घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकुणाच्या मानगुटीवर कुणाचे भूत!

कुणाच्या मानगुटीवर कुणाचे भूत!

Subscribe

राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने १०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची एकमेकांच्या मानगुटीवर बसण्याची चढाओढ सुरू झालेली आहे. त्याला एका वेगळ्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्दबद्ध केले. त्यामुळे जे प्रत्यक्ष सुरू आहे, ते लोकांना त्यांच्या तोंडातून ऐकू आले. पण ही केवळ भाजपची स्थिती आहे असे नाही, त्यांचा एकेकाळचा हिंदुत्ववादी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचेही असेच आहे. त्यांनाही भाजपच्या मानगुटीवर बसून त्यांची केंद्रातील सत्ता खालसा करायची आहे आणि प्रादेशिक पक्षांचा पंतप्रधान बसवायचा आहे. ही इच्छा आणि त्याचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत न कंटाळता दररोज सकाळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमोर करत असतात. राऊत यांचे हे न कंटाळता पुनरुच्चार करत राहणे याला अकल्पित यश येत असते हे त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून दाखवून दिले आहे.

राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे, हे खरे असले तरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यात संजय राऊत यांचे मोठे योगदान आहे. कारण परिस्थिती बघून योग्य नाव पुढे सरकवायचे हे त्यांचे कौशल्य आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, पुढे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा धोशा राऊत यांनी लावून धरला, त्यातूनच मग पुढे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले सगळ्यांनी पाहिले. संजय राऊत यांना राष्ट्रीय पातळीवरही मोठी उलथापालथ करायची आहे. त्यातही त्यांच्या तोंडी शरद पवार यांचे नाव असते. प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन केल्यानंतर पंतप्रधान होण्यासाठी तशी बरीच नावे प्रतीक्षा सूचीत आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी इतकेच नव्हे तर त्याच सूचीमध्ये आता महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव जोडले जात आहे. केंद्रातील भाजपची सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काहीही करायला तयार आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी मध्यंतरी संपुआचे नेतृत्व हे शरद पवारांनी करावे, असा खडा टाकून पाहिला, पण काँग्रेसने डरकाळी फोडल्यावर राऊत शांत झाले आणि त्यांनी काँग्रेसशी सबुरीने घेतले. कारण संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी आहेत. संपुआचा पंतप्रधान झाला तर तो काँग्रेसचाच असला पाहिजे, असा काँग्रेचा प्रयत्न असणार यात शंका नाही, कारण त्यांना राहुल गांधींना काहीही करून पंतप्रधान बनवायचे आहे. त्यात पुन्हा गोम अशी आहे की, काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी अस्तित्वात येत नाही. त्यामुळे काँग्रेसला दुखवूनही चालत नाही आणि त्यांना बाजूला केल्याशिवाय आपल्या पसंतीचा पंतप्रधान बसणार नाही, अशी स्थिती आहे, त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा यासाठी संजय राऊत यांची धडपड चालू आहे. ज्या शिवसेनेने त्यांच्या स्थापनेपासून काँग्रेस आणि नेहरु, गांधी घराण्यातील सगळ्यांचा वेळोवेळी जाहीर समाचार घेतला तीच शिवसेना सध्या काँग्रेसच्या भजनी लागलेली दिसत आहे. कारण मोदी सरकारला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली.

त्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसची भलामण केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश त्यांच्या बळावर उभा राहिलेला दिसतो. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धाही कोणाला नाकारता येणार नाहीत. म्हणजे राऊत यांनी काँग्रेसच्या आजवर झालेल्या पंतप्रधानांवर कौतुक सुमने उधळताना केंद्रातील मोदी सरकारचे महत्व कमी केले. मोदींच्या गेल्या सात वर्षांमध्ये विशेष काही झाले नाही, गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या कारकिर्दीत जे काम झाले, त्याच्यावरच देशाचा कारभार चाललेला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर डोळे मिटून बसा आणि तुम्ही जे बोलत आहात ते बाळासाहेबांना पटेल का याचा थोडावेळ विचार करा, आणि बाळासाहेब काय उत्तर देेतात ते पहा, असा सल्ला दिला. खरे तर आता शिवेसना आणि भाजप या दोन्ही पक्षांना डोळे मिटून आपल्या पूर्वसुरींचे स्मरण करण्याची वेळ आलेली आहे.

- Advertisement -

म्हणजे शिवसेनेने बाळासाहेबांचे आणि भाजपने प्रमोद महाजन यांचे स्मरण केल्यास, कोण होतास तू काय झालास तू, या गाण्याचे बोल त्यांना आठवल्याशिवाय राहणार नाहीत. एकेकाळी मित्र असलेल्या या दोन्ही पक्षांना आता आपण पूर्वी कोण होतो, याचे विस्मरण झालेले असले तरी जनतेची स्मरणशक्ती ही त्यांच्यासारखी अल्प आणि सोयीस्कर नक्कीच नाही. मोदी म्हणजे देशाचे भवितव्य असे, जाहीरपणे सांगणारे राऊत आता गेल्या सात वर्षात मोदींनी काहीच केले नाही, असा दावा करत आहेत. तर दुसर्‍या बाजूला राज्यातील भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी गेले दीड वर्ष फक्त देव पाण्यात ठेवून वाट पाहत नव्हे तर स्वत:ही पाण्यात उभे आहेत. हे करताना त्यांनी राज्यात अनेकांचा जीव घेत असलेल्या कोरोना परिस्थितीचाही विचार खुंटीला गुंडाळून ठेवला आहे. हातातोंडाशी आलेली राज्यातील सत्ता गेल्यानंतर चवताळलेल्या भाजपने कोरोनापेक्षा ठाकरे सरकारचा कसा फडशा पाडता येईल, त्यासाठी सगळे उपाय करून पाहिले, पण त्यात त्यांना काही यश येताना दिसत नाही.

ठाकरे सरकारला जे काही अडचणीचे होईल आणि पेचात पकडता येईल, अशा विषयात भाजप शिरण्याच्या प्रयत्नात असतो. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाचा भयंकर अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत. अशा वेळी राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. आम्हीच कशी योग्य प्रकारे बाजू मांडली, हे पटवून देताना एकमेकांना खोटे पाडत आहेत. आम्ही जोरदार प्रयत्न केले असा दोघांचा दावा आहे, तर मग मराठा आरक्षण का रद्द झाले, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी दोघांचीही इच्छा नव्हती का, असा थेट प्रश्न निर्माण होतो. मराठा आरक्षणाबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यात भाजपला ठाकरे सरकारला जेरीस आणण्याची एक संधी दिसत आहे. मराठा समाजाने मोर्चे काढताना कुठल्याही राजकीय पक्षाला आणि नेत्यांना त्यात प्रवेश दिलेला नव्हता. पण आता राज्यातील भाजपचे नेते मराठा समाजाच्या आंदोलनात बिनझेंड्याने शिरण्यास प्रचंड उत्सक झालेले आहेत.

संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे, पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची, कोविडमुळे शांत बसण्याची असेल तर ती आम्हाला मान्य नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची संभाजीराजेंची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. म्हणजे ठाकरे सरकारच्या मानगुटीवर बसायला आम्हाला जमत नाही, त्यामुळे तुम्ही बसा, त्याला आम्ही समर्थन देतो. थोडक्यात काय तर राज्यातील भाजपच्या नेत्यांना ठाकरे सरकारच्या मानगुटीवर बसायचे आहे, तर दुसर्‍या बाजूला शिवसेनेला अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने केंद्रातील मोदी सरकारच्या मानगुटीवर बसायचे आहे. एकमेकांंच्या मानगुटीवर बसायचे भूत दोघांच्या डोक्यातून उतरायचे नाव घेत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -