घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफडणवीसांनीच केला सावरकरांचा अपमान!

फडणवीसांनीच केला सावरकरांचा अपमान!

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेेलनाच्या शीर्षक गीतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख असताना आणि विचारपीठालाही स्वातंत्र्यवीरांचे नाव दिलेले असताना संमेलनस्थळास सावरकरांचे नाव द्यावे, असा आग्रह धरण्यामागचा देवेंद्र फडणवीस यांचा हेतू लपून राहत नाही. हा हेतू शुद्ध तर नव्हताच; शिवाय स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाराही होता. केवळ स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेनेला लक्ष्य करण्याच्या राजकीय हेतूनेच फडणवीस यांनी सर्वांचे आदर्श असणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या नावाचा ‘गैरवापर’ केला. असे कृत्य अत्यंत अप्रस्तुत आणि असंस्कृत म्हणावे लागेल.

‘जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करू लागतो तेव्हा सौरमंडलसुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही..’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे विधान.. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादामुळे या विधानाची प्रकर्षाने आठवण होते. गेल्या १५-२० दिवसांपासून भारतीय जनता पक्षासह अन्य काही मंडळींनी सावरकरांच्या नावाने जो हैदोस मांडला आहे, तो अकल्याणकारक असाच म्हणावा लागेल. ज्यांचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या स्वातंत्र्यवीर सावरकर या पुरुषसिंहाने आपले सारे आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले आणि मुख्य म्हणजे मरणही याच देशासाठी पत्करले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त.

असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गलिच्छ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरावेत ही शरमेची बाब. खरंतर, राजकीय पक्षांच्या धुळवडीमध्ये आज सावरकर हा एक ‘मुद्दा’ झाला आहे. तसे या देशात दिवंगत नेत्यांना वेठीस धरून राजकारणी डावपेच रंगविण्याचे प्रकार नवीन नाहीत. मुद्दा साहित्य संमेलनातील आहे. संमेलनस्थळाला ‘सावरकरनगरी’ असे नाव द्यावे, अशी मागणी संमेलन तोंडावर आलेले असताना करण्यात आली. वास्तविक, नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ज्यावेळी साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले होते त्याचवेळी म्हणजे अकरा महिने आधी संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रजनगरी’ नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापर्यंत येण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजपसह अन्य कुणीही संमेलन स्थळाला ‘सावरकरनगरी’ नाव द्यावे असा प्रस्ताव दिला नाही की साधी मागणीही केली नाही. नाशिक ही सावरकरांची जन्मभूमी आहे तशीच कुसुमाग्रजांचीही. कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान पाहता त्यांचे नाव संमेलन स्थळाला दिले जाण्यात गैर काही नाही. तसेच, सावरकरांचेही नाव देण्यात गैर काही नव्हते.

- Advertisement -

१९३८ साली मुंबईत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर लाभले. सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध करणारे विपुल लेखन केले. मराठी भाषा शुद्ध असावी यासाठी नवी शब्दरचना करुन मराठी भाषेला आणखी समृद्ध केले. त्यामुळे मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाला कुणी नाकारुच शकत नाही. परंतु कुसुमाग्रजांचे साहित्य श्रेष्ठ की सावरकरांचे असा बिनबुडाचा काथ्याकूट करत न बसता आयोजकांनी ‘कुसुमाग्रजनगरी’ नाव निश्चित केले.

यापूर्वी नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने २००५ मध्ये साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते, तेव्हाही ‘कुसुमाग्रजनगरी’ असेच नाव देण्यात आले होते. तेव्हा मात्र विरोध करण्यास कुणी पुढे धजावले नाही. कदाचित, भाजप नेत्यांच्या राजकीय भूमिका तेव्हा निश्चित झालेल्या नसाव्यात. परंतु जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार विराजमान झाले तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न या मंडळींकडून होत आला आहे. असा प्रयत्न होण्यास वावगे काही नाही.

- Advertisement -

परंतु, कुणीही सावरकरांच्या विचारांना अथवा भूमिकांना विरोध केलेला नसताना उगीचच मुद्दा पेटवायचा म्हणून त्यांच्या नावाचा ‘गैरवापर’ करत भुजबळ किंवा शिवसेनेला लक्ष्य करणे कोणत्याही नैतिकतेच्या कसोटीत बसत नाही. किंबहुना, यातून जातीयतेची विषारी बिजे पेरण्याच्या षड्यंत्राचा वास आल्यास नवल वाटू नये. भुजबळांच्या वा शिवसेनेच्या भूमिकेला विरोध असण्यात गैर काही नाही. पण प्रसंगावधान तर लक्षात घ्यावे. अंदमानात असताना सावरकरांना नामदार गोखल्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा गोखल्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करणार्‍या सावरकरांनी, गोखल्यांची देशभक्ती आणि त्याग याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा कडकडीत उपवास केला होता. दुर्दैवाने, सावरकरांच्या नावाने आपले उखळ पांढरे करणारे आपले राजकारणी हा आदर्श घेत नाहीत. केवळ आपल्या राजकीय विरोधकांना अडचणीत टाकण्यासाठीच हेतुपुरस्सर त्यांच्या नावाचा वापर करतात.

अर्थात, सावरकरांच्या नावावरुन राजकारण या एका मुद्यावरुन केले गेले नाही. तर, संमेलनाच्या शीर्षक गीतात सावरकरांचा उल्लेख करण्यात आला नाही, असेही रान पेटवण्यात आले होते.

साहित्याची कोणतीही जाण नसणारी मंडळी जेव्हा संमेलनाच्या स्वागत गीतातील दोष काढत होती तेव्हा त्यांच्या बौद्धिक क्षमतेची कीव करावी तितकी थोडीच होती. खरे तर शीर्षक गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यसूर्य केला होता, जो वेगवेगळ्या साहित्यात यापूर्वीही करण्यात आला आहे. या गीतातील ज्ञानपीठ, गाव कुसुमांचे, वसंत फुलला, मुरलीचा शोध ही विशेषणेदेखील अशीच व्यक्तीदर्शक आहेत. हे समजून न घेता केवळ आणि केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठीच काही मंडळींनी विरोधाचा झेंडा फडकावला. संमेलन होण्यापूर्वीच गालबोट लागायला नको म्हणून आयोजकांनी शीर्षक गीतात बदल करुन स्वातंत्र्यसूर्याऐवजी स्वातंत्र्यसूर्य सावरकर असा उल्लेख केला. तेव्हाच या वादावर पडदा पडणे अपेक्षित होते. परंतु, सावरकरांच्या नावाचा पोरखेळ मांडणार्‍या मंडळींनी संमेलनस्थळाला सावरकरांचे नाव देण्याचा आग्रह धरला. हा आग्रह धरण्यात गैर काही नव्हते. परंतु, आग्रह धरण्याची वेळ चुकीची होती.

एकदा कुसुमाग्रजनगरी असे नाव दिले असताना त्यात ऐनवेळी बदल केला असता तर तो कुसुमाग्रजांचा अपमान झाला नसता का? सावरकर जसे आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत, तसे कुसुमाग्रज नाहीत का? सावरकरांच्या कर्तृत्वावर कुणीही शंका उपस्थित करत नसतानाही भाजपकडून वारंवार त्यांच्या नावाने वाद उकरुन काढला जात आहे. काही महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी विधान केले की, सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरुन इंग्रजांची माफी मागितली. हे राजनाथ सिंग कोण आहेत? भाजपचा त्यांचा काही संबंध नाही का? खरं तर भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही सावरकरांच्या भूमिकेबाबत दोन प्रवाद आहेतच. यासंदर्भात सावरकरांची नात उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी एका लेखात स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय’ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने याबाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते? सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते.

आमच्या वेदांमध्ये सर्वकाही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर संघ परिवारातल्या किती जणांना पचवता येतील? पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टू-डेट’ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त’ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारे सावरकर संघ परिवाराला पेलतील का? गाय हा उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत? हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकारण नाकारूनही सावरकर हे देशनिष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक आहेत, हे मान्यच करावे लागते. सावरकरांवरून हीन पातळीवरचे राजकारण पुनःपुन्हा खेळले जाते, यात सावरकरांचे काहीच नुकसान नाही. परंतु, यातून आपल्या समाजाचा इतिहासाच्या आकलनाविषयीचा असंमजसपणा दिसतो आणि म्हणून आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते. सहस्त्रबुद्धे यांनी मांडलेली ही भूमिका चुकीची आहे असे म्हणण्यासाठीही संघ वा भाजप परिवारातील कुणी पुढे आले नाही, यातच सर्वकाही येते.

सावरकरांच्या नावाने नेहमीच राजकारण करणार्‍या आणि विधानसभेच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची ग्वाही देणार्‍या भाजपने केंद्रात सत्ता असताना त्यांना अजूनही भारतरत्न बहाल केला नाही, या दुटप्पी भूमिकेला काय म्हणावे? सावरकरांच्या नावाने राजकारणी राळ उडवत असताना संमेलनस्थळी कुणीही सारस्वत सुरू असलेल्या वादाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुढे आला नाही. ‘जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करू लागतो तेव्हा सौरमंडलसुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही’, हे सावरकरांचे म्हणणे या सारस्वतांच्या रोमारोमांत भिनलेले असावे. म्हणूनच कदाचित नाहक विरोधाची भूमिका घेणार्‍या काजव्यांची समजूत काढण्यासाठी मराठी सारस्वतातील कोणत्याही ‘सूर्याने’ त्यांची मनधरणी केली नसावी, इतकेच!

फडणवीसांनीच केला सावरकरांचा अपमान!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -