घरफिचर्ससारांशसमाजमाध्यमांची स्वैर घुसखोरी!

समाजमाध्यमांची स्वैर घुसखोरी!

Subscribe

अलीकडे यू ट्यूब, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांवर व्यक्त होणे खूप सोपे झाले आहे. त्यासाठी रोज एक दीड, दोन जीबीचा डाटा आपल्या हाती असतो आणि त्याचे पैसे आगाऊ भरलेले असल्याने कोणाच्याही व्यक्त होण्यावर कोणतीच मर्यादा अथवा त्यावर आर्थिक व्यय नसल्याने ही माध्यमे सर्वार्थाने मुक्त आहेत. कदाचित ही परिस्थिती अशीच राहिली आणि यातून सामाजिक तेढ वाढत गेल्यास आपण ज्या पोस्ट करतो त्यावर काही नियंत्रण सेन्सॉर नसल्याने नजीकच्या काळात याबाबत काही नियम, बंधने येण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही. कारण राजकीय दृष्टीने तर ही सर्वांचीच डोकेदुखी झालेली आहे. खासगीत सर्वच राजकारणी याची चर्चा करतात. कारण या माध्यमाने आता माणसांचे खासगीपणच संपुष्टात आणले आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते राजकीय नेते, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना या माध्यमांनी ग्रासले आहे.

–डॉ. अशोक लिंबेकर

एकविसावे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे आणि माध्यम क्रांतीचे शतक म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील प्रगतीमुळे आज संपूर्ण समाज या माध्यमाने प्रभावित आणि संकुचित बनत चालला आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर माणसाच्या हातात आलेली ही माध्यमे प्रारंभी कुतूहलाचा, औत्सुक्याचा विषय ठरली. गरज, क्रांती, प्रगती म्हणून या परिवर्तनाचा समाजाने गौरवच केला, परंतु हीच माध्यमे आज कुटुंबाची, समाजाची आणि पर्यायाने राष्ट्रासाठीही डोकेदुखी ठरत आहेत. यावर काही बंधने आणि स्वनियंत्रण घालता आले नाही तर माध्यमांची ही स्वैर हाताळणी आणि त्याचा विघातक, आत्मकेंद्री वापर वाढलेला दिसतोय. अलीकडेच महाराष्ट्रातील समाजिक, वैचारिक, धार्मिक वातावरण या माध्यमातून अत्यंत गढूळ झालेले आपण पाहत आहोत. क्रिया-प्रतिक्रियांचा भडिमार आणि त्यातून होणारे संघर्ष हे नित्याचेच झाले आहेत. यातून अनेक जवळची माणसे दुरावत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणे व्यक्त होणे नाही.

- Advertisement -

आपल्याकडे खंडन-मंडनाची खूप मोठी परंपरा आहे, परंतु प्रागतिक आणि प्रतिगामी अशा दोन्ही स्तरांतील व्यक्ती हे विसरून आज जे वाक्युद्ध लढवत आहेत ते खूपच किळसवाणे आहे. अलीकडे यू ट्यूब, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांवर व्यक्त होणे खूप सोपे झाले आहे. त्यासाठी रोज एक दीड, दोन जीबीचा डाटा आपल्या हाती असतो आणि त्याचे पैसे आगाऊ भरलेले असल्याने कोणाच्याही व्यक्त होण्यावर कोणतीच मर्यादा अथवा त्यावर आर्थिक व्यय नसल्याने ही माध्यमे सर्वार्थाने मुक्त आहेत. कदाचित ही परिस्थिती अशीच राहिली आणि यातून सामाजिक तेढ वाढत गेल्यास आपण ज्या पोस्ट करतो त्यावर काही नियंत्रण सेन्सॉर नसल्याने नजीकच्या काळात याबाबत काही नियम, बंधने येण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही. कारण राजकीय दृष्टीने तर ही सर्वांचीच डोकेदुखी झालेली आहे. खासगीत सर्वच राजकारणी याची चर्चा करतात. कारण या माध्यमाने आता माणसांचे खासगीपणच संपुष्टात आणले आहे.

अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते राजकीय नेते, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना या माध्यमांनी ग्रासले आहे. आता प्रत्येक जण आपली बाजू, समर्थन, विरोध या माध्यमातून व्यक्त करताना दिसतोय, परंतु या व्यक्त होण्यात संयमाऐवजी प्रचंड विखार आपणास दिसून येतो. यातून जातीय, धार्मिक, वंशीय ध्रुवीकरण वाढताना दिसतेय. हे एकसंध राष्ट्रासाठी प्रचंड घातक आहे. राष्ट्रपुरुषांबद्दलचे, संतांबद्दलचे, समाजसुधारकांबद्दलच्या मागील काही दिवसांतील क्रिया-प्रतिक्रिया पाहिल्या असता कोणत्याही संवेदनक्षम माणसाला ही माध्यमे आता प्रचंड स्फोटक वाटू लागली आहेत. कदाचित पुढील सामाजिक विघटन आणि विखंडित लोकमानसाचे हे महत्त्वाचे कारण ठरणार आहे अशी भीती आता वाटू लागलीय. माणूस आता इतका निबर बनत चाललाय की गेंड्यालाही लाज वाटावी. मला येथे यासंदर्भात सुमती लांडे यांची एक कविता आठवतेय, त्या म्हणतात…

- Advertisement -

गेंड्याची कातडी टणक असते,
तिला काहीही टोचत नाही, बोचत नाही,
असं ऐकलं होतं, असेल, नसेल म्हणून सोडून दिलं होतं.
सर्कशीतला गेंडा हरवला आहे. एका वृत्तपत्रात वाचलं.
रात्री दारावर टकटक झाली, दार उघडलं तर समोर
मान खाली घालून गेंडाच उभा ना,
वाटलं बिच्चारा मुका प्राणी,
कशाला आला हा इथं, काय हवं याला?
गेंडा चक्क उत्तरला, तुमची कातडी द्या दोस्त,
आमची मऊ झाली, तुमचा हेवा वाटतो,

तुम्हाला कशी सवय झाली….या कवितेत आजच्या काळाचे सारे सार आणि वास्तविकता सामावलेली आहे. माणूस इतका बोथट होईल असे वाटले नव्हते. त्याचे मन, शरीर, भावना, सारेच इतके टंक झालेय की यात माणूसपण कुठे शोधायचे. यासाठी पुन्हा एखाद्या बुद्धाचीच गरज आता वाटू लागलीय. वाढत्या व्यक्तिवादी आणि बेगडी, निबिड सामाजिक अंधारातून वाटचाल करायची असेल तर आपले माणूसपण शाबूत राहणे कोणत्याही काळात आवश्यकच ना, परंतु संवादाच्या अतिरिक्त सुविधेतूनच माणूस संवाद हरवत चालला, सुसंवाद तर दूरची बात.

ही माध्यमे गरज म्हणून वापरली तर त्याचा विधायक वापर होऊ शकतो, परंतु या माध्यमांच्या आहारी जाणारा समाज स्वकेंद्री बनत आहे. स्वरंजनाचे हे निरर्थक, वेळखाऊ व्यसन अत्यंत घातक आणि मानवी संवेदना, त्याचा विवेक बधिर करणारे आहे. माध्यमांच्या अतिरिक्त आणि बेजबाबदार वापराची ही अविवेकी काजळी मिटली नाही तर नजीकच्या काळात संपूर्ण तरुण पिढी आणि समाजच मानसिकदृष्ठ्या पंगू बनण्याची भीती वाटते. याचे दृश्य परिणाम आज दिसू लागले आहेत. २००० नंतर मात्र ही माध्यमे सर्वांच्या हातात आली. सर्वांना परवडणारी झाली. एक मोठी जागतिक बाजारपेठ आणि समाजाचे मनोविश्व या माध्यमांनी व्यापले आणि समाजाचे चलनवलन या माध्यमांनी बदलून टाकले. माणसा-माणसातील विसंवाद, गैरसमज, सामाजिक दुही, खोट्या माहितीचे, सवंग साहित्याचे प्रसारण आज या माध्यमांनी वाढवलेले दिसते. आज ही माध्यमे अनियंत्रित आणि निरंकुश बनत आहेत. सत्यता, दर्जा, ज्ञान यापासून विलग बनत चाललेली ही माध्यमे मानवी जीवनाला कोणता आकार देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या राज्यघटनेने आपणास अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. तो प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. माध्यम क्रांतीच्या या काळात प्रत्येकाला आपल्या मनातील भावनेला, विचारांना या माध्यमांमुळे एक मोठे जागतिक व्यासपीठ मिळाले ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे, परंतु त्याची दुसरी अविवेकी बाजू मात्र प्रचंड घातक आणि काळीकुट्ट आहे. क्रिया-प्रतिक्रियावादी यांच्यातील अतार्किक, विवेकशून्य संघर्ष उबग आणणाराच वाटतो. भांडवलशाहीमुक्त अर्थव्यवस्थेत या माध्यमामध्येही एक छुपे शीतयुद्ध जाणवते. त्यांच्यात अर्थपूर्ण व्यावहारिक स्पर्धा आहेत.

आजची तरुण आणि किशोरवयीन मुले आणि काही अंशी त्यांचे पालकही या माध्यमांनी ग्रासली आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. कोणताही विचार न करता अत्यंत बेजबाबदारपणे ही माध्यमे वापरली आणि हाताळली जाताना दिसतात. ती कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी वापरावीत याचे कोणतेही भान आणि तारतम्य राहिलेले नाही. या माध्यमांमुळे एक समांतर आभासी जग, आभासी प्रतिसृष्टी निर्माण झाली आहे आणि वास्तवापेक्षाही या काल्पनिक आभासी जगात आजची पिढी रममाण झालेली दिसते. वास्तवापासून असे तुटणे, परात्म होणे हे चित्र भयावह आहे. सकस वाचन, चिंतन, रंजन ही सशक्त लोकमानसाच्या घडणीत असणारे महत्त्वाचे मूलभूत घटक आहेत, परंतु अशा सकस रंजनाकडे आताच्या पिढीचे दूर जाणे भीतिदायकच. याला अपवाद आहेत आणि कोणत्याही काळात ते असतातच, परंतु याचे प्रमाण व्यस्तच आहे. काही दशकांपूर्वी ज्या गोष्टी स्वप्नवत वाटत होत्या त्या या माध्यमांनी सर्वांच्या पुढ्यात आणून ठेवल्या आहेत. याला कोण नियंत्रित करणार? विवेकाशिवाय याला दुसरा मार्ग नाही, परंतु ही विवेकशीलता आता कुठे दिसतेय. आजूबाजूला कोणाला आदर्श मानून पुढे जायचे हा संभ्रम नव्या पिढीच्याही मनात असेलच ना?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -