Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग भल्या पहाटेची चूक मान्य!

भल्या पहाटेची चूक मान्य!

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आपण भल्या पहाटे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ ही आपली चूक होती, असे आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे दीड वर्षानंतर एका वर्तमानपत्राच्या विशेष कार्यक्रमात बोलताना मान्य केले. पण ही चूक मान्य करताना आपल्याला या चुकीचा पश्चाताप होत नाही, कारण आमच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांच्याविषयी मनात जो राग होता, त्यातून आपल्या हातून ती चूक झाली, असा बचाव फडणवीसांनी केला आहे. आपण ही जी चूक केली, त्यामुळे आपल्या प्रतिमेला तडा गेला, आमच्या समर्थकांनाही ते पटलेले नव्हते, अशी कबुली फडणवीस यांनी दिली. असे म्हणतात की, देवासमोर आपण चूक कबूल केली की, देव आपल्याला माफ करतो. लोकप्रतिनिधींसाठी जनता हेच जनार्दन असतात, कारण निवडून येण्यासाठी आणि आपल्या पक्षाचे सरकार येण्यासाठी त्यांच्या मतांची गरज असते.

फडणवीस यांंनी आपली चूक मान्य केली आहे. आता पुढे जनता त्यांना कशा प्रकारे माफ करते आणि त्यांच्या पदरात कोणते माप टाकते, ते येणारा काळच सांगू शकेल. फडणवीस यांनी भल्या पहाटे जो काही चमत्कार घडवून आणला तो खरंच धक्कादायक होता. कारण महाराष्ट्रात राजकीय चमत्कार घडवून आणण्यासाठी आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ओळखले जातात. कारण महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर त्यांनी अनेक चमत्कार करून भल्याभल्यांना नमस्कार करायला लावले आहे. पण ही पहिलीच वेळ होती की, पवारांसारख्या जादुगाराला कुणीतरी प्रचंड धक्का दिला होता, कारण रात्रीच्या अंधारात त्यांच्याच गोटातील प्रमुख नेत्याला फडणवीसांनी आपल्या कच्छपी लावून थेट राजभवनावर आणले होते.

- Advertisement -

शरद पवार जेव्हा सकाळी उठले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का फक्त शरद पवारांनाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेलाही बसला होता. कारण असे काही तरी होईल, असे कुणालाच वाटले नव्हेत. सुरुवातीला सगळ्यांना हा दस्तुरखुद्द शरद पवारांचाच डाव आहे, असे वाटले होते. पण डोईवरचा सूर्य जसजसा पुढे सरकू लागला तेव्हा परिस्थिती स्पष्ट होऊ लागली. हा शरद पवारांचा डाव नसून फडणवीसांनीच त्यांना डाव दाखवला होता, असे सर्वांच्या लक्षात आले. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे मुरलेल्या पवारांनी त्या धक्क्यातून सावरून अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार पुन्हा आपल्याकडे आणले. त्याचसोबत अजित पवारांना त्यांच्या घरातून भावनिक आवाहन करण्यात आले, त्यामुळे शेवटी अजित पवारांनी माघार घेतली आणि ते आपल्या गोटात परतले. त्यामुळे फडणवीसांचा डाव फसला. पण फडणवीस यांनी जो प्रकार केला, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना जसा धक्का बसला तसेच तो डाव फसल्यानंतर त्यांचे हसेही तितकेच मोठे झाले.

आपण भल्या पहाटे असे का केले, त्यावर फडणवीस म्हणाले, आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. राजकारणात जिंवत राहणे आवश्यक असते, आपण मेलो तर आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे फडणवीस यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती हे मान्य करावे लागेल. शरद पवार यांच्यासारख्या मात्तब्बर आणि मुरलेल्या राजकीय नेत्याशी आपण पंगा घेत आहोत, त्याचाही विचार त्यांनी केला नाही. विधानसभेचा प्रचार करताना फडणवीसांनी जाहीरपणे सांगायला सुरूवात केले होेते की, आता शरद पवारांचे राजकारण संपल्यात जमा आहे, आता पुन्हा सत्ता भाजपचीच येणार, मीच पुन्हा येणार, मुख्यमंत्री होणार, निवडणूक हा आता एक औपचारिकता आहे. असेच त्यांना वाटत होते. त्यांनी पवारांच्या वयाकडे पाहून हा विचार केला असावा, पण पवारांचे वय झाले असले तरी त्यांचा करिश्मा कायम आहे, हे पवारांनी नंतर दाखवून दिले. पवारांचे आजवरचे राजकारण आणि त्यांचे सामाजिक स्थान याची फडणवीसांना कल्पना नाही, असे म्हणता येत नाही.

- Advertisement -

कारण फडणवीस हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. शरद पवार यांच्यावर आजवर कितीही आरोप होत आले असले तरी पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात आव्हान देणे वाटते तितके सोपे नाही, हे वेळोवेळी दिसून आलेले आहे, पण फडणवीस यांची सगळी भिस्त ही प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर असते, त्यामुळे जाहीरपणे ते कधीही बोलताना माननीय मोदीजी या शब्दांनीच सुरुवात करतात. म्हणजे जे काही सुरू आहे, ते मोदींमुळेच आहे. अर्थात, त्यात फारसे चुकीचे असे काहीच नाही. कारण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी पंतप्रधान असूनही महाराष्ट्रात सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपच्या अनेक उमेदवारांना निवडून आणले होते. त्यात पुन्हा फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, ही मोदींची पसंती होती. त्यामुळे फडणवीसांना ते वंदनीय असणे सहाजिकच आहे.

अजित पवारांसोबत आपण शपथ घेतली. कारण, राजकारणात जिवंत राहणे आवश्यक असते, असे फडणवीसांना का वाटते हा एक महत्वाचा मुद्दा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरून बसल्यावर काहीही केल्या ते माघार घ्यायला तयार नव्हते. भाजपने त्यांना लाख समजावून पाहिले पण शिवसेनेने अब नही ते कब नही, अशी भूमिका घेतली, आणि भाजपच्या हातून सत्ता गेली. ही सल खरे तर मोदी आणि शहा यांच्या मनातील आहे, कारण अमित शहा यांनी बंद दाराआड आम्हाला मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते तर असे कुठले वचन दिले नाही, असे भाजपवाले म्हणत होते. अशा ताणाताणीत भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेली, पण यात अमित शहांच्या नावाला सत्ता जाण्याचा डाग लागला. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवणे आणि त्यासाठी काहीही करणे आवश्यक होते. त्यातूनच फडणवीस यांच्याकडून भल्या पहाटेची चूक झालेली असावी.

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणतील, असे नेते भाजपकडे नाहीत, त्यांना केंद्रातील भाजप नेत्यांवर त्यासाठी अवलंबून रहावे लागते, असे दिसून आलेले आहे. १९९५ साली राज्यात भाजप शिवसेनेसोबत सत्तेत आली तेव्हा राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रमोद महाजन यांची मदत मिळाली होती. २०१४ साली सत्ता आली तेव्हा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात विक्रमी सभा घेतल्या होत्या. २०१९ ची विधानसभा निवडणूक राज्यातील भाजपच्या नेत्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घालवली असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण तेव्हा त्यांना नरेंद्र मोदींची लाट महाराष्ट्रात चालते असा विश्वास होता. कारण याच लाटेत २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला होता. असे महाराष्ट्रात पूर्वी कधीच झाले नव्हते. केंद्रीय नेत्यांच्या दबावाखालीच फडणवीस यांनी भल्या पहाटे चूक केली होती का, कारण राजकारणात जिंवत राहणे महत्वाचे असते, तुम्ही मेलात तर उत्तर देऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणतात. पण त्यांचा तो डाव फसला. आता त्यांनी ती चूक का केली याचे उत्तर दिले आहे, पण ते म्हणतात ना, जो बुंद से गयी, वो हौद से नही आती.

- Advertisement -