घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलॉकडाऊनचं जीवघेणं सावट !

लॉकडाऊनचं जीवघेणं सावट !

Subscribe

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातल्या त्यात मुंबई ही वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे सरकारसाठी आणि जनसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राज्याची राजधानी असलेली मुंबई जितकी प्रशासकीयदृष्ठ्या महत्वाची आहे. तितकीच ती गरीब आणि श्रीमंतांच्याही रोजीरोटीसाठीही महत्वाची आहे. या शहरात सामान्य फेरीवाल्यांपासून ते उद्योगपती मुकेश अंबानींपर्यंत सगळेजण आपापली यथाशक्ती कमाई करत असतात आणि उत्कर्ष साधत असतात. कधी नव्हे ते कोरोनाच्या महामारीमध्ये या शहरावर लॉकडाऊन व्हायची वेळ आली होती. तशी ती संपूर्ण देशावरच आली होती. राज्याची राजधानी असलेली मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे हे शहर काही महिने किंवा दिवस सोडाच पण काही तास जरी बंद राहिलं किंवा चक्का जाम झाला तर त्याचा विपरीत परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होत असतो. त्यामुळेच मुंबई लॉकडाऊन होणं हे कोणालाच परवडणारं नाही. 26 डिसेंबरपासून मुंबईसह राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा उसळी मारलेली आहे.

आणि त्यातील 80 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याचं सरकारी पाहणी अहवालात समोर येत आहे. डेल्टा विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉन आज झपाट्याने पसरतोय. तो तितका घातक नसला तरी त्याचा फैलाव आणि त्याची लागण ज्या प्रमाणात होते तो सगळा मामला मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या गर्दीच्या शहरांसाठी चिंताजनक आहे. तिसर्‍या लाटेचे संकेत हे फेब्रुवारीसाठी देण्यात येत होते. मात्र त्याआधीच तिसरी लाट येते की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. कोरोनाची उसळी पाहता 31 जानेवारीपर्यंत मुंबई-ठाण्यातल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर मुंबईत लॉकडाऊन लागणार की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. या शहरात हजारो कष्टकरी मंडळींचं पोट आपल्या हातावर आहे. लॉकडाऊन झालं तर काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी इकबाल सिंह चहल यांनी घेतलेली भूमिका ही रास्तच आहे. चहल म्हणतात, ‘सगळा कारभार आणि शहर ठप्प करणं हे सोपं आहे. पण आर्थिक गाडा पुन्हा मूळपदावर आणणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळेच मुंबईत लॉकडाऊन करण्यापेक्षा सावधगिरीचे उपाय अंमलात आणून कोरोना रुग्णांची संख्या थोपवणं हेच आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे.

- Advertisement -

राजकीय नेत्यांच्या आणि पुढार्‍यांच्या मुलांची लाखांची उपस्थिती असणारी लग्नकार्य आणि त्याहीआधी बॉलीवूडच्या पार्ट्या यांच्यामधून कोरोनाने उसळी घ्यायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका आणि त्यासाठीचे देशातील बड्या राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि मेळावे याच्यामुळे देशातील सात राज्ये अधिक चिंताग्रस्त स्थितीत आहेत, ते पाहता भारतात तिसरी लाट फेब्रुवारीच्या आधीच येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 जानेवारीपासून आपल्याकडे 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस द्यायला प्रारंभ झालेला आहे. देशभरात पहिल्या टप्प्यात 40 लाख मुलांना लसवंत करण्यात आलेलं आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण वेगाते सुरू आहे. मोठ्या महानगरांमध्ये आणि त्यातही विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये गगनचुंबी इमारतीमध्ये किंवा टॉवर्समध्ये राहणार्‍या नागरिकांना या ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत तिसर्‍या लाटेच्या वेळेस अधिक अद्ययावत झालेली आरोग्य व्यवस्था, डॉक्टरांचे झालेलं प्रशिक्षण आणि घटलेल्या मृत्युदरांमुळे अनेक नागरिकांच्या मनात आता कोरोनाबद्दलची भीती पूर्वीसारखी राहिलेली नाही.

कोरोना एक विषाणूजन्य साथ आहे हे आता लोकांनी आपल्या मनी ठसवलेलं आहे. त्यातही राजकीय पुढारी आणि बॉलिवूडचे स्टार हे ज्या पद्धतीत वावरताना दिसत आहेत, त्याचं अनुकरण सर्वसामान्य नागरिक करत असल्याचं पाहायला मिळतं. एकट्या मुंबईत सोमवारी कोरोनाचे 8082 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. रुग्णांची दैनिक नोंद वीस हजारांच्या वर गेल्यास या शहरात लॉकडाऊन करावे लागेल, असे संकेत पालिका आयुक्त आणि सरकारी पातळीवरून देण्यात आलेले आहेत. याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णांची संख्या हे लॉकडाउनला आमंत्रण असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत अनेक मंत्री आणि नेते तिसर्‍या लाटेत कोरोनाग्रस्त झालेले आहेत. यातली बरीचशी मंडळी ही विधिमंडळात आणि त्यानंतर लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम स्थळी कोविडग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे पहिल्या व दुसर्‍या लॉकडाऊन दरम्यान लावण्यात आलेले निर्बंध हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहेत. लग्न समारंभ आणि मोकळ्या जागेतील कार्यक्रम यावर काही कडक निर्बंध लावण्याचे संकेत सरकारने दिलेले आहेत. आता पुढे काय करायचं हे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन घोषित करणं किंवा शहराचं अर्थचक्र थांबवणं हे कोणासाठीही फलदायी नाही. श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय मंडळींना लॉकडाऊनमुळे फारसा फरक पडत नसला तरी ज्यांचे पोट हातावर आहे किंवा जे श्रमिक म्हणूनच या धावणार्‍या शहरांमध्ये जगत आहेत त्यांच्यासाठी लॉकडाऊन हा एक जीवघेणा प्रकार आहे. मागच्या दोन लॉकडाऊनमध्ये हजारो उद्योगधंदे बंद पडले. लाखो लोकांचे रोजगार गेले. माध्यमांपासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत आणि कारखानदारीपासून ते अगदी रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत अनेकांचे रोजगार बुडाले. लाखो लोक देशोधडीला लागले. कित्येकांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कित्येकांना गाठीशी पैसे नसल्यामुळे अक्षरशः तडफडत आपले प्राण सोडावे लागले. या सगळ्या काळजावर घाव घालणार्‍या गोष्टी मागच्या दोन लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या आणि अनुभवल्या असतील. त्यामुळेच तिसर्‍यांदा लॉकडाऊन कुणालाच परवडणारा नाही.

सर्वसामान्य नागरिक पुढारी करतात म्हणून आम्ही करतो किंवा त्यांनी केलं तर बिघडत नाही, आम्ही केलं तर काय बिघडतं, असं म्हणण्याचं पातक करु नये, याचं कारण या चिमुटभर राजकारण्यांसाठी जेव्हा एखादी गोष्ट त्रासदायक ठरते त्यावेळेला संपूर्ण व्यवस्था त्यांच्यामागे उभी राहते. त्यांचा इलाज हा बर्‍याचदा सरकारी खर्चाने होतो हे आपण विसरतो. पुढार्‍यांसाठी सगळीच व्यवस्था संकटकाळात धावाधाव करते हे अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे. मात्र तीच वेळ जर सामान्य नागरिकांच्या वाट्याला आली तर मात्र त्यांचे हाल होतील. औषधाविना किंवा ऑक्सिजनसाठी अथवा पैशासाठी त्यांना तडफडावे लागेल. सामान्यांचे जीवन हे किड्या मुंग्यांसारखं होऊन जातं आणि त्यामुळेच इकबाल सिंह चहल म्हणतात, तसं लॉकडाऊन घोषित करणं सोपं आहे. पण अर्थचक्र मूळपदावर आणणं आणि त्यातून कोट्यवधींच्या लोकसंख्येची शहर चालवणं हे खूपच कर्मकठीण आहे. त्यामुळेच लॉकडाऊनचं संकट टाळायचं असेल तर नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि उद्योगपतींपासून टॅक्सीचालकांपर्यंत सगळ्यांनीच वाढणार्‍या कोविडचं भान राखायला हवं. ही काळाची गरज आहे. आणि काळाचं भान राखलं नाही तर काय होतं ते हे याआधी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं आहे. त्यामुळे अनुभव हाच सर्वोत्तम गुरू म्हणत मार्गस्थ व्हायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -