घरफिचर्ससारांश...आणि चंद्र हसला!

…आणि चंद्र हसला!

Subscribe

मनातील हळूवार भावना व्यक्त करताना बहुतांश कवी आणि कवियत्रींनी ‘चंद्रा’चा वापर केला आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे चांद्रयान -३ याच हळूवारपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. भारताने अंतराळ क्षेत्रात ‘सुवर्ण इतिहास’ घडवला... आणि त्या ‘सुवर्ण क्षणा’चे साक्षीदार केवळ चंद्रच नव्हे तर, संपूर्ण जगच होते. हे यश म्हणजे अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या अभ्यासातील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.

–मनोज जोशी

तारीख ७ सप्टेंबर, २०१९… भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटे झाली होती… चंद्रभूमीपासून केवळ २.१ किलोमीटर उंचीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला… भारतीयांसह देशभरातील खगोलप्रेमी दु:खी झाले, तर भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला… पण इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे दु:ख कवटाळून बसली नाही. ‘जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग…,’ असे भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे. इस्रोच्या संशोधकांनी हेच केले. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत २३ ऑगस्ट २०२३ रोजी इतिहास घडविला. ही साधीसुधी भरारी नव्हती तर, गरुड भरारी ठरली.

- Advertisement -

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-३’चे १४ जुलै २०२३ रोजी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपण झाले. त्यानंतर यशस्वीपणे मार्गक्रमण करत या यानाने महत्त्वाचे सर्व महत्त्वाचे टप्पे यशस्वीरीत्या पार केले आणि अखेर बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लॅण्डरने सॉफ्ट लॅण्डिंग केले आणि चंद्रावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला. भारताचे नाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांत कोरले गेले. कारण, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. आधीच्या मोहिमांतील चुका यावेळी इस्रोने टाळल्या होत्या. उलट आणखी सुधारणाही केल्या.

पावणेसहाच्या सुमारास विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही सेकंद शिल्लक असताना तमाम भारतीयांची आणि खगोलप्रेमींची धडधड वाढली. हात एकमेकांमध्ये गुंफले गेले आणि परमेश्वराचा धावा होऊ लागला. समोर असेल त्या माध्यमातून प्रत्येकजण ‘याची देही याची डोळा’ हा ऐतिहासिक क्षण मनामनात साठवत होता. चंद्रावर पाय रोवण्याचा इतिहास घडवताना इस्रोच्या लाइव्ह स्ट्रीमिंगनेही नवीन विक्रम प्रस्थापित केला. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी ८.०६ दशलक्ष लोकांनी पाहिले. आतापर्यंत यूट्यूबवर ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याच्या विक्रमाची नोंद होती. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग सव्वासहा दशलक्ष लोकांनी एकाच वेळी पाहिले होते.

- Advertisement -

याआधी २००८ मध्ये भारताने आपली पहिली चांद्रयान मोहीम राबविली. हे यान जवळपास वर्षभर सक्रिय होते. या यशामुळे चंद्रावर पोहोचणारा भारत हा पृथ्वीतलावरील चौथा देश ठरला. अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तित जाऊन भारत बसला. या मोहिमेत चंद्रावर बर्फ असल्याचे आढळले होते. यामुळेच चार देशांमध्ये भारताची चांद्रमोहीम त्यावेळी उजवी ठरली. मंगळयान मोहिमेचेही कौतुक याचसाठी आहे. मंगळयान मोहीम नोव्हेंबर २०१३ साली सुरू झाली आणि सप्टेंबर २०१४ साली मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. फक्त सहा महिन्यांसाठी असलेले हे यान तब्बल आठ वर्षं कार्यरत होते. या काळात मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो आणि डेटा पृथ्वीवर पाठवले.

तसे पाहिले तर, खगोलशास्त्रात भारतीयांचा अभ्यास अतिप्राचीन काळापासून आहे. त्यावेळी विश्वाचे दोनच भाग मानले जात असत. पृथ्वी आणि आकाश. दिवस व महिना यांचे मापदंड म्हणून सूर्य व चंद्र समजले जात असल्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यावेळी रात्रीच्या वेळी भ्रमंती करताना किंवा नदी, सागरातून प्रवास करताना तार्‍यांची मदत घेतली जात असे. यातूनच तार्‍यांचे महत्त्व अधोरेखित झाले. अशा प्रकारे भारतीयांचे लक्ष सूर्य-चंद्र-तारे यांच्याकडेच होते. परिणामी, पूर्वी दळणवळण आणि ज्ञानाच्या देवघेवीची माध्यमे फारसी नसल्याने ज्योतिषविषयक भारतीय दृष्टिकोन स्वतंत्रपणे विकसित झाला.

अतिप्राचीन भारतीय वाङ्मय म्हणजे वेद आहेत. यामध्ये ज्योतिषशास्त्राद्वारे खोगलशास्त्रीय माहिती काही प्रमाणात उपलब्ध झाली. या काळामध्ये पृथ्वीचे निराधारत्व तसेच गोलत्व, दिवस, पंधरवडा, चांद्रमास, अधिकमास, सौरवर्ष इत्यादींसंबंधी उल्लेख आढळतात. विशेष म्हणजे, हा इ.स.पू. १५०० पूर्वीचा काळ आहे. सहाव्या शतकातील आर्यभट (पहिले) यांनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते हा सिद्धांत मांडला. त्यांनी लिहिलेल्या आर्यभटीय या ग्रंथात कालगणना व ग्रहांची मध्यम-स्पष्ट गती यांची माहिती आहे. सूर्यापासून ग्रहांची अंतरे, ग्रहणे वर्तविण्याची रीत याचाही उल्लेख आहे. बाराव्या शतकातील भास्कराचार्यांनी पृथ्वीचे अक्षीय भ्रमण व कक्षीय भ्रमण सांगतानाच राहू-केतू राक्षस नाहीत आणि चंद्र स्वयंप्रकाशित नाही, हा दावादेखील केला आहे. भारतीयांप्रमाणेच ग्रीक तत्त्ववेत्त्यांचेही खगोलशास्त्रामध्ये विशेष योगदान राहिले आहे.

या अभ्यासाला विज्ञानाची जोड नसल्याने ग्रहमंडळाबाबत काही तर्क मांडले गेले होते. विज्ञानाच्या प्रगतीनंतर अनेक तर्क वास्तवतेच्या कसोटीवर खरे उतरले नाहीत. गुरू, शुक्र, शनी, मंगळ व बुध हे पाच ग्रह गोलाकार असून ते पृथ्वीभोवती वर्तुळाकृती कक्षेत फिरतात. तसेच संपूर्ण तारामंडळ पूर्व-पश्चिम दिशेत २४ तासांत एक फेरी पूर्ण करते, हे तर्क त्यापैकीच आहेत. पण कालांतराने याला विज्ञानाची जोड मिळाल्यानंतर हे भ्रम दूर झाला आणि अंतराळातील एक-एक रहस्ये समोर आली. १५ ऑगस्ट १९६९ साली स्थापन झालेल्या इस्रोने खगोलशास्त्रातील भारतीयांचे योगदान द्विगुणीत केले.

हे यश दिसते तितके सहजसाध्य नव्हते. चंद्रावर पोहोचण्यासाठी जेवढा अभ्यास महत्त्वाचा होता, तेवढीच इस्रोचा इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर होता. स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून १९५७ मध्ये रशियाने संपूर्ण जगास अवकाश क्षेत्र संशोधनासाठी खुले केले. रशिया हा भारताचा जवळचा मित्र असल्याने त्याच्यापासून स्फूर्ती घेत भारतानेदेखील त्या दिशेने पाऊल टाकले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने १९६२ मध्ये भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना करण्यात आली आणि विक्रम साराभाई हे त्याचे अध्यक्ष होते.

होमी भाभा यांच्या सक्रिय पाठिंब्याने विक्रम साराभाई यांनी १९६३ मध्ये देशातील पहिले रॉकेट लाँचिंग सेंटर तिरुवनंतपूरमजवळ (त्रिवेंद्रम) अरबी समुद्रकिनार्‍यावरील थुंबा या ठिकाणी उभारले. हे ठिकाण विषुववृत्ताच्या बरेच जवळ असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली. १ नोव्हेंबर १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारतातून पहिले रॉकेट यशस्वी रीतीने अवकाशात पाठविले. १९६५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय अवकाश सुविधा म्हणून या केंद्राला मान्यता दिली. त्यानंतर चार वर्षांतच भारतीय अंतराळ संशोधनाने कात टाकली. त्यामुळे १५ ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीचीचे नामकरण ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्त्रो) करण्यात आले. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली रॉकेटचे सुटे भाग सायकलवरून आणून डॉ. कलाम आणि त्यांचे सहकारी त्यांची जुळवणी करत असत. तेव्हापासून आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक मैलाचे दगड या संस्थेने प्रस्थापित केले.

भारताने आपल्यातील झोकून देण्याची वृत्ती, चिकाटी आणि कठोर मेहनतीबरोबरच सखोल अभ्यास वेळोवेळी दाखवून दिला आहे. जिथे-जिथे भारताला गृहीत धरले गेले, तिथे-तिथे भारताने इतिहास घडवला आहे. इंग्लंडमध्ये १९८३ मध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्याचे उदाहरण देता येईल. या सामन्यामध्ये भारताकडून कोणालाच अपेक्षा नव्हत्या. तो उत्तम खेळ करेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण भारतीय खेळाडूंची सांघिक कामगिरी, त्यांच्या मेहनतीचे हे फळ होते. याच स्पर्धेत कपिल देवने तडाखेबंद १७५ धावांची खेळी केली. दुर्दैवाने बीबीसीच्या संपामुळे त्या सामन्याचे प्रक्षेपण होऊ शकले नाही, त्यामुळे ही ऐतिहासिक खेळी व्हिडीओच्या स्वरुपात उपलब्ध नाही. पण त्याची चर्चा आजही आहे.

पोखरण येथील अणूचाचणीबद्दलही हेच म्हणता येईल. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणूबॉम्ब चाचणी केली होती. हा बॉम्ब पूर्णपणे भारतीय बनावटीचा होता आणि या चाचणीत भाभा अणूसंशोधन केंद्राचे संशोधक सहभागी झाले होते. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या मोहिमेला ‘स्मायलिंग बुद्धा’ म्हणजेच ‘बुद्ध हसला’ असे सांकेतिक नाव होते. दुसरी अण्वस्त्र चाचणी मे १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या काळात करण्यात आली. त्यावेळी ‘…आणि बुद्ध हसला’ हे पुन्हा चर्चेत आले. यानंतरच भारत आण्विकशक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आला. हा चमत्कार नक्कीच नव्हे. ही भारतीयांची मेहनत, झोकून देण्याची वृत्ती हेच भारताच्या यशाचे गमक आहे.
बालपणी प्रभू श्रीरामाने चंद्रासाठी हट्ट केला होता. त्यावेळी त्यांचे मंत्री सुमंत यांनी त्यांना चंद्राचे प्रतिबिंब दाखविले. ते पाहून श्रीरामाच्या मुखावर हास्य उमलले, अशी कथा आहे. आता भारताने पहिला प्रयत्न फसल्यानंतरही खचून न जाता अवघ्या चार वर्षांत पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होऊन दाखवले. हे प्रतिबिंब नव्हे, म्हणूनच म्हणता येईल, ‘…आणि चंद्र हसला!’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -