घरफिचर्समायमहानगर ब्लॉगठाकरे विरुद्ध राणे!

ठाकरे विरुद्ध राणे!

Subscribe

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडलं. या अधिवेशनाचं वर्णन करायचं म्हणजे ‘अपयशी विरोधक आणि असंवेदनशील सत्ताधारी’ या एकाच वाक्यात करता येऊ शकतं. अधिवेशनाआधीच्या विषयांमध्ये दोन गोष्टींकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची विधिमंडळातली उपस्थिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवड. या दोन्ही गोष्टी साध्य न करणार्‍या अधिवेशनामध्ये नव्याच गोष्टीचा उदय झालेला आहे. ही गोष्ट म्हणजे विधिमंडळामध्ये सहभागी होणार्‍या सदस्यांसाठीच्या सभ्यताचार आणि शिष्टाचाराच्या संहितेची. या संहितेची गरज निर्माण झाली तीच मुळी ठाकरे-राणे यांच्यातील कटुतेमुळे. अर्थात या दोन कुटुंबांतील कटुता ही काही नवी नाही. 2005 पासून सुरू असलेला हा वाद आहे. कोणे एके काळी अगदी कौटुंबिक संबंध असलेली ही दोन कुटुंबं सत्ता प्रभावाच्या कारणास्तवच दूर झाली. आणि तिथून हा संघर्ष सुरू झाला. आधी हा संघर्ष जाहीर सभा आणि बैठकांमधून आणि वाहिन्यांवर सुरू होता. आता तो विधानसभेच्या पायरीपर्यंत पोहचलाय.

आजपर्यंत महाराष्ट्रात अनेकांनी एकमेकांपासून, एकाच पक्षातून एकाच नेतृत्वापासून राजकीय फारकत घेतलीय. त्यात कधी पवार-गडाख असतील कधी पवार-शिंदे तर कधी पवार-देशमुख असतील इतकंच काय राणे-चव्हाणही असतील. राजकारणात जवळ येऊन दूर गेलेली मंडळी ही काळाच्या ओघात आपल्यामधली कटुता विसरून जातात. मात्र ठाकरे-राणे यांच्यामधली राजकीय कटुता वैयक्तिक पातळीवर जाऊन पोचलीय. या कटुतेमुळेच राज्याच्या विधिमंडळात लोकप्रतिनिधींना सभ्यतेची आणि शिष्टाचाराची आचार संहिता घालून द्यावी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आपण माणसांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत. कुत्र्या मांजरांचे लोकप्रतिनिधी नाहीत, हे सदस्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं. अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायर्‍यांवरून आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच म्याव म्याव असा आवाज काढला आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर दोन्हीकडच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर भरपूर तोंडसुख घेतले. आदित्य ठाकरे यांच्यावर अधिवेशनाच्या काळात विधानभवनाच्या परिसरातच नितेश राणे यांनी केलेल्या असंसदीय टीकेचे पडसाद शिवसेनेच्या आमदारांमध्ये उमटले नसते तरच नवल.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत संतोष परब या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण आणि त्यात नितेश राणे यांच्या नावाचा हल्लेखोरांकडून झालेला उल्लेख यामुळे शिवसेनेने दोन्ही पातळीवर जोरदार माहौल तापवला आहे. शिवसेनेने सिंधुदुर्गमध्ये रस्त्यावर आणि पोलीस प्रशासकीय पातळीवर नितेश राणे यांची कोंडी केली आहे. त्यामुळेच नितेश राणे यांना फौजदारी कारवाईपासून पळ काढण्यासाठी अधिवेशनातून दूर राहत फरार व्हावं लागलं. कधीकाळी राणेंचे अत्यंत खास असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे गेल्या दीड वर्षापासून शिवसेनेमध्ये सामील झाले आहेत. नारायण राणे आपल्या पंजातील नखं काढून मातोश्रीलाच घायाळ करत आहेत, असं लक्षात येताच ठाकरेंनी सगळ्याच पातळीवर राणेंना काउंटर करायला सुरुवात केली. पक्षातून आपली हकालपट्टी झाल्यानंतर कोकणातून शिवसेना अस्तित्व गमावेल असं राणेंना वाटलं होतं.

मात्र सिंधुदुर्गातील तीनपैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत. खासदार शिवसेनेचे आहेत तर ज्या मुख्यमंत्रीपदावरून राणे-ठाकरे यांच्यात 2005 सालापासून संघर्ष सुरू झाला ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. राणे असोत किंवा ठाकरे, उभयतांकडून हा वाद सतत धुमसत राहील याचीच व्यवस्था केली गेलेली आहे. बर्‍याचदा हा प्रयत्न राणेंकडूनच झाला आहे. त्यामुळे राणेंकडे असलेले समर्थक हे आपण किती कडवट राणेप्रेमी आहोत हे भासवून वर्षागणिक लाखो रुपयांचा मलिदा आणि आपल्या जमिनींचे सातबारे वाढवत आहेत. तर ठाकरे यांच्या बाजूला असलेले सुमार क्षमतेचे लोकंही आपण राणेंना कसं टोलवलं त्याची वर्णनं पक्ष नेतृत्वाला ऐकवून एकामागोमाग एक पदांच्या सुभेदार्‍या पदरात पाडून घेत आहेत. राणे असोत किंवा ठाकरे अथवा त्यांचे सुभेदार यांच्यातली राजकीय आणि शाब्दिक रणधुमाळी ही बाहेर सुरू होती तोपर्यंत ठीक होतं. पण आता ती खासगी पातळीवर पोहोचत आहे.

- Advertisement -

या संघर्षामध्ये राजकीय नुकसान आणि विश्वासार्हतेची हानी जर कोणाची झाली असेल तर ती नारायण राणे यांचीच. राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे कितीही अवगुण आणि कच्चे दुवे उजेडात आणण्याचा प्रयत्न केला तरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव यांचं विराजमान होणं हे राणे यांच्यासाठी तापदायकच ठरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांबाबत राणेंनी केलेल्या विधानानंतर त्यांची झालेली अटक, पोलीस कारवाई आणि विधी खात्याशी संबंधित गोष्टींचा अभ्यास यात राणे यांचा स्वतःचा असा लौकिक आहे. तरीही सत्ता आणि त्यातही सत्तेतलं सर्वोच्चपद हाती असल्यावर काय करता येऊ शकतं हे उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्या अटकेच्या वेळी दाखवून दिलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या विधानभवनातील आगमनाच्या वेळी नितेश राणे यांनी काढलेल्या मांजरीच्या आवाजामुळे काही क्षणांसाठी आदित्य ठाकरे यांची हुर्यो उडालीही असेल. पण त्याकडे स्वतः आदित्य ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी दुर्लक्ष करत पक्षातील पदाधिकार्‍यांना, आमदारांना आणि कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीचे संकेत आणि संदेश दिलेत ते नितेश राणे यांच्यासाठी डोकेदुखीचे ठरू शकते.

सध्या राणे कुटुंबीय भाजपात आहेत. सध्या म्हणण्याचं कारण एवढंच 2005 सालापासून शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राणे यांनी आधी काँग्रेस त्यानंतर स्वतःचा स्वाभिमानी पक्ष आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केलेला आहे. या तिरंगी प्रवासामध्ये ठाकरे यांच्यापेक्षा राणे यांचंच नुकसान अधिक झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर राणे यांची झालेली अटक आणि आता आदित्य ठाकरे यांची मांजराचा आवाज काढत नितेश राणेंनी उडवलेली हुर्यो या दोन गोष्टी एकाच पातळीवर बघण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेतेमंडळींनी केलेला आहे. त्यामुळे एरवी सुनील प्रभू यांच्यासारखा शांततेने, शिस्तीने संसदीय आयुधांचा अवलंब करत आपले राजकारण करणारा शिवसेनेचा नेता त्वेषानं सभागृहात आणि सभागृहाबाहेर नितेश राणे यांच्यावर तुटून पडला. शिवसेनेने राणे यांना अद्दल घडवण्याची खुणगाठच बांधलीय.

अवघे 982 मतदार असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला राणेंना धडा शिकवायचा आहे. भाजप प्रवेशानंतर मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदामुळे बेधुंद झालेल्या आणि शक्तीशाली पक्षात असल्यानं आलेल्या अतिआत्मविश्वासामुळे राणे कुटुंबियांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. राणे यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईनंतर त्यांचा एकूणच नूरच बदलला. तीच गोष्ट शिवसेनेला आमदार नितेश यांच्या बाबतीत करायची आहे. या दोन्ही गोष्टींमधील एक लक्षात येणारा योगायोग म्हणजे राणे यांनी केलेल्या विधानाचं आणि नितेश यांनी केलेल्या वर्तनाचं समर्थन भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं नाही. भाजपकडून किंवा फडणवीसांकडून राणे यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अवाजवी अपेक्षा धरू नयेत हे समजावण्यासाठी या दोन्ही गोष्टी राणे यांना उपयुक्त ठरू शकतात. अर्थात कोणत्या गोष्टींमधून किती शिकवण घ्यायची हे समजण्यासाठी लागणारा अभ्यास मात्र राणे पिता-पुत्रांना स्वतःच करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -