कॅलेंडर

Subscribe

मी एकदा मुद्दाम हरीच्या खोलीवर चक्कर टाकली. छोटीच खोली होती त्याची आणि भिंतभरून कॅलेंडर्स. त्याच्याशी बोलताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. त्याला ती कॅलेंडर तारीख, वार पाहण्यासाठी मुळी नकोच होती. त्याला ती हवी असायची पोपडे उडालेल्या जुन्या भिंती झाकण्यासाठी, आपलं दारिद्य्र लपविण्यासाठी. कसं आहे ना, जुनं वर्ष सरतं, नवं येतं, आकडे बदलतात, भिंतीवरचं कॅलेंडर पण बदलतं. कोणी भिंतीची शोभा वाढवण्यासाठी नवीन कॅलेंडर घरात आणतात, तर हरीसारखे कोणी आपल्या रंग उडालेल्या भिंती दुसर्‍यांना दिसू नयेत म्हणून.

–सुनील शिरवाडकर

हरी नावाचा एक हरकाम्या आहे. आमच्या इथे बाजारपेठेतच तो काम करतो. कुणा एकाच्या दुकानात नाही. कोणत्याही दुकानदारांचे काहीही काम करतो. कुणाचा निरोप द्यायचा असतो, कुणाचं काही पार्सल नेऊन द्यायचं असतं, नळावरून पाण्याच्या बाटल्या भरून आणायच्या असतात, सगळ्यांना आठवण येते ती हरीची. कामाच्या बदल्यात प्रत्येक जण त्याला थोडे पैसे, कधी नाश्ता देतात. एकटाच राहतो तो. त्यामुळे त्याचं भागून जातं त्यात. कधीही कोणाकडे स्वत:हून काही मागत नाही तो.
डिसेंबर महिन्यात मात्र तो सगळ्या दुकानदारांकडे हक्काने एक वस्तू मागतो, ती वस्तू म्हणजे कॅलेंडर. त्याला कॅलेंडर जमवायचा नाद आहे. आता हल्ली सगळेच दुकानदार काही कॅलेंडर वाटत नाहीत, पण त्यांच्याकडे भेट म्हणून बरीच कॅलेंडर्स आलेली असतात. या एवढ्या कॅलेंडर्सचं काय करायचं, हाही प्रश्न असतोच, मग ते हरीला त्यातलं एखादं कॅलेंडर देऊन टाकतात.
मी एकदा मुद्दाम हरीच्या खोलीवर चक्कर टाकली. छोटीच खोली होती त्याची आणि भिंतभरून कॅलेंडर्स. त्याच्याशी बोलताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. त्याला ती कॅलेंडर तारीख, वार पाहण्यासाठी मुळी नकोच होती. त्याला ती हवी असायची पोपडे उडालेल्या जुन्या भिंती झाकण्यासाठी, आपलं दारिद्य्र लपविण्यासाठी.
मला कससंच झालं. आपल्याला कोणीतरी फुकट कॅलेंडर द्यावं असं प्रत्येकाला वाटतं असतंच, पण असं वाटण्याचं कारण मात्र वेगवेगळं असतं. कोणाला साधं तारीख, वार बघायला हवं असतं, तर कोणाला त्यावर असलेल्या चित्रांसाठी.
एकेकाळी एस. एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल यांची सुंदर सुंदर पेंटिंग्ज कॅलेंडरवर छापली जात असत. लोकांच्या उड्या पडायच्या. त्यावर असलेली देवदेवतांची चित्रे लोक फ्रेम करून घरात लावत असत. अनेक मोठ्या कंपन्या अशी कॅलेंडर्स छापत आणि त्याचे मोफत वाटप करीत असत.
राजा रविवर्मा हा खरंतर या कॅलेंडर आर्टचा जनक. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी त्याने देशातला पहिला लिथोग्राफी प्रेस काढला. एकाहून एक सरस पेंटिंग्ज बनवून त्याने ती स्वत:च्या प्रेसमध्ये छापली. त्याची कॅलेंडर्स काढली. त्याने चितारलेल्या विविध देवदेवतांच्या चित्रांमुळे प्रत्यक्ष देवच जणू सर्वसामान्यांच्या घरात अवतीर्ण झाले.
लोकांना कॅलेंडर विकत घेण्याची सवय लागली ती कालनिर्णय आल्यापासून. याआधी कॅलेंडर घरात आणलं जायचं ते तारीख, वार आणि फारतर त्यावरच्या चित्रांसाठी, पण आता या नवीन कॅलेंडरमध्ये तारीख, वार, पंचांग, जयंती, पुण्यतिथी, चंद्रोदय, सूर्योदय या गोष्टी होत्या. बाजूला लाँड्रीत कपडे टाकल्याच्या तारखा, दूधवाल्याचे, पेपरवाल्याचे हिशोब लिहिण्यासाठी जागा.
काय नव्हतं त्यावर? रेल्वेचं टाईमटेबल होतं, पंचांग होतं, राशीभविष्य, रेसीपीज होत्या, हे करून बघा…ते करून बघा…याशिवाय विविध मान्यवरांचे लेख. अगदी वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून नवोदित लेखकांपर्यंत.
आता तर मार्केटिंग, सेल्स प्रमोशनच्या जमान्यात भेटवस्तू म्हणून नव्या वर्षाची कॅलेंडर्स देण्याची प्रथा चांगलीच रुजली आहे. भिंतीवरची कॅलेंडर्स तर आहेतच, पण टेबल कॅलेंडर, पॉकेट कॅलेंडर, कार कॅलेंडर असे कितीतरी प्रकार निघाले आहेत. एकपानी कॅलेंडरपासून तर अगदी तीनशे पासष्ट पानी ठोकळा कॅलेंडरपर्यंत.
नेहमीच्या दुकानात चहा पावडर आणायला गेलो होतो. त्याने चहासोबत नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात ठेवलं आणि हे सगळं आठवलं. हे कॅलेंडर मी आता आठवणीने हरीला देणार.
कसं आहे ना, जुनं वर्ष सरतं, नवं येतं, आकडे बदलतात, भिंतीवरचं कॅलेंडर पण बदलतं. कोणी भिंतीची शोभा वाढवण्यासाठी नवीन कॅलेंडर घरात आणतात, तर हरीसारखे कोणी आपल्या रंग उडालेल्या भिंती झाकण्यासाठी.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -