घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमुंबई काँग्रेसचा नवसंकल्प...

मुंबई काँग्रेसचा नवसंकल्प…

Subscribe

निवडणुका लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसला मराठी चेहरा पाहिजे म्हणून अध्यक्षपदाची लॉटरी काहीसे अडगळीत गेलेले भाई जगताप यांना लागली. त्यांची गाडी सुसाट धावू लागली. परंतु त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील नेते किंवा दिल्लीतील हायकमांड कुठे बळ देतेय असे दिसले नाही. तरीही जगताप यांना काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असे वाटते.

उदयपूर येथे गेल्या महिन्यात काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात नेते, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचावे, असा आदेश देण्यात आला. त्यानंतर देशभरातील काँग्रेसच्या सर्व प्रदेश कार्यकारिणी, जिल्ह्याच्या कार्यकारिणी कामाला लागल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे नवसंकल्प शिबीर पार पडले. यासाठी स्थळ निवडले ते मुंबईचे प्रवेशद्वार असलेले पनवेल शहर! महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुंबई काँग्रेसचा खरोखरच काही नवीन संकल्प असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. पण खरे कारण आहे येऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक! ही निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. मुंबईत काँग्रेसचे २०१७ च्या निवडणुकीत ३१ नगरसेवक निवडून आलेले आहेत. राज्यात काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असले तरी काँग्रेसला मुंबईत कुणासोबत युती नको.

परंतु स्वबळावर लढण्याइतपत काँग्रेसची ताकद नाही हे युती नको म्हणणार्‍यांना चांगले ठाऊक आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समिती नेहमी स्वयंभू असल्यासारखी वागत आलेली आहे. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. शिवसेना आणि काँग्रेस मुख्य प्रतिस्पर्धी असत. कालौघात भाजपच्या स्थापनेनंतर २०१४ आणि त्यापूर्वी हा पक्ष शिवसेनेसोबत सत्तेत होता. स्वाभाविक या पक्षाने २०१७ च्या निवडणुकीत सत्तारूढ शिवसेनेला जेरीस आणले. अवघ्या दोन जागांनी पिछाडीवर राहिलेल्या भाजपला ८२ जागा मिळाल्या. परंतु युतीमुळे शिवसेनेचा महापौर झाला. पुढे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन न झाल्यामुळे शिवसेना आणि भाजपात विस्तव जाईनासा झाला. स्वाभाविक भाजप मुंबईत कमालीची आक्रमक झाली आहे. २०२२ च्या निवडणुकीत मुंबई ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. शिवसेना आणि भाजपमधील संघर्षामुळे आपला फायदा होईल असा होरा बांधून भाई जगताप यांच्या अगोदर अध्यक्ष राहिलेले संजय निरुपम थेट शिवसेनेलाच अंगावर घेऊ लागले. सत्तेत एकत्र असल्यामुळे निरुपम यांच्या कोणत्याही वक्तव्यावर काँग्रेसचे नेते प्रतिक्रिया देईनासे झाले.

- Advertisement -

निवडणुका लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसला मराठी चेहरा पाहिजे म्हणून अध्यक्षपदाची लॉटरी काहीसे अडगळीत गेलेले भाई जगताप यांना लागली. त्यांची गाडी सुसाट धावू लागली. परंतु त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील नेते किंवा दिल्लीतील हायकमांड कुठे बळ देतेय असे दिसले नाही. तरीही जगताप यांना काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असे वाटते. उद्या त्यांची ही मागणी मान्य झाली असे घटकाभर धरले तरी गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांइतक्या जागा पुन्हा मिळतील का नाही, ही शंका आहे. त्यामुळे पुन्हा आघाडीत सामील होण्याशिवाय मुंबई काँग्रेसला पर्याय रहाणार नाही. मुंबई काँग्रेस समितीला स्वतंत्र दर्जा असल्याने या समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांमध्ये कायम सुंदोपसुंदी होत राहिलेली आहे. देवरा गट, निरुपम गट, गायकवाड गट, जगताप गट, कामत गट, हंडोरे गट अशा गटातटाच्या राजकारणात मुंबई काँग्रेस अडकली आहे.

यापूर्वी गट-तट असले तरी भानुशंकर याज्ञीक, मुरली देवरा, गुरुदास कामत, एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचा गाडा व्यवस्थितपणे रेटला होता. आता भाजपच्या लाटेत काँग्रेसची अवस्था विकलांग झाली आहे. तरीही या पक्षाच्या पूर्वपुण्याईने संघटन उभारणीसाठी संधी येत असतानाही नेते गटातटाच्या राजकारणात आनंद घेत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या पक्षासाठी सत्वपरीक्षा ठरणार आहेत. यात जर हा पक्ष पुन्हा भुईसपाट झाला तर त्याला उभारी घेता येणे कठीण आहे. तळागाळापर्यंत पोहचलेल्या काँग्रेसला ‘बुरे दिन’ काही नवे नाहीत. मात्र यापूर्वी नेते मरगळ झटकून कामाला लागत. इंदिराजींनी दारुण पराभवानंतरही हार मानली नव्हती. आणीबाणीनंतर त्यांना जनतेने नाकारले होते. त्या हार मानणार्‍या नसल्याने त्यांनी देश पिंजून काढला. पक्षाला सत्तेत आणले. त्यासाठी ‘मी पुन्हा येईन’चा नारा लावण्याची त्यांना गरज पडली नाही.

- Advertisement -

इंदिराजीनंतर राजीव गांधी आले. त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसला चांगले दिवस आले. पुढे मोदी उदयानंतर काँग्रेसची वाताहत सुरू झाली ती थांबण्याचे काही नाव घेईना! भाजपकडून सपाटून मार खात असताना काँग्रेस कुठे आक्रमक होतेय असे फारसे कुठे दिसले नाही. काँग्रेसच्या तारूत पाणी शिरू लागताच त्या पक्षाने मोठे केलेले नेते उंदराप्रमाणे इकडे-तिकडे पळू लागले. अलीकडच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला पुन्हा साक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे काही तरी घडले आणि उदयपूरचे मॅरेथॉन चिंतन शिबीर पार पडले. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव झोकून काम करू शकत नसल्याने पक्षाची अवस्था काहीशी सैरभैर झाली आहे. पक्ष नेतृत्त्वाच्या सक्षमतेवर शंका व्यक्त करीत जुने नेतेही इतरत्र पळू लागले आहेत. कपील सिब्बल हे त्यातील ठळक उदाहरण! चिंतन शिबिरानंतर पक्षात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मुंबई काँग्रेसची बैठकही त्यापैकी एक आहे. नवीन संकल्प करताना चिंतन कशाला करायला पाहिजे, हे भाई जगताप यांना कुणीतरी विचारायला पाहिजे. भाजप, शिवसेना आणि अगदी राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आक्रमकपणे काम करीत असताना मुंबई काँग्रेसला चिंतनात वेळ दवडावा लागतोय हीच मुळी हास्यास्पद बाब आहे.

आता वेळ चिंतनाची नव्हे तर जनतेत पोहचून काम करण्याची आहे. गेल्या काही दिवसांत भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने भाजपविरोधात काही आंदोलने केली. या आंदोलनांत जनतेला स्वारस्य उरलेले नाही. महागाईच्या झळा असह्य होत असल्याने त्यावर आक्रमक होऊन काम करा, असे जनता सांगत आहे. मुंबई काँग्रेसला चिंतनासाठी पनवेल का गाठावे लागले, हा गूढ प्रश्न आहे. नेत्यांनी विरोधकांवर आगपाखड करण्याशिवाय आणि कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजण्यापलीकडे काही ठोस संकल्प केलाय असे दिसले नाही. जुन्या विषयांना नव्या तेलाची फोडणी देऊन संकल्प पार पाडता येणार नाहीत. जगताप आणि सहकार्‍यांना मुंबई पर्यायाने राज्यासह देशातील काँग्रेसची चिंता असेल तर हेवेदावे आणि अहंपणा बाजूला ठेवून जोमाने काम करावे लागेल. मुंबई काँग्रेसच्या बैठकीला प्रभारी एच. के. पाटील यांनी येणे ठीक, पण राज्यसभेचे उमेदवार इम्रान प्रतापगढीही आले. त्यांच्या उपस्थितीमुळे मुंबईत उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न तर नव्याने सुरू झाला नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ शकते. नवसंकल्प करताना नेत्यांच्या भाषणात आवेश दिसला नाही. भाजपासह विरोधकांवर वारंवार टीका करून पक्षाला उभारी येईल, असे तूर्त दिसत नाही. आता संकल्प पाहिजे तो दमदार वाटचालीचा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -