घरफिचर्ससारांशएकत्र कुटुंब पद्धतीतून शेती विकास

एकत्र कुटुंब पद्धतीतून शेती विकास

Subscribe

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शेतकरी आणि त्याचे पूर्ण कुटुंब एकत्र नांदतात. त्यात चार-पाच मुले, त्याची पत्नी, सुना आणि लहान मुले अशा पद्धतीची ढोबळमानाने रचना आहे. हे एक मोठे पण एकत्र असणारे कुटुंब शेती विकासास मोठ्या प्रमाणावर मदत करते. या पद्धतीत घरातल्या घरात जास्त श्रमिकांची उपलब्धता होते. अशा वेळी श्रमिकांवरील खर्च वाचतो. घरातील व्यक्तींनी काम केल्यामुळे एक प्रकारचा विश्वास निर्माण होऊन शेतमालाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. मोठ्या प्रमाणावर असणारी जमीन एकत्रपणे वापरता येते.

–प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

भारतीय शेती ही विशेषत: ग्रामीण भागात दिसून येते. शहरी भागातील शेतीचे स्वरूप त्या मानाने मर्यादित आहे. ही भारतीय शेती नानाविध समस्यांनी ग्रासलेली आहे. भारतीय समाजरचनेचा महत्त्वाचा भाग असणार्‍या एकत्र कुटुंब पद्धतीचे आज कमी होणारे प्रमाण किंवा होऊ पाहणारा र्‍हास आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे वाढणारे प्रमाण याचा शेती विकासावर विपरीत परिणाम होतो. यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा र्‍हास थांबविणे काळाची गरज आहे. त्यावरदेखील शेती विकास अवलंबून आहे.

- Advertisement -

ग्रामीण भाग आणि एकत्र कुटुंब पद्धती हे एक समीकरणच आहे, किंबहुना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शहरी भागातही एकत्र कुटुंब पद्धती आहे, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. भारतीय संस्कृतीची शान असणार्‍या एकत्र कुटुंब पद्धतीला आजच्या जमान्यात घरघर लागली असून ही पद्धती हळूहळू कमी होऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेतीच्या विकासाला जी मदत होत होती किंवा होत आहे त्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शेती विकासाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी दिसतो. शेतजमिनीच्या विभाजनाच्या आणि तुकडीकरणाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीच्या वाढणार्‍या किमती होय. जमिनीच्या वाढणार्‍या किमतींमुळे मोठी शेतकरी कुटुंबे विभक्त होत आहेत. हे प्रमाण कमी करणे व थांबविणे महत्त्वाचे आहे.

शेतजमिनीचे विभाजन व तुकडीकरण झाल्यास मनुष्यबळ, शेतजमीन, शक्तीसाधने यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या घटकांमध्ये विभाजन होते. त्यांचे श्रेष्ठत्व कमी होते. याचा विपरीत परिणाम शेती उत्पादनावर होतो. शेतीचे उत्पादन संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ठ्या घटते.

- Advertisement -

एकत्र कुटुंब पद्धतीत शेतकरी आणि त्याचे पूर्ण कुटुंब एकत्र नांदतात. त्यात चार-पाच मुले, त्याची पत्नी, सुना आणि लहान मुले अशा पद्धतीची ढोबळमानाने रचना आहे. हे एक मोठे पण एकत्र असणारे कुटुंब शेती विकासास मोठ्या प्रमाणावर मदत करते. या पद्धतीत घरातल्या घरात जास्त श्रमिकांची उपलब्धता होते. अशा वेळी श्रमिकांवरील खर्च वाचतो. घरातील व्यक्तींनी काम केल्यामुळे एक प्रकारचा विश्वास निर्माण होऊन शेतमालाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. मोठ्या प्रमाणावर असणारी जमीन एकत्रपणे वापरता येते. तिचे तुकडीकरण न होता एकसंध जमिनीवर पिके घेता येतात.

विनाकारण बांध बंदिस्तीखाली सुपीक जमीन वाया न जाता त्याची शेती उत्पादन वाढीसाठी मदत होते. याच पद्धतीमुळे भांडवलाची उपलब्धता किंवा पैशांची उभारणी मोठ्या प्रमाणावर होते. त्याचा उपयोग शेती विकासासाठी करता येतो. त्यात विहीर बांधणे, जमीन सपाटीकरण, शेततळे, पाईपलाईन, शेतीची इतर अवजारे व यंत्रे खरेदी करणे, द्राक्षे किंवा इतर बागेची बांधणी करणे, शेतमाल साठवणूक, बैल, बैलगाडी यांची खरेदी, बियाणे, खते, कीटकनाशके यांची खरेदी करता येते तसेच इतर प्रकारचा खर्च जसे लग्नकार्य, घरबांधणी यावरदेखील खर्च करता येतो.

शेतीच्या विविध कामांची कुटुंबातील व्यक्तींच्या आवड आणि पात्रतेनुसार चांगल्या प्रकारे विभागणी करता येते आणि तीच कामे त्यांनी वर्षानुवर्षे केल्यामुळे त्या कामात त्यांना एक हातोटी आणि कौशल्य प्राप्त झाल्यामुळे ती कामे चांगली होण्यास मदत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येते. त्यासाठी वेळ किंवा पैसा सहजासहजी कमी पडत नाही. अशा प्रकारे चांगल्या शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे भविष्यकालीन शेती विकासाचा तो आधार ठरतो. याच मुलांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवता येते. त्यानंतर त्यांच्याकडून परिवाराला आणि शेती विकासाला एक नवी दिशा प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धतीत बरेच फायदे असताना त्यातील किरकोळ दोष आपण कमी करून किंवा दुर्लक्षित करून एकत्रीकरणाचा फायदा शेतीसाठी कसा घेता येतो याकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -