घरफिचर्ससारांशपंढरीशी जारे आल्यानो संसारा...

पंढरीशी जारे आल्यानो संसारा…

Subscribe

महाराष्ट्राच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवणारी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी! ज्ञानदेव-नामदेवांच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे. वारकरी पंथाने हिला अधिक प्रशस्त आणि विस्तारित करून या परंपरेला सुसंघटित केले. आपल्या तत्त्वज्ञानाच्या आणि भक्तीच्या प्रसारासाठी या परंपरेच्या वारकरी संतांनी अशा पद्धतीने उपयोजन केले की त्यांच्या या व्यवस्थापन, लोकसंघटन आणि प्रसार कौशल्याला नमन करायला हवे. अलौकिक आणि दुर्मीळ असा आनंद वारीत सामील झाल्याने आणि पांडुरंगाला डोळा भरून पाहिल्याने मिळतो, म्हणून तर संत तुकोबांनी म्हणून ठेवले आहे, ‘पंढरीशी जारे आल्यानो संसारा’.

– डॉ. अशोक लिंबेकर

‘महाक्षेत्र महीवरी। अनुपम्य इची थोरी। धन्य धन्य वारकरी। तुका म्हणे तेथीचे।’ असे म्हणत या महाक्षेत्राचे आणि तेथील भक्तीसागरात चिंब होणार्‍या वारकर्‍यांचे महिमान तुकोबांनी येथे गायले आहे. आम्हा घरी धन शब्दाचेची रत्ने अशी प्रातिभथोरवी असणार्‍या शब्दप्रभू तुकोबांकडे पंढरीच्या आषाढी वारीची महती गाण्यासाठी शब्द नाहीत. एकूणातच हा भक्तीसोहळा अनुपम्य आहे असा निर्वाळा येथे त्यांनी दिला आहे. यावरून पंढरीच्या या अलौकिक आणि विश्व प्रसंशनीय, अद्भुत जगातील एकमेवाद्वितीय परंपरेचे महत्त्व लक्षात येते.

- Advertisement -

गेल्या ७००-८०० वर्षांपासून वारीची ही भक्तीगंगा दर आषाढी-कार्तिकीला दुथडी भरून वाहत आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवणारी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी! ज्ञानदेव-नामदेवांच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे. वारकरी पंथाने हिला अधिक प्रशस्त आणि विस्तारित करून या परंपरेला सुसंघटित केले. आपल्या तत्त्वज्ञानाच्या आणि भक्तीच्या प्रसारासाठी या परंपरेच्या वारकरी संतांनी अशा पद्धतीने उपयोजन केले की त्यांच्या या व्यवस्थापन, लोकसंघटन आणि प्रसार कौशल्याला नमन करायला हवे.

आषाढी वारी ही वारकरी पंथातील भाविकांच्या चार वारकर्‍यांपैकी प्रमुख वारी आहे. हा महिना म्हणजे वर्षाकालाचा प्रारंभ! निसर्गरम्य वातावरण आणि आकाशभर घनगर्द नभांची भरती. वसुंधरेवर घननीळाची मुक्त बरसात. या दिवसात सारे तन, मन उल्हसित झालेले असते, पण याबरोबरच एक अनामिक हुरहूरही मनात दाटलेली असते. का कळत नाही! या भावविभोर मनाच्या आणि पृथ्वी आकाश भेटीच्या पार्श्वभूमीवरच महाकवी कालिदासाला मेघदूत सुचले. आपल्या प्रियेला भेटण्याची जशी उत्कट ओढ कालिदासाला लागली होती अशीच पांडुरंगाच्या भेटीसाठी या काळात त्याच्या भक्ताचे हृदय गहिवरून येते. फरक एवढाच की ही ओढ, हे प्रेम विशुद्ध असते. ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ ही विशुद्ध आस घेऊन मग तो पंढरीच्या वाटेला लागतो.

- Advertisement -

हे वर्षानुवर्षे चालू आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा। जावे पंढरीसी आवडे मनाशी। कई एकादशी आषाढी ये। तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी। त्याची चक्रपाणी वाट पाहे।’ एकदा की विठ्ठलभेटीची आस लागली की मग कोणताच सोहळा मनाला आवडत नाही. आषाढीचे वेध लागतात आणि अशी आर्त भावना असणार्‍यांचे पाय वारीकडे वळतात. मग सुरुवात होते ती सामूहिक तीर्थाटनाला. अनेक भागातून दिंड्या, पालख्या, एकाच दिशेने वाटचाल करू लागतात. तेव्हा या महिन्यात महाराष्ट्राचा सारा आसमंत भाग्य पताकांनी आणि वैष्णवाच्या मांदियाळीने, ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने, हरिनामाने दुमदुमून जातो.

हा सोहळा अनुपम्य आहे. निसर्गाच्या रम्य सहवासातील ही सामूहिक ऐक्याची वाटचाल ज्या भाग्यवंताच्या वाट्याला येते तो या जन्मातच स्वर्गसुख अनुभवत असतो. जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्यासी पंढरीची। असे हे सुख जीवनातील सर्व क्षणभंगुर सुखापेक्षा परमोच्च सुख असते आणि ते मिळण्यासाठी त्या व्यक्तीचेही काही संचित लागते. त्याशिवाय या अनुपम्य सुखाचा लाभ होत नाही. हा प्रत्यक्ष मोक्षाचा मार्ग आहे. या वारीच्या रूपाने मोक्षपदाची वाटचाल संतांनी सामान्यास घडवली. मराठी संतांनीही या वारीची मुक्तवाणीने कीर्ती गायली आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘तेथे सुखाची वसती। गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती। जे गर्जती हरिनामे। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे।’ मोक्ष प्राप्तीचा एवढा सुलभ मार्ग वारकरी संतांनी मराठी जनतेस दर्शवला.

हरिनामाच्या गजरात, भजन, कीर्तनाच्या व सामूहिक समतेच्या समेवर चाललेली ही नादमधूर आणि लयबद्ध पदयात्रा आपल्या सांस्कृतिक संचितातील अनमोल ठेवा आहे. येथे सर्व भेद विसर्जित होऊन सर्वच लहानथोर माउली म्हणत एकमेकांच्या पायी लागतात. वारीइतके सामाजिक समतेचे दुसरे व्यासपीठ बघायला तरी मिळते का? म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ‘धरिता पंढरीची वाट। नाही संकट मुक्तीचे। वंदू येती देव पदे। त्या आनंदे उत्साहे।’ कर्मकांड सांडून ही सुलभ भक्ती वारकरी संतांनी आपणास शिकवली. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल विश्वाला या भक्तिभावाने भुरळ घातली आहे. देशोदेशीचे संत, आध्यात्मिक गुरू, अभ्यासक हा जगातील एकमेव सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी या काळात वारीत सहभागी होतात. अभिमानाने सांगण्यासारखे जे काही आपल्याकडे आहे त्या सांस्कृतिक श्रीमंतीतील ही आपली अग्रनामांकित श्रीमंती!

संत ज्ञानदेवांसह सर्व वारकरी संतांनी वारीचा महिमा आपल्या अभंग गाथेतून वर्णिला आहे. विशेष म्हणजे यातील संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम यांच्या घराण्यात आधीपासूनच वारीची आणि विठ्ठलभक्तीची परंपरा होती. विठ्ठलभक्तीचा हा वारसा या संतांना आपल्या पूर्वजांपासूनच मिळाला. अनेकांनी तसे आपल्या अभंगाद्वारे प्रमाण दिले आहे. उदा ‘पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।’ असा वारीबद्दलच्या आपल्या घरातील परंपरेबरोबरच जो वारकरी आहे त्याला इतर कोणत्याही तीर्थाला जायची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन संत तुकाराम करतात, तर आमुचिये कुळी पंढरीचा नेम, असे संत एकनाथांनी म्हटले आहे.

मराठी संतांच्या याच भक्ती विचारांना प्रमाण मानून असंख्य भक्तगण नित्यनेमाने दरवर्षी वारीत सहभागी होऊन पंढरीच्या भक्तीसुखाचा आनंद लुटत असतात. खरेतर हे दिवस शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात, पण तरीही वारीत खंड न पडू देता जगण्याची ऊर्जा घेण्यासाठी मराठी माणूस या शक्ती आणि भक्तीपीठाकडे झेपावत असतो. महाराष्ट्रातील तमाम कृषकांचा हा खरा पाठीराखा आहे. त्याचे दर्शन आणि पंढरीचा संग मराठी माणसाला नेहमीच जगण्याची प्रेरणा देत आला आहे. म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगा चरणी आपली सार्‍या देण्याची कथा व व्यथा वाहून तो त्याला फक्त पीकपाण्याशिवाय दुसरे काहीही मागत नाही.

या श्रद्धेच्या आणि आशेच्या मानसिक बळावर तो कसलीही तक्रार न करता पुन्हा पुढच्या वारीकडे डोळे लावून बसतो. मराठी लोकमानसातील स्थान असे अढळ आहे. वारीमध्ये ज्ञान, भक्ती आणि प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम दिसतो. या वाटचालीमध्ये भक्तीबरोबरच परस्परांबद्दलचा स्नेहभाव वृद्धिंगत होतो. ज्ञानदेवांच्या पसायदानातील भूता परस्परे जडो। मैत्र जीवांचे। हे मागणे पूर्ण होण्यासाठी वारीसारखे दुसरे साधन नाही. इथेच खर्‍या अर्थाने बंधुभावाची जोपासना होते. मानवतेच्या स्नेहज्योती इथेच प्रज्वलित होतात आणि सत्कर्माचा, मांगल्याचा परिमल आसमंत दरवळून टाकतो. इथे कोणीच लहान नसतो, थोर नसतो आणि गरिब-श्रीमंतीची दरी तर इथे पूर्णपणे सांधलेली असते.

सर्व भेदाच्या पार जाणारी ही वारी म्हणूनच सामाजिक समतेची, पर्यायाने स्वातंत्र्य, समता व बंधुतेची शिकवण देते. या अर्थाने वारी हे एक सामाजिक आणि मानवतेच्या मूल्यसंस्काराचे प्रवाही आणि मुक्त असे लोकविद्यापीठच ठरते यात कुठलाही संदेह उरत नाही. आपल्या मनातील सर्व प्रकारच्या दैन्यांचे, दु:खाचे आणि विवंचनेचे परिमार्जन व विरेचन वारीत होते. निसर्गाचा मुक्त सहवास, हरीभक्तीचे पावित्र्य आणि मानसिक विरेचन यामुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यामध्येही वारीचे महत्त्वाचे योगदान आहे, असे म्हणावे लागेल. संत तुकाराम याबाबत म्हणतात, ‘चला पंढरीशी जाऊ। रखमादेविवरा पाहू। डोळे निवतील कान। मना तेथे समाधान। संता महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी। तेथे तीर्थाचे माहेर। सर्व सुखाचे भांडार।’ अशा प्रकारे पंढरीच्या वारीमधून मिळणार्‍या मानसिक आणि शारीरिक आनंदाचे वर्णन संत तुकारामांनी केले आहे.

संत ज्ञानदेव तर वारीचे महत्त्व सांगताना सर्व कर्मकांडांना फाटा देऊन या सुलभ आणि फुकट म्हणजेच जिथे कोणताही आर्थिक व्यवहार नसतो अशा भक्तिमार्गाचा पुरस्कार करण्याचा आणि हा सोपा मार्ग अनुसरण्याचा सल्ला देतात. वारकरी पंथ आणि वारीचे प्रयोजनही त्यांच्या पुढील उक्तीतून समजते. ते म्हणतात, ‘पंढरीचे वाटे अनंत घडती याग। वैकुंठीचा मार्ग तेणे संगे। जप तप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म। हे जाणताती वर्म संतजन। भक्तिमार्ग फुकट। आनंदाची पव्हे। लागलीसे सवे पुंडलिका। दिंडी टाळ घोळ गरुडटाकियाचे भार। वैष्णवाचे गजर जयें नगरी।’ संत ज्ञानदेवांच्या या अभंगाला स्मरूनच वैष्णवाचे भार पंढरपुरात दाखल होतात. ‘माझे जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी’ असा वारीबद्दलचा सार्थ अभिमान संत ज्ञानदेव अभिव्यक्त करतात. इतकेच नव्हे तर जे या वारीत नित्यनेमाने सहभागी होतात त्यांचे कुळ, त्यांचा जन्म खरोखरीच धन्य आहे हा दाखलाही देतात. धन्य कुळ धन्य जन्म। जयासी पंढरीचा नेम।

वारकरी संतांनी दर्शवलेला हा सन्मार्ग मराठी माणसाने मोठ्या आनंदाने स्वीकारून वर्षानुवर्षे तो प्रशस्त करीत नेला. महाराष्ट्राच्या सत्शील, सोशिक, सदाचारी, समृद्ध आणि सुसंस्कृत जडणघडणीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे आणि वारीचे मोठे योगदान आहे. संत तुकारामांनी तर इतर कोणतेही भक्ती व्यापार करण्यापेक्षा फक्त दोनच बाजार करण्याचा सल्ला मराठी माणसांना दिला तो मोठा लक्षवेधी आहे. ‘आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट। पुरे दोन्हीच बाजार। न लगे आणिक व्यापार,’ संत बहिणाबाईने वारीबद्दल पुढील उद्गार काढले आहेत, ‘चालता पाउल पंढरीच्या वाटे, ब्रह्मसुख भेटे रोकडेची। दिंडी ध्वजा भार चालती अपार। मृदंग गंभीर स्वरश्रुती। हमामा हुंबली घालिती परवडी। होऊन उघडी विष्णुदास। बहेणी म्हणे ऐसा आनंद वाटेचा। कोणता दैवाचा देखे डोळा’ बहिणाबाईंच्या या उक्तीप्रमाणे सर्वच संतांनी वारीतील ब्रह्मानंदाचे वर्णन केले आहे. हा दुर्मीळ आनंद वारीत आणि पांडुरंगाला डोळा भरून पाहण्यात मिळतो म्हणून तर संत तुकोबांनी म्हणून ठेवले आहे ,‘पंढरीशी जारे आल्यानो संसारा’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -