घरफिचर्ससारांशड्युअल...जगण्यातलं जीवघेणं द्वंद्व

ड्युअल…जगण्यातलं जीवघेणं द्वंद्व

Subscribe

माणसाच्या मनात कायम द्वंद्व सुरू असतं. विचारांच्या वकुबानुसार चांगलं आणि वाईटात ही लढाई सुरूच असते, पण भवताल तसा नसतो. बरेचदा परिस्थितीमुळे चांगलं किंवा वाईट ठरवण्याचा अधिकार माणसाकडून काढून घेतला जातो. त्याच्या विवेकबुद्धीवर परंपरा, सामाजिक संस्था तसंच आजूबाजूच्या घटना परिणाम करत असतात. जगण्याच्या गरजेनुसार विवेकबुद्धी वळवावी लागते. विवेक वळवण्यास जे नकार देतात त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. ही किंमत जीवाचं मोलही असू शकते. ‘ड्युअल’ मानवी मनातला हाच संघर्ष मनाच्या गडद अंधार्‍या बोगद्यातून रणरणत्या रस्त्यावर आणतो. रिचर्ड मॅथसनच्या लघुकथेवर आधारित हॉलिवूडपट ‘ड्युअल’ पडद्यावर उतरतो. दिग्दर्शन १९७१चं जरी असलं तरी स्पीलबर्गने या कथेला सिनेमात बदलताना जे नाट्य आणि प्रसंग निर्माण केले आहेत, मानवी जाणिवांच्या पातळीवर ते आजही तेवढेच भीतिदायक, आश्चर्यकारक आणि अतर्क्य आहेत.

आपल्या आजूबाजूला यशस्वी होण्याची तीव्र स्पर्धा आहे. यश कसं मिळवलं, यापेक्षा ते मिळवणं महत्त्वाचं आहे. यशाची परिमाणं बदललेली आहेत. पैसा, सुरक्षितता, स्थैर्य, मानमरातब ही यशाची आजची परिमाणं आहेत. ड्युअल हाच जीवघेणा संघर्ष पडद्यावर आणतो. त्यामुळेच माणसांच्या समुदायातली ही जीवघेणी स्पर्धा केवळ दोन वाहनांमध्ये अडकून राहत नाही. माणसात इर्षा असते, कायम पुढे जाण्याची, त्यापेक्षा इतरांपेक्षा आपण वेगळे असायलाच हवेत, इतरांहून पुढेच असायला हवे, आपल्या मागे जग धावायला हवं. जगण्याच्या स्पर्धेत आपल्यापेक्षा मागे असणार्‍यांची संख्या मोठी असल्यानंतरही त्याचं समाधान नसतं, तर आपल्यापुढे गेलेल्यांच्या संख्येचं दुःख असतं. स्टीव्हन स्पीलबर्गचा १९७१ मध्ये आलेला ड्युअल हा हॉलिवूडपटही हीच स्पर्धा मांडतो.

संदर्भ जरी भवतालचे असले तरी घडणारी कथा दोन तासांचीच आणि दोन वाहनांमध्ये असते. यातलं मोठं वाहन अर्थात एक महाकाय ट्रक आहे, जो राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतो. माणसापेक्षा व्यवस्था कधीही मोठीच असते. या व्यवस्थेला ओव्हरटेक करून पुढं जाणं कठीण असतं. तर या ट्रकला मागे टाकण्याचा जीवघेणा प्रयत्न करणारा आणि व्यवस्थेसोबत शत्रूत्व पत्करणारा डेनिस व्हेवर हा कारचालक आहे. यातल्या ट्रकचालकाला चेहरा नाही, तो इर्षा, अहंकार, सामाजिक किंवा राजकीय शत्रू, अस्तित्व संपवण्याची भीती असलेली ताकद असं काहीही असू शकतो. चेहरा कारचालक नायकाला आहे. कारण तो कल्याणकारी कायदा, संस्कृती आणि नियमबद्ध असलेल्या समाजाचा प्रतिनिधी आहे. स्पीलबर्गच्या ड्युअलची कथा अमेरिकेत घडतेय.

- Advertisement -

तो कामानिमित्त कारमधून कॅलिफोर्नियाकडे निघाला आहे. भकास उजाड डोंगररांगा असलेल्या रणरणत्या एका मोठ्या प्रशस्त हायवेवर त्यापुढे एक जायंट टँकरवजा ट्रक आलेला आहे. भकभक धूर सोडणारा ट्रक डेनिसला रस्ता देत नाही, मात्र एका रिकाम्या शेतात आडवळणाला गाडी घेऊन डेनिस ट्रकच्या पुढं निघून जातो. ट्रक मागे सोडल्यावर डेनिसला ट्रकवर विजय मिळवल्याचा आनंद होतो. त्याचा हा आनंद अहंकारी इर्षेने भरलेला आहे. मागे पडलेल्या ट्रकचालकाचा अहंकार दुखावल्यानंतर या दोघांमध्ये सुरू होती ती असूयेची जीवघेणी स्पर्धा. पुढं जाण्याची म्हणण्यापेक्षा एकदुसर्‍यांना मागं टाकण्याची. हे द्वंद्व म्हणजेच स्पीलबर्गचा ‘ड्युअल’, तो इथूनच खर्‍या अर्थानं सुरू होतो. पुढं ड्युअलच्या पडद्यावर हा प्रवास न राहता जीवघेणं शर्यतयुद्ध एकदीड तास सुरूच राहतं, मात्र या एक ते दीड तासात मानवी मनातल्या जाणिवांचे एकेक पदर उलगडत जातात. पुढं जाण्याची ही इर्षा जगण्यामरण्यापर्यंत मरण्यामारण्यापर्यंत नेली जाते.

ड्युअलमध्ये कोणी व्हिलन नाही किंवा नायक नाही, निर्जीव वाहनच ही दोन्ही कामं करतात. मानवी मनातली इर्षाचं इथं व्हिलनचं काम करते. या मानवी इर्षेला लाखो हॉर्सपावरच्या इंजिनाचं यांत्रिक बळ मिळाल्यावर ती केमिकल वाहून नेणार्‍या जीवघेण्या जायंट ट्रकमध्ये बदलते. ही इर्षा नायक डेनिस आणि ट्रकचालक या दोघांमध्येही समान आहे. ट्रकचालकामध्ये ती हिंस्त्र स्वरूपात आहे, तर नायक डेनिसमध्ये मवाळ स्वरूपात आहे. अनेकदा आपला भवतालही असाच असूयेनं भरलेला असतो. जगण्यासोबत माणसाच्या दोन स्पर्धा कायम सुरूच असतात, एक स्वत:च्या अंतर्मनासोबत द्वंद्व सुरू असतं, ज्याला आपण ‘जमीर’ किंवा ‘आतला आवाज’ म्हणतो आणि दुसरे भवतालसोबत.

- Advertisement -

ज्यावेळी भवतालसोबतच्या युद्धखोर जगात जिंकण्यासाठी माणूस स्वत:च्या ‘आतल्या आवाजाला’ मारून टाकतो त्यावेळी त्यातला माणूस पराभूत होऊन संपलेला असतो. ड्युअलची कथा जरी रस्त्यावर घडत असली तरी या स्पर्धेचे असे अनेक मानवी संदर्भ समोर येत जातात. ड्युअलमध्ये कारचालक आणि ट्रकचालकामध्ये कोणत्या कारणावरून वितुष्ट येतं हे स्पष्ट होत नाही. केवळ शर्यतीत एकमेकांपुढे जाण्याची तीव्र जीवघेणी इच्छाच कारण ठरते. हा रोडरॅशचा प्रकार असल्याचं समोर येतं. प्रवासात अनेकदा वाहनचालकांना याचा अनुभव येतो, मात्र या घटनांमागे असलेले मानवी जाणिवेचे संदर्भ चित्रपटात समोर येत जातात.

चित्रपटाला निश्चित असं कथानक नाही. त्यामुळे केवळ पटकथेवरच भिस्त आहे. यात संवादही नाहीत. ड्युअलचा पडदा बर्‍यापैकी केवळ कार आणि ट्रकमधल्या शर्यतीनं भरलेला आहे. शर्यतीत ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहीत असते. त्यात संयमाने जिंकलेल्या कासवाचं आपल्याला कौतुक असतं, तर मूर्खपणा आणि अतिआत्मविश्वासामुळे हरलेला ससा टीकेचा धनी ठरतो. ड्युअलमध्ये ससा आणि कासव असा फरक नसतो. ट्रक आणि कारचालकातला कधी ससा समोर येतो तर कधी कासव. या दोघांचं वागणं त्या त्या घडणार्‍या वर्तमानातून आलेलं असतं. त्यामुळे चित्रपटात कुठलाही काळ समोर येत नाही. एका टप्प्यावर ही स्पर्धा जीवाच्या अटीतटीवर येते आणि त्याचा परिणामही समोर येतो.

मानवी जीवनाचा प्रवास आणि रस्त्यावरच्या रोड रॅशमध्ये असलेला फरक चित्रपटातून नाहीसा होतो. जगण्याच्या प्रवासाचीही तीव्र शर्यत झाल्यावर जीवघेणी स्पर्धा जगावीच लागते, त्यापेक्षा ती जिंकावी लागते, अशा भ्रमील जगण्याची कसरत ड्युअल समोर आणतो. जगण्याच्या प्रवासात अतर्क्य गोष्टी घडतात. अनेकदा घडलेल्या, घडत असलेल्या घटनांशी आपला दुरान्वयेही संबंध नसतो, तरीही त्याचा आपण आणि आपले कुटुंब, भवतालावर होणारा परिणाम टाळता येत नाही. घटना जगण्याला बांधिल नसतात. त्यामुळे त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. घडत असलेल्या आणि घडून गेलेल्या घटनांची कारणे शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. तरीही तो ठोस निर्णयापर्यंत पोहचू शकत नाही. केवळ परिणाम सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात काही राहत नाही. ‘ड्युअल’ हेच सांगत राहतो.

ट्रकचालक आपल्याला मारण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी शंका कार चालवणार्‍या डेनिसला येते, पण त्यामागील कारणांचा परस्परसंबंध तो जोडू शकत नाही. त्याच्याजवळ उरतात त्या शक्यता आणि तर्क…याच बळावर त्याला ही स्पर्धा जिंकण्यापेक्षा आता त्याला स्वतःचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. जगण्याच्या संघर्षात अनेकदा ज्यांचा आपल्या जगण्याशी दुरान्वयेही संबंध नसतो त्यांचीही आपल्या द्वंद्वातून हानी होते. चित्रपटाच्या कथानकात हे स्पष्ट होत जातं. आयुष्याच्या प्रवासात आलेल्या अडचणींचे डोंगर पार करताना सहप्रवाही भेटतात. काही घडीचे असतात तर काही अडचणीत साथ देतात. ‘ड्युअल’च्या दोन तासांच्या कथानकात जगण्याचा हा संघर्षमय प्रवास प्रवाही घटनेत रूपांतरित होतो. कथानक एकाच ओळीचं असलं तरी स्पीलबर्गच्या हाताळणीसाठी, सिनेमॅटोग्राफीसाठी ड्युअल पाहायला हवा.

पार्श्वसंगीताचा चपखल वापर, विविध कोनातून फिरणार्‍या कॅमेर्‍यामुळे चित्रपटातली वाहनेच नायक आणि खलनायक बनून समोर येतात. मानवी मनातल्या जगण्यातल्या चांगल्या वाईट जाणिवा ड्युअलमध्ये वाहनांचा आकार घेतात. त्यामुळेच डेनिसला चिरडण्याचा प्रयत्न करणारा महाकाय ट्रकवजा टँकर खलनायकाचा चेहरा भासतो. एका अंधार्‍या बोगद्यात टँकरच्या हेडलाईट्स हळूवार चालूबंद होतात. त्यावेळी ही वाहनं नसून माणसांच्या चांगल्या वाईट इच्छांनी भरलेले लोखंडाचे मानवी देह असल्याचं वाटावं इतका परिणाम स्पीलबर्गनं चित्रपटात ओतलेला असतो. सस्पेन्स, थ्रील असलं सगळं काही ड्युअलमध्ये मिळतं. चित्रपटात संवाद नसतानाही चित्रपटातला मोकळा अवकाश बरंच काही सांगून जातो. सिने माध्यमाची ही विरामाची भाषा कॅमेर्‍यातून बोलकी करण्यात स्पीलबर्ग यशस्वी झालेला असतो. ड्युअलचा प्रेक्षक या प्रवासात नकळत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन अलगद बसतो आणि जगण्यातल्या संघर्षाचं स्टेअरिंग हातात घेतो. चित्रपट संपल्यानंतर या स्टेअरिंगवरचे आपले हात जड झालेले असतात आणि सुटकेचा नि:श्वास टाकलेला असतो.

(लेखक आपलं महानगरचे मुख्य उपसंपादक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -