घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनासलेल्या व्यवस्थेचे बळी...

नासलेल्या व्यवस्थेचे बळी…

Subscribe

नाशिकमध्ये बुधवारी महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. नाशिक महापालिकेच्या तसेच राज्यातील संवेदना गोठवणार्‍या व्यवस्थेने घेतलेले हे बळी आहेत. दुपारी 12.30 च्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती लागली. जवळपास दीड तास या रुग्णालयातील ऑक्सिजनवर आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना जिवंत राहण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या प्राणवायूचा पर्यायी पुरवठा तब्बल दीड ते दोन तास होऊ न शकल्यामुळे अक्षरश: तडफडत श्वास गुदमरत रुग्णांचे बळी गेले. टाकीतील ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयातील गंभीर असलेल्या रुग्णांना पुरवण्यात येत होता. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेले काही रुग्ण ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे दगावले आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी पोहचून रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच या घटनेची डॉक्टर, इंजिनियर, आयएएस अधिकारी अशा त्रिसदस्यीय समितीकडून घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कंपनीचे लोक घटनास्थळी दाखल झाले. पाऊणतासाच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजनची पुन्हा जोडणी करण्यात आली. तोपर्यंत इतर रुग्णालय आणि भुजबळ कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचे सिलेंडर पाठवण्यात आले होते. मात्र ऑक्सिजन टाकीची दुरुस्ती करेपर्यंत काही रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला असून यात 11 पुरुषांचा आणि 11 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या 11 रुग्णांचा असा 22 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील 5 रुग्णांपैकी 4 जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 1 रुग्ण खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रजेवर असलेल्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णाजवळ 1 डॉक्टर ठेवण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांची ही विधाने म्हणजे वरातीमागून घोडे आहेत.

- Advertisement -

रुग्णांना ज्यावेळी ऑक्सिजनची गरज होती त्यावेळी तो तर रुग्णालयाला पुरवता आला नाही, मात्र आता रूग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी प्रत्येक रुग्णाला जवळ एक डॉक्टर ठेवण्यात आला असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ करतात हे तर फारच बालिशपणाचे म्हणावे लागेल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. ही चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये 1 आयएएस अधिकारी, 1 इंजिनियर आणि 1 डॉक्टरचा समावेश असणार आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिकमधील या भीषण घटनेला दुर्घटना नक्कीच म्हणता येऊ शकत नाही, कारण ती वरून जरी अपघात वाटत असली तरी ही घटना मानवी दोषामुळे घडलेली दुर्घटना आहे. केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील आणि अगदी राष्ट्रीय पातळीवर बोलायचे झाले तर देशाची आरोग्य व्यवस्था ही किती कुचकामी आणि रुग्णांचे बळी घेणारी आहे याचे नाशिकची दुर्घटना हे एक जिवंत उदाहरण आहे. महिन्यांपूर्वीच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अशाच एका भीषण दुर्घटनेत दहा बालकांचा जीव गमवावा लागला होता. मुंबई आणि नागपूर येथील काही रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांकडे पाहता राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक महापालिका, नगर परिषदा या रुग्णालयांकडे तसेच आरोग्य व्यवस्थेकडे किती बेफिकीरपणे पाहतात हे सहज लक्षात येते.

- Advertisement -

नाशिकच्या दुर्घटनेबाबत चौकशी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या चौकशी समिती स्थापन केली जाईल. चौकशी समिती चौकशी करेलदेखील त्याचा अहवाल राज्य सरकारकडे येईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेईल आणि मग दोषी असतील तर संबंधितांवर कारवाई होईल. परंतु या सर्व घटनांमधून आज ज्यांचे प्राणवायू अभावी प्राण गेले आहेत, अशांचे गेलेले जीव हे पुन्हा ही व्यवस्था देऊ शकणार नाही. ही मानवी हानी कदापी भरून येणारी नाही याचे भान राज्यातील, नाशिकमधील संवेदनाहिन असणार्‍या यंत्रणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

या प्रकरणात आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या दुर्घटनेनंतर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते हे जे एरवी अशीच घटना जर दुर्दैवाने मुंबईत अथवा अन्य कुठल्या शहरात घडली असती तर राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर तुटून पडले असते ते विरोधी पक्षनेते बुधवारी दिवसभर गायब होते. भाजपसारख्या प्रमुख पक्षाच्या नेत्यांचे हे सूचक मौन बरेच बोलके आहे असे म्हणावे लागेल. नाशिक महापालिका ही भाजपच्या ताब्यात आहे. आणि ज्या झाकीर हुसेन रुग्णालयात हा दुर्दैवी प्रकार घडला ते रुग्णालय हे नाशिक महापालिकेचे आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला आणि तेथील सत्ताधार्‍यांनादेखील या दुर्घटनेची जबाबदारी झटकता येणार नाही. झालेली दुर्घटना ही अतिशय क्लेशदायक आहेच. त्याच्यामुळे त्याचा वापर हा राजकारणासाठी होता कामा नये हे बरोबरच आहे, मात्र राज्यातील भाजपचे नेते हेच सूत्र शिवसेनेच्या अथवा राष्ट्रवादीच्या व काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांच्या बाबतीत अशाच समान पद्धतीने वापरतात का, हादेखील एक चिंतनाचा विषय आहे.

राज्यात सर्वत्रच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील बर्‍याच खासगी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवता येत नसल्यामुळे अन्य रुग्णालयांमध्ये शिफ्ट करावे लागले होते. ऑक्सिजनचा पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे त्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला दिलेल्या सोशल मीडियावरील संदेशामध्ये देशात कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही याची सर्वतोपरी काळजी केंद्र सरकार घेत आहे असा दिलासा दिलेला आहे. नाशिकच्या दुर्घटनेमध्ये सुदैवाने ऑक्सिजनचा पुरवठा हा पुरेसा होता मात्र तरीदेखील पालिका रुग्णालयांमध्ये ही खबरदारी घेतली जाण्याची आवश्यकता होती की जर सीजन पुरवठा करणारी एक व्यवस्था अपघाताने का होईना खंडित झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून तिथे इमर्जन्सीसाठी अन्य व्यवस्था उपलब्ध असणे हे गरजेचे होते.

आता या पर्यायी व्यवस्थेचा विचार कोणी करायचा? राज्य सरकारने, केंद्र सरकारने की स्थानिक महापालिकेने ? तर सहाजिकच याचे उत्तर म्हणजेच याची जबाबदारी ही स्थानिक महापालिकेवरच आहे. मात्र नाशिकसारखी दुर्घटना ही राज्यात अथवा देशातही कोणत्याही रूग्णालयात होऊ शकते हे लक्षात घेऊन यापुढे तरी किमान संबंधित राज्य सरकारने राज्याच्या रुग्णालयांमध्ये मग ती सरकारी रुग्णालय असोत महापालिकांचे रुग्णालये असो की खासगी रुग्णालय असोत नाशिकची दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णालयांना पर्यायी ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थेबाबत तातडीने आदेश देण्याची गरज आहे तसेच संबंधित रुग्णालयांकडून त्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून घेण्याचीदेखील गरज आहे. तरच यापुढे नाशिकसारख्या दुर्घटना या राज्य सरकारला तसेच केंद्र सरकारला टाळता येऊ शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -