घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाकरी परतायला हवी!

भाकरी परतायला हवी!

Subscribe

मागच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यानंतर जय-पराजयात फक्त दोन नगरसेवकांची तफावत होती. हे दोन नगरसेवक मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले असते तर कुठल्याही क्षणी भाजपला स्वतःकडे ओढता आले असते. पण तेव्हा युतीमध्ये कटूपणा, ठाकरेची नाराजी नको, म्हणून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकवू दिला आणि महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विराजमान झाले. मागच्या वेळेला हुकलेली भाजपची संधी आता २०२२ ला त्यांना वाया दवडू द्यायची नाही. त्यांना स्वतंत्रपणे मुंबईचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

राज्यातील सत्ता गमावलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा आणि भाजपाचा महापौर बनवण्याचा मनसुबा जाहीरपणे बोलून दाखवलाय. भाजपचे अभ्यासू नेते आशिष शेलार यांनी तर २०१७ मध्ये शिवसेनेला जीवदान देणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चूक होती, असं नुकतंच ‘माय महानगर’च्या मुलाखतीत सांगून टाकलं. शेलार यांच्या या विधानाला खूप मोठा गर्भितार्थ आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यानंतर जय-पराजयात फक्त दोन नगरसेवकांची तफावत होती. हे दोन नगरसेवक मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले असते तर कुठल्याही क्षणी भाजपला स्वतःकडे ओढता आले असते. पण तेव्हा युतीमध्ये कटूपणा, ठाकरेची नाराजी नको, म्हणून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकवू दिला आणि महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विराजमान झाले. मागच्या वेळेला हुकलेली भाजपची संधी आता २०२२ ला त्यांना वाया दवडू द्यायची नाही. त्यांना स्वतंत्रपणे मुंबईचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

मागची पाच वर्षे अल्पमतात असूनही बहुमतासारखी सत्ता हाकणारे देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षाचे नेते झाले आहेत. शिवसेनेने ज्या स्वरूपाची धोबीपछाड त्यांना दिली आहे, त्यामुळे दुखावलेल्या भाजपने राज ठाकरे यांच्याबरोबर सलगी करायला सुरुवात केली आहे. भाजपकडे असलेली आर्थिक ताकद आणि मनसेकडे असलेले कार्यकर्त्यांचं जाळं याच्या जोरावर शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस-पाटील-शेलार सज्ज झाले आहेत. त्यांना मदत करायला राज ठाकरे आसुसलेले आहेत. कारण सेनेनं रातोरात सहा नगरसेवक पळवल्याचा वचपा राज यांना काढायचा आहे. त्यामुळे दुखावलेल्या राज यांनी भाजप बरोबर जाऊन शिवसेनेला अद्दल घडवली तर नवल वाटायला नको. अर्थात शिवसेनेला अद्दल मुंबईकर नाही तर पालिकेतल्या सेनानेत्यांचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेचा कैफ घडवू शकतो. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गोटात वासरात लंगडी गाय शहाणी असाच प्रकार सुरू आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या तिजोरीचा दर्जा असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद माझगावच्या यशवंत जाधव यांच्याकडे आहे. मुंबई महापालिकेत सुनील प्रभू आणि राहुल शेवाळे या जोडगोळीच्या हाती सूत्रं असताना यशवंत जाधव यांना प्रभू, शेवाळे आणि त्यानंतर शैलेश फणसे यांनी अक्षरशः कस्पटासमान वागणूक दिली होती. यशवंत आणि त्यांची नगरसेविका पत्नी आणि विद्यमान आमदार यामिनींना तत्कालीन प्रभावी मंडळींनी साफ नामोहरम केले होते. आता अनेक ज्येष्ठ नगरसेवक वेगवेगळ्या कारणांनी सभागृहाबाहेर गेल्यामुळे पालिकेतील सूत्रं जाधव यांच्या हाती आली आहेत. त्यामुळे आता महापालिकेत सध्या यशवंतराज सुरू आहे. जाधव यांच्या राजकारणाचा बाज काहीसा आक्रमक आणि आव्हानाला अंगावर घेणारा असा आहे. साम-दाम-दंड-भेदाने आपली फत्ते करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पत्नीला आमदार करताना त्यांनी आपल्या या स्वभावाची चुणूक दाखवत भायखळ्यातून एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण यांना धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. पत्नी यामिनी यांचा विजय आणि आपल्या अवतीभवती कोणी प्रतिस्पर्धी नाही यामुळे यशवंत जाधव यांना अतिआत्मविश्वासाची बाधा झाली. स्थायी अध्यक्षपदाची ही त्यांची दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्मला त्यांनी छान काम केलं. साहजिकच त्यांना रिपीट करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सर्व सूत्रं स्वत:च्या हाती घेतली. साहजिकच महासभेचा अजेंडाही स्थायीच्याच अ‍ॅण्टिचेंबरमध्ये ठरू लागला. त्यात पेशाने शिक्षक असूनही विश्वनाथ महाडेश्वर यांची कामगिरी शिवसेना आणि मुंबईसाठी अत्यंत सुमार दर्जाची होती.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेताल वक्तव्याने आणि वागण्याने प्रशासनावरचा अंकुश गमावला होता. आयुक्तांनी महापौरांना कधी गांभीर्याने घेतलं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे महाडेश्वर यांच्यानंतर आपणच महापौर असल्याच्या अविर्भावात जाधव वावरू लागले. महापौर निवडीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जाधव यांचं नाव चर्चेत ठेवून मातोश्रीने दुसर्‍या दिवशी मात्र किशोरी पेडणेकर यांना महापौर केल्यामुळे जाधव यांना जबरदस्त धक्का बसला. त्याचबरोबर मातोश्रीला कोणी गृहीत धरू नये असा संदेशही उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकला. याचं कारण आदल्या रात्रीचं म्हणजे स्व.शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीच्या रात्री यशवंत जाधव यांच्या हातून घडलेल्या चुका कारणीभूत ठरतात. महापौर आणि सभागृहनेते यांच्यातला वाद हा गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेत पाहायला मिळतो. सध्या मुंबईच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी विशाखा राऊत यांच्याकडे आहे. राऊत या पेशाने शिक्षिका होत्या. त्यांनी मुंबईचे महापौर पद आणि आमदार पदही भूषवले आहे, पण पक्षाची आणि पालिकेची आर्थिक सूत्रे हाती आलेल्या यशवंत जाधव यांनी सभागृह नेत्यांचा आवाज पूर्णपणे क्षीण करून टाकलेला आहे. जाधव हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत, पण आज काही गोष्टी या स्तंभात स्पष्टपणे लिहिणं हे एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी खूपच गरजेचं आहे आणि ते जाधव आणि त्यांच्या पक्षासाठी गरजेचं आहे. २००३ ते २००७ या काळात यशवंत जाधव यांना मातोश्रीने अत्यंत वाईट वागणूक दिली होती. तो त्यांच्यासाठीचा खर्‍याखुर्‍या अर्थाने बॅडपॅच होता. मातोश्रीच्या नाराजीमुळे जाधव यांच्याबरोबर सेनेचे पदाधिकारी, पत्रकार आणि कार्यकर्तेही अंतरावर राहत होते, आता दिवस बदललेले आहेत आणि त्याच वेळेला जाधव यांची कार्यशैलीही. मुंबई महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण ही एकमेव समिती अशी आहे यावर आयुक्त अध्यक्ष म्हणून असतात या समितीवर सभागृह नेता सदस्य असतो. मात्र, पहिल्यांदा या समितीवरून सभागृह नेत्यांना दूर ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

आपल्याला अडचणीच्या ठरणार्‍या दोन विभागप्रमुखपदी असलेल्या नगरसेवकांना स्थायी समितीवरून हटवण्यात आलं आहे. त्यांना कमी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्थापत्य समितीचे सदस्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरे आपला सत्कार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आणि मुंबईतल्या अकरा विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत करून घेतात. हा मानसन्मान पालिकेत का दिला जात नाही? हे का घडतंय? सध्या मेट्रोचे वृक्ष प्राधिकरणाचे १०-१२ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते प्रलंबित ठेवण्यासाठी जे ‘काही’ सांगितलं जातंय ते ऐकल्यावर छाती दडपून जाण्याचीच वेळ आलीय. या सगळ्या गोष्टी कमी म्हणून की काय चीनला स्वखर्चाने अभ्यास दौर्‍यावर जाणार्‍या नगरसेवकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसचं कारण देऊन हा दौरा रद्द केला आहे. चीनच्या या दौर्‍यात शांघाय आणि गोंजाव या दोन शहरांना भेटी देण्यासाठी मिळालेल्या निमंत्रणामागे आरोग्य समितीवरील अमेय घोले या तरुण आणि धडपड्या नगरसेवकाचे परिश्रम होते. हा ७०-७५ हजार रुपयांचा खर्च नगरसेवक स्वत: करणार होते, पण वायरसचं कारण देऊन चीनचा दौरा, शिक्षण समितीचा डेहराडूनचा, स्थापत्य समितीचा अंदमान निकोबारचा आणि विधी समितीचा राजस्थानचा दौरा आर्थिक कारणांनी रद्द करण्यात आला. त्यासाठी आदित्य ठाकरेंच्या ढालीचा वापर केला आहे, पण ज्या ज्या मंडळींना आपल्या इच्छे व्यतिरिक्त नगरसेवकांचे अभ्यास दौरे होऊ नये असं वाटत होतं त्यांचंच मांजर या दौर्‍याला आडवं गेल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात ऐकायला मिळते. अन्यथा विजय सिंघल, रमेश पवार आणि आशुतोष सलील हे अधिकारी पालिकेच्या खर्चाने आठवड्याभराच्या विदेश दौर्‍यावर गेले तेव्हा नेमकी कुणाच्या डोळ्यावर अंधारी आली होती?

जाता जाता यंदापासून शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृत्यर्थ १७ प्रभाग समितीच्या अध्यक्षांपैकी पहिलं येण्याचा मान शिवडीतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या सचिन पडवळ या तरुण नगरसेवकाला मिळाला. नशिबाने संधी मिळाली की त्याचं सोनं कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणून पडवळ यांच देता येईल. अधिकार्‍यांपैकी हा पुरस्कार जी साऊथच्या शरद उघडेंना मिळालाय. या दोघांकडूनही मुंबईने अपेक्षा बाळगायला हरकत नाही. अर्थात दोघांसमोर कामगिरीच्या सातत्याचं आव्हान आहेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -