घरफिचर्ससारांशमहाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी !

महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी !

Subscribe

कधीकाळी उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये अधांधूद, गुन्हेगारीचे राज्ये म्हणून ओळखली जात. गुन्हेगारी आणि ती राज्य असा परिचय होता. अर्थात अनेक गुन्ह्यांच्या आलेखात ती राज्ये वरच्या क्रमांकावर होती, मात्र आता त्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर आला आहे. याबद्दल येथील धोरणकर्त्यांबरोबर शिक्षण व्यवस्था ज्यांच्या हाती आहे त्यांनी अधिक गंभीरपणे विचार करायला हवा. शिक्षणातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठीची जडणघडण केली जात असते. शिक्षणातून संस्काराची पेरणी करणे अपेक्षित आहे.

भारतातील अनेक प्रांतापैकी महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत, महापुरूषाचे आणि संताची भूमी असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या भूमीत जन्माला आलेले महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, र.धो.कर्वे, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महापुरूषांच्या कर्तृत्वाने बहरलेली ही भूमी आहे. या भूमीत कर्मवीरांसारख्या महापुरूषांने शिक्षणाचा केलेला प्रसार केला. जातीभेदाच्या पलिकडे जात यारे यारे सान थोर अवघ्या जातीचे नारीनर असे म्हणत संतानी समतेचा विचार प्रतिपादन केला. या सार्‍या विचाराची कास धरत त्या पाऊलवाटेने मार्गक्रमण करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा परिचय आहे. या भूमीतून समतेचा विचार रूजविण्याचा प्रयत्न झाला. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणाची वाट अत्यंत नैतिकतेच्या उंचीने घेऊन जाण्याचा सातत्याने प्रयत्न केला. राजकारणी, साहित्यिक, विचारवंत आणि दिशा दाखविणार्‍या चळवळीने ही भूमी समृध्द झाली आहे. आपल्या इतिहासातील विविध कामगिरीचा महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान होताच.आपला महाराष्ट्र काल परवापर्यंत इतर राज्यांसाठी आदर्शाची पाऊलवाट ठरत होता. अनेकजण महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्राबद्दल अत्यंत चांगुलपणाने बोलत जात होते. अत्यंत प्रागतिक राज्य म्हणून ओळखले जात होते. वर्तमान मात्र आपला इतिहास विसरून अधांरमय भविष्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे चित्र आहे.

कधीकाळी उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये अधांधूद, गुन्हेगारीचे राज्ये म्हणून ओळखली जात. गुन्हेगारी आणि ती राज्य असा परिचय होता. अर्थात अनेक गुन्ह्यांच्या आलेखात ती राज्ये वरच्या क्रमांकावर होती, मात्र आता त्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर आला आहे. याबद्दल येथील धोरणकर्त्यांबरोबर शिक्षण व्यवस्था ज्यांच्या हाती आहे त्यांनी अधिक गंभीरपणे विचार करायला हवा. शिक्षणातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठीची जडणघडण केली जात असते. शिक्षणातून संस्काराची पेरणी करणे अपेक्षित आहे. विचार करण्याची क्षमता वृध्दी अपेक्षित आहे. विवेकाची पेरणी करणारी व्यवस्था म्हणून शिक्षणाकडे पाहिले जात असते. त्यामुळे सद्सद्विवेक जागा ठेवण्याचे काम शिक्षणातून घडत असते. त्यामुळे समाजाची उंची वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असे सातत्याने विचारवंत सागंत आले आहेत.असे असताना जेव्हा शिक्षण घेतलेली माणसं गुन्हेगारीच्या दिशेने चालू लागतात तेव्हा शिक्षणातून अपेक्षित केलेली पेरणी करायची राहून गेली असे वाटत राहते. महाराष्ट्रातील वाढती हिंसा चिंताजनकच आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या वतीने 2020 सालातील गुन्हेगारीच्या संदर्भातील अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. भारतात एकूण 66 लाख 1 हजार 285 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या एकूण गुन्हांपैकी महाराष्ट्राच्या नावावरती पाच लाख 39 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2019 पेक्षा 29 हजार 570 अधिकचे गुन्हे एका वर्षात नोंदविण्यात आले आहेत. ही वाढ सुमारे 5.49 टक्के इतके आहे. राज्याच्या गुन्हेगारीचे प्रमाण सुमारे 8.17 टक्के इतके आहे. शंभर लोकांच्यामागे सुमारे नऊ गुन्हे हे विचार करायला भाग पाडते आहे. देशात बालगुन्हेगारीचे 1 लाख 28 हजार 531 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 14 हजार 371 गुन्ह्यांची नोंद आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे 3 लाख 71 हजार 503 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशात 49 हजार 385 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ते राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

भारतातील आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भाने आर्थिक भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे संदर्भाने नोंदविण्यात आलेल्या तीन हजार 100 गुन्ह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातील 664 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रमाण शेकडा 22 टक्के इतके आहे. भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशात सायबर गुन्हेगारी संदर्भाने 50 हजार 35 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून महाराष्ट्रात पाच हजार 496 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्य विरोधातील कारवाई संदर्भाने भारतात एकूण 5 हजार 613 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील 252 गुन्हे असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात नोंदविल्या गेलेल्या तीस हजार 183 खुनांच्या गुन्ह्यांपैकी महाराष्ट्रात 2 हजार 229 गुन्ह्यांची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. खुनांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारात महाराष्ट्रात वाढ झाली असून देशातील 24 हजार 794 गुन्ह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 4 हजार 909 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहेत. भारतातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर झालेल्या अत्याचारांमध्ये 50 हजार 291 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 569 गुन्हे महाराष्ट्रातील आहेत.

- Advertisement -

जमाती संवर्गातील आठ हजार 272 गुन्हे संपूर्ण भारतात नोंदविण्यात आले आहेत त्यापैकी 663 महाराष्ट्रातील आहेत. भारतात आर्थिक गुन्हेगारीत 1 लाख 45 हजार 754 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 12 हजार 452 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हा आलेख महाराष्ट्रासाठी निश्चित गौरवास्पद नाही.आपल्या राज्यात गेले काही वर्ष सातत्याने शिक्षणाचा आलेख उंचावत आहे. सव्वादोन कोटी मुलांच्या शिक्षणासाठी राज्यात आज एक लाख दहा हजार शाळा आहेत.त्याच बरोबर महाविद्यालयांची संख्या, विद्यापीठांची संख्यादेखील मोठी आहे. राज्यात साक्षरतेचा आलेखही देशाच्या सरासरीपेक्षा अधिक उंचावलेला आहे. राज्याची पटनोंदणी देशात सर्वाधिक आहे. अशा परीस्थितीत शिक्षण गरीबांच्या घरापर्यंत पोहचवले जात आहे. शिक्षणाचा होणारा विस्तार, शिक्षणातून वाढत जाणारी साक्षरता आणि त्याचवेळी राज्यातील वाढत जाणारी गुन्हेगारी यांचा काही संबंध आहे की नाही हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण घेऊनही विवेकाची वाट चालणे होणार नसेल,चांगले काय आणि वाईट काय याचे चिंतन घडणार नसेल तर शिक्षण कुचकामीच ठरते. समाज व राष्ट्र हे सुसंस्कृत घडविण्याची जबाबदारी शिक्षणाची असते. शिक्षणाने गुन्हेगारी मानसिकतेपासून दूर जाणारी मने घडवण्याची जबाबदारी उचलण्याची गरज आहे. अन्यथा शिक्षणाचा आलेख उंचावणे, त्यासोबत गुन्हेगारीचा आलेख उंचावणे याचा अर्थ शिक्षणाचा पराभव होणे आहे हे लक्षात घ्यायला हवे.

महाराष्ट्रात सावित्राबाई, महात्मा फुले यांनी पेरणी केलेल्या शिक्षणाचा विचार येथे कितीतरी संघर्षाने रूजला आहे. शिक्षणाचा विचार रूजविण्यामागे नेमकी सामाजिक दृष्टिकोन त्या महापुरूषांचा होता. शिक्षणाची पेरणी झाली तर आधुनिक विचार पेरले जातील. विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होईल. त्याच बरोबर विवेकाची पेरणी झाल्याने जाती व्यवस्था, धर्माचे संघर्ष थांबतील, खर्‍या धर्माचा विचार शिक्षणातून रूजेल अशी अपेक्षा होती. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल. विचाराची उंची उंचावेल अशी धारणा होती. या समाजात असलेली जाती, धर्माची असलेली विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्था संपुष्टात आणणे यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला जात होता. शिक्षण घेतल्यानंतर माणसांची विवेकशीलता उंचावायला हवी असते. चांगले काय, वाईट काय याचा विचार करण्याची क्षमता प्रत्येक शिकलेल्या माणसात यायला हवी असते. शिक्षणातून मूल्यांच्या विचाराची वृध्दी होण्याची अपेक्षा असते. ती मूल्य जशी रूजली नाही त्याप्रमाणे शहाणपण आणि विवेकाची पेरणी करण्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत.

समाजात शिक्षणातून केवळ साक्षरता उंचावण्याचा विचार केला जात नाही हे सातत्याने बोलले जाते. शिक्षणाकडून विचारवंतानी अनेक प्रकारच्या अपेक्षा केल्या आहेत. आपल्याला मात्र साक्षरतेच्या पलिकडे अद्याप तरी जाता आलेले नाही हेही वास्तव आहे. शिक्षणातून व्यक्तीचे मनाची जडणघडण होत असते त्याप्रमाणे राष्ट्राची जडणघडण होत असते. समाजात शिक्षणाचा आलेख वाढतो आहे आणि त्याचा परिणाम समाजमनावर होतो आहे हे आपल्या सामाजिक जीवनातून प्रतिबिंबीत होण्याची गरज आहे. जेव्हा समाजातील गुन्हेगारीचा आलेख घटत जातो. न्यायालयाची संख्या कमी होत जाते, पोलिसांची संख्या कमी होत जाते तेव्हा त्या समाजात शिक्षण रूजले आहे असे म्हणता येते. हा आलेख घटत जाणे याचा अर्थ समाजात शहाणपणाची पेरणी योग्यप्रकारे झाली आहे. विवेकाची पेरणी यशस्वी झाली आहे. मात्र एकिकडे शिक्षण वाढत जाणे आणि दुसरीकडे तुंरूग, पोलीस, न्यायलायांची संख्या वाढत जाणे याचा अर्थ शिक्षणाच्या पदव्या घेणारी माणस वाढली मात्र शिक्षण अपयशी ठरले आहे. ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होत नाही अशी कोणतीही गोष्ट व्यर्थच म्हणायला हवी.त्यामुळे वर्तमानात केवळ शिक्षण संस्थाची संख्या वाढवून समाज व राष्ट्राची प्रगती साध्य करता येणार नाही. त्यामुळे शिक्षणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. आज विचार केला नाही तर उद्याचे भविष्य काळोखात गडप होण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -