घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनंदीबैल ते अ‍ॅलेक्सा...बदलती दुनियादारी

नंदीबैल ते अ‍ॅलेक्सा…बदलती दुनियादारी

Subscribe

छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी आता मोबाईल पेमेंट सोयीचे वाटते. पण हे एकंदरीतच इतक्या सहजासहजी झालेले नाही. त्यासाठी ग्राहकांच्या वापरासोबतच कंपन्यांनी केलेली गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली उलाढाल यासारखी कारणे मोबाईल पेमेंटचा पसारा वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. एका नंदीबैलाच्या डोक्यावर दिसणारा फोनपे स्कॅनचा स्टिकर या मोबाईल पेमेंटच्या पर्यायाने खोलवर मारलेली मुसंडी दाखवणारा आहे. त्यावेळी केवळ आपल्या बोलण्याच्या इशार्‍याने यंत्रांना कार्यान्वित करण्यासाठी अ‍ॅलेक्सा तंत्रज्ञानाचाही आता वापर होऊ लागला आहे. दुनिया वेगाने बदलत आहे.

जगभरात कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटांना सुरूवात झालेली आहे. त्याचवेळी भारतातील आकडेवारी मात्र कोरोनाने आता भारतातून काढता पाय घेतला आहे असंच काही चित्र सांगणारी आहे. कोरोनाने संसर्गाच्या रूपात मोठी जीवितहानी केली खरी. पण कोरोनाच्या निमित्ताने एका नव्या पर्यायाकडे मोठ्या वेगाने आपण भारतीय म्हणून वळलो ते म्हणजे डिजिटल पेमेंटच्या तंत्रज्ञानाकडे. आता खिशातल्या वॉलेटमध्ये किती पैसे आहेत, यापेक्षाही डिजिटल वॉलेट तुम्ही किती आणि कसं वापरता या पर्यायाकडे तुमचे सहज व्यवहार अवलंबून असतात.अतिशय झटपट व्यवहारांसाठी गुगल पे, फोन पे सारखा पर्याय हा सर्रासपणे वापरला जातो, हे चित्र आता आपल्याला सवयीचे झाले आहे. अतिशय क्लिष्ट आणि फसव्या वाटणार्‍या अशा पेमेंटचा चेहरामोहरा बदलला गेलो जेव्हा हे पर्याय अगदी पानटपरीपासून ते भाजीवाल्यापर्यंत उपलब्ध झाले. आता तर हा काही टॅपचा व्यवहार झालाय.

स्कॅन करा आणि पे करा असं हे सर्वात सोपं मॉडेल झालं आहे. त्याचाच प्रत्यय हा कोरोना काळातही आला. कोरोनात डिजिटल पेमेंटचा वाढलेला बोलबाला पाहता आता मोबाईल पेमेंटची एकप्रकारे क्रेझ झाली आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी आता मोबाईल पेमेंट सोयीचे वाटते. पण हे एकंदरीतच इतक्या सहजासहजी झालेले नाही. त्यासाठी ग्राहकांच्या वापरासोबतच कंपन्यांनी केलेली गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली उलाढाल यासारखी कारणे मोबाईल पेमेंटचा पसारा वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. एका नंदीबैलाच्या डोक्यावर दिसणारा फोनपे स्कॅनचा स्टिकर या मोबाईल पेमेंटच्या पर्यायाने खोलवर मारलेली मुसंडी दाखवणारा आहे. अर्थात ग्रामीण भारतही यातून अलिप्त नाही. जोवर बायोमेट्रिक पर्यायांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत नाही तोवर यापुढचा काळ हा मोबाईल पेमेंटच गाजवणार आहे.

- Advertisement -

भारतात मोबाईल पेमेंट्स हे कार्ड पेमेंटपेक्षाही अधिक जलदगतीने होत आहेत याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. सहज, सोप्या पद्धतीने अवघ्या काही स्टेप्समध्ये होणारे मोबाईल पेमेंट हे ग्राहकांसोबतच व्यावसायिकांसाठीही सुलभ असे माध्यम झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मोबाईल पेमेंट्सने आता कार्ड पेमेंटला पिछाडीवर टाकले आहे. भारतातल्या मोबाईल पेमेंटबाबतच्या २०२१ च्या अहवालानुसार मोबाईल पेमेंट हे कार्डच्या तुलनेत अतिशय वेगाने प्रगती करत आहेत. याच अहवालातील माहितीनुसार क्रेडिट कार्डला मागे टाक मोबाईल पेमेंट हे ६७ टक्क्यांनी वाढले आहेत. एकट्या २०२० सालामध्ये ४७८ अब्ज डॉलर्सचे व्यवहार हे मोबाईल पेमेंटच्या माध्यमातून झाले आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या महामारीच्या काळातच मोबाईल पेमेंटने मोठी झेप घेतली आहे.

मोबाईल पेमेंटमध्ये वाढ होण्याचे कारण हे फक्त ग्राहकांकडून होणारा व्यवहारच नाही, तर मोबाईल पेमेंट्स वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी घेतलेला पुढाकारही तितकाच महत्वाचा आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी केलेली मदत हे एक मोठे कारण आहे. तर दुसरीकडे नियामक दृष्टीकोनातून देण्यात आलेल्या परवानग्याही तितक्याच कारणीभूत आहेत. महत्वाचे म्हणजे रोख पैशांसाठीची मागणी आता कमी होत आहे, हेदेखील एक मुख्य कारण आहे. फोन पे आणि गुगल पे या दोन्ही पर्यायांनी मोबाईल पेमेंटमध्ये सर्वाधिक पसंती मिळवली आहे. या दोन अ‍ॅपची चलती आहे. ही अवस्था चीनसारखी आहे. चीनमध्ये अलीप्ले आणि व्हीचॅट प्रोसेसला पसंती आहे. भारतातील फोन पे आणि गुगल पे साठीची पसंती छोट्यातल्या छोट्या व्यवहारातही दिसून येते हीच वास्तविकता मोबाईल पेमेंटची आहे.

- Advertisement -

या मोबाईल पेमेंटचा प्रत्यक्ष व्यवहार हा नुसता काही कंपन्यांची मक्तेदारी म्हणून दिसत असला तरीही ग्राहकांच्या बाबतीत मात्र ही स्थिती नाही. ग्राहकांना आणि व्यावसायिकांना सध्या डिजिटल पेमेंटमध्ये मोबाईल पेमेंटचा सहज सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये अगदी केळी विक्रेत्यापासून चहा ते पान टपरी अशा सगळ्याच ठिकाणी गुगल किंवा फोन पे चा सर्वात सहज पर्याय ग्राहकांना वापरणे शक्य झाले आहे. परिणामी व्यवहार सोपे होतानाच तुलनेत कॅशची मागणी ही दुसरीकडे कमी झाली आहे. ग्राहकांना मोबाईल पेमेंटद्वारे होणार्‍या झटपट व्यवहारांची विश्वासार्हता हीच यामागचे कारण आहे. आपला झालेला व्यवहार झटपट दिसण्याचा पर्याय, सोप्या पद्धतीने पैसे पाठवण्याची सुविधा आणि व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण हीच मुख्य कारणे ही मोबाईल पेमेंटचा वापर होण्यासाठीची आहेत. किमान आणि कमाल अशा दोन्ही व्यवहारांची मर्यादा नसल्यानेच डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अधिक स्वीकार झालेला आहे. दुसरीकडे एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादा हेदेखील एक कारण आहे.

बिझनेस टायकून समजल्या जाणार्‍या आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटच्या माध्यमातून नेहमीच युजर्सशी संवाद साधत असतात. डिजिटल पेमेंटच्या निमित्ताने त्यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आनंद महिंद्रा यांनी एका नंदीबैलाचा त्याच्या मालकासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण हा व्हिडिओ शेअर करतानाच त्यांनी एक प्रश्नदेखील विचारला आहे. आनंद महिंद्रा यांनी नंदीबैलाच्या डोक्यावर फोनपे पर्याय असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या दारात आलेल्या नंदीबैलाला फोन पे च्या पर्यायातून पैसे देत असल्याचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी ट्विटर युजर्सना प्रश्न केला आहे की भारतात डिजिटल पेमेंट कनव्हर्जनसाठी आणखी कोणत्या प्रकारचा पुरावा हवाय ? या व्हिडिओच्या निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी युजर्सना बोलत केलं आहे. या व्हिडिओला जवळपास ४ लाख वेळा पाहिले गेले आहे. तर व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊसही पडला आहे. अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने एखादी गोष्ट करणार्‍यांचे आनंद महिंद्रा हे नेहमीच कौतुक करतात.

तसेच अशा सुपर ब्रेनचे प्रमोशनही आनंद महिंद्रा आपल्या ट्विटरवरून करतात. मग सोशल डिस्टन्सिंगचा जुगाड असणारी रिक्षा असो वा अपंगांसाठी एखादा जुगाड करणारा व्हिडिओ असो आनंद महिंद्रा अशा इनोव्हेशनचे नेहमीच कौतुक करतात. नंदीबैलाच्या डोक्यावर फोनपेचा स्टिकर लावल्याचा व्हिडिओ शेअर करून त्यांनीही असाच काहीसा जुगाड केला आहे. हा जुगाड सांगतानाच त्यांनी ऑनलाईन पेमेंटचा वाढलेला दबदबाही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही एका कार्टूनचा फोटो शेअर करत त्यांनी बँक दरोडेखोरांची खिल्ली उडवणारे कार्टून शेअर केले होते. ऑनलाईन पद्धतीनेच बँक लुटली आहे, त्यामुळे प्रत्यक्षात बँक लुटण्यासाठी काहीही उरलेले नाही, असा फलक बँकेबाहेर लावल्याचे ते कार्टून होते. यापुढे चित्रपटात प्रत्यक्ष बँक लुटण्याचे सीन्स नसतील असेही त्यांनी या कार्टूनला कॅप्शन देऊन सुचवले होते.

सोपी झालेली केवायसी पद्धत, बँकेला मोबाईल पेमेंट अकाऊंटसोबत लिंक करण्याची सोपी पद्धत यासारख्या कारणांमुळेच मोबाईल पेमेंटला अधिक मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले आहे. सध्या स्कॅनरवर आणि डिजिटल स्कॅनिंग कोडवर हे तंत्रज्ञान थांबले आहे. पण आगामी काळात मात्र व्यक्तीची बायोमेट्रिक ओळख हीच डिजिटल व्यवहारांची ओळख असेल. फक्त बायोमेट्रिक ओळखीवरच यापुढच्या काळातील व्यवहार सुलभ होतील. पण सध्या मोबाईल पेमेंटसाठी झालेली गुंतवणूक त्या तंत्रज्ञानसाठी व्हावी लागणार आहे. पण तोवर मोबाईल पेमेंटच राज्य करणार हे नक्की आहे. त्यामुळे डिव्हाईस शिवायचे पेमेंट तंत्रज्ञान जोवर शिरकाव करत नाही, तोवर नंदीबैलाच्या डोक्यावर पेमेंट स्कॅनिंगचा स्टिकर दिसणारच हे मात्र नक्की.

सध्या मोबाईल पेमेंटच्या बाबतीत डिव्हाईसची गरज असली तरीही येत्या काळात हे डिव्हाईस कालबाह्य होईल, याचीच चाहूल अनेक देशांमध्ये लागली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (एआय) झालेली वाढ याचेच एक उदाहरण आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा हे सोपं उदाहरण. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून अनेक ग्राहक हे अधिक व्यवहारांचा पर्याय स्वीकारण्याची सुरूवात झाली आहे. कारण आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणुकीचा धोका अशा एआय तंत्रज्ञानात कमी होतो. म्हणूनच भ्रष्टाचाराचा शोध घेणार्‍या तंत्रज्ञानासाठी ग्राहक यापुढच्या काळात वळतील. एआयसोबतच अधिक सुरक्षित व्यवहारांसाठी ग्राहकांचा कल यापुढच्या काळात हा पैसे मोजून अ‍ॅप्लिकेशन वापरण्यावरही असेल. कारण जिथे कार्ड वापर कमी होतोय, तिथेच डिजिटल व्यवहारांमध्ये धोका मिळू नये म्हणून ग्राहक अधिक सुरक्षित पर्यायांसाठी येत्या काळात पैसे मोजून व्यवहार करणार हेदेखील निश्चितच आहे. म्हणूनच पेड अ‍ॅपचा वापर येत्या काळात आणखी वाढेलच.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -