पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतिहास घडविणारे राष्ट्रनेते : रामदास आठवले 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या दि 17 सप्टेंबर रोजी 72 वा वाढदिवस देशभर साजरा होणार आहे.  संपूर्ण जगाला आपल्या नेतृत्वाची दखल घ्यायला लावणारे आणि जगात आज प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेते म्हणून संपूर्ण जगात  अव्वल  ठरलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान वाटत असून खऱ्या अर्थाने ते आज राष्ट्रनेता आहेत.विश्वनेते ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी लिहिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिष्टचिंतन करणारा शुभेच्छापर विशेष लेख 

– रामदास आठवले 

जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे नेहमी देशाला संबोधित करताना इतिहासाची उजळणी करतात.नव्या पिढीला देशवासियांना आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट वक्ते आहेत. महानेते आहेत. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वशैलीत ते आपल्या देशाच्या गौरवशाली  इतिहास विसरू नका याचे आवाहन करतात. त्यासाठी आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासातील ऐतिहासिक नायक; महापुरुषांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा याचे ते आवाहन करतात. आता नुकताच आपल्या देशाच्या नेव्ही चा नाविक दलाचा  नवा ध्वज देशाला अर्पण करण्यात आला.जुना ध्वज ब्रिटिशांच्या परकीय सत्तेचा आणि आपल्या पारतंत्र्याची आठवण देणारा ध्वज होता.तो ध्वज बदलून भारतीय नविक दलाचा जो नवीन ध्वज तयार करण्यात आला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची छटा वापरण्यात आली आहे. त्याचे प्रयोजन सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की भारतीय नविक दलाचे आरमाराचे  जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.त्यांचा आदर्श घेण्यासाठी आणि त्यांनी घडविलेक्या पराक्रमाच्या इतिहासातून प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना हा नवा ध्वज समर्पित करीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केलेल्या भाषणात सांगितले होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृढविश्वास आहे.  मुंबईत चौत्यभूमी लगत च्या इंदूमिल ची जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय  स्मारकासाठी मिळवून देण्यात मोदींनी तत्परता दाखविली. लंडन मधील हेन्री रोड वरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्या लोकार्पण सोहळ्यास पंतप्रधानांसोबत मीही उपस्थित होतो.दिल्लीतील 26अलीपुर रोड ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाणभूमी आहे. तिथे संविधानाच्या आकारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर भव्य स्मारक मोदींनी उभारले आहे. दिल्लीतील 15 जनपथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभारण्यात आले आहे. भीमजन्मभूमी महू मध्यप्रदेश; रत्नागिरी आंबडवे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक;इंदूमिल येथे उभारण्यात येणारे स्मारक व तेथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा उंच स्टॅच्यु ऑफ ईक्वालिटी चा पुतळा  ही पंचतीर्थे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पक नेतृत्वाच्या संकल्पनेतून साकारली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मूल्यांची पूजा करणारे संविधनाला मानणारे लोकनेते राष्ट्रनेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळविल्या नंतर सर्व खासदारांसमोर संसदेत सर्वप्रथम संविधानाला नतमस्तक होत अभिवादन केले होते.  विरोधकांनी कितीही आरोप केले तरी आपल्या कृतीतून त्यांना जबरी उत्तर देत आपल्या कर्तृत्व सिद्ध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतात आणि विश्वात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यांच्या समोर विरोधी पक्षाचा एक ही नेता त्यांच्या नेतृत्वाच्या  उंची समोर टिकाव धरू शकत नाही.

नवीन संसद भवनाच्या निर्मिती चे काम वेगाने होत असून त्यात उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच लोकार्पण केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विचार देशाने स्वीकारले असते आपला  देश आणखी पुढे असता याचीखंत व्यक्त करून मोदींनी देशाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इतिहासाची आठवण मनात ठेऊन त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आहे.

फाळणी च्या काळात तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास देशासमोर उभा करताना सरदार वल्लभभाई  पटेल यांचा जगतिल सर्वाधिक उंचीचा पुतळा गुजरात मध्ये नर्मदा नदीजवळ  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उभारला आहे. ऐतिहासिक महापुरुषांचा वारसा  पंतप्रधान मोदी देशाला देत असताना स्वतः एक नवा इतिहास घडवीत जात आहेत. 2014 पासून ते देशाचे पंतप्रधान झाले असून जनतेने त्यांच्यावर अतूट प्रेम केले आहे. देशभर लोकप्रियता सतत कायम असताना जगात ही त्यांची अव्वल जागतिक नेते म्हणून लोकप्रियता आहे. 2014 पासून भारतात मोदी युग सुरू झाले असून सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करणारे आणि सर्वांचा विश्वास जिंकणारे हे मोदी युग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी ते गुजरात चे मुख्यमंत्री होते तेंव्हापासून ओळखत आहे. गुजरात चे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी तथागत भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती आहे.  भारत नेपाळ संबंध दृढ करताना पंतप्रधानांनी बुद्धजन्मभूमी लुम्बिनी लाही भेट दिली आहे. जगभर भारत एक विकसित राष्ट्र म्हणून आपला एक दबदबा निर्माण करीत आहे. मोदींच्या दूरदृष्टीतून आपले पराष्ट्रधोरण यशस्वी होताना दिसत आहे.

जगभर होत असलेल्या  अलिम्पिक सारख्या क्रीडास्पर्धांमध्ये आता भारताचे क्रीडापटू सुवर्ण; रजत ; कांस्य पदक जिंकत आहेत. पदक जिंकण्याची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील एक मोलमजुरी करणारा वीटभट्टी कामगारांचा मुलगा अविनाश साबळे हा अडथळ्यांच्या  स्टीपल चेस  शर्यतीत कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सिल्वर  मेडल जिंकू शकला. क्रीडापटूबद्दल  विशेष  लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचे हे फलित आहे.

जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवून जम्मू काश्मीर मध्ये नवा इतिहास घडवून देशातील अन्य राज्यांशी जम्मू काश्मीर ची नाळ जोडली. जम्मू काश्मीर मध्ये देशातील कोणत्याही राज्यातील माणूस जाऊन तिथे आपला उद्योग व्यवसाय उभारू शकतो. तसेच मुस्लिम महिलांना न्याय देणारा तीन तलाक चा कायदा रद्द करून नवा इतिहास मोदींनी घडविला आहे.  देशातील अपंगांना दिव्यांग शब्द देऊन दिव्यांगांबद्दल विविध योजना राबवून त्यांना सक्षम करणारे; ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबविणारे; सामाजिक न्याय मंत्रालयाचा बजेट 13 हजार 134 कोटी इतका असून सामाजिक न्यायाची जाण असणारे राष्ट्रनेते नरेंद्र मोदी आहेत.

पंतप्रधान आवास योजनेद्वारे बेघरांना घर; ग्रामीण भागातील  गृहिणींची  चुलीच्या धुराच्या त्रासातून सुटका करण्यासाठी   मोफत सिलेंडर  देणारी उज्ज्वला  योजना देशात लोकप्रिय झाली. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करीत आहेत.  शेवटच्या माणसाला न्याय मिळावा  अंत्योदयाचे उद्दिष्ट्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.कोरोनाच्या महमारीत त्यांनी  ताळेबंदी लावून लाखो लोकांचे जीव वाचवून मोदी हे देवदूत ठरले आहेत.

इतिहास घडविणारे  राष्ट्रनेता लोकनेता विश्व नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 72 व्या वाढदिववानिमित हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो. त्यांच्या नेतृत्वात भारत जागतिक महासत्ता होवो हीच शुभेच्छा!

(लेखक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत)