घरफिचर्ससारांश‘बॉल लायटनिंग’ एक अनसुलझी गुत्थी!

‘बॉल लायटनिंग’ एक अनसुलझी गुत्थी!

Subscribe

सर्वसामान्य व्यक्तीला ‘बॉल लायटनिंग’ या रहस्यमयी, रंजक आणि नैसर्गिक विजेच्या प्रकाराबद्दल क्वचितच माहिती असते. ‘बॉल लायटनिंग’ ही एक वैज्ञानिक अद्भुत घटना आहे. ‘बॉल लायटनिंग’ म्हणजे आकाशातून जमिनीवर पडणारे विजेचे चेंडू किंवा गोळे होय. ‘बॉल ऑफ फायर’ किंवा ‘फायर बॉल’ या नावाने ही ते ओळखले जातात. कधी कधी वाटाण्याच्या दाण्यापासून काही मीटर परीघाचे तर कधी टेनिस बॉलच्या आकारापासून फुटबॉलच्या आकारापर्यंत ‘बॉल लायटनिंग’चे सूर्यासारखे तप्त असे हे ‘तेजोमय विद्युत गोळे’ क्षणात क्षितिज समांतर तर कधी तिरपे किंवा उभे धावताना दिसतात.

कल्पना करा की एखादी अजब गोष्ट अचानक हल्ला करते आणि काही कळण्याच्या आत तुमच्या चेहर्‍यावर तव्याचा चटका बसावा तशा रेषा उमटतात…. या रेषा उमटलेला चेहरा आरशात पाहता तेव्हा ही भुताटकी आहे असे वाटू लागते…. इतरांच्या बाबतीतदेखील असे घडते आहे असे तुम्हाला कळते….रात्रीअपरात्री आणि कधी तरी दिवसादेखील हे हल्ले होऊ लागतात.. मग हा प्रकार गावोगावी वाढत जातो….घबराट पसरल्याने अपघाताने तर काहींनी अगदी विहिरीत उड्या टाकून जीव दिला.. मानवी शरीरावर हल्ला करत विजेचा जीवघेणा झटकादेखील बसतो.

गंभीर चिघळलेल्या जखमा पाहून डॉक्टरदेखील ‘लाइलाज’ सांगून मोकळे होतात.. भीती आणि अफवांचे वनवे विझविण्यासाठी सरकार शोधमोहीम सुरू करते.. पण यामागचे विज्ञान काही सापडत नाही… मी जेव्हा मुंबईत एका प्रख्यात पटकथा लेखकाला ‘रोबोट’ चित्रपट कथानक लिहिण्याबरोबरच ‘बॉल लायटनिंग : एक अनसुलझी गुत्थी’ या नावाने एक चित्रपटाची पटकथा लिहिली आहे असे सांगितले, तेव्हा ते प्रचंड प्रभावित झाले… एक वैज्ञानिक ‘सायफाय’ पटकथा लिहितोय हे भारतासाठी नावीन्यपूर्ण आहे असे ते म्हणाले…. पण ही ‘सायफाय’ म्हणजे विज्ञान कल्पनारम्य (सायन्स फिक्शन) कथा अद्याप मोठ्या पडद्यावर येणे बाकी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर याबाबत सिरीयल व नंतर सेरीज अशी पाईपलाईनमधली चर्चा अद्याप आऊटपुट घेऊन बाहेर आलेली नाही हे सत्य आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये 2002 मध्ये ‘मुंहनोचवा’ घडलेला प्रकार हा बॉल लायटनिंगचे विज्ञान आहे हे सारे सत्य आहे हे ऐकून तर अनेक जण चाटच झाले. निसर्गाची अजब करामत म्हणजेच ‘बॉल लायटनिंग’ अनेकांच्या चेहरांवर रेघोट्या ओढल्या गेल्याने ते घायाळ झालेत, लोकांवर हल्ला करीत घबराट पसरविण्या मागे ‘मुंहनोचवा’ म्हणजे ‘बॉल लायटनिंग’चे विजेचे गोळे होते हे अद्भुत आणि तितकेच रंजक वैज्ञानिक वास्तव आहे.

विशेष म्हणजे ‘बॉल लायटनिंग’मुळे अनेक ठिकाणी आगी लागल्यात आणि उत्तर प्रदेशचाच्या असंख्य गावागावातील शेतातील उभी पिके धगधगत जळत होती, पण शेतकरी फक्त बघत राहिला. स्वप्ने व्यापून टाकणारे या वास्तव भयपटात कुणीही हिरो वाचवायला आला नाही आणि नैसर्गिक परिस्थिती बदलताच तांडव नृत्य करून ‘बॉल लायटनिंग’ गायबदेखील झाली हे विशेष! याच सत्य घटनांची माळ गुंफत याचे पुढे किमान दोन भागात चित्रपट काढण्याचा निर्णय झाला पण अजून चित्रपट पडद्यावर साकारणे बाकी आहे.

- Advertisement -

आपण 13 मार्च 2022 च्या ‘आपलं महानगर’च्या अंकात जादुई ‘संत एल्मो’ज फायर’ चे वैज्ञानिक सत्य समजून घेतले. मात्र ‘बॉल लायटनिंग’ हा विजांचा प्रकार आणि त्यामुळे विजेचा प्रभाव दाखवित घडणार्‍या घटनादेखील ‘संत एल्मो’ज फायर’पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे हे समजून घ्यायला हवे. असो. सर्वसामान्य व्यक्तीला ‘बॉल लायटनिंग’ या रहस्यमयी, रंजक आणि नैसर्गिक विजेच्या प्रकाराबद्दल क्वचितच माहिती असते. ‘बॉल लायटनिंग’ ही एक वैज्ञानिक अद्भुत घटना आहे. ‘बॉल लायटनिंग’ म्हणजे आकाशातून जमिनीवर पडणारे विजेचे चेंडू किंवा गोळे होय. ‘बॉल ऑफ फायर’ किंवा ‘फायर बॉल’ या नावाने ही ते ओळखले जातात.

कधी कधी वाटाण्याच्या दाण्यापासून काही मीटर परीघाचे तर कधी टेनिस बॉलच्या आकारापासून फुटबॉलच्या आकारापर्यंत ‘बॉल लायटनिंग’चे सूर्यासारखे तप्त असे हे ‘तेजोमय विद्युत गोळे’ क्षणात क्षितिज समांतर तर कधी तिरपे किंवा उभे धावताना दिसतात. कधीकधी काहीही इजा न पोहचविता व्यक्तीचा पाठलाग करतात, त्या व्यक्तीच्या डोक्यावर गोल-गोल फिरतात आणि फट् आवाज करीत साबणाच्या फुग्याप्रमाणे फुटत वातावरणात दुर्गंधी पसरवून ‘बॉल लायटनिंग’चे हे चेंडू गायब होतात. काच, लाकूड, भिंत, धातूचे पत्रे यांना न तोडता ‘बॉल लायटनिंग’चे हे चेंडू आरपार जावू शकतात अशा शेकडो घटनां ऐकल्या तर आश्चर्य वाटते. अद्यापही यामागचे विज्ञान आपल्याला कळालेले नाही याची जाणीव होते.

वातारणाच्या कुशीत निळे, जांभळे, लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे, पारदर्शक आदी रंगछटांचे ‘विजेचे चेंडू’ जगभर उड्या मारत अ-वैज्ञानिक करामती दाखवित असतात. कधी क्षणात अदृश्य होतात. कुणाला ‘बॉल लायटनिंग’ परग्रहावरच्या प्राणांच्या करामती वाटतात. विजा जेव्हा वाळू किंवा जमिनीवर पडतात तेव्हा भुईनळ्याच्या दाण्याप्रमाणे उडी मारत पळणारे ‘बॉल लायटनिंग’ म्हणजेच विजेचे गोळे लोकांनी जसे पाहिले आहेत. अगदी तसेच ‘विजेचे गोळे’ प्रयोगशाळेतदेखील बनविण्यात काही संशोधकांनी यश मिळविले आहे. ‘बॉल लायटनिंग’ हा विजांचा दुर्मीळ प्रकार असून आयुष्यात व्यक्तीला एकदा ‘बॉल लायटनिंग’ दिसण्याची शक्यता 0.01 टक्के इतकी कमी आहे. जानेवारी 2014 मध्ये ‘बॉल लायटनिंग’चा खराखुरा व्हिडीओ जगभर प्रसारित झाला. आकाशातून प्लाझ्माचे पडणारे धगधगते गोळे म्हणून या ‘बॉल लायटनिंग’ चे वर्णन केले जाते.

1753 मध्ये रशियन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज विल्यम रिचमन ह्याने प्रयोगासाठी बसविलेल्या धातूच्या सळईमधून फिक्कट निळ्या रंगाचा विजेचा चेडू बाहेर पडून तो डोक्याला चिटकल्याने त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागलेत. 30 एप्रिल 1877 रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ‘बॉल लायटनिंग’ प्रकट झाल्याचे जनसमुदायाने पाहिले अशीदेखील अधिकृत नोंद आढळते. वाहनांना आणि शेतांना आगी लावताना हे विजेचे लोळ स्फोटदेखील घडवितात. परिणामी शॉर्टसर्किटने आग लागल्याच्या बातम्या झळकतात. ‘बॉल लायटनिंग’च्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. शेकडो वर्षांच्या दहा हजारपेक्षा जास्त नोंदी असलेल्या ‘बॉल लायटनिंग’मुळे 1960 नंतर संशोधकांचे दोन गट पडले आहेत. एक गट विजेचे गोळे पडतात यावर विश्वास ठेवतो आणि अभ्यास करीत शोध घेतो आहे. तर दुसरा गट भौतिकशास्त्राच्या नियमांना बासनात गुंडाळून टाकतो, त्यामुळे तो ‘बॉल लायटनिंग’ च्या घटनांवर विश्वास ठेवत नाही.

19 मार्च 1963 रोजी न्यूयॉर्क ते वॉशिंगटन जाणार्‍या फ्लाइट ईए 539 मध्ये अचानक 20 सेटीमीटर व्यासाचा विजेचा चेंडू पायलटच्या केबीनकडून विमानात मध्यावर दाखल झाल्याची ‘बॉल लायटनिंग’ची अधिकृत नोंद आहे. विजेच्या तारा, खांब, मीटर, ट्रान्सफॉर्मर, लायटनिंग अरेस्टर आदी ‘बॉल लायटनिंग’ची आकर्षण केंद्र होत. सध्या याबाबत बरेच संशोधन सुरू असले तरी ‘बॉल लायटनिंग’ च्या विक्षिप्त आचरणामागचे गुढ अद्याप उकललेले नाही. ‘बॉल लायटनिंग’चे कोडे उलगडण्यास अजून प्रचंड वाव आहे. विज्ञान नक्की उलगडेल आणि या विज्ञानाचा वापर मानवी सभ्यता, संस्कृती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रम्हांडाच्या क्षितिजांना पादाक्रांत करताना नक्की होईल, अशी आशा आहे. पण तोपर्यंत तरी असेच म्हणावे लागेल की, बॉल लायटनिंग : एक अनसुलझी गुत्थी!

–प्रा. किरणकुमार जोहरे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -