घरफिचर्समाझा बाबाच माझा बेस्ट फ्रेंड

माझा बाबाच माझा बेस्ट फ्रेंड

Subscribe

मला कधी कोणत्या मुलाबरोबर मैत्री करायलाही तुम्ही रोखलं नाही. कदाचित त्यामुळंच मी बिनधास्त झाले. माझे विचार मी फक्त तुमच्यामुळे मांडायला शिकले. गप्प राहून जगात फक्त नुकसान होतं हे तुम्ही शिकवलं. पण काही बाबतीत तुम्ही गप्प राहिलात आणि मी तुम्हाला गमावलं हे मी कधीच विसरु शकणार नाही.

ऑगस्टचा पहिला महिना आला की, वारे वाहू लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. वास्तविक हल्ली शाळा, कॉलेज सगळ्यांनाच फ्रेंडशिप डे म्हणजे नक्की काय हे माहीत असतं. पण खरी मैत्री मात्र फार कमी मित्रांकडून अनुभवायला मिळते. आपल्या आयुष्यात एक मित्र अथवा मैत्रीण नेहमीच असा असतो, ज्याला आपल्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत असते. माझ्या आयुष्यातला माझा सर्वात पहिला आणि जवळचा मित्र जर कोणी असेल तर माझा ‘बाबा’.

या ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्तानं तुम्हाला बरंच काही सांगावंस वाटतंय. कारण आता पहिल्यासारखं समोर येऊन बोलता येत नाही ना? मलाही वेळ नसतो. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही समोर नसता. मला नेहमी वाटतं की, सर्वात जास्त जेव्हा मला तुमची गरज होती, तेव्हाच बाप्पा तुम्हाला घेऊन गेला. कदाचित त्याला तुमची जास्त गरज होती. अर्थात असं आता मनाला समजवायचं. चार वर्ष होऊन गेली तुम्हाला जाऊन, पण एकही दिवस असा गेला नाही की, ज्या दिवशी तुमची आठवण आली नाही. मी कधीही कुठेही फसायचे तेव्हा तुम्ही नेहमीच एका मित्राप्रमाणे खंबीरपण उभे राहिलात माझ्या पाठीशी. कधीही मुलगी नाही तर मुलगा म्हणूनच वाढवलंत. आजही मी अभिमानानं हेच सांगते की, कदाचित तुम्ही माझ्या लहानपणी कठोरपणानं वागला नसता तर मला काही गोष्टींमधला चांगुलपणा कळलाच नसता.

- Advertisement -

आजही जेव्हा मनातलं सगळं बोलायचं असतं तेव्हा वेड्यासारखं वाटतं की, तुम्ही नक्की अचानक याल आणि पटकन मला प्रेमानं हाक मारून सगळं समजून घ्याल. मन अगदी मोकळं होऊन जाईल. बाहेर असणारी मी आणि तुमच्याशी घट्ट मैत्रीचं आणि मुलीचं नातं असणारी मी ही नक्कीच वेगळी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच त्या व्यक्तीसारखी मैत्री तुम्हाला कदाचित अन्य कोणाशीच करता येत नाही आणि माझ्यासाठी माझा पहिला आणि अगदी जवळचा मित्र हा नेहमीच तुम्ही होता, आहात आणि नेहमीच राहणार.

कितीही काही झालं तरीही तुमच्याकडे येऊन भडाभडा बोलायची सवय. आता ती सवय नाही राहिली. बोलते खूप हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्यामागे असणारी ‘मी’ फारच कमी लोक ओळखतात. अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. मी गप्प राहिल्यावर मला काहीतरी झालं आहे, हे तुम्हाला लगेच कळायचं. मला काय हवंय किंवा काय नकोय हे मी सांगण्यापूर्वीच तुम्हाला कळायच. मला कधी कोणत्या मुलाबरोबर मैत्री करायलाही तुम्ही रोखलं नाही. कदाचित त्यामुळंच मी बिनधास्त झाले. माझे विचार मी फक्त तुमच्यामुळे मांडायला शिकले. गप्प राहून जगात फक्त नुकसान होतं हे तुम्ही शिकवलं. पण काही बाबतीत तुम्ही गप्प राहिलात आणि मी तुम्हाला गमावलं हे मी कधीच विसरु शकणार नाही.

- Advertisement -

मला पत्रकारितेचं वेगळं क्षेत्र निवडायचं होतं. तुम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण माझ्यावरच्या विश्वासापोटी कोणतेही आढेवेढे न घेता मला कधीही मागे न ओढता परिस्थिती नसतानाही तुम्ही माझं शिक्षण, माझी आवड जपली. चांगले संस्कार दिले. आपली चूक नसेल तर ’अरेला कारे’ करताना मागे हटायचं नाही हा तुमचा बाणा आजही मी जपतेय. माझा बेस्ट फ्रेंड तुम्ही आहात हे कदाचित माझ्या सगळ्याच जवळच्या माणसांना माहीत आहे. पण तुम्हाला सांगण्याची वेळच कधी आली नाही. अर्थात तुम्हालाही ते माहीत होतं. पण आता वाटतं कधीतरी हे व्यक्त करायला हवं होतं. त्यामुळंच या फ्रेंडशिप डेचं निमित्त साधून तुम्हाला हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. जन्मोजन्मी मला फक्त आणि फक्त तुम्हीच बाबा मिळावे आणि असा बाबा जो माझा सर्वात जवळचा मित्र असावा हीच एक इच्छा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -