घरफिचर्ससारांशरसवंत व्हा...

रसवंत व्हा…

Subscribe

ऐन उन्हाळ्यात लेखनाकरिता असा विषय निवडताना मनाला आपसूकच तजेला जाणवतो. थंडगार अन् प्रसन्न वाटते. माझा कलिंगड पुराण हा लेख वाचकांच्या विशेष पसंतीस उतरलेला आहे. म्हणून तोच धागा पकडून आजचा हा लेख लिहित आहे. तुम्हाला वाढत्या तापमानातील उष्णतेवर मात करायची असेल तर या टुकार शीतपेयांचा आधार घेऊ नका. कारण निसर्गाने आपल्याला भरभरून खजिना दिला आहे. त्याचा वापर करा. अस्सल फळांचा आस्वाद घ्या. आरोग्य राखा. यासोबत पुढच्या पिढ्यांना हा गारवा मिळावा असे वाटत असेल तर अंगणात एखादं फळझाड लावा, ते जोपासा म्हणजे येणार्‍या पिढीला तुम्ही हक्काने म्हणू शकाल, मुलांनो...रसवंत व्हा!

– कस्तुरी देवरुखकर

आपल्या निसर्गात असंख्य फळझाडांचे प्रकार आहेत. त्यातील कित्येक फळं रणरणत्या उन्हाळ्यात संजीवनी देण्याचं काम करतात. फळे आली म्हणजे त्यापासून तयार केले जाणारे रसाचे प्रकारसुद्धा समोर आलेच. मी जेव्हा एखाद्या फळाचा रस सेवन करते तेव्हा मला थेट हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत सामावून गेल्याचा भास होतो. वैशाख वणव्यात होरपळताना अंगाची होणारी लाही लाही कमी करण्यासाठी ऊस, ताडगोळे, कलिंगड, लिंबू, कोकम, करवंद, शहाळ्याचे पाणी, काकडी व अन्य रसधारक फळे अन् त्यांचा रस पृथ्वीवरील अमृतच वाटतात. मला आठवतंय लहानपणी गरमीच्या सुट्टीत एसटीने गावी जाताना एखाद्या स्थानकावर एसटी थांबली की प्रवासातील झोपेतून जागे झाल्यावर कानावर शब्द पडायचे… गारे गार, गारे गार… उसाचा रस घ्या…

- Advertisement -

खिडकीतून डोकावताना थंडगार, मधाळ चवीने युक्त, लिंबूमिश्रीत उसाच्या रसाचा ग्लास कुणीतरी तोंडासमोर आणून धरायचे. मग काय आईवडिलांना न विचारताच तो ग्लास हातात घेऊन घटाघटा रस पिऊन रिकामा ग्लास त्या रस विक्रेत्याच्या हातात दिला जायचा. पुढे त्याला पैसे देण्याची जबाबदारी बाबांची. आम्ही आपले डोळे मिटून पुन्हा गप्प पडून राहायचो. आई, आत्या मात्र कोकणची मैना म्हणजेच टपोरी, रसाळ करवंद जी हिरव्यागार पानाच्या द्रोणमधून दिली जात ती खाण्यात मग्न असायच्या, तर आतेभाऊ थंडगार पाण्यात भिजवून ठेवलेल्या काकडीला मीठ मसाला लावून विकल्या जाणार्‍या हातगाडीजवळ रेंगाळताना दिसायचा.

रसनेच्या माध्यमातून पोटात उतरत संपूर्ण शरीराला थंडावा देऊन आत्म्याला तृप्त करणार्‍या या नैसर्गिक गारव्याची अनुभूती घेताना एसटीची पुढच्या प्रवासाला निघायची वेळ कधी व्हायची ते कळायचेदेखील नाही. एव्हाना एसटीचा वाहनचालक समोरच्या कॅन्टीनमधून मिसळ पाव खाऊन झाल्यावर लालेलाल रसरशीत कलिंगडाच्या फोडीचा आस्वाद घेत एसटीच्या दिशेने वाटचाल करू लागलेला असायचा. ते दृष्य पाहून गाडीच्या बाहेर असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडायची. एसटी सुटेल या भीतीने प्रवासी हातातल्या खाद्यपदार्थांसकट वेगाने गाडीत प्रवेश करायचे.

- Advertisement -

उष्णतेचा शत्रू आपण ज्याला बोलू शकतो त्याचबरोबर पृथ्वीवरचे अमृत म्हणजे लिंबू सरबत. आमच्या येथे मुंबईत सोमवारचा आठवडे बाजार असतो. शालेय जीवनात असताना आई आम्हाला त्या दिवशी शाळा सुटल्यावर शाळेतून थेट बाजारात घेऊन जायची. आईचा बाजारहाट सुरू असायचा. मी आणि माझी भावंडं मात्र घामाच्या धारात भिजून जायचो. घशाला कोरड पडलेली असायची. त्यावेळी कंपनीद्वारे निर्मित शीतपेये अर्थात कोल्ड्रिंक्स पिणे ही गरज नसून चैन समजली जायची.

तत्सम पेयं जास्त करून लग्नसमारंभात ठेवली जायची. त्यामुळे सूर्य आग ओकत असताना लिंबूरस, कोकम सरबत, ताक, लस्सी अशाच द्रव्य पदार्थांना मागणी असायची, जी अतिशय आरोग्यदायी होती आणि आजही आहेत, तर आईचे लक्ष आमच्याकडे जायला आणि समोर लिंबू सरबतची गाडी दिसायला एक वेळ व्हायची. आई भाजी घेता घेता खुणेने इशारा करायची व आम्ही क्षणार्धात त्या लिंबू सरबतच्या गाडीपाशी जाऊन थांबलेले असायचो. त्या लिंबूरसाचा शीतल थेंब जिभेवर पडताच वाळवंटातून प्रवास करीत पाण्याच्या सरोवरात बुडाल्याचा अत्यानंद व्हायचा. शिणलेल्या जीवाला संजीवनी मिळाल्याचे सुख जाणवायचे.

कोकणात सुट्टीत गावी गेल्यावर कैरीचे पन्हे पिण्याचा योग यायचा. पुढे काही दिवस आंबड गोड पन्ह्याची चव जिभेवर रेंगाळत असायची. गावी ‘जाम’ नावाचे सफेद रंगाचे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असायचे, जे अतिशय रसाळ असते. उन्हाळ्यात दिवसा प्रवास करताना सरकारी बुथवर ताडगोळ्यांचा रस ज्याला निरा असे म्हणतात ते पिऊन तहान भागवण्याची मजा काही औरच. जागोजागी दिसणारे कलिंगड विक्रेते अन् त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेबलवर सजवून ठेवलेल्या रसरशीत कलिंगडाचे लालसर काप याची भुरळ प्रवाशांना पडली नाही तरच नवल.

भर उन्हाळ्यात एखाद्या लग्नसमारंभाला जायचे तर जिवावर येते. आजकाल शहरात अन् शहरसदृश गावात वातानुकूलित मंगल कार्यालय घेण्याची परंपरा आहे, परंतु काही वर्षांपूर्वी गावाकडील लग्न म्हटल्यावर दारासमोरील मांडवात लग्न ठरलेले असायचे. त्यावेळी शहरातून गावाकडे प्रवास करायची वेळ आलीच तर नटूनथटून खासगी बसने प्रवास करताना वाटेत गरमागरम वडा पावची गाडी तर शेजारी बर्फाचा गोळा व सरबतवाला दिसायचा. त्यावेळी माझी पावलं आपसूक त्या गोळा सरबतच्या हातगाडीजवळ येऊन थांबायची. भर उन्हात गरम वडा पाव खाणार्‍यांना मात्र मानलं पाहिजे, जे धाडस मला कधी जमले नाही.

उन्हाळ्यात फळे आणि फळांचा रस आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहीतच आहे. या गोष्टीचा आपल्या पूर्वजांना चांगला अभ्यास होता म्हणून तर आई-आजीच्या पिढीपासून लिंबू सरबत, कोकम सरबत, पित्तशामक आवळा सरबत, वाळा सरबत, नारळ पाणी, विविध फळांचे चविष्ट रस, कैरीचे पन्हे, ताक, लस्सी, नाचणीचे अंबिल, लग्नसमारंभात सर्रास आढळणारा जिलेबीचा सखा मठ्ठा, ताडगोळे, कलिंगड, करवंद इत्यादी फलाहाराचा आस्वाद घेणे इतिकर्तव्य मानले जायचे, जी ऋतुमानानुसार शरीराची गरज असते, परंतु आजकाल टीव्हीवर दाखवल्या जाणार्‍या भल्यामोठ्या कंपन्यांच्या भव्यदिव्य जाहिरातीला तसेच एखाद्या हिरोच्या नाटकी स्टंटबाजीला भुलून त्या हानिकारक शीतपेयांना बळी पडणार्‍या तरुणाईला सांगावेसे वाटते की, तुम्हाला वाढत्या तापमानातील उष्णतेवर मात करायची असेल या टुकार शीतपेयांचा आधार घेऊ नका. कारण निसर्गाने आपल्याला भरभरून खजिना दिला आहे. त्याचा वापर करा. अस्सल फळांचा आस्वाद घ्या. आरोग्य राखा. यासोबत पुढच्या पिढ्यांना हा गारवा मिळावा असे वाटत असेल तर अंगणात एखादं फळझाड लावा. ते जोपासा म्हणजे येणार्‍या पिढीला तुम्ही हक्काने म्हणू शकाल, मुलांनो… रसवंत व्हा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -