मागे बसणार्‍याला हेल्मेटसक्ती कितपत योग्य?

मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी ९ जूनपासून दुचाकीवर मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्तीचे केले आहे. यासोबतच नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाईचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिलाय. विशेष म्हणजे तत्पूर्वी हा नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही दिली होती, ती मुदत ८ जून रोजी संपली आहे.

Mumbai traffic police forced the occupants of two wheelers to wear helmets

गेल्या काही दिवसांपासून देशभरात दुचाकी अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी मागे बसणार्‍यालाही हेल्मेटसक्ती केलीय. मागे बसणार्‍याने हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्दच्या शिक्षेची तरतूदही केलीय. पण आता या निर्णयामुळे दुचाकी चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांचा हा नियम जाचक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. प्रत्येक वेळी मागच्याने हेल्मेट घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता मोटारसायकल चालकांमधून उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी ९ जूनपासून मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्तीचे केले आहे. यासोबतच नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाईचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिलाय. विशेष म्हणजे तत्पूर्वी हा नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही दिली होती, ती मुदत ८ जून रोजी संपली आहे. त्यामुळे ९ जूनपासून मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे.

आता बाईकच्या मागे बसणार्‍याने हेल्मेट न घातल्यास वाहतूक अधिकारी कारवाई सुरू करतील. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, असे वाहतूक पोलिसांना आढळून आले आहे. सध्या वाहतूक पोलीस हेल्मेट नसणार्‍या दुचाकीस्वारांकडून ५०० रुपये दंड आकारतात किंवा त्यांचे परवाने निलंबित करतात. मात्र वाहतूक नियमांनुसार हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास तुम्हाला दंडही होऊ शकतो हे ऐकून तुम्हाला आता धक्का बसला असेल. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते. त्यामुळे आता या नियमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक दुचाकी चालकांनी हा नियम जाचक असल्याचं म्हटलं आहे. एखादा दुचाकीस्वार जात असताना पाठीमागे बसणार्‍यानंही हेल्मेट घालावं या कल्पनेनेच अनेकांची त्रेधातिरपीट उडालीय.

दुचाकीवरून दोघांनी प्रवास करताना प्रत्येक वेळी दोन हेल्मेट सोबत बाळगावी लागणार आहेत. तसेच सोबत लहान मूल असलं तरी त्यालाही हेल्मेट घालावे लागणार आहे, या निर्णयाने अनेकांना तणाव आलाय. बर्‍याचदा बाईक किंवा स्कूटीमध्येही हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था केलेली असते, पण हे अधिकचे हेल्मेट कुठे ठेवावे हाच प्रश्न आता दुचाकीस्वारांना सतावतोय. दुसरीकडे हेल्मेट न घातल्यास ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारणार या विचारानंच अनेकांचा संताप होतोय. हेल्मेट न घातल्यास एवढी कठोर शिक्षा कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. हेल्मेटसक्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही लोकांचा यामुळे हेल्मेटसक्तीला विरोध आहे. त्यासंदर्भात काहींनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना भेटून निवेदने दिली आहेत.

या निर्णयाला राजकीयदृष्ठ्याही विरोध होत आहे. भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाला बालीश आणि अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांमध्ये संताप असून, हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी करणारं पत्रही त्यांनी गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. तसेच हा हेल्मेट सक्तीचा कठोर निर्णय रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही भाजपनं इशारा दिलाय. मुंबई पोलीस आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे ‘आजार म्हशीला आणि औषध पखाल्याला’ असल्याचा टोलाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय. दुचाकीवर ऐनवेळी बसणार्‍याने हेल्मेट कोठून आणायचे?, दुचाकीमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असते का? ताशी ४० किमीपेक्षा कमी वेगात वाहन चालवले जात असताना हेल्मेटची गरज काय? असा सवाल आमदार भातखळकर यांनी उपस्थित केलाय. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून तसा निर्णय जाहीर करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनास सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

कायद्याने हेल्मेटसक्ती आहे. कॉलेज, तरुण, तरुणी वेगात दुचाकी चालवत असून, ६० ते ७० च्या स्पीडने दुचाकी हाकतात. त्यामुळेच दुर्दैवाने अपघात घडतो त्यावेळीच आपल्या डोक्यावर हेल्मेट नसेल आणि डोक्याला मार लागला तर जीवावर बेतू शकते. शिस्त आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचं आवाहन वाहतूक पोलीस करत आहेत. तसेच हेल्मेट घातल्यामुळे डोळ्यात कचरा, नाका-तोंडात धूळ जात नाही. चेहरा, डोके सुरक्षित राहते. अपघात झाला तरीही जोरात मार लागत नाही, डोक्याला गंभीर इजा होत नाही, सुरक्षित प्रवास होण्यास मदत होते, असेही फायदे सांगितले जात आहेत. जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यात चुकीच्या दिशेने वाहन चालवणार्‍यांविरुद्ध २,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, तर २०० वाहनचालकांना अनावश्यक हॉर्न वाजवल्याबद्दल प्रत्येकी १,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार जर एखाद्या दुचाकीस्वाराने मोटारसायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घातले नाही, तर त्याला नियम १९४D MVA- अंतर्गत १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. एवढेच नाही तर जर एखाद्याने निकृष्ट हेल्मेट घातले किंवा हेल्मेटवर BIS नोंदणी चिन्ह नसेल तर चालकाला १९४D MVA – नुसार १००० रुपयांचे अतिरिक्त चलन भरावे लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्राने असा नियम लागू केला होता की, भारतात फक्त दुचाकी वाहनांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेट तयार आणि विकले जातील.

मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अधिसूचना जारी करून दुचाकीच्या मागील सीटवर बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचे केली आहे. यासोबतच या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दुचाकीच्या मागील सीटवर बसलेले बहुतांश लोक हेल्मेट परिधान करत नसून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले आहे. सध्या हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणार्‍यांना वाहतूक पोलीस ५०० रुपये दंड करतात किंवा त्यांचा परवाना रद्द करतात. आता १५ दिवसांनंतर हेल्मेट न घालता मागच्या सीटवर बसणार्‍यांना हाच दंड आकारण्यात येणार आहे. आजही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटविषयी जागरूकता नाही, याची मला खंत वाटते. हेल्मेट न घालता सर्रासपणे गाड्या वेगाने चालतात आणि अपघाताला सामोरे जातात. दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट सक्ती केली, हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. प्रशासनाने अशा प्रकारे कठोर होण्याची गरज असल्याचंही या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

नवीन मोटार वाहन कायद्याच्या कलम (१२९) नुसार दुचाकीवर बसणार्‍या चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही मुलाला किंवा व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कायद्याच्या कलम (१२८) नुसार दुचाकी चालक स्वत:व्यतिरिक्त फक्त एकच सवारी करू शकतो. दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास दंड भरावा लागेल. आपण नेहमी अपघाताच्या बातम्या ऐकतो, वाचतो. काही वेळा चालकाने हेल्मेट घातल्यामुळे तो बचावतो, परंतु मागे बसलेल्या व्यक्तीला मात्र त्याचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकांनी हेल्मेट सक्तीच्या नियमांना अतिशय गांभीर्याने घेऊन स्वत:च्या आयुष्याला महत्त्व देणे गरजेचे आहे. हेल्मेटची सक्ती ही आवश्यक आहे. कारण यामुळे अपघात जरी घडला तरी तुमचा जीव सुरक्षित राहणार आहे. भरधाव वेगाने जाणारी वाहने, त्यात नियम न पाळणारे चालक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आणि सध्या हेल्मेटमध्येही खूप प्रकार उपलब्ध असून, त्यात वेगळे वाटण्यासारखे काही नाही. दुचाकी चालवताना हेल्मेट डोक्यावर असल्याने प्रवासात जीव सुरक्षित राहतो. परंतु कामाच्या वेळेस, महाविद्यालयात हे हेल्मेट ठेवणे, सांभाळणे हे फार किचकट वाटते. यामुळेच अनेक तरुण ते वापरताना दिसत नाहीत, परंतु अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने प्रशासनाने केलेली सक्ती ही चांगलीच आहे.

विशेष म्हणजे देशातील अनेक शहरांमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसणार्‍यासाठी हेल्मेट अनिवार्य आहे. अनेक ठिकाणी तर पाच वर्षांवरील मुलांसाठीही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. दुचाकीस्वारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), इन्शुरन्स सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. डीएल आणि प्रदूषण प्रमाणपत्र मूळ असावे. आरसी आणि विमा प्रमाणपत्राची छायाप्रत ठेवावी लागेल. याशिवाय नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहन ओव्हरलोड केल्यास तुम्हाला २०००० रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच असे केल्यास प्रति टन २००० रुपये अतिरिक्त दंडही भरावा लागणार आहे. यापूर्वीही हजारो रुपयांची चलन कापण्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. नाही तर आपल्या खिशाला कात्री लागणार तर आहेच, परत आपला परवानाही रद्द केला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबईपासून सुरुवात झालेला हा नियम महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांत लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन हेल्मेटचा जाच महाराष्ट्रातील सगळ्यांना सहन करावा लागू शकतो. त्यामुळेच मागे बसणार्‍यालाही हेल्मेट सक्तीसारखे कठोर वाहतूक नियम करणे आताच आवश्यक आहेत का, असा प्रश्न दुचाकीचालकांकडून उपस्थित केला जात आहे.