घरफिचर्सधार्मिक उन्माद आणि मतांचा खेळ!

धार्मिक उन्माद आणि मतांचा खेळ!

Subscribe

2014 साली बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपला पाच वर्षांनी पुन्हा तोच जादूचा प्रयोग होईल, याची खात्री नाही. यामुळे 2019 च्या निवडणुकांना सामोरे जाताना काय करावे आणि काय करू नये, यासाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा टीम ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, बजरंग दल, भाजयुमोच्या खेळांना आता सुरुवात झाली आहे. ’हर हिंदू की पुकार, पहले मंदीर फिर सरकार…’ असा शिवसेनेच्या नथीतून तीर मारत राम मंदिरासाठी आरत्या ओवाळून झाल्या. अयोध्येत शिवसेना उतरली आणि वातावरण भगवेमय झाले! श्रीराम पुन्हा जन्माला आले आणि समस्त हिंदू पावन झाला… राम जन्मला ग बाई राम जन्मला, असा शरयू किनारी पाळणाही म्हणून झाला. ठरल्याप्रमाणे अयोध्या स्वारी करून उद्धव ठाकरे आणि सैन्य मायदेशी परतल्यानंतर साधू संत अयोध्येत मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनीही आवाज दिला : जय श्रीराम. गेल्या दोन आठवड्यात धर्माच्या या उन्मादात मंदिराची एक वीटही रचली गेली नाही, हे वास्तव समोर आल्याने आता हिंदूंना तापवण्यासाठी करायचे काय? हा प्रश्न हिंदूंच्या ठेकेदारांसमोर आ वासून उभा असताना या आठवड्यात गोहत्येच्या नावाखाली बुलंदशहर प्रकरण पेटवण्यात आले. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक उन्माद आणि मतांचा खेळ आता सुरू आहे. जशी निवडणूक तोंडासमोर येईल तसा या खेळाला गडद रंग देण्यात येईल…

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा जिंकल्याने 2014मध्ये भाजपचे केंद्रातील बहुमताचे सरकार होऊ शकले. मात्र 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. त्यात सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कैराना लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे 2014च्या निवडणुकीपूर्वी जसे ’मुज्जफरनगर’ आणि मध्यंतरी ’कैराना’ घडवले गेले

तसे आता ’बुलंदशहर’ घडवून आणलं जात आहे का? असा सवाल या निमित्ताने उभा राहतो. गोहत्येचे ’संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित खेळ समोर येत आहे, असे आम्ही नाही शिवसेनेचे मुखपत्र सामना म्हणत आहे. आहे की नाही गंमत. आम्ही भाजपबरोबर सत्तेत राहणार, पण सत्तेची शेज न सोडता सतत टीका करून शिवसेना वेगळी कशी काय आहे, हा रोज तोच खेळ दाखवणार. भाजप शिवसेनेचे छान चाललंय…

- Advertisement -

मंत्रालयात एके दिवशी भाजपचे आमदार आणि पत्रकार मित्र अनिल गोटे भेटले होते. स्वतः एकेकाळी पत्रकारिता केल्याने गोटे यांना पत्रकारांसोबत चहा घेत मनमोकळ्या गप्पा मारायला आवडतात. माणूस बिनधास्त असल्याने मनात एक आणि पोटात एक असा काही प्रकार नाही. मला अजूनही वाटते की आभाळ कोसळो की वणवा पेटो पोटातले कधी ओटावर न आणणार्‍या भाजपच्या कंपूत हा माणूस कसा काय स्थिरावला? धुळे निवडणुकांच्या तोंडावर त्याचा शेवटी स्फोट झालाच. गोटे यांनी भाजपच्या छुप्या राजकारणाचे कपडे व्यवस्थित भर बाजारात फाडले! याच गोटे यांना दोन वर्षांपूर्वी एकदा विचारले होते : केंद्रात भाजप सत्तेवर येण्याचे कितपत चान्सेस आहेत. यावर ते पटकन सांगून गेले : निवडणुका तोंडावर येऊ दे, मग बघा कसा खेळाला रंग येतो. नरेंद्र मोदी यांच्या पोतडीत 2019 च्या निवडणुकीसाठी अनेक जादूचे खेळ आहेत. संमोहनाने भारावून टाकतील ते भारतीय मतदारांना. ते आता दिसायला लागले आहे. दृष्य आणि अदृष्य स्वरूपात!
उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात झालेला प्रकार पाहता सत्ताधार्‍यांना विकासाचे की दंगलीचे राजकारण करायचे आहे? असा प्रश्न उभा राहतो.

तेथील हिंसाचारात सुबोध कुमार सिंह या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या हत्येच्या कटात विहिंप, बजरंग दल आणि भाजयुमोच्या सदस्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुबोध कुमार सिंह हे दादरी हिंसाचाराचे तपास अधिकारीही होते. या हिंसाचाराच्या सूत्रधाराचे नावही समोर आले आहे. योगश राज असे त्याचे नाव असून तो बजरंग दलाचा संयोजक आहे. उपस्थित लोकांना भडकवण्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुबोध सिंह यांच्या हत्येच्या कटात योगेश राज (जिल्हा अध्यक्ष, प्रवीण तोगडिया ग्रुप), उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावे समोर आली आहेत.

हिंसाचारात शहीद झालेल्या सुधोब कुमार यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय त्यांच्या मनात संतापही आहे. गोहत्येवरून उसळलेल्या दादरी हिंसाचार प्रकरणाचा तपास करणार्‍या सुबोधकुमार यांचा या निमित्ताने काटा तर काढण्यात आला नाही ना? असे संशयाचे भूत या पोलीस अधिकार्‍याच्या कटुंबाच्या मानगुटीवर कायम बसणार आहे आणि मुख्य म्हणजे हे कुटुंब हिंदू समाजापासून कायमचे दूर जाणार आहे. राजकारणाच्या या अंधाधुंदीत आपलीच माणसे आपल्याच माणसांना मारणार असतील तर माणुसकीच्या ठिकर्‍या उडाल्या आहेत, हेच वास्तव समोर येते. असे वातावरण म्हणजे निःशब्द रात्रीच्या अंधारात वणव्यात उभे राहण्यासारखे आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुलंद शहरातील हिंसाचारावर दु:ख व्यक्त करत पोलीन निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या पत्नीला 40 लाख रुपये आणि आई-वडिलांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली खरी,पण या कुटुंबाच्या आणि पर्यायाने लोकशाहीत शांतपणे जगू पाहणार्‍या लोकांच्या मनातील भयाचे वातावरण कमी होणार नाही. उलट ते वाढत जाईल!

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका शेतात कथित गोहत्या झाली असून एका विशिष्ट समाजातील लोकांनी गोहत्या केली आहे, अशी अफवा पसरवण्यात आली आणि अफवा पसरल्यानंतर लोकांनी गोवंशाचे अवशेष घेऊन रस्ता अडवला. पाहता पाहता गर्दी वाढली. शेकडो लोक विरोध-आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जमाव आणखीच भडकला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे जमावाचा क्षोभ आणखीच वाढला. थोड्याच वेळात तिथे गोळीबार झाला. यात सुबोध कुमार आणि आणखी एक तरुणी जखमी झाला. सुबोध कुमार यांना रुग्णालयात नेण्यासही जमावाने रोखलं. शिवाय त्यांच्या कारवर तुफान दगडफेकही केली. शेवटी सुबोध कुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असली तरी आता यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही.

विश्वास तरी कसा बसावा पाहा : निवडणुकांपूर्वी कट्टरपंथीय ओवेसी बंधुंची एमआयएम आणि डॉ. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ यांची युती होणे, राम मंदिरासाठी शिवसेनेने चांदीची वीट घेऊन अयोध्येला धाव घेणे आणि आता ज्या राज्यातून बहुमताचे सरकार येऊ शकते तेथे धार्मिक द्वेषाच्या नावाखाली दंगली घडवून आणणे, हे काय प्रकार आहेत. हा सर्व धर्माच्या नावाखाली मते मिळवण्याचा प्रकार नाही, तर दुसरे काय आहे? भारतीयांची स्मरणशक्ती कमजोर आहे. ते सरकारने दिलेली आश्वासने विसरतात, याचा फायदा आधी काँग्रेसने घेतला होता आणि आता तोच जुना खेळ भाजपने 2014 पासून सुरू केला आहे. धर्माचे नाही आम्ही विकासाचे राजकारण करणार असे सांगून सत्तेवर आलेल्या मोदी आणि कंपनीने विकास कमी आणि असुरक्षित वातावरण अधिक पसरवले आहे. शहरांमधील गरगर फिरणार्‍या पंख्याखाली बसून, रात्री झोपताना एसी चालू करून, विकेंडला दोन दिवस दे धमाल करून आणि मतदानादिवशी पिकनिकला जाणार्‍यांना याची कल्पना येणार नाही. पण 60 टक्के भारतीय जनता ज्या गावकुसांमध्ये राहते तेथे असुरक्षितता काय असते, त्याची भयानता शब्दांच्या पलीकडची आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रोळी येथे एका कार्यक्रमात बोलताना सुरक्षिततेची हीच भीती व्यक्त केली. निवडणुकांपूर्वी देशात दंगली होऊ शकतात, असे त्यांना त्यांच्या दिल्लीतील मित्राने सांगितल्याचे ते म्हणाले. आधी मोदी प्रेमात बुडालेले राज हे आता खडबडून जागे झाले असून वास्तव आणि मायाजाल यातील फरक ते सांगत आहे. लोकशाहीत असा कडक बोलणारा नेता हवाच. पण, यात आताचा वरचा सूर आणि सातत्य हवे, अन्यथा कमी होत गेलेला विश्वास आता कुठे बसतोय असे वाटत असताना तो पुन्हा गायब झाला नाही म्हणजे मिळवली. असो.

राज यांना उत्तर देताना शिवसेना चाणक्य संजय राऊत यांनी राज यांनी दंगल होणार असल्याचे पुरावे पोलिसांना द्यावेत, असा राजकीय टोला मारला खरा. पण यातून मुख्य मुद्दा सुटत नाही, त्याचे काय करायचे? दंगलीपूर्वी असे काही कोणी पुरावे जमा करत असतो का. हा वातावरणाचा एक अंदाज असतो आणि त्या दृष्टीने तपास होणे गरजेचे असते. पण सत्ता ज्याच्या हातात आहे आणि त्यांना ती पुन्हा मिळवायची आहे, ते आपल्याला पोषक वातावरण कसे काय गमावू देतील, याचे उत्तर राज यांना टोला मारताना राऊत यांनी दिले असते तर बरे झाले असते. पण, चलो अयोध्या, असे उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरवण्याएवढे ते सोपे नाही.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -