घरफिचर्समायमहानगर ब्लॉगदीपिकाचे ‘बोलणारे’ मौैन...

दीपिकाचे ‘बोलणारे’ मौैन…

Subscribe

नागरिकत्व सुधारणा तसेच पडताळणी कायद्यावरून वादंग सुरू असतानाच जेएनयूमध्ये झालेला वाद सत्ताधार्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र सत्ताधार्‍यांच्या अलिकडच्या राजकीय निर्णयातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आता नवा राहिलेला नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि पडताळणीतही धार्मिक वादाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर जेएनयू हल्ल्यानंतरही डावे आणि उजवे यांच्यातील वादालाही जमातवादाचीच किनार आहे. या हल्ला प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये मंगळवारी हजेरी लावली. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी आणि विद्यापीठांमध्ये आंदोलने सुरू झाली असताना दीपिकाने जेएनयूमध्ये मूक उपस्थिती दर्शवली. या मौनाने समाजमाध्यमांवर रान पेटलं आहे. शब्दांपेक्षा मौन बरंच काही बोलतं…या मौनाची भीती वक्तव्यांपेक्षा जास्त असते. ही मौनातली शांतता एखाद्या राजकीय शीतयुद्धापूर्वीची असू शकते. केवळ बोलल्याने भूमिका स्पष्ट होते, असे नाही, असं शांततेचं मौनही बरंच काही बोलून जातं. चित्रपटातील भूमिकेपेक्षा दीपिकाने वास्तवातील घडामोडीत घेतलेली भूमिका त्यामुळेच महत्त्वाची आहे. लोकशाहीत भूमिका घेण्याला कमालीचं महत्त्व असतं. हुकूमशाहीच्या देशात भूमिका नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. घेतलेली भूमिका ही अभिव्यक्त करण्याचा अर्थच लोकशाही असतो. जेएनयूमधल्या लाठ्याकाठ्यांना दीपिकाच्या मौनाने चोख उत्तर दिलं आहे.

दीपिकाच्या मौनात डावं उजवं असं काही नाही. कदाचित ती बोलली असती तर डावी किंवा उजवी, प्रतिगामी किंवा पुरोगामी, धर्मद्वेष्टी किंवा धर्मांध अशी लेबलं तिला लावता आली असती. पण ती केवळ या ठिकाणी थांबली, शांतपणे थांबली. तिने तिचं मतही व्यक्त केलं नाही. हिंदी पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नाव असलेल्या दीपिकाला संजय लिला भन्सालीच्या पद्मावतनंतरही धमकीला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळीही ‘विशिष्ट जमातवादाचा कैवार’ घेणार्‍या दीपिकाचा चित्रपट थिएटरात चालू देणार नाही, अशी धमकी तिला आणि पद्मावतच्या निर्मात्यांना दिली गेली होती. त्यानंतर आता ही दुसरी वेळ… या ‘मौनातल्या केवळ थांबण्याचे’ कौतूक समाजमाध्यमांवर होत आहे. या शिवाय दीपिकाला ट्रोलही केलं जात आहे. ‘दीपिकाचा खरा चेहरा दिसला’, ‘छपाक,च्या प्रमोशनसाठी दीपिकाकडून तरुणांच्या आंदोलनाचा वापर’ इथपासून ते दीपिकावर अत्यंत खालच्या पातळीवरील व्यक्तिगत स्वरुपातही आरोप करून ट्रोलिंग सुरू आहे.

- Advertisement -

जेएनयूचे विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षाने शहारुख, सलमान आणि आमिर यांनाही जेएनयूतील घटनेबाबत बोलण्यास सुचवले आहे. दीपिका बोलली नाही…पण बरंच काही बोलून गेली. दीपिकाच्या विरोधात आणि समर्थनातही हॅशटॅग चालवले जात आहेत. आज तिचा ‘छपाक’ चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, अशा परिस्थितीत बहुमतातील राजकीय सत्ताकाळातील समर्थक गट आणि झुंडींच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याच्या तिच्या ‘मौना’ चं कौतुकच व्हायला हवं. असंच मौैन हिंदी पडद्यावरील खान मंडळींनी दाखवलं आहे. मात्र त्याची कारणे वेगळी असावीत. ‘काही बोलायचे आहे…पण बोलणार नाही’ बोलल्यास साभार पाकिस्तानात पाठवणी होण्याचा अनुभव या मंडळींनी याआधी अनेकदा विविध राजकीय मुद्यांबाबत घेतलेला आहे. दीपिकाला समाजमाध्यमांवर विरोध करणार्‍यांमध्ये पुरुषप्रधान मानसिकताही डोकावते आहे. विरोध हा नक्की कोणाला आहे. दीपिकाच्या जेएनयूमधल्या मौनाला, तिच्या भूमिकेला की तिच्या केवळ स्त्री असण्याला, असे प्रश्न आहेतच. तिच्याबाबत सुरू असलेल्या गलिच्छ ट्रोलिंगनंतर निर्माण झालेले हे प्रश्नही हा केवळ भूमिकेबाबतचा राजकीय विरोध नसून त्याला पुरुषप्रधान विकृत मानसिकतेची जोड असल्याचे स्पष्ट करणारा आहे.

नागरिकत्व सुधारणा तसेच पडताळणी कायद्यावरून वादंग सुरू असतानाच जेएनयूमध्ये झालेला वाद सत्ताधार्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र सत्ताधार्‍यांच्या अलिकडच्या राजकीय निर्णयातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आता नवा राहिलेला नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि पडताळणीतही धार्मिक वादाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर जेएनयू हल्ल्यानंतरही डावे आणि उजवे यांच्यातील वादालाही जमातवादाचीच किनार आहे. या हल्ला प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आणि प्रशासनावर असलेला राजकीय दबाव यामागचे कारण असू शकते. या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्येही थेट दोन गट पडले आहेत, तसेच ते सोशल मीडियावरही पडले आहेत. मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांना झालेले ट्रोलिंगही राजकीय उद्देशाने प्रेरित असेच आहे. दीपिकाचा छपाक पाहू नका, त्याऐवजी तान्हाजी…अनसंग वॉरिअर पहा, असे संदेश समाजमाध्यमांवर झळकले जात आहेत. तान्हाजी…च्या टे्रेलरनंतरही वाद निर्माण झालाच होता. अभिनेत्री काजोल साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या संवादातील ‘जनाऊ सलामत रहता है’ या वाक्यावर आक्षेप घेणारी मंडळीही माध्यमांवर सक्रिय झाली होती.

- Advertisement -

जेएनयूचा मूळ विषय त्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची कारणांवरून लक्ष विचलित करून विषय धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्याचे प्रयत्न दीपिकाच्या निमित्ताने पुन्हा करण्यात आला आहे. युनिर्व्हसिटीतील आंदोलन आणि हल्ल्याचा मुख्य विषय असताना तो दीपिकाच्या ‘छपाक’ पर्यंत नेण्यात यंत्रणा यशस्वी झाली आहे. मेघना गुलजारच्या छपाकमध्ये अ‍ॅसिड हल्ल्याने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या तरुणीच्या संघर्षाची कथा आहे. मात्र, यातूनही धार्मिक संदर्भ शोधले, काढले जात आहेत. मेघना गुलजारचा हा चित्रपट ज्या घटनेवर आधारीत आहे त्यात दीपिकावर अ‍ॅसिड हल्ला करणारा आरोपी विशिष्ट धर्माचा होता. त्याला जाणीवपूर्वक दुसर्‍या धर्माचे दाखवण्यात आल्याची ‘चर्चा’ समाजमाध्यमांवर सुरू आहे. हा विषयही अखेरीस विद्यार्थी आंदोलनावरून अलगद दीपिका, बॉलिवूड तेथून धार्मिक ध्रुवीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न पडद्याआडून सुरू आहे. लवकरच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांआधी युद्धखोरीची किंवा जमातवादी ध्रुवीकरणाची भाषा नवी नसते. बहुमताच्या जोरावर संविधान, कायद्यातील चौकटी भेदण्याचा प्रयत्न केल्यावर देशद्रोही ठरवणार्‍यांकडून विरोधकांना धर्मद्रोही ठरवण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणेने काम सुरू केलेले असते, कारण धर्मद्रोही ठरवल्यावर देशद्रोही ठरवण्याची नवी व्याख्या नव्या राजकीय तत्वात पद्धतशीरपणे अंमलात आणली जात असते. जीडीपी, बेरोजगारी, आर्थिक मंदी, परराष्ट्र धोरणातील अपयश, नागरिकत्वाची पडताळणी यासारख्या राजकीय प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी मूळ विषय जमातवादाच्या मुद्याकडे नेण्याची खेळी नवी नाही.

दीपिकाच्या मुद्यावरूनही हेच स्पष्ट केले जात आहे. नोटाबंदी, आर्थिक मंदी, काश्मीर, कलम ३७० असे अनेक वादग्रस्त निर्णय आणि विषय केंद्रातील सत्तेशी संबंधित आहेत. मात्र दीपिकाच्या छपाकचा विषय पुढे रेटून या मूळ विषयांना पर्यायाने जेएनयूमधील आंदोलनाच्या मूळ कारणांनाच बगल दिली जात आहे. ट्रोल करणारे, ट्रोल होणारे, चर्चा करणारे, चर्चा होणारे असे सगळेच घटक एका मोठ्या यंत्रणेकडून राजकीय सोयीनुसार वापरले जात आहेत का? असा प्रश्न आहे. अनियंत्रित समाजमाध्यमे याला बळी पडलेली आहेतच, प्रसारमाध्यमांचाही त्यांच्या नकळत वापर केला जात असल्यासारखी ही स्थिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -