घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआपलेच दात आणि आपलेच ओठ!

आपलेच दात आणि आपलेच ओठ!

Subscribe

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसांनी इथल्या समाज धुरिणांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा दिला. १०५ आंदोलकांनी पोलिसांच्या गोळ्या छातीवर घेऊन हौतात्म पत्करले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. या सगळ्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. काँग्रेसचे नेते संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी संघर्ष करणार्‍यांच्या विरोधात होते. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री सत्तेवर आले. कारण काँग्रेस हा मोठा पक्ष होता. त्यात पुन्हा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यातील सगळे सूत्रे केंद्रीय नेत्यांच्या इशार्‍यावरून फिरवली जात. आपण राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर विचार करावा लागेल, अशी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यामुळे मराठी माणसांच्या हक्काचा संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊनही इथल्या भूमिपुत्रांची उपेक्षा होत होती. यावर मार्ग काढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली.

शिवसेनेच्या माध्यमातून इथला जो उपेक्षित भूूमिपुत्र होता तो एकत्रित झाला. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा पहिला हक्क असला पाहिजे, हे लक्षात घेऊन शिवसेनेेने मराठी माणसाला विशेषत: नोकर्‍या मिळण्यासाठी पुढाकार घेतला, प्रसंगी संघर्ष केला. आवाज कुणाचा, शिवसेनेचा, ही गर्जना महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत घुमली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी रोजगार देणार्‍या अनेक कंपन्या आणि संस्था आहेत. तिथे मराठी माणसाला प्राधान्य मिळावे, यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील भूमिपुत्रांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास दिला. त्यातूनच शिवसेनेचा प्रभाव राज्यात वाढू लागला.

- Advertisement -

सुरुवातीच्या काळात शिवसेेनेच्या छत्राखाली अनेक मराठी लोक एकत्र आहे. त्यातूनच शिवसेनेसाठी नवे नेते निर्माण झाले. पण काळ जसा पुढे सरकत गेला, तसे बाळासाहेब आणि शिवसेनेविषयी अढळ निष्ठा ठेवणारे काही नेते शिवसेनेतून बाहेर पडले. छगन भुजबळ आणि गणेश नाईक हे त्यातले सुरुवातीचे प्रमुख नेते. आपण शिवसेनेसाठी रक्त आटवले, पण जेव्हा संधी मिळण्याची वेळ आली, तेव्हा मात्र ती नाकारण्यात आली, या भावनेतून छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. भुजबळ बाहेर पडल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांना विशिष्ट नावाने संबोधत असत. त्यावर तेही त्यांच्यावर टीका करत असत. पण तरीही शिवसेनेवर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता.

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या शिवसेना आणि भाजपच्या युतीची १९९५ साली महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच त्यांना पदावरून पायउतार होण्याचा आदेश मातोश्रीवरून आला. त्यानंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. पण हा काळ अगदी काही महिन्यांचा होता. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता आली तर आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असे वाटत असताना उद्धव ठाकरे हे आपल्याला अनुकूल नाहीत, असे लक्षात आल्यानंतर त्यांच्याशी राणे यांचे वितुष्ट येऊ लागले, त्यातूनच पुढे २००५ साली राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले. शिवसेनाप्रमुखांचे वारसदार हे राज ठाकरे असतील असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे येऊ लागले.

- Advertisement -

आपल्याला डावलण्यात येत आहे हे लक्षात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेत होणारी घुसमट दूर करण्यासाठी पक्ष सोडला. पुढे २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर प्रामुख्याने शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष सुरू झाला. मनसेला राज्यात सुरुवातीच्या काळात निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले. तेरा आमदार आणि बरेच नगरसेवक निवडून आले. पुढे मात्र परिस्थिती खालावत गेली. निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट्सही वाचवणे अवघड होऊन बसले. एका बाजूला राज ठाकरे यांच्या भाषणांना विक्रमी गर्दी होते. पण ही गर्दी मतांमध्ये रुपांतरीत होत नाही, हे असे का होते हे एक कोडे आहे. ज्या मंडळींनी शिवसेनेतून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली, त्यांंच्याविषयी ही अशी परिस्थिती आहे.

सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी आणि कुणालाही भिडणारी संघटना म्हणून शिवसेना ओळखली जाते. सुरुवातीला शिवसेनेचा विषय केवळ मराठी माणूस होता, पण पुढे अधिक व्यापक बनताना ज्वलंत हिंदुत्ववादी संघटना असे रूप देण्यात आले. माझ्या मराठी माता भगिनींपासून, माझ्या तमाम हिंदू माता भगिनींनो असा शिवसेनेचा प्रवास झाला. आता तर शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष बनायचे आहे. त्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असतात. पण त्यात काही त्यांना यश येताना दिसत नाही. उलट, ज्या भाजपशी यांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. त्यांचेच ते आता कडवे विरोधक होऊन बसले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यातील विरोध ज्या थराला गेलेला आहे, ते पाहता हे दोन पक्ष मागील तीस वर्षे मित्रपक्ष होते, याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. आज त्यांचे नाते विळ्या भोपळ्याचे झालेले आहे.

महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम ठेवून भाजपला कोंडीत पकडले. त्यानंतर भाजप आपली मागणी मान्य करणार नाही, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. खरे तर भाजप हा शिवसेनेचा विचारसरणी जुळणारा मित्र होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे काही शिवसेनेचे नैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले महाविकास आघाडीचे सरकार सध्या जरी चालले असले तरी पुढील काळात स्वबळाची आकांक्षा या आघाडीच्या ठिकर्‍या उडवू शकते. पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आणि त्यांचे सरकार येऊ शकत असेल तर ते शिवसेनेला आपल्यासोबत घेतील का, याविषयी शंका आहे. आज त्यांना गरज आहे, त्यामुळे या दोन ताकदवान पक्षांनी शिवसेनेची पालखी खाद्यांवर घेतली आहे.

पण पुढे त्यांना बहुमत मिळाले तर शिवसेना कुठे जाणार हा प्रश्न आहे. दुसर्‍या बाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे हे नव्या दमाने मैदानात उतरले असून संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी दौरे करत आहेत. भाजप त्यांना आपल्या गोटात खेचून शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. राज ठाकरे यांचा शिवसेनेला कडवा विरोध आहे, भाजपला त्याचा फायदा घ्यायचा आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच झाली. त्यात राणेंच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली शक्ती पणाला लावली. यावेळी अटीतटीच्या झुंजीत शिवसेनेला नमवून राणे यांचा विजय झाला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक ही एकाच संघटनेची माणसे. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही माणसे एकामेकांपासून फुटत गेली. एकमेकांविरोधात लढू लागली. त्यामुळे शिवसेनेची हानी झाली एवढे मात्र नक्की. आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाकडे दाखवणार बोट.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -