भोंदूगिरीचा भांडाफोड

पोलिसांनी दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली. महिलेने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच, भोंदूगिरी करणारे ते जोडपे चपापले. थोड्या वेळापूर्वी त्यांच्याकडे येऊन गेलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी लगेच ओळखले. सोबत पोलीस गाडी आणि पोलीस पाहून, ते जोडपे काही क्षण गोंधळले. मात्र लगेच सावध होऊन, अरेरावीची भाषा बोलू लागले. यामध्ये महिलेने जास्त पुढाकार घेऊन, कांगावा सुरू केला. हा सारा प्रकार पाहून चाळीतील शेजारचे काही पुरुष, महिला, शाळकरी मुलं जमा झाली. दरबाराची जागा दाखवण्यासाठी पोलिसांनी जोडप्याला फर्मावले.

नाशिक जिल्ह्यात, कळवण हा आदिवासीबहुल तालुका आहे. या तालुक्यातील एका बर्‍यापैकी मोठ्या असलेल्या गावात, एका घरात अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरी चालते, मोठी आर्थिक कमाई केली जाते, अशी गुप्त माहिती त्या गावातील एका जागरूक नागरिकाने नाशिक येथील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना कळवली. ही घटना साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीची आहे. अम्मा-भगवान या तथाकथित आध्यात्मिक गुरू असलेल्या जोडप्याच्या फोटोफ्रेममधून आपोआप मध, तेल, तांदूळ, विभूती, हळद-कुंकू असे पदार्थ पाझरतात, गळतात, असा चमत्कार घडत असल्याचे जाणिवपूर्वक सांगितले जाते. या दैवी चमत्काराचा बोलबाला अगदी कमी कालावधीत या गावात आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात झाला असून, ज्या इसमाच्या घरी छोटेखानी दरबार भरतो, तेथे दररोज सकाळ, संध्याकाळ दर्शनासाठी, आरती, पूजा करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागतात, असंही त्याने कळविले.

खरंच चमत्कार घडतो का, हे कुतूहलापोटी पाहायला, लोक गर्दी करत असतात. आणि खरंच जर चमत्कार घडत असेल तर, आपलेही प्रश्न सुटतील, इच्छा पूर्ण होतील, या विचाराने आशेपोटी लोक अशा ठिकाणी जात असतात. तेथील फोलपणा लक्षात आल्यावर किंवा अपेक्षाभंग झाल्यावर, काही महिन्यांनंतर ही गर्दी आपोआप ओसरते,असाही अनुभव येतो. मात्र तोपर्यंत भोंदूगिरी करणारा कमाई करून तृप्त झालेला असतो. दुसरीकडे भोंदूगिरीचे दुकान सुरू करण्याची तयारी त्याने अगोदरच करून ठेवलेली असते.

ह्या आदिवासी भागात असलेल्या गावातील भोंदूगिरी करणारा हा इसम, घरातच दरबार भरवितो. श्रद्धेपोटी लोक यथाशक्ती दान, दक्षिणा म्हणून छोटीमोठी रोख रक्कम फोटो समोर ठेवतात. दिवसभरात दोन ते तीन हजार रुपये सहज जमा होतात. पूजा, आरती प्रीत्यर्थ पेढे, नारळ, कपडे आणि इतर काही मौल्यवान वस्तूही काही भाविक अम्मा- भगवान यांच्यावरील श्रद्धेपोटी अर्पण करून जातात. अशी माहिती ह्या जागरूक नागरिकाने कार्यकर्त्यांना दिली.

आध्यात्मिक बुवाबाजी, भोंदूगिरी समाजातील अगदी तळागाळात, आदिवासी भागात कशी फोफावली आहे, अध्यात्माचा कसा धंदा बनला आहे, याचे हे अगदी छोटे पण उत्तम उदाहरण !!

प्रत्यक्ष जाऊन, या चमत्काराचा भांडाफोड करून, नागरिकांचे, भाविकांचे होणारे विविध प्रकारचे शोषण थांबवायचे, असे नियोजन करण्यात आले.

नाशिकपासून साधारणतः सत्तर किलोमीटर अंतरावरील या आदिवासी गावात, एक दिवस नाशिकहून दोन कार्यकर्ते दुपारी बाराच्या आसपास या गावात पोहचले. गाव आदिवासी भागात असले तरी, भर दुपारीही गावात बर्‍यापैकी गजबज चालू असल्याचे दिसून येत होते. मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालये अशा सुविधा गावात असल्याचे कळले. जवळपासचे आठ ते दहा आदिवासी खेडे, वाड्या, पाडे यांच्या आर्थिक व्यवहाराचे, दळण-वळणाचे हे गाव, केंद्र असल्याचे चौकशीअंती कळाले.

गावातील भरवस्तीत एका कनिष्ठ मध्यमवर्गीय दुमजली चाळीसारख्या वस्तीतील दोन, तीन खोल्या असलेल्या एका छोट्याशा अरूंद घरात अध्यात्माच्या नावाने दरबार भरवून भोंदूगिरी चालते, त्या ठिकाणाचा शोध घेतला. खरं तर त्याची जास्त विचारपूस करावीच लागली नाही, कारण गावात दरबाराचा श्रद्धामय बोलबाला चांगलाच झाला असल्याचे जाणवले. आम्ही अम्मा -भगवानचे भक्त, शिष्य आहोत, दर्शनासाठी खूप लांबून आलो आहोत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तेवढे बोलणेही पुरेसे ठरत होते. हे ऐकून, काही जणांनी आदराने , घर दाखविण्यासाठी त्या घरापर्यंत सोबत येण्याची तयारीही काहींनी दाखवली. किती मोठा हा श्रद्धेचा महिमा !!

वेळ भर दुपारची. घराच्या दारापुढे कार्यकर्ते जाऊन थांबले. घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र चाळीतील इतर घरे आणि हे तथाकथित आध्यात्मिक दरबाराचे घर यात फरक होता. अम्मा भगवानचे काही पोस्टर्स, झेंडे ठळकपणे घराच्या दर्शनीवर लावलेले दिसत होते.

नवीन येणार्‍या भाविकाला नेमके घर शोधण्यात अडचण येऊ नये, यासाठी ही सोय केलेली असावी. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. हळूच कडी वाजवली. मध्यमवयीन महिलेने दरवाजा उघडला. आम्ही अम्मा- भगवानांचे शिष्य आहोत. लांबून दर्शनासाठी आलो आहोत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्या महिलेने आदराने घरात बोलावले. तोपर्यंत त्यांचे पतीही पुढच्या खोलीत आले. दुपारची विश्रांती घेत असावेत, असे लक्षात आले. कार्यकर्त्यांनी जुजबी ओळख देऊन, अम्मा भगवानच्या दर्शनासाठी आम्ही आतुर झालो आहोत, असे सांगितले. त्या जोडप्याने अम्मा-भगवानची चमत्काराची महती आणि सध्या येथे कधीपासून दरबार भरतो, किती भक्तिभावाने लोक येतात, कसे, कसे चमत्कार घडले, याचे रसभरीत वर्णन सुरू केले. कार्यकर्त्यांच्या खिशात चालू असलेला टेपरेकॉर्डर इमानेइतबारे त्याचे काम करीत होता. शेवटी ज्या खोलीत अम्मा भगवानचा फोटो व इतर पूजा साहित्य ठेवले होते, तेथे कार्यकर्ते गेले.

दोन बाय दोन फूट आकाराची अम्मा-भगवान यांची ती फोटो फ्रेम होती. तिच्यातून कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, काय, काय पदार्थ पाझरले,गळाले ते दाखवायला जोडप्याने सुरुवात केली. फोटो फ्रेमची मागील बाजू तपासण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र तसे करू नका, फोटो पालथा केला तर अम्मा भगवानचा अपमान होतो, असे त्यांनी सांगितले. फोटोच्या समोर पूजा साहित्य, एका मोठ्या ताटात पाच, दहा, वीस, शंभरच्या काही नोटा, काही नाणी आणि त्यासोबतच घडी घातलेली नवी साडी ठेवलेली होती.

सदर साडी त्या महिलेने तिला, तिच्या माहेराहून काल मिळाल्याचे सांगितले. मात्र अम्माला न विचारता साडी कशी नेसणार?. प्रथम अम्मा साडीची घडी मोडतील, म्हणून रात्रभर ती साडी अम्मांच्या फोटो समोर ठेवली आहे. रात्री कधीतरी अम्मा फोटोतून बाहेर येतील आणि साडीची घडी मोडतील. त्यानंतर ती साडी सदर महिला नेसणार होती, अशी महत्वपूर्ण माहिती सदर महिलेने सांगितली. खरं तर, फोटोतून एखादी व्यक्ती बाहेर येऊन, साडी नेसते हा सदर महिलेने केलेला चमत्काराचा दावा, कार्यकर्त्यांना भांडाफोडीसाठी पुरेसा पुरावा ठरला असता. मात्र कार्यकर्त्यांनी घाई न करता, तिथून काढता पाय घेण्याचे ठरवले.

सायंकाळी दरबाराच्या वेळी पुन्हा पूजा, आरतीसाठी येऊ, असे सांगून कार्यकर्ते निघाले. त्यांनी तडक त्याच गावात असलेले पोलीस स्टेशन गाठले. तेथील प्रमुख पोलीस अधिकारी काही कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी गेल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी टेपरेकॉर्डर चालू करून, तेथील पोलिसांना संभाषण ऐकवले. मात्र हे प्रकरण फार गंभीर आहे आणि तातडीने त्याचा तपास केला पाहिज, असे काही विशेष या प्रकरणात आहे, असे वाटत नाही, असा पोलिसांनी अभिप्राय दिला.

मात्र ,कार्यकर्त्यांनी अशा भोंदूगिरीचे समाजात काय, काय वाईट परिणाम होतात, सामान्य भाविक-भक्तांचे कसे शोषण होते, ते का थांबवले पाहिजे, असे सर्व स्पष्टीकरण केले. शेवटी हा इसम कोण आहे, हा प्रकार गावात कुठे चालतो याबाबत कार्यकर्त्यांनीच पोलिसांना माहिती देऊन, भोंदूगिरी करीत असलेल्या त्या इसमाचे नाव, घराचे ठिकाण सांगितले. ते ऐकून मात्र पोलिसांपैकी एका पोलिसाने लगेच ओळखले. सदर इसमाचा प्रवासी वाहतुकीचाही व्यवसाय असून, तो तीन, चार लहान प्रवासी गाड्या बाळगून आहे. मात्र पोलिसांची रीतसर परवानगी न घेता, तो धंदा करतो. अनेक वेळा निरोप देऊनही, तो अजून पोलिसांना भेटायला गेला नाही, म्हणून त्याच्यावर पोलिसांची करडी नजर असल्याचे जाणवले.

चला, ह्या निमित्ताने का होईना आता त्याला झटका दाखवू, या विचाराने तीन पोलीसदादांनी सोबत येण्याची तयारी दाखवली. अम्मा -भगवानच्या नावाने ज्या घरात दरबार भरतो, तेथे सर्वजण पोहचले. दरवाजा बंदच होता.

पोलिसांनी दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली. महिलेने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच, भोंदूगिरी करणारे ते जोडपे चपापले. थोड्या वेळापूर्वी त्यांच्याकडे येऊन गेलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी लगेच ओळखले. सोबत पोलीस गाडी आणि पोलीस पाहून, ते जोडपे काही क्षण गोंधळले. मात्र लगेच सावध होऊन, अरेरावीची भाषा बोलू लागले. यामध्ये महिलेने जास्त पुढाकार घेऊन, कांगावा सुरू केला. हा सारा प्रकार पाहून चाळीतील शेजारचे काही पुरुष, महिला, शाळकरी मुलं जमा झाली. दरबाराची जागा दाखवण्यासाठी पोलिसांनी जोडप्याला फर्मावले. कार्यकर्ते, तीन पोलीस, ते दोघे आणि आणखी काही शाळकरी मुलं असे आठ, दहा लोक घरातील फोटो फ्रेम असलेल्या त्या खोलीत पोहचले.

कार्यकर्त्यांनी जोडप्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. चमत्काराच्या नावाने तुम्ही लोकांना फसवता, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात, दक्षिणेपोटी त्यांच्याकडून पैसे घेता, मोठी रक्कम जमा करता, चमत्काराचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना दैववादी बनविता, अशा सर्व प्रश्नांनी ते दोघेजण पुरते गोंधळले. पण तरीही ते मान्य करायला तयार नव्हते.

अम्मा-भगवान यांच्या फोटो समोर काल ठेवलेली साडी, रात्री अम्मा फोटोतून बाहेर येऊन नेसणार होत्या, असं तुम्ही म्हणाला, मात्र आज दुपार झाली तरीही साडीची घडी जशीच्या तशीच दिसतेे आहे, हे कसे काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी सदर महिलेला विचारला. आता आपले पितळ उघडे पडण्याची वेळ जवळ आली आहे, असे त्या दोघांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

तिथे एक शाळकरी मुलगा उभा होता. त्याला कार्यकर्त्याने आपुलकीने त्याचे नाव विचारले. कोणत्या वर्गात शिकतो, हे विचारले. तो मुलगा इयत्ता सहावीत शिकतो,असे म्हणाला. विशेष म्हणजे तो त्या महिलेचा पुतण्या असल्याचे त्या महिलेनेच सांगितले. कार्यकर्त्यांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन अगदी शांतपणे विचारले की, बाळा या फोटोसमोर ठेवलेली ही नवी साडी, या फोटोत दिसणार्‍या ह्या अम्मा, फोटोच्या बाहेर येऊन ही साडी नेसतील का? पोरगा तत्काळ उतरला, ‘नाही नेसू शकणार ! फोटोतील व्यक्तीला फोटो बाहेर येताच येणार नाही ना !! ’, त्या बालबुद्धीने सर्वांसमोर कार्यकारणभाव स्पष्ट केला.

यावर कार्यकर्त्यांनी त्या महिलेला सांगितले की, फोटोतील व्यक्ती बाहेर येऊन साडी नेसू शकत नाही, हे जर या सहावीत शिकणार्‍या मुलाला समजते तर तुम्हाला ते समजत नाही, असं थोडंच आहे ?

यावर सदर महिलेची बोलती बंद झाली. बिचारा तिचा पतीही काहीही बोलू शकला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी जाणूनबूजून ते लोकांना सांगत असलेल्या त्या चमत्काराचा भांडाफोड पोलिसांसह सगळ्यांसमोर झाला होता.

पुढील काम पोलिसांनी सुरू केले. त्या जोडप्याला पोलीस स्टेशनला आणले. पण पुढे काय कायदेशीर कारवाई करायची, असा प्रश्न उभा राहिला. कारण अध्यात्माच्या नावाने अशी फसवणूक व शोषण करणे, या विरोधात थेट कारवाई करण्यासाठी कायदाच तेव्हा अस्तित्वात नव्हता. म्हणून त्यांचा माफीनामा पोलिसांनी लिहून घेतला.

दरबार तत्काळ बंद करून, असे पुन्हा न करण्याबाबची तंबी पोलिसांनी त्या जोडप्याला दिली. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. कारण तोपर्यंत जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वातच आलेला नव्हता.

पुन्हा असे चमत्काराचे दावे करून लोकांना दैववादी बनवू नका, फसवू नका, असे कार्यकर्त्यांनी त्या पतीपत्नीला समजावून सांगितले. निदान पोलिसांसमोर तरी त्यांना ते मान्य करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नव्हता.