घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशिवसेनाप्रमुखांचे आठवले रूप...

शिवसेनाप्रमुखांचे आठवले रूप…

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणाचे सध्या जे काही तीन तेरा वाजले आहेत, अशा स्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कडक आवाज देणारा कुणी नेता सध्या महाराष्ट्राला हवा आहे, अशी लोकभावना दिसून येत आहे. सत्तेवर असलेली तिघाडी आणि विरोधात असलेला भाजप यांच्यामध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांचा जो काही

कलगीतुरा सुरू आहे, अशा वेळी कुणीतरी उभा राहावा आणि दोन खडे बोल सुनवावेत, अशी एक भावना होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरून ठाकरी भाषेत जे तडफदार भाषण केले, त्यात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ओजस्वीपणा दिसून आला. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला भाजपच्या समर्थनाची किनार म्हणण्यापेक्षा समर्थनाचा पदर होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण मागील काही काळ राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत असत, पण पुढे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काही नेत्यांबरोबर राज ठाकरे यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर मात्र राज ठाकरे भाजपविषयी बरेच मवाळ झाले.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांना ईडीची नोटीसही आली होती. काहीही असो पण राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बाणा धारण करून काही मूलभूत मुद्यांना हात घातला आहे. जशी वाटचाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची झाली तशीच राज ठाकरे यांची होताना दिसत आहे. खरे तर राज ठाकरे हे शिवाजी पार्कवरून बोलत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत असाच भास होतो, पण आता हा भास न राहता तो त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. शिवसेनेमध्ये आपली घुसमट होत आहे, असे सांगून राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला.

या पक्षाला सुरुवातीला चांगले यश मिळाले, पण पुढे मात्र पक्षाची निवडणुकीतील स्थिती खालावत गेली. सभांना तर प्रचंड गर्दी तसेच राज ठाकरे यांचे भाषण सुरू असेल तर टीव्ही चॅनेलवाले अन्य काहीही लावत नाहीत. कारण त्यावेळी टीआरपी सगळ्यात जास्त असतो. म्हणजे राज यांचे भाषण मोठ्या संख्येने लोक पाहत आणि ऐकत असतात, पण इतकी मोठी लोकप्रियता मिळालेली असताना निवडणुकीच्या राजकारणात मनसेला अपयश येते, पण आजच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा विचार केला तर पुढील काळात मनसेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नेत्यामुळे संघटना उभी राहत असते. मनसेकडे राज ठाकरे यांच्यासारखा मजबूत नेता आहे. त्यामुळे आज नही तो कल मिल जाएगा फल, असेच मनसेबाबत म्हणावे लागेल. त्याला तशी कारणेही आहेत. कारण शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रिपद मिळवले, पण त्यांनी त्यांच्या मतदारांच्या भावनेला तडा दिला आहे. कारण आपण मतं कुणाला दिली होती आणि सरकार कुणाचे आले, असा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आले, पण विश्वासार्हता गेली अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शिवसेनेच्या पालखीचे भोई होण्याचे जे मान्य केलेले आहे, त्यात त्यांना काही आनंद वाटत आहे अशातला भाग नाही. ती त्यांची राजकीय गरज आहे, पण शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन त्यांनी हळूहळू आपला प्रभाव कसा वाढेल याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. जसा काळ पुढे पुढे सरकेल तसे शिवसेनेच्या लक्षात येईल की, मुख्यमंत्रिपद तर आपल्या हाती आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबतच्या सहकारी पक्षांनी घेतलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेत असल्यामुळे शिवसेनेला काही गोष्टीवर ठाम भूमिका घेता येत नाही. खरे तर शिवसेना ही मूलत: मराठी माणसांची संघटना आहे. त्यांनी परप्रांतीयांना कितीही जवळ घेतले तरी त्यांना मते देणारा हा इथला सर्वसामान्य मराठी माणूस असतो. शिवसेनेने अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून आपले नशीब आजमावून पाहिले, पण त्यांना तिथे अपयश आले.

फार दूरचे जाऊ द्या, बाजूच्या गोव्यातही शिवसेनेला आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत शिवसेनेकडे सत्ता असली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा करत असतात. राष्ट्रवादीवाले न बोलता पक्ष विस्ताराचे आपले काम करत असतात. त्यामुळे पुढे जेव्हा विधानसभा निवडणुका होतील, तेव्हा शिवसेनेची काय अवस्था असेल, असा प्रश्न आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्यामुळे त्यांना मराठी माणसांचे मुद्दे ताकदीने लावून धरता येत नाहीत. ती जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती राज ठाकरे आणि त्यांची मनसे भरून काढत आहे. बरेचदा असे होते की, जे विषय मनसे अगोदर घेते तेच विषय शिवसेना मागाहून घेते. म्हणजे मनसे हे शिवसेनेचे इंजिन आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. राज ठाकरे यांनी मदरशांमध्ये, मशिदींमध्ये कुठली सामुग्री ठेवलेली आहे, तसेच मशिदींवरील भोंगे उतरविले नाही, तर आम्ही मशिदींसमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावू, असे म्हटले आहे.

भाजपने त्यांच्या या भूमिकेला समर्थन दिले आहे. याच वेळी मुस्लिमांसाठी आक्रमक भूमिका घेणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका, असे आदेश त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुसलमान रस्त्यांवर नमाज पढून रस्ते अडवतात म्हणून आम्ही रस्त्यावर उभे राहून महाआरत्या म्हणू अशी भूमिका शिवसेनेने काही वर्षांपूर्वी घेतली होती, पण महाआरत्या मागे पडल्या, नमाज अजून सुरूच आहेत. तसेच भोंगे हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. कारण प्रार्थनेला विरोध नाही, पण इतक्या जोरात भोंगे वाजवून प्रार्थना करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न अनेक विचारशील लोक उपस्थित करत असतात. हा विषय अगदी न्यायालयांपर्यंतही गेलेला आहे, पण भारतामध्ये अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतांचा विचार करून असे प्रश्न कधीच सोडवले जात नाहीत. कारण अनेकांची ती राजकीय गरज असते. राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार का, हा सध्या चर्चेचा विषय आहे, पण भाजपला बहुमताची आशा आहे. त्यामुळे पुढे काय होणार हा सगळा गुंतागुंतीचा विषय आहे, पण राज यांच्या निमित्ताने बाळासाहेबांचा अवतार शिवाजी पार्कवर दिसला, हे मान्य करण्यावाचून पर्याय नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -