच लोकांनी ओला आणि उबेरला पसंती दिली आहे. लोकांना एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी हवी असते. लोकांचा प्रवास करण्याचा ट्रेंड थांबणार नाही. मुंबईचा विस्तार होत आहे. मुंबईची फायनान्शिअल हब म्हणून ओळख आहेच. पण त्यासोबत नवीन रोजगाराची संधी तसेच यात नव्या जनरेशनचा समावेश या सगळ्यांसाठी प्रवासाची सुविधा महत्वाचीच ठरणार आहे. मग सध्याच्या उपनगरीय लोकल सिस्टिमवर आपण किती अवलंबून राहणार आहोत. या सिस्टिमची क्षमता आता संपली आहे. म्हणूनच जोवर नवीन वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत नाहीत, तोवर मुंबईची वाहतूक कोंडी संपण्याचा नजिकचा कोणताच पर्याय नाही.

धार्मिक भावना जपताना प्रकल्प पुढे नेणे आव्हान

मुंबईसारख्या लोकवस्तीत अनेक जाती धर्माचे आणि सांस्कृतिक वारसा असलेले लोक असतात. प्रत्येक जाती धर्माची धार्मिक स्थळे असतात. प्रकल्पाच्या ठिकाणी कामे करताना धार्मिक संवेदनशीलता तितकीच ठेवावी लागते. चर्चा करून तसेच तोडगा काढून त्या धार्मिक स्थळाला कस स्थलांतरीत करता येईल यासाठीच प्राधान्य द्यावे लागते. संवादातून प्रश्न सुटतात. संवाद साधण्याच ेकाम दोन्ही बाजूने व्हावे लागते. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे यावे लागते. धार्मिक स्थळांचे पुर्नवसन करताना कुठेही कटुता येऊ न देता तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येणार नाही. यासाठी प्रयत्न करूनच ही धार्मिक स्थळे हलवण्यात आली आहेत. ईस्टर्न फ्री वे साठी मंदिर, मशीद, चर्च अशा सगळ्याच धार्मिक स्थळांचे पुर्नवसन करण्यात आले. कुठलेही धार्मिक स्थळ हलवताना त्यासाठीचा विरोध तर असतोच, पण योग्य संवाद साधून त्यातून मार्ग काढता येतो. धार्मिक स्थळाचे स्थलांतर चांगल्या पद्धतीने होणार हे पटवून द्यावे लागते. मुंबईत एमयुटीपी प्रकल्पाअंतर्गत जेव्हा पुर्नवसन झाले तेव्हा सुरुवातीला कुठेही धार्मिक स्थळांच्या पुर्नवसनासाठीचे धोरण नव्हते. त्यावेळी पुर्नवसनासाठी होस्ट कम्युनिटी म्हणून मार्ग काढला. अतिरिक्त घरे घेऊन रिकाम्या झालेल्या जागेवर धार्मिक स्थळे उभारली गेली. लगेच संबंधित समाजघटक हे बदल मान्य करतात असे नाही, अशावेळी सतत बैठका घ्याव्या लागतात. अनेक स्थानिक प्रतिनिधींनी समन्वय साधण्यासाठी किंवा एकमत करण्यासाठी खूप मदत केली.

- Advertisement -

भुयारी मेट्रोचे आव्हान मोठेच

मुंबईतील ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी ही मेट्रो 1 च्या 11.5 किलोमीटरच्या टप्प्यामुळे शक्य झाली आहे. घाटकोपर वर्सोवा प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळण्यात कमी वेळेतील कनेक्टिव्हिटी हेच मुख्य कारण आहे. संपूर्ण मुंबईतील परिसरांना एकमेकांशी जोडणे हे मेट्रो 3 प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट आहे. अवघ्या 55 मिनिटांमध्ये कुलाबा ते सिप्झ हे अंतर या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. सध्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी नसणार्‍या प्रकल्पांना ही मेट्रो जोडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होईल. मेट्रो 1 मध्ये सध्या 3.5 लाख प्रवासी प्रवास करतात. तर मेट्रो 3 मध्ये 17 लाख प्रवासी प्रवास करू शकतील. भुयारी आणि उन्नत मेट्रो या दोन्ही प्रकल्पाची आप आपली आव्हाने आहेत. उन्नत प्रकल्पासाठी प्रत्येकवेळी रस्ता रूंद असतोच असे नाही. रस्त्याच्या मध्ये असणार्‍या विविध सेवा पुरवठादारांच्या वाहिन्या तसेच वाहतूक कोंडी यासारखी आव्हाने या प्रकल्पात असतात. भुयारी प्रकल्पात सलग रस्ता अनेकदा लागत नाही. अशा प्रकल्पाच्या भूगर्भात काम करताना अनेक ठिकाणी कामे करावी लागतात. मुंबईसारख्या काळा कातळ असलेल्या भूगर्भात खणून आतमध्ये जाणे आणि रस्ता खोदून ही सगळी कामे करणे हेच मोठ आव्हान आहे. पण दोन्ही प्रकल्पांची तुलना केल्यास भूमिगत प्रकल्पांमध्ये हे आव्हान सर्वाधिक आहे. अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात तसेच अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

शिक्षण क्षेत्रातल्या चांगल्या घटकांच्या एकत्रिकरणाचा प्रयोग

शिक्षण हे एकप्रकारचे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे या क्षेत्राची आव्हाने आणि स्वरूपच वेगळे असते. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था यांना बांधण्याची जबाबदारी ही शैक्षणिक धोरणाची असते. प्रत्येक घटकाचा विचार करून धोरण तयार करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, याची खातरजमा करणे हे शिक्षण विभागातील सर्वात मोठे आव्हान होते. राज्यातील 1 लाख शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कशी समान राहिल, तसेच योग्य शिक्षण या पर्यंत कसे पोहचेल यासारख्या गोष्टी बघणे हे आव्हान असते. चांगले काम करणारे काही शैक्षणिक घटक खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये होते. या सगळ्यांचा समन्वय साधण्याचा मी प्रयत्न केला. त्यामधून सकारात्मक ऊर्जा ही शिक्षण विभागाला कशी मिळेल, यासाठीचा प्रयत्न केला.

पाच वर्षात मुंबई मेट्रोचे नेटवर्क

महानगर प्रदेशाला व्यापून टाकण्याचे 270 किलोमीटरचे नेटवर्क उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मेट्रो 4 च्या निमित्ताने वडाळा-ठाणे-कासारवडवली हा महत्वाकांशी प्रकल्प आहे. त्यानिमित्ताने पुढे कल्याण, भिवंडीला जाणारे असे हे प्रकल्प आहेत. सध्याचे मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचे जाळे आणि मेट्रोच नियोजित 270 किलोमीटरचे जाळे हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीवर मुंबईतला प्रत्येक नागरिक हा येणारच आहे. आगामी पाच वर्षात मेट्रोचे खूप मोठे नेटवर्क महानगर प्रदेशात विस्तारलेले असेल.

देशात मराठी तरुणांची उत्तम कामगिरी

लोकसेवा आयोगासाठी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही. लोकसेवा आयोगासाठी आपल्याला हव्या त्या भाषेत परीक्षा देता येते. पण इंग्रजी ही ज्ञानभाषा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व हे मिळवायलाच हवे. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात शैक्षणिक नोकरी हाच मोठा पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. तुलनेत महाराष्ट्रात मात्र विद्यार्थ्यांना मुलांना करिअर निवडण्यासाठी अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक अधिकारी राज्यात अतिशय उत्तम कामगिरी करत आहे. प्रत्येक केडरनुसार राज्यांमध्ये नेमणूक होत असते. त्यामुळे प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रातच संधी मिळेल, असे होत नाही.

मुंबईकरांची 150 वर्षांसाठीची सुविधा

आरेचे क्षेत्र हे 12 हजार हेक्टर इतके मोठे आहे. त्यापैकी अवघी 25 हेक्टर जागा ही मुंबईच्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पात चालवण्यात येणार्‍या लोकल कोणतंही प्रदूषण करणार्‍या नाहीत. त्यामुळे वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी मदत होईल. तसेच आगामी 100 ते 150 वर्षांसाठी मुंबईकरांची वाहतुकीची सुविधा होणार आहे. आरे कारशेडसाठी होणार्‍या वृक्षतोडीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यास तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. मुंबईच्या रस्त्यांच्या तुलनेत 53 टक्के अधिक वाहने मुंबईच्या रस्त्यांवर सद्यस्थितीला धावतात. दररोज हजार वाहनांची भर मुंबईच्या रस्त्यांवर पडते. वाहतूक कोंडीमुळे होणारी पर्यावरणाची हानी अधिक आहे. त्यामुळे सध्या वाहनांचा वापर करणार्‍यांना मेट्रोचा पर्याय देणे महत्वाचे आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलसारख्या स्वच्छ इंधनाची चर्चा जरी होत असली तरी प्रत्यक्ष रस्त्यावर धावणार्‍या इलेक्ट्रिक व्हेईकलची आकडेवारी खूप कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिलेनियम प्लस शहरांसाठी मेट्रो महत्वाचीच

मुंबई शहराची वाढ ही उभ्या स्वरूपात झाली आहे. पण या वाढीलाही मर्यादा आहेत. पुणे शहर मात्र तुलनेत सर्व बाजूने असे वाढणारे शहर आहे. पुण्यात वाहतुकीचा सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे बस सेवा आहे. म्हणून मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम म्हणून मेट्रोचा पर्याय पुणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर यासारख्या शहरांसाठी महत्वाचा आहे. जिथे 50 बसेस लागतील तिथे एक मेट्रो लागेल आणि पर्यावरणाची हानीही कमी होईल. जी मिलेनियम प्लस शहर म्हणून ओळखली जातात त्या शहरात मेट्रोचा पर्याय कधीही सुविधेच्या रूपातच असणार आहे. पण छोट्या शहरांना मात्र मेट्रोची गरज असण्याचे कारण नाही. त्याठिकाणची बस व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. अनेकदा राजकीय फॅड म्हणून मेट्रो प्रकल्पाची मागणी केली जाते. पण मेट्रोसारखा प्रकल्प खर्चिक आहे. शेवटी या प्रकल्पाचा भार हा प्रवाशांवर पडणार आहे. ही गोष्टदेखील तितकीच महत्वाची आहे.

मातोश्री भेट प्रकल्पाच्या प्रगतीसाठी

राजकीय पक्षांमार्फत अनेकदा अपुर्‍या माहितीवर किंवा चुकीच्या माहितीवर विरोध होत असतो. अशावेळी प्रकल्पाची दुसरी बाजू सांगणे महत्वाचे असते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट हा प्रकल्प पुढे नेण्यासाठीच्या संवादाचाच एक भाग होता. मेट्रो 3 प्रकल्पाचा प्रमुख म्हणून प्रकल्पाचे आणि शहरवासीयांचे हित सांगण्याचा हा एक प्रयत्न होता. हा संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. प्रकल्पाला होणारा विरोध आणि गैरसमज दूर व्हावा हाच त्यामागचा हेतू होता. मातोश्रीवर दोनवेळा या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी मी गेली होते. या भेटींचा फायदा प्रकल्प पुढे नेण्यासाठी नक्कीच झाला.

व्हिजनरी मुख्यमंत्री

एमएमआरडीएमध्ये असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली होती. प्रत्येक मुख्यमंत्र्याची कामे करण्याची वेगळी अशी स्वतःची आपली ओळख होती. 2008 पासून मी एमएमआरडीएमध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पांसाठी कार्यरत होते. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांचा विरोध व्हायचा. पण शासनाची भूमिका ही चांगल्या प्रकल्पांना अडथळा नको अशीच होती. कितीही विरोध झाला तरीही सगळेच मुख्यमंत्री पाठीशी उभे राहिले. पृथ्वीराज चव्हाण यांची विद्वत्ता ही कामकाजासाठी नक्कीच उपयुक्त असायची. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. मुंबईतील भुयारी प्रकल्प कसा होणार ? यासाठीची आव्हाने कोणती याबाबत तर्क वितर्क होत असतानाच अनेकदा ते खंबीरपणे या प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले आहेत. या सगळ्याचा फायदा हा प्रकल्पासाठी नक्कीच झाला आहे. चारही मुख्यमंत्री व्हिजनरी होते. मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

वर्क लाईफ बॅलेन्स

महिला अधिकार्‍यांना वर्क लाईफ बॅलेन्स करावा लागतो. असं आता होत नाही. फक्त महिला अधिकार्‍यांवरच कुटुंबाची जबाबदारी येते, ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. मुंबईसारख्या शहरात पती आणि पत्नी यांना दोघांनाही काम करावे लागते. तसेच माझ्या बाबतीतही… आम्ही कुटुंब म्हणून सगळ्यांची जबाबदारी घेतो. आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये सासुबाई तसेच मुले यांनाही माझ्या कामाचे स्वरूप माहित आहे. काम संपल्यानंतर जो वेळ घरासाठी दिला जातो तो क्वालिटी टाईम देण्यासाठी माझा प्राधान्य असतो.

तर डॉक्टर, इंजिनिअर झाले असते …

वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी मी दहावीला असताना सनदी अधिकारी व्हायचे असा निर्णय घेतला. पण तेव्हा मला याबाबतचे तितकेस गांभीर्य नव्हते. जयसिंगपूरसारख्या लहान गावात मी होते. त्यावेळी कधीही कोणता अधिकारी पाहिला नव्हता. पण अधिकारी होणे शक्य आहे. असे कुणीतरी सांगितले. तेव्हा असे वाटलं की मला काही तरी वेगळं करायचं आहे. वेगळी आणि कठीण परीक्षा ज्यावेळी असते तेव्हा अशी कठीण परीक्षा क्रॅक करायला हवी, हेच आव्हान मी समोर ठेवले होत. पण तो निर्णय मी फार समजुतीने घेतला नव्हता असं नव्हतं. हे आव्हानाच आहे. त्यावर मात करायचं हेच उदिष्ट होतं. आव्हान घेतलं तर त्याच्याशी एकनिष्ठ रहायचं हे मात्र मनात निश्चित केल होतं. जयसिंगपूरसारख्या छोट्या गावात या अभ्यासाबाबत सुरुवातीला तितकीशी माहिती मिळत नव्हती.

त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. एक क्षणी असही वाटलं की आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही. काही माहितीच मिळत नाहीए तर आपण परीक्षा पास होणार की नाही, असंही वाटू लागलं होतं. इंजिनिअर किंवा डॉक्टरही होता आलं असतं. पण ते सगळं सोडून मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. सनदी अधिकारी नाही होता आलं तर काय? असे मनात शंका निर्माण करणारे प्रसंगही आले. पण एकदा या क्षेत्राचे गांभीर्य कळाल्यानंतर मी खूप योग्य निर्णय घेतला याचे समाधान वाटले. हे क्षेत्र तुम्हाला खूप मोठे एक्सपोजर देते. ते देखील अतिशय कमी वयामध्ये हे महत्वाचे.

एकाचवेळी अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. प्रत्येक क्षेत्रात तळागाळाशी जाऊन काम करण्याचे आव्हान तुमच्यापुढे असते हे महत्वाचे. ग्रामीण भागात काम करताना जलसंवर्धनापासून ते दारिद्य्र निर्मुलन, प्राथमिक शिक्षण, आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी काम केले. राजभवनात केलेल काम हे संपूर्ण धोरणनिर्मितीशी संबंधित असे काम होते. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरने एक नवे दालनच खुले केले. ही नवीन ताकद जी या सेवा क्षेत्रात आहे ती कोणत्याच क्षेत्रात नाही.

तुमची क्षितीजं खूप विस्तारतात आणि तुम्हाला रोज नव्याने शिकायला मिळतं. या अनुभवातून कोणतीही गोष्ट हाताळण्याची तुमची क्षमता वाढते. माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतं असे हे वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे. रोजची नवी आव्हाने आहेत आणि प्रश्न सोडवण्याची संधीही तुमच्यापुढे आहे. समाजासाठी कामे करण्यासाठी यासारखे व्यासपीठ असू शकत नाही. आतापर्यंतचा हा प्रवास समाधानकारक आणि घेतलेला निर्णय योग्य होता असं वाटायला लावणारा असा आहे.

मुंबईचा विलक्षण योगायोग

माझ्यासारख्या जयसिंगपूर किंवा सांगलीचे असणार्‍यांसाठी मुंबई हे स्वप्न असत. मुंबईची लोकल, गर्दी यामध्ये आपण काही करू शकू की नाही असं हे सगळं स्वप्नवत वाटायचं. 1985 दहावीत बोर्डात आल्यावर राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सत्कार झाला. जयसिंगपूरहून डोंबिवली गाठणं, लोकलने मुंबई गाठणं आणि ताज हॉटेलला सत्कार होणं हे सगळ भव्य होतं. सत्काराच्या कार्यक्रमादरम्यान तुम्हाला करिअरमध्ये काय व्हायचंय असं विचारण्यात आलं. मी त्यावेळीही आयएएस असं लिहिलं होतं. आयएएस असं लिहिणारी मी एकटीच मुलगी होती. त्यावेळी दिनेश अफझलपूरकर सर यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. ते स्वप्न मुंबईच्या निमित्ताने राहिल आणि आयएएस होऊन मुंबईतच काम करण्याची संधी मिळाली. हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -