घरफिचर्ससारांशआषाढी एकादशी...देवतांच्या तेजाचा उत्सव!

आषाढी एकादशी…देवतांच्या तेजाचा उत्सव!

Subscribe

आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते.

–मानसी सावर्डेकर

आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्‍या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

- Advertisement -

हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात. त्यामुळे दोन तिथ्या असतात. एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी ‘स्मार्त’ व दुसर्‍या दिवशी ‘भागवत’ असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणार्‍या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते.

- Advertisement -

अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोन्ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. अशा वेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते.

देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते.

आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.

पंढरपूर वारी
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकर्‍यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करीत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी सांप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.

आषाढी एकादशीचे व्रत
आषाढी एकादशीला व्रत-उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करीत जागरण करावे. विठ्ठलनामाचा जयघोष करीत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.

आषाढी एकादशी महात्म्य कथा
एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला, पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते, पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.

तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात. यासाठी राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.

आषाढी एकादशी आरती विठ्ठलाची
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥धृ०॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥२॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥५॥

–(लेखिका साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -