अर्धा महाराष्ट्र उपाशी!

यशवंतराव चव्हाण या एकमेव द्रष्ठ्या मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता सारा महाराष्ट्र विकासाच्या कवेत घ्यावा एवढी मोठी झेप बाकीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हती. शरद पवार यांनी ती सुरुवातीला दाखवली. यशवंतराव यांचे मानसपुत्र असणार्‍या पवार यांनाही मोठी दृष्टी आहे, पण सत्तेच्या राजकारणात त्यांनी ती आपसूक कमी केली. कारण ज्या माणसाने कृषी, महिला, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रात भरीव योगदान दिले त्यांना कोकण, मराठवाडा आणि विदर्भ विकसित करण्याचे मोठे मन का दाखवता आले नाही. म्हणूनच अर्धा महाराष्ट्र उपाशी आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली… देशाला दिशा देणार्‍या महाराष्ट्राने वयाची साठी गाठली म्हणजे सहा दशके पूर्ण करून आज आपले हे महा राज्य नव्या उंबरठ्यावर उभे आहे. भूतकाळाकडे मागे वळून बघताना आणि भविष्यावर नजर टाकताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतेय ती म्हणजे कोणी किती बाता मारू दे आज अर्धा महाराष्ट्र उपाशी आहे. विकासाचा चुकीचा अर्थ लावून येथील राज्यकर्त्यांनी लोकांची दिशाभूल केली. कोकण, मराठवाडा आणि विदर्भाची आज काय परिस्थिती आहे हे एकदा डोळ्यासमोरून झरझर पुढे येऊ दे म्हणजे स्वप्न दाखवले गेले पूर्ण भाकरीचे, पण या तीन भागांना अर्धी भाकरीही वाट्याला आली नाही. आली ती जळलेली, करपलेली, कुस्करलेली आणि शिळीपाकी… विदर्भ आणि मराठवाड्यात होणार्‍या आत्महत्यांवर एक नजर टाकूया म्हणजे या करपलेल्या अर्ध्या भाकरीचे आणि उपासमारीचा दाह काळीज चिरून टाकेल.

विदर्भ- मराठवाड्यात माणसे मरतात आणि कोकणात ती का मरत नाहीत म्हणून कुणी स्वतःची पाट थोपटून घेत असेल तर तो एक भास आहे… कारण अख्या कोकणाची मान मुंबईच्या खांद्यावर आहे. हा खांदा मोडला की मान फासावर जायला कितीसा वेळ लागणार आहे तो. घरटी माणूस मुंबईत असून आज तो पुणे आणि गोव्याकडे जगायला सरकला आहे. आहे कुठे विकास. कवी आरती प्रभू म्हणतात तसे: दोन डोळे, दोन काचा, दोन खाचा… प्रश्न कुठे येतो आसवांचा! विदर्भ आणि मराठवाड्यात तर अश्रू पुसायला कोणी नाही. नाटककार महेश एलकुंचवार यांच्या त्रिनाट्यधारेसारखी विचित्र कोंडी झालीय… उद्ध्वस्त धर्मशाळा होऊन युगांत लोटला आहे आणि राज्यकर्ते मग्न तळ्याकाठी बसलेत.

यशवंतराव चव्हाण या एकमेव द्रष्ठ्या मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता सारा महाराष्ट्र विकासाच्या कवेत घ्यावा एवढी मोठी झेप बाकीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हती. शरद पवार यांनी ती सुरुवातीला दाखवली. यशवंतराव यांचे मानसपुत्र असणार्‍या पवार यांनाही मोठी दृष्टी आहे, पण सत्तेच्या राजकारणात त्यांनी ती आपसूक कमी केली. कारण ज्या माणसाने कृषी, महिला, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रात भरीव योगदान दिले त्यांना कोकण, मराठवाडा आणि विदर्भ विकसित करण्याचे मोठे मन का दाखवता आले नाही? का सत्तेची गणिते आड आली. गडचिरोलीच्या लोकांच्या हातात जगण्यासाठी बंदुका येईपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीने डोळे बंद करून घेतले होते का? आणि याचा फायदा घेत विरोधी पक्षांनी म्हणजे भाजप आणि शिवसेनेने येथे पाय रोवले. चेपलेल्या लोकांना ते आपले वाटू लागले, पण दोन वेळा सत्ता येऊन त्यांनाही काही मोठे दिवे लावता आले नाही… आडात नाही तर पोहर्‍यात येणार कुठून? देवेंद्र फडणवीस यांनी एवढ्या मोठ्या जोरात गप्पा मारल्या की लोकांना वाटले महाराष्ट्राची अमेरिका झाली, पण त्याचा दुभंगलेला रशिया होऊ शकला नाही. अजित पवार रिकाम्या धरणात ‘मी आता मुतू का…’ असे म्हणाले म्हणून भाजपवाल्यांनी आकांत केला, काँग्रेस आघाडीची भ्रष्ट राजवट खाली खेचली, पण पाच वर्षात काय दिवे लागले? अंधार पडलाय… दिवा घेऊन शोधावे लागेल.

फडणवीस यांची शहरी मानसिकता आडव्या महाराष्ट्राला उभे करण्याची नव्हती हे वास्तव आहे. पाणी अडवण्याचे ढोल वाजले, पण त्या भोक पडलेल्या ढोलात भ्रष्टाचाराचे पाणी शिरून योजनेचे तीन तेरा वाजले. शेतकरी म्हणजे मुका प्राणी. त्याला धरला तर हाक ना बोंब. कोकण सोडा, विदर्भ आणि मराठवाडा ही दोन राज्ये होऊ शकतात, एवढा त्यांचा मोठा विस्तार आहे, पण राज्य काय पश्चिम महाराष्ट्राच्या एका तालुक्याच्या विकास योजना तिथे पोहचू शकल्या नाहीत. भयानक आहे हा सारा प्रकार! बहू असोत सुंदर वा संपन्न की, महा प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा… हे म्हणताना आज गळा भरून नाही धरून येतो आणि हे सांगताना मी आधी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत महाराष्ट्र बघून घेतला आहे. हवेत वार करायला आपण राजकारणी नाही. प्रचंड असमतोल असा विकास आहे. मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकर नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री विदर्भाने दिले. काय मिळाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर हाती सूत्रे घेताना वसंतराव नाईक यांनी एक दशकाहून मोठा काळ राज्य केले? का जिरायती जमिनी बागायती होऊ शकल्या नाहीत. पाण्याची गंगा दारी आली नाही की शेतीवर आधारित उद्योग उभे राहिले नाहीत. मोठे उद्योग तर कोसो दूर राहिले. या भागात कापूस पांढरे सोने होते, पण त्याचा कोळसा केला आणि चंद्रपूर तसेच गडचिरोलीत मात्र जंगले तोडून कोळशाच्या खाणी उभ्या केल्या. जंगलात राहून निर्सगाशी एकरूप होऊन जगण्याचे साधे निकष देशोधडीला लावले. इकडे मराठवाड्यात शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण असे चार मुख्यमंत्री झाले, पण या मोठ्या भागाच्या विकासाचे रुतलेले गाडे वर कधी आले नाही. विलासराव देशमुख तर वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे एक दशकाहून मोठा काळ मुख्यमंत्री होते, पण, सगळ्या गोष्टी अगदी सहज घेत त्यांच्या राज्य कारभारात काहीच गंभीरता दिसली नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

राज्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड इच्छाशक्ती लागते जी यशवंतराव, वसंतदादा पाटील यांच्याकडे होती आणि शरद पवार यांच्याकडेही आहे. पण, ती उर्वरित मुख्यमंत्र्यांनी कधी दाखवली नाही. हे दुर्दैवाने का म्हणावे लागले याचे कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा ज्या वेगाने विकास झाला आणि त्याला त्यांच्या नेत्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवली तशी इतरांनी दाखवायला हवी होती. त्यांचे हात कोणी बांधले नव्हते. हात कोणाचे का धरता येत नाही हे बघायचे असेल तर वसंतदादा या माणसाकडे बघावे. कमी शिक्षण असूनही त्यांना आपल्या भागाच्या विकासाची आस होती. काम करून घ्यायला आलेला कुठला माणूस त्यांच्या दारातून निराश होऊन परतला नाही. आज पश्चिम महाराष्ट्रातला अगदी छोट्यातला छोटा माणूस धोतर टोपी घालून बिनधास्त मंत्रालयात येतो, आमदार निवासात थांबतो, आपल्या भागाची कामे करून घेतो. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहायचे नसेल तर आधी स्वतः खस्ता खाल्या पाहिजेत.

घरी बसून तुमच्या दारात कोणी योजना घेऊन येणार नाही. हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या लोकांना त्यांच्या नेत्यांनी शिकवले आणि मग त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या मानगुटीवर बसून गिरवले… ही मानसिकता ना कोकणी माणसात होती, ना मराठवाडी आणि विदर्भीय लोकांमध्ये दिसली. गावकूस लांब, अतिरेकी स्वाभिमान, आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती मुळावर आली. कोकणच्या नशिबाने नाही तर साथी मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यामुळे कोकणात रेल्वे धावली. ही या दोन देव माणसांच्या प्रयत्नांची शिकस्त होती म्हणूनच…नाही तर कोकणातूनही ए. आर. अंतुले, मनोहर जोशी आणि नारायण राणे असे तीन मुख्यमंत्री झाले, पण हाती काय आले? पण, एक राहून राहून वाटते की अंतुले आणि राणे यांना संपूर्ण पाच वर्षांचा काळ मिळाला असता तर कोकण बदलला असता… हे दोन नेते ताकदीचे होते. खूप काही लिहिता येईल, पण शब्दांना मर्यादा असतात. आता लक्ष लागले आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे..शरद पवार साथीला असताना ते भविष्याचा विचार नव्या दृष्टीने करतील, अशी आशा आहे.