घरफिचर्सव्यक्तीचित्रण, एक अभिव्यक्ती

व्यक्तीचित्रण, एक अभिव्यक्ती

Subscribe

चित्रकलेची किंवा कुठल्याही कलेची व्याख्या विद्यापीठांतून शिकवली जात नाही. ती शिकता येत नाही. मीही तसा कधी प्रयत्न केला नाही. कला ही सराव आणि रियाजातून उलगडत जाते. जसा की समुद्र किंवा अंतराळ ज्याचा थांग लागत नसतो. कला ही अशीच असते. खोल आणि गडद, मग किरकोळ शब्दांच्या व्याख्येत ती मावणार कशी ? त्यावेळी केवळ एकच पर्याय कलाकारापुढे उरतो. कलेला शक्य तेवढं समजून घेण्याचा. त्याच्या असीम अंतराळात स्वतःला हरवण्याचा. मीही तेच करतो. चित्र किंवा रंगकला हळूहळू उलगडत जाते. पण ती कधीच संपत नसते. त्यामुळेच त्यात शोध असतो, औत्सुक्य, कुतूहल आणि नाविन्य असतं. जी थांबते ती कला असूच शकत नाही. माझी कलाही अशीच आहे.

निसर्ग, वस्तू, गूढवाद चित्रकलेचे असे अनेक प्रकार असतात. मला त्यातलं व्यक्तीचित्रण जास्त भावतं. मानवी देहाचं आकर्षण तीन पातळीवर असतं. एक भौतिक जे की लैंगिकतेमध्ये अनेकदा मोडलं जातं. दुसरं मानसिक आणि तिसरं वस्तुनिष्ठ…मानवी व्यक्तीचित्रे रेखाटणार्‍यांना या तीनही पातळ्यांचा एकाच वेळेस विचार करावा लागतो. चित्रकलेच्या अभ्यासात मानवी आकृतीबंध शिकता येतो. पण मानवी संवेदना, मनाचं चित्रण व्यक्तीचित्रातही टाळता येत नाही. बालपण, तारुण्य, वार्ध्यक्य मानवी जगण्याच्या बदलत्या काळात देहबोली आणि देहाच्या आकृतीबंधात फरक पडत जातो. व्यक्तीचित्रे रेखाटणार्‍यांना हा जगण्याच्या अनुभवातला फरक लक्षात घेणं गरजेचं असतं. माझी कला याच फरकातून आलेल्या मानवी चेहर्‍यापलिकडच्या संवेदनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. चित्रकला हे दृष्य माध्यम आहे. त्यामुळे चित्रकाराला माणसांच्या मानवी जगण्याचा अनुभव प्रत्येक वेळेस ध्यानात घ्यावाच लागतो. माणसं अनुभवातूनच घडत जातात. उलगडत जातात, हे घडणं आणि उलगडणं रंग आणि रेषेत जेवढं पकडता येईल. तिथे व्यक्ती चित्र तेवढं यशस्वी होतं.

- Advertisement -

माणसांचा आकृतीबंध जरी सारखाच असला तरी प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं. ज्याचं त्याचं अनुभवविश्व असतं. त्यातून तो घडत जातो. म्हणजेच दूरच्या गावाहून पंढरीच्या वारीत आलेल्या एखाद्या जुन्या जाणत्या साधारण ६० ते ६५ वर्षे वयाच्या वारकर्‍याच्या चेहर्‍यावर माऊलींच्या भेटीची ओढ स्पष्ट होत असते. ही ओढ रंगातून कॅनव्हॉसवर आहे तशीच उतरवण्याची किमया जिथे जेवढ्या प्रमाणात साध्य केली जाते. तिथे व्यक्ती चित्रही तेवढंच यशस्वी होतं. लहान मुलांचा चेहरा, देहबोली निरागस असते. त्यांची नैसर्गिक शरीरचना कलेच्या अभ्यासात शिकवली जातेच. मात्र, ही निरागसता अभ्यासण्यासाठी कुंचल्यासोबतच लहानग्यांच्या अनुभवविश्वाची शिदोरी महत्वाची असते. मानवी देहाचा अभ्यास हा वेगळा भाग असतो आणि देहबोली वेगळी. यातला फरक समजणं व्यक्तीचित्रणासाठी आवश्यक असतं. आपण जेव्हा हसतो, आश्चर्यचकीत होतो. तेव्हा आपल्या भुवया उंचावल्या जातात. बुब्बुळं मोठी होतात. हा अभ्यास शिकवला जातो. मात्र, हसण्याची संवेदना अनुभवातून समृद्ध होत जाते. कलाकारासाठी ही गोष्टही तेवढीच महत्वाची असते. चित्रे काढण्यासाठी मानवी सौंदर्याची मर्यादा असते. हा गैरसमज असल्याचं मला वाटतं. प्रत्येक देह बोलत असतोच. त्यामुळे मानवी देहाच्या सौंदर्याची कुठलीही परिभाषा करता येत नसते. जिथं अशी मर्यादा पडते तिथं चित्रकला नसते. वैविध्य मानवाच्या देहात नसतं. इथून तिथून सगळी माणसं सारखीच असतात. मात्र त्यांच्या परंपरा, जगण्याची पद्धत, अनुभव यातलं वेगळेपण आणि त्यातून आलेले त्यांच्या चेहर्‍याचे भाव तेवढ्याच ताकदीने कॅनव्हॉसवर उतरवणं हे व्यक्ती चित्रकलेचे गमक असल्याचं मला जाणवतं.

म्हणूनच कुठल्याही माणसाचे किंवा महिलेचे, लहान मुलाचे, बाळाचे, तरुण-तरुणींची चित्रे वेगवेगळीच असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये न्यूड मॉडेल कॅनव्हॉसवर रेखाटलं जात असताना माणसांना वाचण्याची ही सवय उपयोगी पडते. कलाकार जो असे मॉडेल कॅनव्हॉसवर रंगातून उतरवत असतो त्याचे भाव, त्याचे अनुभवविश्व आणि संबंधित मॉडेलची रंगछटा, त्यावर पडलेला प्रकाश, त्याची तात्पुरती असलेली ठेवण या गोष्टी सर्व कलाकारांसाठी सारख्याच असतात. मात्र, देहबोलीतून उलगडणारे रंग वेगवेगळे असू शकतात. एकाच मॉडेलचे चित्र अनेक कलाकार वेगवेळ्या पद्धतीने कॅनव्हॉसवर उतरवतात यात कमालीचे आणि आश्चर्यकारक वैविध्य असते. कारण प्रत्येक कलाकाराचे अनुभवविश्व वेगळे असते.वॉटर कलर्स, स्केचिंग आणि खडू, चित्रकलेसाठी ही साधने मला नेहमीच आवडतात. पण त्यातही ऑईल पेंटचे माध्यम मला जास्त आवडतं. रंगसंगती किंवा रंगमिश्रणातील वैविध्य यातून जास्त साध्य केले जातं असा मला वाटतं. चित्रकलेसाठी पेन्सिल हे माध्यम महत्वाचं आहेच. लहान मुलांना आपण भिंतीवर वेड्यावाकड्या रेषा काढताना पाहतो. त्यामुळेच चित्रकलेची सुरुवात खरतर रेषांनीच होते. व्यक्ती चित्रातील बारिक कामासाठी पेन्सिलची खूप मदत होते आणि शिवाय पेन्सिल सहज उपलब्ध होते. या पेन्सिल रेखाटन विषयावरच माझं पहिलं पुस्तक आहे. रेखाटनातून आलेले अनुभव मी माझ्या तीनही पुस्तकात लिहले आहेत. आपल्याकडे चित्रकलेची माहिती देणारी किंवा मोठ्या चित्रकारांचे अनुभव सांगणारी पुस्तके कमी आहेत. जी पुस्तके प्रामुख्याने चित्रकलेच्या अभ्यासाठी उपलब्ध केली जातात ती पुस्तके बहुतांशी परदेशातील चित्रकार लेखकांची आहेत. जे. जे. मध्ये यापैकी बहुतेक पुस्तकं अभ्यासायला मिळाली.

- Advertisement -

कलाकार हा संवेदनशील असावा लागतो, असं म्हटलं जातं. चित्रकलाही त्याला अपवाद नाही. आणि मानवी व्यक्ती चित्रे काढणारे तर संवेदनशीलतेपासून दूर असूच शकत नाहीत. पृथ्वीवरील भारताच्या असलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे संस्कृती आणि आचरणातील वैविध्यामुळे भारतात वेगवेगळ्या रंगांची, वर्णाची माणसं आढळतात. त्यामुळेच परदेशातील चित्रकारांनाही भारतातील माणसांना कॅनव्हॉसवर रंगवणं आवडतं. फिगरेटीव्ह पेंटिग्ज शिकत असताना जेजे तल्या पदवीच्या अखेरच्या वर्षात माझ्या प्रबंधाचा विषय स्केचिंग-द प्युअरेस्ट फॉम ऑफ आर्ट असा होता. यालाच पुढे मी पुस्तकरुप दिलं. रंगांपेक्षा रेखाटनं मला जास्त आवडतात. चित्र पाहून एखादा संदेश जातोय किंवा पाहाणार्‍याला त्याच्याशी समरस होता येतंय किंवा त्याच्या मनात संवेदनांचे तरंग उमटत असतील तर चित्र यशस्वी झाल्याचं मला वाटतं. चित्र पाहणार्याची ही समरसता जेवढी जास्त चित्र तेवढंच यशस्वी होतं. भारतातल्या मानवी चेहर्‍यांमध्ये कमालीचे वेगळेपण पाहायला मिळते. त्वचेचा रंग गडद असतो. मानवी देह हासुद्धा निसर्गाचाच सुंदर अविष्कार असल्याचं मला वाटतं. त्यामुळे निसर्गचित्र हे मानवी देहापेक्षा वेगळं नसावं.

मानवी संवेदनांचे उगमस्थान म्हणून मी मानवी देहाकडे पाहतो. यात लैंगिकता आड येत नसते. एखाद्या डॉक्टरसाठी जसा मानवी नग्न देह हा एक सब्जेक्ट असतो. तसा चित्रकारासाठीही हा विषय तेवढाच असतो. मलाही मानवी नग्नता हा विषय त्यासाठीच महत्वाचा वाटतो. चित्र पाहाणार्‍याच्या मनातले विचार, अनुभूती आणि संवेदनेनुसार चित्रकाराच्या चित्रांबद्दल संबंधितांकडून त्यानुसार मत व्यक्त केले जाऊ शकते. यात चित्रकाराचा विषय नसतो. आपल्या समाजातील ग्ननतेच्या बिघडलेल्या व्याख्येवर हा दोष येऊ शकतो. त्याबाबत चित्रकाराचा नाईलाज असतो मात्र हा नाईलाईलाजही प्रामाणिक असावा लागतो. कुठल्याही कलेमध्ये संवेदनशीलता आवश्यक असते. आणि स्वच्छ संवेदनासाठी मनाचा प्रमाणिकपणा गरजेचा असतो. हा प्रामाणिकपणा कलेच्या कुठल्याही विद्यापीठात शिकवला जात नाही. मात्र, त्यासाठी पूरक वातावरण दिलं जातं. त्यातून चित्रकाराचा अनुभव विकसित होत जातो. त्यासाठी कलाकाराला आधी स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असणं खूप आवश्यक असतं.


-तुषार मोलेश्वरी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -