घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोरोनाच्या सामन्यात प्लाझ्मा बाद

कोरोनाच्या सामन्यात प्लाझ्मा बाद

Subscribe

ज्या प्लाझ्मासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: तासनतास रांगांमध्ये उभे होते, वनवन फिरत होते त्या प्लाझ्मा थेरपीला अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने कोरोनाच्या उपचार पद्धतीतून बाद ठरवले. प्लाझ्मानंतर आता रेमडेसिवीर इंजेक्शनलाही उपचारांच्या प्रोटोकॉलमधून हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या दोन्ही बाबी कोरोनावर उपचार करण्यात परिणामकारक ठरत नसल्याचा निष्कर्ष आयसीएमआरने काढलाय. हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणायचे की आजतागायत प्लाझ्मा आणि रेमडेसिवीरसाठी घडवून आणलेले आर्थिक गणित म्हणायचे? प्लाझ्मा आणि रेमडेसिवीरचा उपचारासाठी उपयोग नव्हता तर आजवर त्यासाठी झालेेले ‘महाभारत’ मुद्दाम घडवले गेले का? की यामागे मेडिकल इंडस्ट्रीचा हात होता? हे आणि असे असंख्य प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्लाझ्माच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास या उपचार पद्धतीचा उपयोग कोरोना काळातच केला गेला असे नाही. १९१८-१९ ला जो स्पॅनिश फ्लूची साथ आली होती त्यावेळी या पद्धतीचा प्रभावी वापर केला गेला. त्यावेळी या पद्धतीचे निकाल सकारात्मक आले होते.

त्यानंतर स्वाईन फ्लू, सार्ससारख्या आजारांसाठीही या पद्धतीचा वापर केला गेला. मात्र, एबोलोमध्ये ती फारशी परिणामकारक ठरली नाही. त्यानंतर आता कोरोना काळातही तिच्या परिणामकारकतेवर शंका घेतली गेली. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने अवघ्या १० रुग्णांचे निरीक्षण नोंदवले होते. या १० रुग्णांना प्लाझ्मा दिल्यावर ते लवकर बरे झाले. आजारानंतर १४ दिवसांच्या आत या उपचार पद्धतीचा फायदा होतो, असे निरीक्षणही विद्यापीठाने नोंदवले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नेचर नावाच्या जर्नलमध्ये प्लाझ्माचे गोडवे गायले गेले. ३९ रुग्णांचे निरीक्षण त्यांनी यात नोंदवले. ज्यांना प्लाझ्मा दिला त्यांच्यात १४ दिवसानंतर ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले दिसले नाही. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले होते. गेल्यावर्षी अमेरिकेतील मेयो क्लिनिकने ३५ हजार कोरोना रुग्णांचे निरीक्षण नोंदवले होते. जे रुग्ण आयसीयूत दाखल आहेत त्यांना आजार झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत प्लाझ्मा दिला तर मृत्यूदर हा ८.७ टक्के इतका बघायला मिळाला. त्यानंतर प्लाझ्मा दिल्यास मृत्यूदरात वाढ होऊन तो ११.९ टक्यांपर्यंत पोहोचला. अर्थात हे केवळ निरीक्षण होते.

- Advertisement -

प्लाझ्मा दिलेले रुग्ण आणि प्लाझ्मा न दिलेले रुग्ण अशी जर त्यावेळी तुलना केली असती तर त्यातून शास्त्रीय तथ्य पुढे आले असते. मेयो क्लिनिकच्या या निरीक्षणांच्या आधारे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकीय खेळी केली. एफडीएवर त्यांनी टीकास्त्र सोडत आता निवडणुकांनंतरच प्लाझ्मा थेरपीला मान्यता देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. ट्रम्प यांच्या थयथयाटाच्या आहारी नेहमीच जाणारी अमेरिकन व्यवस्था त्या काळातही घाबरुन गेली आणि त्याची परिणती म्हणजे एफडीएने घाईगर्दीने प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली. आता अमेरिकेने मान्यता दिल्यावर भारतातील केंद्रातील मेंढरांनी त्याचे अनुकरण केले आणि पुढचा-मागचा विचार न करता या थेरपीला मान्यता देऊन ते मोकळे झाले. प्रारंभी केंद्र सरकारने या थेरपीला मान्यता दिली. दिल्ली आणि कर्नाटकात असंख्य रुग्ण या थेरपीने बरे होत असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या थेरपीला डोक्यावर घेतले. कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी १ मे २०२० ला केला होता. १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत असल्याचा दावा त्यांनी २ जुलै २०२० ला झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये ही थेरपी नक्की काय आहे आणि तिची उपयुक्तता किती आहे याची महती पटवून दिले.

राजकीय पातळीवर प्लाझ्मा थेरपीला राजाश्रय मिळाल्याने तिचा वापर वाढला हे आता स्पष्टच झाले आहे. ही थेरपी नक्की कसे काम करते हे समजून घेणेही गरजेचे आहे. खरे तर, प्रत्येक विषाणू हा बहुरुपी आहे. रुप बदलण्याच्या प्रक्रियेलाच म्युटेशन असे म्हटले जाते. जीवशास्त्रज्ञांच्या मते, प्लाझ्मा थेरपीमुळे विषाणूंमध्ये म्युटेशन होणे शक्य आहे. प्लाझ्मामधील अँटीबॉडीज रुग्णाच्या शरीरातील विषाणूंवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. विषाणूही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. अँटीबॉडीजने विषाणूला मारले नाही तर तो आपले रूप बदलतो आणि सटकतो. याला एस्केप म्युटेशन म्हणतात. भारतात आढळून आलेले E484Q आणि L452R ही दोन्ही एस्केप म्युटेशन म्हणून ओळखली जातात. या म्युटेशनला रोगप्रतिकारकशक्ती ओळखत नसल्याने, संसर्ग पसरतो असे तज्ज्ञ सांगतात. प्लाझ्मा दान केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा कमकुवत असेल किंवा त्यात चांगल्या अँटीबॉडी नसतील तर, रुग्णाच्या शरीरातील विषाणू पूर्ण मरणार नाहीत. अशावेळी विषाणूंत म्युटेशन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्लाझ्मा वापरतानाही त्याच्या चाचण्या झाल्या असत्या तर परिणाम कदाचित वेगळे आले असते. परंतु या सर्व जर-तरच्या गोष्टी झाल्या.

- Advertisement -

अचानक अवतरलेल्या कोरोनाने वैद्यकीय क्षेत्राला खात्रीशीर संशोधन करायला पुरेसा वेळच दिला नाही. त्यातून केवळ निरीक्षणांच्या आधारे प्लाझ्मा थेरपीसारखी एखादी थेरपी वापरली गेली. या थेरपीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने नोव्हेंबर २०२० मध्येच आक्षेप घेतला होता. ‘प्लाझ्मा थेरपी’ चा अनियंत्रित वापर योग्य नसल्याची सूचना त्यांनी त्यावेळी केली होती. परंतु रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या आरोग्य विभागाने या सूचनेचा त्यावेळी विचारच केला नाही. चीन आणि नेदरलँडमध्येही ‘प्लाझ्मा थेरपी’ चा फायदा होतो याचे पुरावे मिळाले नाहीत. या थेरपीमुळे कोविडचे वेगवेगळे प्रचंड घातक स्ट्रेन्स निर्माण होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. या थेरपीमुळे कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याचे जगप्रसिद्ध जर्नल लान्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले. या सर्व अभ्यासांचा विचार करुन अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने कोरोनाच्या उपचार पद्धतीतून बाद ठरवले. त्याचप्रमाणे आता रेमडेसिवीर इंजेक्शनलाही उपचाराच्या प्रोटोकॉलमधून बाद ठरवण्याचा विचार सुरु झाला आहे.

या इंजेक्शनची निर्मिती कर्करोगग्रस्त रुग्णांकरिता करण्यात आली आहे. कर्करोगासाठी या इंजेक्शनचा जितका परिणाम झाला तितका कोरोनावर झाला नाही, असा दावा आता केला जातोय. परंतु कोरोनावर ज्यांनी प्रत्यक्षात उपचार केले त्यांचे मत मात्र पूर्णत: वेगळे आहे. रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट असंख्य असतील. पण कोरोनाचे रुग्ण वाचवण्यात या इंजेक्शनने महत्वाची भूमिका बजावलीय हे नाकारुन चालणार नाही, असे सांगणारा एक मोठा मतप्रवाह आहे. रेमडेसिवीरची साठेबाजी आणि उपलब्धता याचाच विचार करुन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जाते. अर्थात औषध कंपन्यांतील अंतर्गत स्पर्धाही या बंदीला पोषक ठरणारी आहे. रेमडेसिवीरच्याच धाटणीचे आणखी काही औषधे तिसर्‍या लाटेसाठी सज्ज आहे. या औषधांचे मार्केट रेमडेसिवीर हटल्यास खुले होऊ शकते. म्हणूनच काही मंडळींना हाताशी धरुन रेमडेसिवीरचे कांड करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची शंका येते. कोरोनाच्या या दीर्घकाळ चाललेल्या कसोटी सामन्यात प्लाझ्माचा त्रिफळा उडवण्यात आलाय. रेमडेसिवीरलाही धावबाद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण नेहमीच प्रेक्षकांच्या भूमिकेत असलेला सर्वसामान्य माणूस यात भरडला जातोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -