घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसामान्य चेहर्‍याचा राजा माणूस!

सामान्य चेहर्‍याचा राजा माणूस!

Subscribe

आपल्या तुळतुळीत केशविहिनतेचाही आपल्या अभिनयात सुयोग्य वापर करणार्‍यांमध्ये कृष्ण-धवल काळातील डेव्हीड चेऊलकर आणि अलिकडचे अनुपम खेर या अभिनेत्यांचे नाव मोठे आहे. किशोर नांदलस्कर यांनी मात्र या तुळतुळीतपणाला आपल्या सामान्य चेहर्‍याची जोड देऊन विनोद आणि सामान्य माणसाची हतबल वेदनाही आपल्या अभिनयातून मराठी रंगभूमी आणि पडद्यावरही साकारली. कोरोनामुळे किशोर नांदलस्कर यांचे नुकतेच निधन झाले. नांदलस्करांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत राजाच्या भूमिका अनेकदा साकारल्या, त्यांनी सामान्य माणसाच्या चेहर्‍यालाही अभिनयातून मराठी माणसाच्या अती सामान्यपणाचे मात्र जगण्यातील अस्सल राजबिंडेपण बहाल केले.

किशोर नांदलस्कर 1980 च्या दशकात मराठी दूरदर्शनवरच्या गजर्‍यात टकमकपूरचे महाराज असतात. हा माणूस कॅमेर्‍याच्या कुठल्याच कोनातून महाराज वाटेल का, असा उफराटा प्रश्नच या विनोदाची सुरुवात असते. तर तुळतुळीत गोलाकार टकलावर बसवलेला मुकूट मिरवत किशोर सेटवर हातात सिल्वर पेपर लावलेली चकचकीत उभी तलवार घेऊन टकमकपूरचे महाराज संपूर्ण सेटभर गोल गोल फिरतात…त्याच वेळी त्यांचा प्रधान बहुतेक विजय कदम, आताशा पक्कं आठवत नाही. त्यांना त्यांच्या मागोमाग ढोलकीच्या थापेच्या तालावर फिरत धिन तनक धिन…धिन तनक धिन…चालत राज्याचे हालहवाल सांगतो…प्रधानानेच ऐकून शिडशिडीत बांध्याचे नांदलस्कर महाराज टकमकपूरच्या भ्रष्टाचाराला कारण ठरलेल्या हिशेब तपासनीसाला चाबकाचे फटके मारण्याचे फर्मान सुनावतात. त्याच वेळी आपल्या राज्यातील दुष्काळासाठी परराज्यातील राजाकडून मदत मागवण्यासाठी प्रधानांनी खलिता घेऊन जावे, असं फर्मानही सोडतात.

किशोर नांदलस्कर ऐंशीच्या दशकात पाणवठ्यावर निघालेल्या गवळणींना छेडणारे कान्हाही झालेले असतात. पुन्हा त्यांचं तुळतुळीत टक्कल इथंही मिरवणं महत्वाचं असतं. आपल्या टकलावर मोरपिस फुलवून हा कान्हा दूरदर्शनच्या सेटवरच्या सर्व कोनातून गवळणींना छेडत त्यांच्या मागे मागे फिरत असतो. अचानक स्थितप्रज्ञ होऊन मंचाच्या मधोमध हा कान्हा कमरेची बासरी ओठांना लावतो आणि पाय दुमडून उभा राहतो. त्यावेळी टकलावरचं हलकंच खाली सरकलेलं मोहपिसं बाळकृष्णाच्या चष्म्याआड येतं आणि चष्मा सावरताना एका पायावर उभारलेल्या नांदलस्करांची त्रेधातिरपिट उडते.

- Advertisement -

मुंबई दूरदर्शनच्याच ‘चाळ नावाच्या वाचाळ वस्तीत’ही नांदलस्कर दिसतात. इथं त्यांच्यासोबत चंदू पारखी असतात. आताशा हे दोघेही स्वर्गात एखाद्या चाळीत तिथल्या अप्सरांना छेडत धुमाकूळ घातल असतील आणि स्वर्गातल्या मंचावरचे बघे पारखींसोबतच आता धुमाकूळ घालायला नांदलस्कर आलेत म्हणत, वग, नाटकातल्या तिकिटबारीवर केलेल्या खर्चाच्या पुरेपूर वसुलीच्या अत्यानंदाने खळखळून हसत असतील. अतिशय सर्वसामान्य माणसाचा चेहरा असलेल्या नांदलस्करांनी आपल्या प्रेक्षकांमधल्या सामान्यपणालाही हेरलं होतं. हे सर्वसामान्यपणच या दोघांमधला एक मजबूत दुवा होता. मराठी रंगभूमीवरील अस्सल अभिनेता म्हणून नांदलस्कर परिचित होते. नांदलस्करांचं एक वैशिष्ठ्य होतं, त्यांच्या भूमिका त्यांच्या व्यक्तीमत्वाशी मेळ खाणार्‍याच होत्या.

एलआयसी एजंट, रेल्वे, बसमधील प्रवासी, पोस्टातला कर्मचारी, सरकारी बँकेचा कर्मचारी, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला पेन्शनधारी अशा सर्वसामान्य व्यक्तीरेखा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. पौराणिक कथेतल्या कृष्णाशिवाय नांदलस्करांनी रामायणातील मारुतीही साकारल्याचं आठवतंय…नांदलस्करांचा पौराणिक नाटकातला नट असलेला गेटअपमधला मारुती नाट्य मंडळाची प्रयोगासाठी निघालेली बस रस्त्यात बंद पडल्याने मदतीसाठी एका अतीश्रद्धाळू गावात अचानक अवतरतो, रामनवमीच्या दिवशी गावात साक्षात मारुती अवतरल्याची चर्चा होते. त्यामुळे नाईलाजाने मारुती झालेल्या नांदलस्करांची त्या गावात जी अवस्था होते, ती अभिनयातून किशोर नांदलस्करच उभी करू शकत होते.

- Advertisement -

किशोर नांदलस्कर म्हणजे दुसर्‍यांच्या घरात डोकावणारा अस्सल मराठी चाळकरी…महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’मध्ये नांदलस्करांनी डेढफुट्याचा दारुडा बाप साकारल्यावर त्याचं कौतुक होतंच. नांदलस्कर आणि मांजरेकर यांच्यातलं ट्युनिंग मराठी दूरदर्शनच्या काळापासून होतं. डेढफुट्या पावभाजीच्या गाडीवर पहिल्यांदा कमावलेल्या पैशातून नांदलस्करांसाठी क्वार्टर घेऊन येतो. त्यावेळी पोरानं दारु पिएगा…असं विचारल्यावर गहिवरलेल्या डोळ्यांनी होकार देणारे नांदलस्कर लक्षात राहतात. नांदलस्करांनी महेश मांजरेकरांच्या ‘कुरूक्षेत्र’मध्येही महत्वाचा रोल केलाय. त्याआधी राजकुमार संतोषीचा नव्वदच्या दशकातला ‘दामिनी’ आठवायला हवा, यात सामूहिक अत्याचार झालेल्या उर्मीच्या आज्याची भूमिका सुहास भालेकरांनी केलीय.

कुरुक्षेत्रमध्ये अत्याचारित मुलीच्या बापाची भूमिका नांदलस्करांनी केली होती. त्यात मुलीच्या मृत्यूनंतर व्यवस्थेविरोधात लढून हताश झाल्यावर खटला मागे घेणारा हतबल बाप किशोर नांदलस्करच करू शकत होते. घरात बायकोला घाबरणारा सामान्य माणूस नांदलस्करांनीच साकारावा, यातील त्यांची बायको ही अनेकदा उषा नाडकर्णीच असल्याने छोट्या पडद्यावरच्या चाळकरी घरात नांदलस्करांची डाळ शिजण्याचा कधी प्रश्नच नव्हता. सामान्य चेहर्‍याचे नांदलस्कर यांनी आपल्या अभिनयाच्या मोठेपणाखाली आपल्यातल्या सामान्य माणसाला दबू दिलं नाही. हे सामान्यपण त्यांच्या माणूस म्हणून जगण्याचा भाग होतं.

किशोर नांदलस्करांनी मराठी रंगभूमीवरही आपली छाप सोडली होती. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं अखेरच नाटक मानलं जातं. त्यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ही केलं. त्याला दिग्दर्शनाची जोड पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिली. दिलीप प्रभावळकरांनी अजरामर केलेल्या राजाची भूमिका नांदलस्करांनी नव्याने केलेल्या विच्छा…मध्ये साकारली होती. ऐंशीच्या दशकातलं ‘वासूची सासू’ही पुन्हा नव्याने मराठी रंगभूमीवर दाखल झालं. त्यातही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्करांच्या वाट्याला आली. त्यांनी त्याचंही सोनंच केलं. या शिवाय नांदलस्करांनी अजरामर केलेल्या भूमिका लक्षात राहातील अशी नाटकं म्हणजे ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ ही प्रमुख आहेतच.

या शिवाय नांदलस्कर यांनी ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ या मराठी पडद्यावरही आपल्या कामाचा ठसा उमटवला. महेश मांजरेकरांच्या जवळपास सर्वच हिंदी चित्रपटात नांदलस्कर दिसले. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’ ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ यातील त्यांच्या भूमिका लक्षात राहतील. सर्वसामान्य चेहर्‍याला त्यांनी राजबिंडेपण बहाल केलं. कित्येक नाटकात त्यांनी साकारलेला राजा जरी सामान्य चेहर्‍याचा, चष्माधारी असला तरी त्यातील दुर्दम्य आशावाद असामान्य होता. मुंबई, पुणे किंवा ठाण्याच्या कुठल्याही चाळवजा गल्लीतील छोट्याशा घरात राहणार्‍या, बस, लोकलमध्ये सीटसाठी धडपडणारा मराठी मनाचा ‘राजा माणूस’ पडद्यावर साकारणारे किशोर नांदलस्कर लक्षात राहतात हे त्यांनी साकारलेल्या सामान्य माणसातील राजेशाहीमुळेच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -