घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमैत्रीबंध...गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा...!

मैत्रीबंध…गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा…!

Subscribe

आमचं बालपण साधारण १९७५ ते १९८५ या काळातलं. त्यावेळी मध्य मुंबईतील गिरणगाव-काळाचौकी परिसरातील शिवाजी विद्यालय या नामांकित शाळेत जाणारे आम्ही सारे. शिक्षकवर्गाने जो भक्कम पाया घालून दिला त्यावर आज आम्ही सारे समर्थपणे उभे आहोत. त्या काळी दूरदर्शन हा एकच पर्याय उपलब्ध असल्याने किलबिल, (आणि आमच्या संयमाची परीक्षा पाहणारा व्यत्यय!), गजरा असे कार्यक्रम पाहत मोठी झालेली आमचीपिढी). आमच्यापैकी काहीजण संता कुकडी देखील भक्तीभावाने पाहात असत!) नाही म्हणायला अधूनमधून भारताच्या क्रिकेट संघाचे सामने (आणि विशेष आकर्षण टेलिमॅच! ) पाहायला मिळत. शाळेच्या वर्गात, मैदानात, पाण्याच्या टाकीवर, जिथे मिळेल तिथे खेळणे हा तर आमचा स्थायी भाव.

- Advertisement -

इयत्ता चौथीपर्यंत मुलामुलींची शाळा एकत्रच भरे. पाचवीनंतर मात्र ती वेगवेगळी भरू लागली. त्यामुळे काही अपवाद वगळता मुलं आणि मुली असे दोन गट तयार झाले. नववी, दहावीत मिसरूड फुटताना हळूहळू स्वत्वाची जाणीव झालेले आमच्यातील काहीजण मग मधल्या सुट्टीत ‘जनसंपर्क’ वाढवण्यासाठी कन्या शाळेभोवती व्यवस्थित केस विंचरून, फेस पावडर लावून घिरट्या घालत. अर्थात, ते एक सहज सुंदर कुतूहल होतं. दहावी झाल्यानंतर, आमच्यापैकी बरेच जण तसे जवळपासच राहत असल्याने अधूनमधून एकमेकांना भेटत असू. कालांतराने शिक्षणासाठी म्हणा अथवा राहत्या जागा बदलल्याने हळूहळू दिसणं भेटणं कमी झालं. काहीजण उच्च शिक्षणासाठी तर काहीजण नोकरी व्यवसायानिमित्त विखुरले गेले. १९८५ ते २०१२ पर्यंत जसजसा काळ पुढे सरकला तसतश्या भेटीगाठीही कमी होत गेल्या. शिक्षण पूर्ण होऊन सर्वजण विवाहबंधनातही अडकले. आता प्रत्येकाच्या प्रायॉरिटीज बदलल्या होत्या. काहीजण करिअर या शब्दाने झपाटलेले होते.

तसे आम्ही छोट्या छोट्या सहलींसाठी वर्षाकाठी एकत्र येत होतो. पण एखाद वेळेसच. छोटा ग्रुप एकत्र आला की पुन्हा सर्वांनी जमावे याची चर्चा होत असे. पण ती कल्पना प्रत्यक्षात काही उतरत नव्हती. आपल्यापैकी बरेच जण प्रश्नांचा विचार करतात आणि एखादाच उत्तरावर काम करतो.

- Advertisement -

आमचा सुनील…. हा म्हणजे असा की, फक्त आमच्याच नाही तर इतर वर्गातील मुलामुलींची नावं वडिलांच्या नावासकट तोंडपाठ असलेला एन्सायक्लोपीडिया. तर, फेसपावडर लावणारांच्या मदतीला सुनीलने फेसबुक आणलं! ज्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता त्यांना फेसबुकच्या माध्यमातून शोधून काढलं. झालं…आता तारीख, वार, वेळ ठरली. दिनांक २/०९/२०१२ रोजी काळाचौकी येथल्या अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या सभागृहात रियुनियनचा कार्यक्रम ठरला. बरीचशी मुलं मुली आमच्या गोकर्णबाई, शिरसाट बाई, जाधव बाई, पार्टेबाई, बोडये बाई, भालेरावसर, टिळवेमॅडम, ढोंबेमॅडम, कडू मॅडम या गुरूजनांना भेटलो. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केलं. आदरणीय शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पुन्हा एकदा पॉझ… पण थोडासाच…

आता व्हॉट्सॅप नावाचं नवंच समाज माध्यम हाताशी आलेलं असल्याने आपापले ग्रुप स्थापन करून व्हर्च्युअल भेटीगाठी चालू झाल्या. मुलं शिवाजी ८५ या नावाच्या ग्रुपवर धिंगाणा घालू लागली तर एव्हरग्रीन गर्ल्स नावाने मुलींचा ग्रुपही तिकडे किलबिल करू लागला. छोटेखानी गेट टुगेदर्स, सहली होतच होत्या… पण अर्थात वेगवेगळ्या…. प्रत्येक सहलीत शाळू मित्रांच्या चर्चा होत असत. रवी आणि नीना या दोघांच्या पुढाकाराने मग दोन विखुरलेले गट एकत्र आले, त्याचं ‘मधली सुट्टी’ असं नामकरण करण्यात आलं. मग काय बालपणीच्या त्या मित्र मैत्रिणींच्या कुटुंबांच्या छायाचित्रांतून एकमेकांना ओळखणे सुरू झाले. दोन तपांपेक्षाही जास्त कालावधी लोटला होता.

आता संदेशांची देवाणघेवाण होऊ लागली. एकंदरीत छान चाललं होतं सगळं.

आणि मग कोरोना आणि त्या अनुषंगाने आलेलं लॉकडाऊन. आपली कामं ऑनलाईन करण्याची आलेली नवीन जबाबदारी. कधीही न थांबणाऱ्या मुंबापुरीत ह्या नव्या दिनचर्येशी जुळवून घेण्याचं शिवधनुष्य आम्ही सर्वांनी लीलया तर पेललंच, पण त्याबरोबरच स्वतःमधल्या सुप्त गुणांना उभारी देण्याची प्रत्येक संधीही घेतली. ग्रुपमधील अॅक्टिव्हिटीजना अगदी उधाण आलं होतं. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती आमच्या ग्रुपलासुद्धा लागू आहे.

गायकनट प्रशांत, पाककला, गायन, काव्य, अभियांत्रिकी ते अध्यात्म या सर्व प्रांतात मुशाफिरी करणारा अवधूत, आदर्श शिक्षिका गायिका लेखिका आणि अभिनेत्री गीता, गायिका योगगुरू आणि चित्रकार नीना यांनी आपापल्या सादरीकरणाने वातावरण अगदी भारून टाकलं. आपल्या खुमासदार शैलीने वृत्तलेख लिहिणारा संतूवाणी हा तर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याला गणेशने साथ द्यायला सुरुवात केली.

गणितातील कोड्यांची जलद आणि अचूक उत्तरं देणारा इंजिनिअर कम शिक्षक प्रसाद, एखाद्या वृत्ताचे (कि वृत्तीचे?) अभंग आणि दोहे वापरून पुणेरी शैलीत विश्लेषण करणारा संजय धुमाळ, त्याच्या तांत्रिक बाजूची उकल करणारा विनायक तर मानसिक बाजू प्रामाणिकपणे मांडणारा वरिष्ठ पोलिस अधिकारी रवी हे सर्वच अनेक नाण्यांच्या अनेक बाजू विशद करीत असतात.

चौथीनंतर शाळा सोडून नाशिकला गेलेला आणि मग थेट मधल्या सुट्टीत अवतरलेला अभिजित, लंडनमधल्या टेकडीवरून टेहळणी करून कुठल्याही विषयावर निःपक्षपाती मत देणारा विलास प्रभू तर कॉर्पोरेटमंत्र पेरणारा महेश.. जोडीस समस्त सरकारी यंत्रणांचा प्रतिनिधी प्रेमळमाऊली वसंतराव…ही सर्व क्षेत्रे कमी आहेत की काय म्हणून फॅशन डिझायनर माधवी आणि नृत्यगायन क्षेत्रात करीयर करू शकतील अशी सर्व माणसे ज्याच्या घरात आहेत तो लाघवी अभय, मधल्या सुट्टीत ज्याच्यातला रानकवी जागृत झाला तो आमचा दयानंद…

कुशाग्र बुद्धीमत्ता लाभलेली पूर्वीची अबोल, पण आता आमूलाग्र बदललेली, योगवर्ग घेणारी डॉ. राजश्री आणि प्रत्येक गेट टुगेदरला आणि सहलीला आवर्जून हजेरी लावणारा, आशयपूर्ण मेसेजेस पोस्ट करणारा आमचा टॉपर विनायक…..

धावती भेट देणारा निद्रिस्त ज्वालामुखी सुरेश आणि धूमकेतूसारखा उगवून सर्वकाही आलबेल असल्याची खात्री करून घेत पुन्हा सुप्तावस्थेत जाणारा शैलेश कोल्हटकर, नियमितपणे पोस्ट करणारा संजय कलव, प्रेमळ समिता आणि वैशाली, योग्य वेळी कोपरखळी देणाऱ्या किर्ती आणि नेत्रा, निकेता, डॉ. स्वप्ना, अनिता, वंदना, वर्षा वायंगणकर, संध्या, सीमा, स्मिता, सायली, उर्दू ‘शेरखान’ प्रदीप, विलास काळे, विजय, दीपक, कोकणचा नरेश, नवी मुंबईचा अनिल, शीघ्रकवी समीर ही सर्व मंडळी आमचा ग्रुप चालता बोलता ठेवतात.

लॉकडाउनच्या काळात जर वर्क-फ्रॉम-होम होऊ शकतं तर गेट-टुगेदर-फ्रॉम-होम का नाही होऊ शकत? अशी कल्पना आमच्या क्वालिटी पर्फेक्शनिस्ट डॉ. राजश्री आणि विनोद यांच्या डोक्यात आली. सोशल गॅदरींग विथ सोशल डिस्टन्सिंग! सध्या ऑनलाईन मिटींग्ज आणि वेबिनार्स ह्या गोष्टी नवीन नाहीत पण आमच्यापैकी सर्वांच्या सरावाच्याही नाहीत. शाळूसोबती भेटणार म्हणून बरेचजण तयार झाले. सर्वांना एकत्र आणून नियोजनाचं काम पाहणाऱ्या विनोदची चांगलीच कसरत झाली खरी, पण आपला इतक्या वर्षांचा अनुभव पणास लावून त्याने ती चांगली निभावून नेली. हल्ली कॅलेंडरमधील वारांना फारसं महत्व राहिलेलं नाही, तरी आपल्या लाडक्या रविवाराला सर्वांची पसंती मिळाली, आणि २४ मे, २०२० ला दुपारी दोनचा मूहूर्त ठरला ऑनलाईन स्नेहसंमेलनाचा!

रविवारच्या जेवणावर ताव मारून सगळे तयार! आज काही दुपारची झोप येणार नव्हती. ऑनलाईन गेट टुगेदरचं एक बरं असतं, स्थळ-काळाचं बंधन नसतं, फक्त इंटरनेट…बस्स! साक्षात पुणेकरसुद्धा नियम मोडून ऑनलाईन येणार होते. विलायतेहून प्रभू येणार होते, नाशिक, डोंबिवली, ठाणे, मुलूंड, अंधेरी, बोरिवली, काळाचौकी येथून मंडळी येणार होती. हे व्हर्च्युअल गेट टुगेदर अगदी ग्लोबल होणार होतं.

दुपारचे दोन वाजले आणि मोबाईल्स आणि लॅपटॉप्सच्या स्क्रीनवर एकामागून एक चेहरे प्रकट होऊ लागले. काहीजण सराईतपणे वावरत होते, तर काही बुजल्यासारखे. काहीजण तर एकमेकांना पंचवीस तीस वर्षांनंतर भेटत होते. त्यामुळे थोडीशी अनामिक हुरहुर होतीच. पण हे सुरूवातीची पंधरा वीस मिनिटंच.

वर्गात नेहमी वरचा नंबर पटकावणाऱ्या विनयने सुरेल सरस्वती स्तवनाने सुरुवात केली आणि मग दिलखुलास गप्पा सुरू झाल्या. अनेक आठवणी जाग्या झाल्या, एकमेकांच्या नव्याने ओळखी झाल्या. प्रथमच हजेरी लावणाऱ्या, एका नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्या असलेल्या डॉ. वर्षा शाहचा प्रवास मनात अभिमानाची भावना जागवून गेला.

वसंत, मनोहर, विनायक, विनोद, डॉ. राजश्री यांनीही आपापल्या आयुष्याचा प्रवास उलगडला. त्याचबरोबर प्रत्येकाच्या व्यावसायिक अनुभवांचा ग्रुपमधील इतरांना किंवा एकंदरीतच समाजाला कसा लाभ करून देता येईल यावरही चर्चा झाली.

मग गीता, नीना, प्रशांत, अवधूत, गणेश आणि प्रसाद यांची गाणीही झाली. हास्यविनोदांत वेळ कसा जात होता हे कळत नव्हतं आणि हे व्हर्च्युअल गेटटुगेदर संपूच नये असंही वाटत होतं. अगदी संपता संपता आलेल्या निकिताची उपस्थिती सर्वांना सुखावून गेली, पण लॉकडाऊनमधील अत्यावश्यक सेवेतील कामांमुळे उशीर झाल्याने कर्तव्यतत्पर अभियंता विकास चव्हाण सहभागी होऊ न शकल्याची चुटपुटही लागून राहिली.

आणि हो, सुशिल, प्रकाश, संतोष एम्., सावंत वितु, अनंत, परशुराम, शैका, नितीन हे देखील त्यांच्या अत्यावश्यक सेवाकार्यातून वेळ काढून पुढच्या व्हर्च्युअल गेट टुगेदरला भेटतील हीच अपेक्षा! काहीजण लौकर शाळा बदलून दुसरीकडे गेलेले होते.. काहीजण नंतरच्या काळात शाळेत आलेले होते. पण ह्या व्हर्च्युअल गेट टुगेदरनंतर everyone had a feeling, that I always belonged here! पडद्यावरील स्नेहसंमेलन तर झालं, पण आता वेध लागलेत प्रत्यक्ष भेटीचे…गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा… हेच खरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -