घरफिचर्सतळ्याकाठी ताल हरवला...

तळ्याकाठी ताल हरवला…

Subscribe

कुमार गंधर्वांना पटकन झोप लागली. थोड्यावेळाने वसंतरावांना कसेसेच होऊ लागले. ते लगेचच कवी सावंत आणि तात्या झोपले होते त्या खोलीत आले. वसंतरावांना कसंतरी होतंय म्हणून कवी सावंतांनी कुमारजींना उठवलं. तोपर्यंत वसंतरावांचे डोळे पैलतीरी लागले होते. इतकी वर्षे कुमारजींच्या साथीला बसणारे वसंतराव कुमारजींना मिठी मारून अचानक मैफल अर्धवट टाकून गेले.

इतकी वर्षे झाली. आचरा गावचं नाव ऐकूण होतो, पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. तो योग गेल्यावर्षी आला. मालवणला काही निमित्ताने जाणं झालं. तेथे समुद्रावर थोडावेळ हिंडलो आणि पुन्हा किनार्‍यावर आल्यानंतर आम्हा भावंडांपैकी कोणी म्हणाला इथून आचरा जवळच आहे. आचरा म्हटलं की, माझ्या डोळ्यासमोर रामेश्वरचं देवालय आलं. तिथली गावपळण आठवली. रामेश्वराची ख्याती मी मधुभाई कार्णिकांकडून ऐकली होती. मधुभाईंबरोबर एकदा करुळच्या रामेश्वरच्या देवालयात गेले होतो तेव्हा मधुभाई म्हणाले, हा इथला रामेश्वर, पण आचार्‍याचा रामेश्वर ही मुख्य गादी…त्या रामेश्वरच्या देवळाची कीर्ती आणि आचरे गावाची महती सर्वदूर पसरलेली. गाडी जसजशी रस्त्याला लागली तशी देवालय बघण्याची आतुरता वाढली.

आचर्‍याच्या रामेश्वराच्या आवारात पाऊल टाकलं आणि तिथला परिसर बघून माझे पाय खिळून राहिले. एवढ्या उन्हाळ्यातदेखील परिसरात वारा सणसणत होता. आजूबाजूला पसरलेल्या अजानबाहू वृक्षाच्या फांद्या सर्वत्र पसरलेल्या होत्या. आत गाभार्‍यात जाऊन रामेश्वराचे दर्शन घेतले. देवालयात काही भाविक मंडळी जमली होती. आतल्या सभागृहात बसलो आणि मनात एक गोष्ट वाटून गेली तीदेखील उगाचच. 1975 च्या रामनवमीला या मंदिराच्या या सभामंडपात अखिल महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील आणि संगीत क्षेत्रातील प्रभावळ या ठिकाणी उपस्थित होती. त्यांनी आपापल्या कला या ठिकाणी प्रस्तुत केल्या. त्यात स्वतः पु.ल.देशपांडे, सुनीताताई, कुमार गंधर्व, मालिनी राजूरकर, प्रभाकर कारेरकर, शरदचंद्र चिरमुले अशी अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती.

- Advertisement -

या सर्वांना आचर्‍यासारख्या गावी आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत या गावचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर. हा गाव आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे रथी महारथींची भूमी. भार्गवराम पांगे, भार्गवराम आचरेकर तसेच चित्रकार मुरलीधर आचरेकर यांचा हा गाव. त्यामुळे या गावाला सांस्कृतिक वारसा मिळालेला. मी भीतीला टेकून बसलो आणि त्या वर्षीच्या रामनवमीच्या उत्सवातला मधुभाईनी लिहिलेला प्रसंग आठवला.

त्याचं झालं असं की, उत्सवातल्या एका संध्याकाळी कुमार गंधर्व गात होते. साथीला तानपुरा झंकारत होता. बाजूला तबल्याच्या साथीला वसंतराव आचरेकर होते. संपूर्ण सभामंडप भरला होता. श्रोते जीवाचे कान करून कुमारांना ऐकत होते. कुमार रंगात आले, संध्याकाळच्या त्या सांजकिरणांना साक्षीला ठेऊन निसर्ग किमया दाखवत होता. कुमारजींचा पुरिया धनश्री आता अनवट वळणे घेत रंगला आणि अचानक दिवे गेले.

- Advertisement -

कुमारांनादेखील त्याचे भान नव्हते. तबल्यावर वसंतराव आपल्या हलक्या हाताने त्या सुरावटीला तालांचा साज चढवत होते. श्रोतेतर त्याहूनही मुग्ध झाले होते. दिवे गेल्याचं कोणालाच भान नव्हतं. कुमारांनी रागदारी संपवली आणि डोळे उघडले तेवढ्यात गेलेले दिवे आले. त्या भिंतीला टेकून मी हा प्रसंग डोळ्यासमोर आणत होतो.

आमच्या पिढीने कुमारांना गाताना बघितलं नाही किंवा बघितलं असेल, पण कुमार काय चीज आहे ते कळलंदेखील नसेल. पण आज युट्यूबच्या माध्यमातून कुमार गाताना बघायला मिळतात. गाताना कुमारांना बघणं म्हणजे एक स्थितप्रज्ञ समाधिस्थ पाहणे. त्यांनी लावलेल्या प्रत्येक सुराचा गौरव तालाने करणारे वसंतराव आचरेकरही ग्रेटच. कुमारांच्या सुरांना त्यांनी तालाची साथ केली. आचरेकरांची तबलीयेगीरीची किमया मी ऐकूण होतो. कुमारजींना त्यांच्या गाण्याला योग्य साथ करील असाच तबला वसंतरावांचा होता. कुमारजींना हवा तसा लय-ताल समजून वाजवणारा हात म्हणजे वसंतरावांचा. कुमारजींच्या शब्दात सांगायचे तर बहुतेक तबलजी लहान ठेके वाजवताना तो कमीपणा समजून त्यावर ते मनापासून प्रेम करत नाहीत.

जसे रागसंगीत गाणारे ठुमरी, गजल, भजन, गीत या गानप्रकारावर फार प्रेम करत नाहीत तसे हे इतर तबलजी. पण ही गोष्ट आचरेकरांची नव्हती. केव्हाही, कधीही, कुठलाही ठेका व लय ते सहज, प्रेमाने, आनंदाने घेत असत. त्या लय-तालांचे मात्रा व वजन ज्या प्रमाणात मला पाहिजे तसे असायचे. मी खूप तबलजी-नवाजाबरोबर प्रवास केला. सर्वच मोठमोठे तबलजी माझ्या साथीला बसले, पण वसंतामध्ये जो गुण होता तो कोणामध्ये मला दिसून आला नाही. वसंतराव आचरेकरांच्या तबल्याचा बाज कुमार जाणून होते.

देवळातल्या देवासमोर ठेवलेल्या तबला-डग्ग्याची जोडी मला वसंतरावांची आठवण करून देत होती. मी तबला शिकायला सुरुवात केल्यापासून वसंतरावांचं नाव ऐकत होतो. दादरा, केरवा, झपताल वाजवावेत तर ते वसंतरावांनी. तबल्यावर नाजूक ठेका वसंतराव कसे धरायचे हे आमच्या नलावडे मास्तरांकडून खूप ऐकले होते. या आचरे गावातील माणसे आजही सांगतात की, इकडचं शेंबड पोरदेखील उपजतच तबल्याचा ठेका धरतं. या मातीत ही पुण्याई कोणी ठेवली? वसंतरावांनीचं ना!

आचरेकरांची महती आठवत असताना सांजेची किरणे मंदिरावर पडू लागली आणि या सांजेच्या वेळी वसंतरावांच्या बाबतीतली मनात झाकून ठेवलेली आठवण उघडी झाली.

मागील अनेक वर्षे कुमारांचा गाण्याचा कार्यक्रम सावंतवाडीत व्हावा यासाठी शिवरामराजे भोसले स्वतः आग्रही होते. कवी वसंत सावंत तर कुमारांचे चाहते आणि वसंतराव आचरेकरांचे मित्र. 1980 च्या मार्च महिन्यात कुमारजींचा बेळगावचा कार्यक्रम संपल्यावर आंबोलीमार्गे सावंतवाडीत येऊन राजवाड्यात कार्यक्रम करायचा बेत आखला गेला त्याप्रमाणे कुमारजी आणि वसंतराव आचरेकर सावंतवाडीत आले. 9 मार्चला बेळगावचा कार्यक्रम संपून 10 मार्चला संध्याकाळी ही मंडळी वाडीत आली. कुमारजींसाठी राजेसाहेबांनी खास गाडी पाठवली. सोबत कवी सावंत होतेच. सावंतवाडीच्या पर्णकुटी विश्रामगृहात राहण्याची उत्तम सोय केली होती. दिवस अगदी मजेत गेला. दुसर्‍या दिवशी राजेसाहेबांनी राजवाडा आणि सावंतवाडीतल्या इतर गोष्टी दाखवल्या. सावंतवाडीच्या वाड्याच्या दरबारात कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू होती.

दुसर्‍या दिवशी म्हणजे 12 मार्चला सावंतवाडीच्या राजवाड्यात कुमारजींचा कार्यक्रम होणार होता. संध्याकाळी खूप गप्पा झाल्या.रात्री कुमारजी आणि वसंतराव मोती तलावाच्या काठी असणार्‍या डाक बंगल्याच्या एका खोलीत आणि दुसर्‍या खोलीत कवी वसंत सावंत आणि तात्या मुसळे झोपले होते. कुमारजींना पटकन झोप लागली. थोड्यावेळाने वसंतरावांना कसेसेच होऊ लागले. ते लगेचच कवी सावंत आणि तात्या झोपले होते त्या खोलीत आले. वसंतरावांना कसंतरी होतंय म्हणून कवी सावंतांनी कुमारजींना उठवलं. तोपर्यंत वसंतरावांचे डोळे पैलतीरी लागले होते. इतकी वर्षे कुमारजींच्या साथीला बसणारे वसंतराव कुमारजींना मिठी मारून अचानक मैफल अर्धवट टाकून गेले.

तबल्यातून नादब्रम्ह निर्माण करणारा वसंता कुमारांची ती मैफल न सजवताच गेला. वसंतरावांचा तबला म्हणजे ओंकारमय नाद. त्याला शिवत्वाची झळाळी होती. टप्पा गाताना मान खाली घालून सुरांची अनोखी निर्मिती करणारे कुमार आणि त्या सुरांना नाजूकपणे तालाची अनोखी साद देणारे वसंतराव ही अनोखी केमिस्ट्री होती.

आचर्‍याच्या त्या रामेश्वराच्या मंदिरातून आम्ही निघालो आणि गाडी पुढे जाताना वसंतराव आणि कुमारजींच्या युट्यूबवर बघितलेल्या अनेक मैफिली कानात साठवल्या होत्या त्या आठवल्या….त्यात वसंतरावांचा तबला कानात सतत गुंजारव करत होता.

एव्हाना गाडीने आचरा सोडलं. वसंतराव डोळ्यासमोरून हलेनात. वसंतरावांच्या हळव्या आठवणींनी डोळ्यात अश्रू जमा झाले. गाडीच्या समोरचा रस्ता दिसेना. डोळ्यासमोर आता एकच दृश्य. कुमार गात आहेत आणि वसंतराव आचरेकर समोर त्या सुरांशी आपल्या तबल्याचा ताल जुळवून घेत आहेत. कुमार बैठक घालून बेभान होऊन गात आहेत.
ऋणानुबंधाच्या …..जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्ठता मोठी….

-प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -